ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा शपथ घेणाऱ्या नवीन पटनाईक यांना राज्याची उडिया ही भाषा बोलताही येत नाही. डून स्कूलमध्ये शिक्षण घेतलेले पटनाईक हे तरीही एक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. गेली चौदा वर्षे ओडिशातील सगळ्या राजकारण्यांना बाजूला करत पटनाईक यांनी सत्ता आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले आहे. ज्या भारतीय जनता पक्षाबरोबर एके काळी राज्यातील सत्तेत भागीदारी केली होती, त्या भाजपला दूर ठेवून आपले वेगळेपण सिद्ध करणे ही त्यांच्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. लोकसभा निवडणुकीत ओडिशातील २१ मतदारसंघांपैकी २० ठिकाणी बिजू जनता दल या पक्षाला विजय संपादन करता आला, तो केवळ नवीन पटनाईक यांच्या लोकप्रियतेच्या आधारावर. संपूर्ण देशात मोदी लाट असताना ओडिशाने मिळवलेले हे यश निश्चितच नजरेत भरणारे आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला १४७ पैकी ११७ जागांवर विजय मिळाला. मागील निवडणुकीत या पक्षाला १०३ जागा मिळाल्या होत्या. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात मिळालेला हा विजय लोकसभा निवडणुकीतही प्रतिबिंबित झाला, हे महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगळ्या असतात, असे सांगत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ज्या खिरापतींची तयारी केली आहे, ती पाहता ओडिशासारखे यश महाराष्ट्राला का मिळाले नाही, याचे उत्तर मिळू शकते. नवीन यांचे वडील बिजू पटनाईक हे ओडिशाचे मुख्यमंत्री होते. वडिलांच्या निधनानंतर नवीन यांना राजकारणात येणे भाग पडले. वृत्तीने साहित्यिक असलेल्या नवीन पटनाईक यांचे तोपर्यंतचे आयुष्य ओडिशाबाहेर गेले होते, तरीही त्यांनी राजकारणात आल्यानंतर एकाच वर्षांत बिजू जनता दल या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपबरोबर युती करून त्यांच्या पक्षाने सत्ता हस्तगत केली. ही युती २००७ पर्यंत अस्तित्वात होती. ही युती तुटल्यानंतरही नवीन पटनाईक यांचे राजकीय वर्चस्व कमी झाले नाही. या राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेणाऱ्या पटनाईक यांनी तेथील बारा लाख विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी सायकलींचे वाटप केले. वरवर पाहता ही एक लोकप्रिय खेळी वाटू शकते, परंतु त्याचा मोठा परिणाम ओडिशातील नागरिकांमध्ये झाला. रघुराम राजन समितीच्या अहवालानुसार देशातील एक गरीब राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओडिशाचा विकास दर मात्र ९ टक्के आहे. राज्यातील महिला आणि आदिवासी हा पटनाईक यांचा खरा मतदार आहे, असे मानले जाते. त्यांच्यासाठी गेल्या चौदा वर्षांत अनेक योजना यशस्वीपणे राबवण्यात आल्या आणि त्याचा फायदा मतदानातून व्यक्त होताना दिसतो, असे तेथील नागरिकांना वाटते. राज्यातील साडेपाच लाख महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रशासनाने जे काम केले आहे, त्याचाही फायदा या पक्षाला सतत मिळतो आहे. कोणत्याही मोठय़ा प्रकरणात अडकू न देता आपला प्रादेशिक पक्ष बळकट करत राहण्याची पटनाईक यांची कार्यशैली देशातील अन्य राज्यांतील सत्ताधाऱ्यांपेक्षा वेगळी आहे. मागास राज्याचा शिक्का पुसून टाकण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकारकडून फारसे अर्थसाह्य़ न मिळताही पटनाईक यांनी तेथील राजकारणावरील आपले वर्चस्व जराही ढळू दिलेले नाही. जगन्नाथ पुरी, कोणार्कचे सूर्यमंदिर यांसारख्या प्राचीन ऐतिहासिक खुणांबरोबरच हिराकुड धरण आणि रुरकेलाचा पोलाद कारखाना या आधुनिक खुणा या राज्याचे वेगळेपण सिद्ध करणाऱ्या आहेत. देशाच्या राजकारणात फारसा रस न घेता स्वत:च्या राज्यावरील आपली पकड घट्ट करणाऱ्या नवीन पटनाईक यांचे चौथ्यांदा मुख्यमंत्री होणे, ही घटना अन्य राज्यांसाठी अभ्यासण्यासारखी आहे.
ओडिशाचे नावीन्य..
ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा शपथ घेणाऱ्या नवीन पटनाईक यांना राज्याची उडिया ही भाषा बोलताही येत नाही. डून स्कूलमध्ये शिक्षण घेतलेले पटनाईक हे तरीही एक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-05-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naveen patnaik novel of odisha