हृषीकेश दत्ताराम शेर्लेकर
जुनीच गोष्ट नव्या पद्धतीने करण्यापेक्षा एखादे नवीनच उत्पादन किंवा बाजारपेठ शोधणे, हे झाले डिजिटल रिइमॅजिनेशन. ते करायचे तर डिजिटल पर्याय शोधणे जमले पाहिजे, त्यासाठी हवे डिजिटल अप-स्किलिंग.
या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या की सामूहिक सर्जनशीलतेतून नवनिर्मिती करणे शक्य होईल..
या लेखमालिकेच्या शेवटच्या अध्यायातील शेवटून दुसऱ्या लेखापर्यंत आज आपण पोहोचलो आहोत. यात डिझाइन थिंकिंग, डिजिटल रिइमॅजिनेशन, डिजिटल अप-स्किलिंग या तंत्रपद्धतींबद्दल जाणून घेऊयात.
(अ) डिजिटल रिइमॅजिनेशन :
औद्योगिक क्रांती ४.० मधील डिजिटल विश्व निर्माण झाले आणि प्रत्येक गोष्ट ‘डिजिटल’ पर्यायात उपलब्ध होऊ लागली. त्यात उद्योग व उत्पादने, ग्राहक सेवा, औद्योगिक व वैयक्तिक देवाणघेवाण, संवाद, व्यवसाय प्रक्रिया आणि कार्यस्थळे, शिक्षण, मनोरंजन, कला सगळेच आले. स्पर्धात्मक पातळी उंचावण्यासाठी मग सगळे उद्योग आपल्या व्यवसायांना डिजिटल पर्याय शोधू लागले, ज्यात प्रामुख्याने पाच डिजिटल उपशाखा आणि सहा डिजिटल संकल्पना अंतर्भूत आहेत, ते खालीलप्रमाणे –
(१) डिजिटल उपशाखा : मोबाइल आणि अॅप्स, विदा-विश्लेषण, समाजमाध्यमे, क्लाऊड, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स.
(२) डिजिटल संकल्पना : व्यवसायाचे प्रारूप, उत्पादने आणि सेवा विभाग, ग्राहक वर्ग व बाजारपेठ, सेवा माध्यमे, व्यवसाय प्रक्रिया, कार्यस्थळे.
डिजिटल पर्याय शोधणे म्हणजे यातील एक किंवा अधिक उपशाखा वापरून एक किंवा अधिक व्यवसाय संकल्पनांचा नवीन डिजिटल पर्याय शोधणे. नवीन पर्याय हा फक्त जुनीच गोष्ट नव्या पद्धतीने करणे नसून एखादे नवीनच उत्पादन किंवा बाजारपेठ शोधणे, पूर्णपणे नवीन व्यवसायाचे प्रारूप उभे करणे हेदेखील असू शकते. थोडक्यात, निर्माण झालेल्या डिजिटल विपुलतेचा उद्योगवृद्धीसाठी वापर करणे असा याचा अर्थ होतो.
(ब) डिजिटल अप-स्किलिंग :
आता डिजिटल विपुलतेचा वापर करायचा असेल, तर सर्वप्रथम कर्मचाऱ्यांना नवीन डिजिटल पर्याय शोधणे जमले पाहिजे. त्यासाठी दोन गोष्टी यायलाच हव्यात, त्या म्हणजे –
(१) डिजिटल उपशाखांचे सखोल व्यावसायिक ज्ञान आणि त्या उद्योगाचा व्यावहारिक अनुभव.
(२) अर्थातच सर्जनशीलता, नवनिर्माण आणि सहानुभूती.
डिजिटल अप-स्किलिंग म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्यांना एक किंवा जास्त डिजिटल उपशाखांचे (मोबाइल व अॅप्स, विदा-विश्लेषण, समाजमाध्यमे, क्लाऊड, कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स, आयओटी अर्थात वस्तुजाल, इत्यादी) प्रशिक्षण देणे, बाहेरून सल्लागार नेमून त्यांच्याकरवी एकंदरीत रणनीती आखणे, डिजिटल पर्यायांचे डिझाइन, प्रत्यक्ष अंमलबजावणी, पुढे जाऊन सांभाळ, तसेच प्रशिक्षण आणि प्रकल्प व्यवस्थापन कंत्राटी स्वरूपात करून घेणे.
डिजिटल अप-स्किलिंगमध्ये कर्मचाऱ्यांचे विविध गट पाडून गरजेनुसार वेगवेगळे प्रशिक्षण देणे, त्यांना विविध प्रकल्पांत समाविष्ट करून घेणे असे उद्दिष्ट असते.
इथे काहींना प्रश्न पडला असेल की, ज्यांना तांत्रिक, संगणकविषयक ज्ञान फारच कमी असेल- त्यांनी काय करायचे? याचे उत्तर असे की, अशांनी आपले कार्यक्षेत्र आणि व्यावहारिक ज्ञान वापरून त्याच क्षेत्रात प्राथमिक प्रकारचे डिजिटल तंत्रज्ञान प्रशिक्षण तसेच सध्या त्या क्षेत्रात काय काय नवीन सुरू आहे, आदींचा अभ्यास व अवांतर वाचन करणे.
(क) डिझाइन थिंकिंग :
डिजिटल अप-स्किलिंग झाले तरी, नवीन डिजिटल पर्याय शोधण्यासाठी प्रचंड प्रमाणात सर्जनशीलता, नवनिर्माण आणि सहानुभूती जोडीला हवीच! ‘डिझाइन थिंकिंग’ नावाच्या कार्यपद्धतीमध्ये एक कार्यशाळा घेऊन, तीत विविध प्रकारचे कार्यात्मक तज्ज्ञ एकत्र आणून एका ‘टीम-वर्क’ पद्धतीने नवीन डिजिटल पर्याय शोधला जातो; त्याबद्दल थोडक्यात पाहू या..
डिझाइन थिंकिंग कार्यपद्धतीमध्ये सहा-चरण प्रक्रिया वापरतात : (१) सहानुभूती (२) व्याख्या (३) कल्पना (४) नमुना (५) चाचणी आणि (६) अंमलबजावणी. यातील पहिले चरण आहे सहानुभूतीचे- म्हणजेच समोरच्याच्या (ग्राहक, कर्मचारी, पुरवठादार, इत्यादी) भूमिकेत शिरून त्यांच्यासमोरील आव्हाने, कष्ट जाणून घेणे. पुढील कार्यपद्धतीमध्ये मग कल्पना- जिथे नवनिर्माण, सर्जनशीलता हे गुण उपयोगी येतात.. आणि त्यापुढील प्रक्रिया कुठल्याही प्रकल्प व्यवस्थापन स्वरूपात येतात.
वर वर सोप्पे वाटले तरी एखाद्याच्या भूमिकेत शिरून त्यांच्या समस्या समजून घेणे अत्यंत कठीण काम. तेच समोरचे आपल्यापेक्षा सामाजिक किंवा आर्थिकदृष्टय़ा खालच्या स्तरावरचे असले की मग तर ते आणखी कठीण होऊन जाते. इथेच शालेय शिक्षण, घरातील संस्कार आणि एकंदरीत स्वभाव, मानवी मूल्ये कामाला येतात.
डिझाइन थिंकिंग कार्यशाळेमध्ये एका ठिकाणी विविध स्थरांतील लोकांना एकत्र आणून नवनिर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ- (१) डिझाइन थिंकर, तज्ज्ञ व कार्यशाळा प्रमुख, (२) कार्यात्मक तज्ज्ञ.. व्यावहारिक अनुभव गाठीशी असलेले, (३) आयटी अभियंते, (४) ग्राहक, इत्यादी (ज्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत ते), (५) प्रशासन व प्रक्रिया कर्मचारी, (६) चित्रकला, संगीत, इत्यादींमध्ये निपुण असलेले काही तज्ज्ञ.. नवनिर्माण/ उजवा मेंदू कार्यक्षम असलेले, (७) डिजिटल सल्लागार, (८) प्रकल्प व्यवस्थापक व वरिष्ठ व्यवस्थापन.
लेखासोबत दिलेल्या तक्त्यात डिजिटल पर्याय निर्माण करण्यासाठी लागणारी साधने मांडली आहेत- डिझाइन थिंकिंग, डिजिटल रिइमॅजिनेशन, डिजिटल अप-स्किलिंग, डिजिटल संकल्पना आणि उपशाखांसकट!
लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
hrishikesh.sherlekar@gmail.com