|| हृषिकेश दत्ताराम शेर्लेकर
नवप्रज्ञेच्या भविष्यकालीन परिणामांना सामोरे जाण्यासाठी बदल व संधी कशा ओळखता येतील, याची चर्चा..
कृत्रिम बुद्धिमत्तेचे किंवा ‘नवप्रज्ञे’चे- ‘एआय’चे भविष्यातील व्यवसायांवर होणारे परिणाम व संधी यांची चर्चा गेल्या आठवडय़ात ‘नव्या कौशल्यांचे नवे रोजगार’ या लेखातून केली. आज तिथून पुढे उर्वरित व्यवसायांबद्दल बघू. मात्र हे पुन्हा सांगायलाच हवे की, आपण २०३०-४० सालात नवप्रज्ञेला कसे तोंड द्यायचे याच्या शक्यता पाहात आहोत..
(१) पत्रकार व लेखक :
परिणाम : या कार्यक्षेत्रात क्लिष्ट संवाद, भावना व आकलनशक्ती असल्यामुळे रोबोटिक यांत्रिकीकरणाची शक्यता कमीच वाटते. तरीही फक्त मजकूर वाचून दाखवणारे ‘न्यूज-रीडर’, लिहिणारे ‘कन्टेन्ट-रायटर्स’ वगरे पुढे नाहीसे होतील. मोठय़ा बातम्यांचा ६० शब्दांमध्ये सारांश आजही (उदा.- इनशॉर्ट्स.कॉम) होतो आहे.
संधी, बदल : ‘अपग्रेड’ करण्यासाठी प्रत्येकाने स्वतच्याच क्षेत्रात ‘मनुष्य + मशीन’ मिळून नवीन कार्यपद्धती शिकणे हे ओघाने आलेच. ‘न्यूज-रीडर’ ते ‘इंटरव्ह्यूअर’ आणि ‘कन्टेन्ट-रायटर’ ते ‘क्रिएटिव्ह-रायटर’ असा प्रवास अनेक जण करू शकतील.
इथे उदाहरण द्यावेसे वाटते यूटय़ूबवर गाजलेल्या ‘व्हिलेज फूड फॅक्टरी’चे. तमिळ फिल्म इंडस्ट्रीत असिस्टंट डायरेक्टर पदावर काही काळ काम केलेला गोपीनाथ. सोबतीला फक्त एक डीएसएलआर कॅमेरा व त्याचे वडील अरुमुगम, मांसाहारी पदार्थ बनविणारा एक अवलिया स्वयंपाकी. बस्स, ४२ यूटय़ूब व्हिडीओ, सहा महिन्यांत ३० लाख ‘व्ह्यू’ आणि त्यातून गूगल अॅडसेन्सद्वारा ६.५ लाख रुपये उत्पन्न. आपण बऱ्याचदा समाजमाध्यमांच्या नावे बोटे मोडत असतो, तिथेच एका २२ वर्षीय तरुणाने नगण्य भांडवलावर शून्यातून व्यवसाय उभारला. अशा प्रेरणादायक कहाण्यांबद्दल आवर्जून अधिक माहिती मिळवा आणि तुमच्यातील कल्पकतेला एक संधी तर देऊन बघा!
(२) कलाकार, क्रीडापटू आदी
परिणाम : इथे उच्चकोटीची सर्जनशीलता, कला किंवा शारीरिक क्षमता परत मानवी संवाद व उत्कट भावना असल्यामुळे यांत्रिकीकरणाची शक्यताही करवत नाही. परंतु नवीन पिढीच्या आवडी-निवडीदेखील झपाटय़ाने बदलतायेत. नाटक, थिएटरच्या जागी वेब-सीरिज व यूटय़ूब, मदानी खेळांच्या जागी ‘ऑनलाइन गेमिंग’ आले आहे. एआयचा एक वाईट चेहरा म्हणून ज्याची नक्कीच गणना करता येईल अशी-‘डीप-फेक’ नावाची प्रणाली कुठल्याही माणसाचा चक्क खोटा व्हिडीओ बनवू शकते. व्यक्तीचे खरे व्हिडीओ मिळवून, त्यात ‘खोटे’ संवाद घुसवून हा ‘डीप-फेक’ व्हिडीओ तयार होतो. पुढे ख्यातनाम कलाकारांची डिजिटल नक्कल करून बनविलेले व्हिडीओ प्रसिद्ध होतील. उदा.: किशोरकुमारच्या आवाजात रोबोटिक पद्धतीने निर्माण केलेले नवीन गाणे.
संधी, बदल : गरवापर आहेच, पण तितक्याच नवीन शक्यतादेखील. वरील फूड फॅक्टरीप्रमाणे सामान्य कलाकार, क्रीडापटू त्यांची कला गल्लीतून समाजमाध्यमांतून जगापर्यंत नेऊ शकतील. यासाठी डिजिटली अपग्रेड मात्र नक्कीच व्हावे लागेल.
(३) पर्यटन व हॉटेल व्यवसाय :
परिणाम : नावीन्यपूर्ण पाककृती शोधणे – विरुद्ध- ठरवून दिलेल्या सूचना तंतोतंत पाळून तोच तोच पदार्थ बनविणे, साफसफाई यांचा सामना या क्षेत्रात आहे. भविष्यात जाऊ दे, अशी रोबोटिक किचन असलेली हॉटेल्स अमेरिकेत सुरू झाली आहेत. मग मनुष्य तिथे काय करतात, तर एक नवीन रेसीपी शोधतात, दोन ग्राहक सेवा व मार्केटिंग. आपल्या चेन्नईमध्येदेखील रोबोटिक वेटर डिशेस किचनमधून ग्राहकांच्या टेबलापर्यंत आणण्याचे काम करताहेत.
संधी, बदल : आहात त्याच क्षेत्रात ट्रेनिंग घेऊन शेफ किंवा सेल्स, ग्राहक सेवेमध्ये ट्रान्सफर. जोडीला आपल्या व्यावहारिक ज्ञानाचा वापर करून समांतर व्यवसाय सुरू करणे (व्हिलेज फूड फॅक्टरीसारखे किंवा निराळे काही तरी).
(४) मोटार/ विमान/ जहाजचालक व संबंधित रोजगार
परिणाम : चालकविरहित स्वयंचलित मोटार हा विषय ‘एआय’ संशोधनातील पहिल्या पाचमध्ये मोडतो. त्यावर अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. कार कॅमेऱ्याची रस्त्यावरील अडथळे ओळखण्याची अचूकता टक्केवारी नव्वदीच्या घरात पोहोचली आहे. भविष्यात गाडय़ा नक्कीच चालकविरहित असतील व कदाचित उडणाऱ्यादेखील, म्हणजे फ्लाइंग टॅक्सी. विमाने, मोठी जहाजे इत्यादी तर आजही ऑटो-पायलट मोडवर चालतात, त्यातील चालक फक्त काही गडबड झाल्यास ‘कंट्रोल’ स्वतकडे घेतात.
संधी, बदल : पण म्हणून जगातले सर्व चालक बेरोजगार होतील का? नक्कीच नाही. एक तर स्वयंचलित वाहनांना प्रचंड प्रमाणात नियंत्रण कक्ष लागतील. दुसरे म्हणजे ऑटो-पायलटवर चालणाऱ्या वाहनात हल्लीच्या ड्रायव्हरची जागा ‘वाहक’ घेतील. जे नियम, देखरेख, इमरजन्सी कंट्रोलबरोबरच ग्राहक-सेवा, टूर-गाइड अशा भूमिकादेखील निभावतील.
(५) व्यावसायिक सल्लागार (उदा.: चार्टर्ड अकाऊंटंट, कर सल्लागार)
परिणाम : रोबोटिक- प्रोसेस- ऑटोमेशन व चॅट, व्हॉइस-बॉट वापरून ग्राहक संवाद आणि ‘एनएलपी’ वापरून कागदपत्रे यांत्रिक पद्धतीने हाताळली जाताहेत, त्यामुळे हा प्रांत काहीसा धोक्याचाच. व्यवहाराची क्लिष्टता, उलाढालीची रक्कम अशावर मानवी सल्लागारांचे महत्त्व अवलंबून राहील. उदा.: वैयक्तिक कर, विमा गुंतवणूक यांचे ऑटोमेशन शक्य आहे, पण कंपनी टॅक्स किंवा मोठी रक्कम, क्लिष्ट अटी व खास ग्राहकांसाठी पर्सनल सल्लागार.
संधी, बदल : कंपनी-ते-ग्राहककडून कंपनी-ते-कंपनी व्यवसायाकडे वळणे.
(६) सुरक्षा-पहारेकरी व इतर
परिणाम : हल्लीचे डिजिटल-युग, त्यात मालमत्ता व संपत्ती साठवण्याची पद्धतदेखील व्हच्र्युअल. म्हणूनच सुरक्षेची व्याख्याही बदलत चालली आहे आणि जग फिजिकल-सिक्युरिटीकडून सायबर-सिक्युरिटीकडे वळते आहे. अर्थातच स्थावर मालमत्ता, स्वतची सुरक्षा व अंतर्गत/राष्ट्रीय सुरक्षा या बाबी वेगळ्या कक्षेत येतात. आधीच्या ‘ई-पहारेकरी’ या लेखात (२९ एप्रिल) बघितल्याप्रमाणे तिथेही फेशिअल रेकग्निशन इत्यादी वापरून बरीच प्रगती घडते आहे.
संधी, बदल : एक तर सायबर-सिक्युरिटी एक्स्पर्ट बनणे. दुसरे म्हणजे सध्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल जागरूक असणे हे गरजेचे/ फॅशनेबल झाले, म्हणून फिटनेस-ट्रेनर, क्रीडा व्यवसायांकडे वळणे हा एक पर्याय असू शकतो.
(७) अभियांत्रिकी (आयटी तसेच स्थापत्य, उत्पादन)
परिणाम : ‘आम्ही इंजिनीअरच स्वतला हळूहळू बेरोजगार करतो’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इंजिनीअर थोडक्यात विविध प्रकारची मशीन्स डिझाइन करतो, त्यांचे उत्पादन करवतो, ती चालवतो व सांभाळतोदेखील. आजच्या घडीला डिझाइन सोडून इतर कामे बरीचशी ऑटोमेट झालीच आहेत. आता आम्हीच या मशीन्समध्ये बुद्धिमत्ता आणतो आहोत, मग पुढल्या काळात त्या मशीन्स आणि सॉफ्टवेअरच डिझाइनचेही काम करतील, आजही मर्यादित प्रमाणात करतात म्हणा.
संधी, बदल : संशोधन व नव-उद्योगासाठी लागणारी सर्जनशीलता सोडली तर तेच तेच सूचनाबद्ध काम करणाऱ्या इंजिनीअरांचे पुढल्या काळात काही खरे नाही. मग ते स्थापत्य, उत्पादन यांतील असोत वा आयटी क्षेत्रातले.
(८) उच्चपदस्थ अधिकारी वर्ग, उद्योजक, संशोधक व शास्त्रज्ञ, विचारवंत, पुढारी इत्यादी
परिणाम : यांत्रिकीकरण अशक्य. समजा झालेच तर टर्मिनेटर सिनेमासारखं मानवजातीवरच विनाशकारी संकट येईल. शेवटी बुद्धिमत्ता आणि जाणीव या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण अजून तरी मशीन्सना फक्त आपली बुद्धीच प्रदान करीत आहोत, जाणीव नाही.
संधी, बदल : या शक्तिशाली व बुद्धिमान गटाने पुढाकार घेऊन एआयसंदर्भात जागतिक पातळीवर लवकरात लवकर कायदे, धोरण व नियम बनविणे अत्यंत गरजेचे आहे.
एकंदरीत कल लक्षात घेतला तर शारीरिक श्रम किंवा सूचनाबद्ध आणि सतत एकाच प्रकारच्या (रिपीटिटिव्ह) कामांचे यांत्रिकीकरण जास्तीत जास्त होत आहे, होईल. ज्या व्यवसायांमध्ये एकच मनुष्य विविध कामे करतो अशी क्षेत्रे; किंवा कला, क्रीडा व मानवी भावना, सर्जनशीलता अंतर्भूत असलेली क्षेत्रे आणि तीन उच्च बुद्धिमत्तेची कार्यक्षेत्रे यांत्रिकीकरणापासून दूर आहेत व भविष्यातदेखील असतील. एका वाक्यात सल्ला द्यायचा तर ‘असाल त्याच क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञान वापरून तोच व्यवसाय, रोजगार पूर्णपणे वेगळ्या स्वरूपात आणून कसा वृद्धिंगत करता येईल, हाच विचार आणि कृती करा.’ याला डिजिटल-री-इमॅजिनेशन म्हटले जाते.
त्यासाठी गरज आहे वाचनाची, शिक्षणाची मार्गदर्शनाची. त्याहीआधी जिज्ञासू मानसिकतेची – जी तुम्हाला स्वत:त व पुढच्या पिढीत आणायचीय- म्हणूनच आजच्या युवा पिढीला भविष्यातल्या संधी व आव्हानांसाठी तयार करण्याची जबाबदारी नक्कीच आजच्या साक्षर प्रौढ जनतेवर आहे. समर्थानी म्हटलेच आहे, ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’!
लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
hrishikesh.sherlekar@gmail.com