बारामती येथे येत्या आठवडय़ात होत असलेल्या अ. भा. मराठी नाटय़ संमेलनाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीची मातृसंस्था म्हणविणाऱ्या, परंतु प्रत्यक्षात तसा व्यवहार न करणाऱ्या नाटय़ परिषदेच्या दृष्टिकोनात गेल्या दोन वर्षांपासून काही सकारात्मक बदल होत आहेत. त्यांचा परामर्श घेणारा लेख..
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद ही समस्त मराठी रंगभूमीची आणि रंगकर्मीची मातृसंस्था आहे असे जरी म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र तशी नाही. म्हणजे आत्ता-आत्तापर्यंत तरी नव्हती. कारण कायम ती व्यावसायिक नाटकवाल्यांच्याच ताब्यात राहिलेली आहे.  अगदी सुरुवातीपासून व्यावसायिक नाटकवाल्यांचेच तिच्यावर वर्चस्व राहिले असले तरी प्रारंभी रंगभूमीच्या निरनिराळ्या प्रवाहांमध्ये सवतासुभा नव्हता. नाटक करणारे बहुतेक नाटय़कर्मी नाटय़ परिषदेच्या मांडवाखाली एकत्र नांदत होते. परंतु गेल्या २५-३० वर्षांत मात्र अ. भा. मराठी नाटय़ परिषद ही व्यावसायिक नाटय़कर्मीच्या, त्यातही नाटय़निर्मात्यांच्या (मोहन जोशींच्या काळात कलाकारांच्या!) कह्य़ात गेली आणि तिने रंगभूमीच्या अन्य प्रवाहांशी आपले नाते तोडले. नाटय़ परिषदेच्या संलग्न संस्था म्हणून नाटय़निर्माता संघ, कलाकार संघ, हौशी रंगमंच संघटना, नाटककार संघ अशा विविध संस्था जरी कार्यरत असल्या, तरी नाटय़ परिषदेकडून त्यांना बरोबरीच्या नात्याने कधीच वागवले जात नाही. (त्यातल्या त्यात नाटय़निर्माता संघ हीच काय ती समर्थपणे कार्यरत आहे. बराच काळ निर्मात्यांचीच परिषदेतही सत्ता असल्याने त्यांना डावलण्याचा प्रश्नच नव्हता. मोहन जोशींच्या कार्यकाळात मात्र त्यांना थोडेसे उपेक्षेचे दिवस आले.) नाटय़ परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी मात्र त्यांचा पाठिंबा आणि सहकार्यासाठी त्यांचे लांगुलचालन केले जाते. ही झाली व्यावसायिक रंगभूमीशी संबंधित असलेल्यांची कथा! मग रंगभूमीच्या वेगवेगळ्या प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची नाटय़ परिषदेने दखलही न घेतली तर त्यात नवल काय?
प्रायोगिक व समांतर रंगभूमी, हौशी रंगभूमी, कामगार रंगभूमी, दलित रंगभूमी, बालरंगभूमी अशा रंगभूमीच्या विविध प्रवाहांना नाटय़ परिषदेच्या लेखी कधीही महत्त्व नव्हते. या रंगप्रवाहांतील कर्तृत्ववान कलाकार व यशस्वी नाटय़कृतींना कुणा पुरस्कर्त्यांनी पुरस्कार ठेवले आहेत म्हणूनच फक्त वार्षिक पुरस्कार समारंभाच्या वेळी परिषदेला काय ती त्यांची आठवण होते. तरीही या घटक संस्था स्वत:ला नाटय़ परिषदेशी संलग्न ठेवण्याकरता मनापासून धडपडतात. आपल्या तक्रारी- गाऱ्हाणी परिषदेकडे मांडतात. नाटय़ परिषदेकडून त्याकामी काही मदत होईल अशी अपेक्षा बाळगतात. तोंडी लावण्यापुरती नाटय़ परिषद त्यांना मदत करतेही; परंतु परिषदेच्या एकूण व्यवहारात त्यांना फारसे स्थान नाही, हे वास्तव आहे.   
मच्छिंद्र कांबळी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष असताना निर्मात्यांचेच परिषदेवर वर्चस्व होते. निर्मात्यांचे हितसंबंध जपणे, परिषदेचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा आयोजिणे आणि नाटय़ संमेलन भरविणे यापलीकडे नाटय़ परिषद तेव्हा काहीच करीत नव्हती. अपूर्ण नाटय़संकुलाचे तुणतुणे वाजवणे, हेच त्यावेळी परिषदेचे एकमेव कार्य होते. एखाद्या नाटकाच्या बाबतीत दहशतीने सेन्सॉरबाह्य़ सेन्सॉरशिप लादण्याचा प्रयत्न झाला तरी त्यावर आवाज उठवण्याचे काम मातृसंस्था म्हणून नाटय़ परिषद करीत नसे. दोन निर्मात्यांमध्ये किंवा निर्माते आणि कलाकार यांच्यामध्ये एखाद्या गोष्टीवरून वादविवाद झाल्यास त्यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावण्याची आवश्यकताही नाटय़ परिषदेला कधी वाटत नसे. ज्याने त्याने आपले काय ते निस्तरावे, अशीच शहामृगी भूमिका परिषद अशा प्रसंगी घेई. आजही या परिस्थितीत फारसा मोठा फरक पडला आहे अशातला भाग नाही. परंतु गेल्या दोनएक वर्षांत नाटय़ परिषद स्वत:ला जाणीवपूर्वक बदलू पाहते आहे असे प्रकर्षांने जाणवू लागले आहे.
मोहन जोशी नाटय़ परिषदेच्या अध्यक्षपदावरून गेल्यावर हेमंत टकले यांनी अध्यक्षपदाची आणि विनय आपटे यांनी उपाध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. आणि त्यांनी प्राधान्याने आजवर नाटय़ परिषदेसंबंधात रंगभूमीच्या अन्य प्रवाहांचे जे आक्षेप आहेत, त्यांचे आपल्या परीने निरसन करण्याचे ठरवले. याचाच एक भाग म्हणून नाटय़संमेलनाचे ठरीव, साचेबद्ध, केवळ उत्सवी असलेले स्वरूप बदलणे आणि त्यात रंगभूमीच्या जास्तीत जास्त घटकांना समाविष्ट करण्याच्या दिशेने त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यातूनच गेल्या वर्षी सांगली येथील नाटय़संमेलनात प्रायोगिक रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मी अमोल पालेकर यांना उद्घाटक म्हणून सन्मानाने बोलावण्यात आले. आजवर प्रायोगिक व समांतर रंगभूमी म्हणजे ‘अस्पृश्य रंगभूमी’ अशीच नाटय़ परिषदेच्या धुरिणांची समजूत होती. प्रायोगिक तसेच समांतर नाटकवाल्यांनाही नाटय़ परिषदेशी फार काही देणेघेणे नव्हते. तेही आपल्या गुर्मीत असत. आपण करतो तीच श्रेष्ठ नाटके अशी त्यांचीही समजूत होती. त्यामुळे तेही परिषदेला भाव देत नसत.
मोहन जोशी नाटय़ परिषदेत सत्तेवर आले तेव्हा बुजुर्ग रंगकर्मी दामू केंकरे यांनी प्रायोगिक आणि बालरंगभूमीला नाटय़ परिषदेच्या नाटय़संकुलात योग्य ते स्थान मिळावे म्हणून जोरदार आग्रह धरला. मोहन जोशी यांनी बराच काळ त्यांना आश्वासनांवर झुलवत ठेवून अखेरीस साफ ठेंगा दाखवला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रायोगिक व समांतर रंगभूमीवरील रंगकर्मीनी दामू केंकरे, विजय तेंडुलकर प्रभृतींच्या नेतृत्वाखाली प्रायोगिक आणि बालरंगभूमीला नाटय़संकुलात हक्काचे घर मिळावे म्हणून मोठे आंदोलन केले. परंतु या आंदोलनालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. ज्या दामू केंकरे यांच्या पाठिंब्यामुळे मोहन जोशी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष झाले, त्यांनाच नंतर त्यांनी अडगळीत सारले. त्यांच्या सर्व विधायक सूचनांना मोहन जोशी यांनी केराची टोपली दाखवली. परिणामी नाटय़ परिषद आपली नाही, हा प्रायोगिकवाल्यांचा समज आणखीनच दृढ झाला.
या सगळ्या पाश्र्वभूमीवर गेल्या दोन वर्षांत नाटय़ परिषदेची सूत्रे हाती घेतल्यावर नव्या नेतृत्वाने सर्वाना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेऊन प्रायोगिकांना जवळ करण्याचे धोरण राबवायला सुरुवात केली आहे. त्याचाच परिपाक म्हणजे गेल्या वर्षी अमोल पालेकर यांची संमेलनाच्या उद्घाटकपदी झालेली निवड होय.
अर्थात पालेकरांनी आपल्या भाषणात नाटय़ परिषदेकडून प्रायोगिकांच्या इतक्या वर्षांच्या झालेल्या उपेक्षेला खणखणीतपणे वाचा फोडली. त्यासंबंधात त्यांनी नाटय़ परिषदेवर टीकेचे घणाघाती आसूडही ओढले. परंतु तरी नाटय़ परिषदेच्या विद्यमान धुरिणांनी त्यांचा हा रास्त राग सहानुभूतीपूर्वक समजून घेतला. पालेकरांच्या सकारात्मक सूचनांचा निश्चितपणे स्वीकार केला जाईल, असे उलटपक्षी ठोस आश्वासनही दिले. त्यामुळे रंगभूमीच्या निरनिराळ्या प्रवाहांमध्ये एक सौहार्दाचे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले; जे आजपर्यंत दुरापास्त होते.   
यंदा तर बारामती येथील येत्या नाटय़संमेलनाचे अध्यक्षपदच प्रायोगिक रंगभूमीवरचे एक महत्त्वाचे नाटय़कर्मी असलेले डॉ. मोहन आगाशे भूषविणार आहेत. प्रायोगिकांच्या आजवरच्या उपेक्षेचे परिमार्जन नाटय़ परिषद करू इच्छिते, असा स्पष्ट संदेश त्यामुळे निश्चितपणे दिला गेला आहे. नाटय़ परिषदेची नवी प्रस्तावित घटना सध्या तांत्रिक अडचणीमुळे अजूनही अस्तित्वात येऊ शकलेली नाही. ती लागू झाल्यास आजपावेतो केवळ नाटय़ परिषदेच्या घटनेच्या चौकटीत बसत नाहीत म्हणून अनेक दिग्गज रंगकर्मी नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदापासून वंचित राहिले, त्यांची यापुढच्या काळात अध्यक्षपदी वर्णी लागू शकेल. अर्थात नाटय़ परिषदेच्या धुरिणांची तशीच तीव्र इच्छा असती तर याआधीही घटनेचा बाऊ न करता सर्वसहमतीने विजय तेंडुलकरांपासून डॉ. श्रीराम लागूंपर्यंत अनेक कर्तृत्ववान नाटय़कर्मी नाटय़संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले असते. परंतु ते होणे नव्हते, हेच खरे. असो.
‘नाटय़संमेलन म्हणजे उत्सव.. उरुस’ अशीच समजूत असलेल्या आजवरच्या नाटय़ परिषदेच्या अध्यक्षांनी संमेलनात ग्लॅमर असलेल्या हिंदी चित्रपट तारे-तारकांना पाहुणे म्हणून बोलावण्यातच धन्यता मानली. ज्यांना धड मराठी बोलता येत नाही, ज्यांना नाटय़ संमेलन म्हणजे काय, हेही माहीत नाही अशा या तथाकथित वलयांकित कलाकारांना बोलावण्याने काय साध्य झाले, हे ते सुमार वकुबाचे नाटय़ परिषदेचे तत्कालीन अध्यक्षच जाणोत. यावर्षी मात्र मणिपूरचे दिग्गज रंगकर्मी रतन थिय्यम संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मराठी रंगभूमी आजघडीला देशातील प्रमुख रंगभूमी असली तरी तिचा अन्यभाषिक रंगभूमीशी आदानप्रदान, संवाद थांबला आहे. तो यानिमित्ताने पुन्हा सुरू व्हावा अशी अपेक्षा आहे. भारतातील अन्य प्रांतांतील रंगभूमीवर आज काय चालले आहे, तिथले रंगकर्मी कोणती नाटके करताहेत, आपली मराठी रंगभूमी भारतीय रंगभूमीच्या संदर्भात नेमकी कुठे आहे, याचा तौलनिक अभ्यास  करण्यासाठी नाटय़ परिषदेने प्रोत्साहन द्यायला हवे. या सगळ्याची ंमाहिती नाटय़ परिषदेच्या धुरिणांना असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या प्रांतोप्रांतीच्या रंगभूमीवरील चांगली नाटके मराठी रंगभूमीवर येण्यासाठी आणि आपली उत्तम नाटके अन्यभाषिक रंगभूमीवर होण्यासाठी मध्यस्थाचे वा दुवा होण्याचे काम नाटय़ परिषदेकडून अपेक्षित आहे. यावर्षी अन्य भाषांतील काही नाटके संमेलनात सादर होणार आहेत. परंतु त्यांची व्याप्ती आणखीन वाढवायला हवी.
स्वत:ला ‘अखिल भारतीय’ म्हणवून घेणाऱ्या नाटय़ परिषदेच्या महाराष्ट्राबाहेरच्या मोजक्याच शाखा आज बंद पडल्या आहेत. न्यू जर्सीची नाटय़ परिषद शाखा ही घटनाबाह्य़ होती. तिने भरवलेले विश्व नाटय़ संमेलनही त्यामुळे बेकायदेशीरच होते. परंतु नाटय़ परिषदेसह सर्वानीच ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ म्हणत हे वादंगाने गाजलेले संमेलन त्यावेळी कसेबसे पार पाडले होते. आज न्यू जर्सीची नाटय़ परिषद शाखा सक्रीय आहे की नाही, कळायला मार्ग नाही. असे असले तरी स्वत:ला ‘अ. भा.’ म्हणवून घेणाऱ्या नाटय़ परिषदेच्या महाराष्ट्राबाहेरील शाखा पुन्हा सक्रीय करण्याचे मोठे आव्हान परिषदेसमोर आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले  असल्याचे सांगण्यात येते. बारामतीच्या संमेलनात नाटय़ परिषदेच्या महाराष्ट्राबाहेरील शाखांनी आपले प्रतिनिधी पाठवावेत म्हणून त्यांना पत्रे पाठविण्यात आली आहेत. त्याचबरोबर राज्यातील निरनिराळ्या विद्यापीठांतून नाटय़शास्त्राचे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नाटय़ संमेलनात सक्रीय सहभागी करून घेण्याकरिता संबंधित नाटय़शास्त्र विभागांना पत्रे धाडण्यात आली आहेत. अशा तऱ्हेने नाटय़ परिषदेने आपले कार्यक्षेत्र व्यापक करण्यासाठी कंबर कसली आहे. असे हे एकुणात सकारात्मक चित्र आज तरी दिसते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

  रवींद्र पाथरे
ravindra.pathare@expressindia.com

  रवींद्र पाथरे
ravindra.pathare@expressindia.com