|| हृषिकेश दत्ताराम शेर्लेकर
कृत्रिम प्रज्ञा किंवा ‘नवप्रज्ञे’चा वापर, उपयोजन हे वाढतच जाऊ शकतील.. कदाचित, मनुष्यबळ मुबलक असलेल्या भारतासारख्या देशात हे होणारही नाही; पण झाले तर? किंवा जिथे होईल तिथे? .. तिथे नवप्रज्ञेशी मानवी बुद्धीला सामना करावाच लागेल.. याचा फटका कुणाला बसेल आणि कोण तगेल?
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संशोधनाला दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास सुरुवात झाली असली तरी खरी प्रगती गेल्या दहा-वीस वर्षांतच झाली आहे. प्रचंड प्रगत, स्वस्त झालेल्या क्लाऊड कॉम्प्युटिंग, स्टोअरेज व डेटा नेटवर्कमुळे ही प्रगती दिसू-जाणवू लागली आहे. अलीकडेच केलेल्या एका चाचणीनुसार ‘गुगल एआय’चा (https://ai.google/) बुद्धय़ांक (आयक्यू) फक्त एखाद्या सहा वर्षांच्या मुलाइतकाच आहे असे सिद्ध झाले. यावरून आपण दोन अंदाज लावू शकतो : एक म्हणजे पुढील अवघ्या २०-२५ वर्षांत प्रगती अत्यंत झपाटय़ाने होईल आणि दोन- जागतिक पातळीवर योग्य कायदे, नियम न बनल्यास प्रचंड गरवापर सुरू होईल. त्यामुळेच, आजचा लेख आणि नवप्रज्ञा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच ‘एआय’च्या पुढील काही उपयोगांमुळे उद्योग, रोजगारांवर भविष्यात होणारे परिणाम, शक्यता आणि शिफारशी, सल्ले याविषयी.
खालील तक्त्यात विविध व्यवसाय दिसतील. नवप्रज्ञेवर आधारित तंत्र-उपयोजनांमुळे (एआय बेस्ड ऑटोमेशनमुळे) ज्यांच्यावर सर्वात प्रभाव पडू शकेल ते व्यवसाय ‘शक्यता निर्देशांक’ करून इथे मांडले आहेत. अपेक्षेनुसार अशी कामे ज्यांच्यात फारच कमी प्रमाणात बुद्धिमत्ता/ ज्ञान/ कौशल्य किंवा भावना/ कला/ सर्जनशीलतेची गरज पडते, ती भविष्यात कधी तरी रोबोट्स पूर्णपणे पार पाडू शकतील. त्यामुळे तीन गोष्टी नक्कीच होतील, एक म्हणजे अशा रोजगारांच्या संख्येत भविष्यात बरीच घट होईल. दोन- त्यामुळे प्रभाव पडलेली जनसंख्या जास्त करून अशा कामांकडे वळतील जिथे मानवी भावना/ संवाद/ स्पर्श किंवा नवकल्पना/ कला/ सर्जनशीलता वापरण्याची गरज असते आणि तिसरे- आताची बाल्यावस्थेतली पिढी मोठी होईल तोपर्यंत रोबोट्स सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य हिस्सा बनलेले असतील, जसा आजचा स्मार्टफोन मोबाइल व इंटरनेट.
यापुढे बघू शिफारसी, सल्ले म्हणजे वयोगटानुसार कोण काय काय उपाययोजना करू शकतील. त्यासाठी वरील तक्त्यामधील (उजवा कोपरा) सर्व २० चौकोन पाहा.
टीप : १) वरील तक्त्यात विविध व्यवसाय त्यांना लागणाऱ्या कौशल्यानुसार विभागले आहेत. अर्थातच सर्वच्या सर्व व्यवसायांचा उल्लेख शक्य नसल्यामुळे काही प्रातिनिधिक उदाहरणेच दाखविली आहेत.
२) वरील तक्त्यात मांडलेले मत पूर्णपणे माझे स्वत:चे असून ते निष्कर्ष माझा अभ्यास व जाहीरपणे उपलब्ध असणारे संशोधन यांवर आधारित आहे.
३) वरिष्ठ व कनिष्ठ असे शब्द जाणीवपूर्वक वापरले आहेत. वरिष्ठ म्हणजे फक्त २०-२५ वष्रे व्यावसायिक अनुभव नसून त्यामध्ये निष्णात असणे असा होतो. कनिष्ठ म्हणजे कितीही अनुभव गाठीशी असला तरीही नक्की काय करायचे ते सूचनाबद्ध स्वरूपात त्यांच्या वरिष्ठाला सांगावे लागते असे.
४) मुख्य म्हणजे परिणाम, शक्यता आणि प्रत्यक्ष वास्तविकतेमध्ये बरीच तफावत असू शकते. फक्त तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे म्हणून प्रत्येक जण ते तंत्रज्ञान अमलात आणेलच असे मुळीच नाही, जास्त करून भारतासारख्या देशात – जिथे मनुष्यबळ स्वस्त आणि तंत्रज्ञान महाग- तिथे तर अशा वापराची शक्यता आणखीच कमी.
५) कुठलाही तंत्रज्ञान-प्रकल्प सुरू करायच्या आधी गुंतवणुकीवरचा परतावा आणि स्पर्धात्मक फायदा किंवा कायदे-पालन व सुरक्षा अशा गोष्टींचे मूल्यमापन केले जाते. बरेचदा नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध असूनही व्यावसायिक समीकरण जुळत नसल्यामुळे प्रकल्प रेंगाळतात, सुरूच होत नाहीत.
या दुसऱ्या तक्त्यात ‘सध्याच्या कामाचे स्वरूप आणि कौशल्य’ वि. ‘वयोगट’ यांनुसार आलेख मांडलेला आहे. तुम्ही स्वत: कुठल्या विभागात येता, ते ठरवून त्यातील सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे.
१) हाय-रिस्क (अति जोखीम) : तरुणांनी आवड असेल अशा प्रकारचं समांतर-शिक्षण, उच्च-शिक्षण घेऊन हळूहळू कार्यक्षेत्र बदल करण्याचा प्रयत्न करावा. शिक्षण प्रत्येकाला शक्य होईलच असे नाही, त्यांनी आवडीचे पर्यायी व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने मेहनत घ्यावी, जेणेकरून रोजीरोटी फक्त रोजगारावरच अवलंबून आहे असे नको.
२) मध्यम-जोखीम : विद्यार्थ्यांनी शक्य असेल तर आवडीच्या छंदाची जोपासना करावी; भविष्यात नोकरी/ रोजगाराच्या जोडीला एक पर्यायी कार्यक्षेत्र, व्यवसाय निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.
३) लो-रिस्क : प्रौढांनी आवडीच्या छंदातून नोकरी/ रोजगाराच्या जोडीला एक पर्यायी कार्यक्षेत्र, व्यवसाय निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. पुढील पाच-दहा वर्षांत निवृत्तीचे वय असेल तर कमीत कमी घरात तंत्रज्ञानाला पोषक असे वातावरण बदल नक्कीच करा, पुढच्या पिढीसाठी.
प्रत्येक कार्यक्षेत्र आणि वयोगट यांनुसार सल्ले मांडण्याचा प्रयत्न तक्ता क्रमांक दोनमध्ये करण्यात आला आहे. म्हणजे बँकिंग, टेलिकॉम, आरोग्य, वकील, डॉक्टर, छोटे-मध्यम व्यवसाय इत्यादी. एक गोष्ट मात्र प्रकर्षांने जाणवते आहे : जसजशी कृत्रिम बुद्धिमत्ता वाढीस लागते आहे, तसतशी मानवी बुद्धिमत्तेची आपल्याच अस्तित्वासाठी कसोटी लागतेय. डार्वनिच्या सिद्धान्ताप्रमाणे ‘सव्र्हायवल ऑफ द फिटेस्ट’ – बलवत्तर तेच तगतील!
लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
hrishikesh.sherlekar@gmail.com