|| हृषिकेश दत्ताराम शेर्लेकर
विविध उपकरणे, डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता यांची सांगड घालून नवनवीन ई-पहारेकरी निर्माण होत आहेत. सध्या तरी त्यांच्याकडे मानवी पहारेकऱ्यांना पर्याय म्हणून न बघता, एका सहायकाच्या भूमिकेतच बघावे लागेल..
सध्याच्या निवडणूकपर्वात चौकीदार शब्द अनेक कारणांमुळे बराच चर्चेत आहे. म्हणून ठरविले आज सव्र्हेलन्स (पहारा-देखरेख) आणि डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता यावर चर्चा करू. चौकीदारी, देखरेख, पाळत, तपासणी वगैरेंमध्ये तीन कार्ये प्रामुख्याने अपेक्षित असतात. एक बारकाईने अविरत निरीक्षण. दोन आखून दिलेल्या नियमांची व सूचनांची अंमलबजावणी व तीन काही गैर घडल्यास वरिष्ठांना जागृत करणे आणि परिस्थितीवर नियंत्रण आणणे. इथे अविरत, सूचना, जागृत व नियंत्रण हे शब्द अत्यंत महत्त्वाचे. बारकाईने विचार केला तर लगेच लक्षात येईल की वरील कार्ये करताना स्वत:ची बुद्धिमत्ता वापरायची फारशी गरज, किंबहुना अपेक्षा नसते. मी असे मुळीच म्हणत नाही की यांना बुद्धीच नसावी, परंतु अत्यंत हुशार पहारेकऱ्यालादेखील ‘सांगून, नेमून’ दिल्याप्रमाणेच काम करणे अपेक्षित असते. यांची बहुतेकशी कामे सरळसोट, एका सूचनावलीत बसू शकणारी. त्यात ही कामे बऱ्याचदा ‘कंटाळवाण्या’ प्रकारात मोडतात. दिवसरात्र, उन्हातान्हात, रात्रीबेरात्री सतत उभे व सतर्क राहून, डोळ्यात तेल घालून पहारा देणे म्हणजे काही सोपं काम नव्हे. त्यात पहाऱ्याची गरज निर्जनस्थळी, डोंगर वा खोऱ्यात, देशाच्या सीमेवर जाऊन पोहोचली तर हेच काम किती साहसाचे व जोखमीचे होते.
एकंदरीत पहारेकरी म्हटला की कर्तव्यदक्ष व विश्वासू, सचोटी व प्रामाणिकपणाने आणि गरज पडल्यास साहसी वृत्तीने जोखीम घेऊन निरंतर व चोख देखरेख ठेवणारा, काटेकोरपणे नियमांचे पालन करणारा व काही गडबड झाल्यास लगेचच कारवाई करणारा असेच मनात येते नाही का? पण पहारेकऱ्याबद्दल सर्वाना भेडसावणारी आव्हाने कुठली? तर १) प्रचंड मनुष्यबळ व त्यांचा खर्च. २) जोखीम व अपघात. ३) निष्काळजी व अप्रामाणिकपणा. ४) प्रशिक्षित सुरक्षा-कामगारांची चणचण. म्हणूनच आयओटी डिव्हायसेस, डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता यांची सांगड घालून नवनवीन ई-पहारेकरी जन्माला येतायेत, पण सध्या तरी त्यांच्याकडे मानवी पहारेकऱ्यांना पर्याय म्हणून न बघता, एका सहायकाच्या भूमिकेतच बघावे लागेल. सर्वसाधारणपणे ई-पहारेकऱ्याच्या आराखडय़ात चार प्रमुख घटक असतात, ते खालीलप्रमाणे.
१) डेटा-कॅप्चर (माहिती मिळविणे)
- मानवी पंचेंद्रिये कामे करतात त्याप्रमाणे सर्व प्रकारची माहिती विविध उपकरणे वापरून मिळविणे. इथे दृश्ये (प्रतिमा व व्हिडीओ), गंध (गॅस लिक्स), आवाज (स्फोट ध्वनी), चव (भेसळयुक्त अन्न), स्पर्श (हवा, द्रव दाब) इत्यादी प्रकार येतात.
- विविध उपकरणांमध्ये येतात घरात, ऑफिसात लावलेला सुरक्षा कॅमेरा ते अद्यवयात सॅटेलाइट कॅमेऱ्यापर्यंत गरजेनुसार श्रेणी
- माहिती म्हणजे फक्त फोटो, व्हिडीओ नसून विविध सेन्सर्सनी मिळविलेला डेटाही यात येतो. उदाहरणार्थ, सार्वजनिक स्थळी लावलेले एक्स-रे मशीन्स, गॅस-लिकेज, डेसिबल, वायुप्रदूषण, पाणी पातळी सेन्सर्स आदी.
- या डेटा-कॅप्चर करणाऱ्या मशीन्सना ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (आयओटी) तंत्रज्ञानामधील ‘कनेक्टेड फिजिकल डिव्हायसेस’ देखील संबोधले जाते.
- इथे सर्वात महत्त्वाचे प्रश्न असतात ते किती व कुठले डिव्हायसेस घ्यायचे, ते नक्की कुठे लावायचे आणि शेवटी त्यांनी किती कालावधीने डेटा मिळवायचा (सेकंदाला, मिनिटाला, की दिवसातून एकदा?). उत्तर प्रत्येक उपयुक्ततेवर अवलंबून.
२) डेटा-ट्रान्स्फर (माहिती पोचविणे)
- पुढील पायरी म्हणजे विविध स्रोतांतून माहिती मिळवून, ती तशीच पुढे पाठविणे किंवा विश्लेषण करून पुढे पाठविणे.
- पारंपरिक डिव्हायसेसदेखील डेटा-कॅप्चर करतच होत्या, परंतु जोपर्यंत त्या ‘कनेक्टेड’ म्हणजे इतरांशी जोडलेल्या नव्हत्या तोपर्यंत त्यांनी मिळविलेल्या डेटाचा फारसा काही ‘रियल-टाइम’ वापर, तो-देखील सक्रिय देखरेख ठेवण्याकरिता होत नसे.
- इंटरनेटमुळे मात्र यात आमूलाग्र परिवर्तन आले. घरचे वायफाय, मोबाइल नेटवर्क, ऑफिसमधील खासगी लॅन-नेटवर्क, सार्वजनिक ठिकाणी हल्ली उपलब्ध होत असलेले वायफाय, कारखान्यातील मशीन्सला जोडणारी विशिष्ट नेटवर्क्स आणि अगदी समुद्रात, विमानात, डोंगरदऱ्यात वापरात येणारे सॅटेलाइट नेटवर्क यामुळे हल्ली कुठेही ‘कनेक्टिव्हिटी’ मिळू लागली आहे.
- सव्र्हेलन्ससंदर्भात बोलायचे झाल्यास डेटा किती कलावधीने घ्यायचा व त्यातील कुठला, किती विश्लेषणासाठी पुढे पाठवायचा याला फार महत्त्व असते. थोडक्यात तारेवरची कसरत. उदाहरणार्थ, रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारातील फोटो चोवीस तास दर सेकंदाला काढून सर्वच्या सर्व इंटरनेटद्वारा पुढे पाठविले तर प्रचंड खर्च. पण तोच कालावधी दर मिनिटांपर्यंत वाढविला तर सुरक्षेशी किती तडजोड केली जातेय हे कसे व कोणी ठरवावे?
- म्हणून हल्लीची डिव्हायसेस डेटाचे मर्यादित प्रोसेसिंग करून फक्त उपयुक्त डेटाच नेटवर्कवरून पुढे पाठवितात, ज्याला ‘इंटेलिजंट एड्ज डिव्हायसेस’ म्हणतात. उदाहरणार्थ, घराच्या दारात लावलेला सुरक्षा कॅमेरा दर सेकंदाला फोटो काढतो. परंतु फक्त दरवाजा उघड-बंद झाल्यावरचेच फोटो तो वायफाय नेटवर्क वापरून पुढे घरमालकाच्या मोबाइल अॅपवर पाठवितो.
३) डेटा-अनॅलिटिक्स (माहिती विश्लेषण)
- वरील डेटा एकदा एका ठिकाणी गोळा झाला, की अनॅलिटिक्स सॉफ्टवेअर्स त्यांचे एआय मशीन-लर्निग अल्गोरिथम्स वापरून अनेक-मितीय विश्लेषण करतात. त्यात वर्गीकरण, विसंगती, अपवाद, पुढे काय घडू शकेल अंदाज आदी येतात.
- येणारे इनपुट फोटो, व्हिडीओ असतील तर एआयवर आधारित फेस-रेकग्निशन (ठरावीक चेहरा ओळखणे. जसे सराईत गुन्हेगार), इमेज-रेकग्निशन व व्हिडीओ-अनॅलिटिक्स (हल्ला, शस्त्रे, मारहाण, अपघात, इत्यादी दृश्य शोधणे) केले जाते.
- इनपुट ध्वनिसंभाषण असेल, तर नॅच्युरल लँग्वेज प्रोसेसिंग व स्पीच अल्गोरिथम्स वापरून ठरावीक शब्द (खंडणी, चोरी, हल्ला वगैरे), एखाद्या विशिष्ट माणसाचा आवाज ओळखणे (अपहरणकर्त्यांच्या कॉल रेकॉर्डिगवरून) अशी कामे होतात.
- इनपुट सेन्सरमधून येत असतील तर मशीन-लर्निग अल्गोरिथम्स वापरून विसंगती, अपवाद, फोरकास्ट (अंदाज) अशी कामे होतात. उदाहरणार्थ, कारखान्यातील हवेत विषारी वायूचा अंश आढळला तर त्यावर खबरदारी म्हणून अलार्म.
४) अॅक्शनेबल-इनसाइट्स (पुढच्या क्रियेसंबंधी इशारे व सूचना)
- अॅनॅलिटिक्सच्या विश्वाची साखळी पूर्ण व्हायला ‘डिव्हायसेस -> डेटा -> अॅनॅलिटिक्स -> इनसाइट्स -> अॅक्शन’ या सर्व पायऱ्या पार पाडाव्या लागतात. वरील उदाहरणात, गॅस सेन्सरने विषारी वायूची नोंद केली, त्यापुढे अॅनॅलिटिक्स सॉफ्टवेअरनी नेहमीच्या स्थितीपेक्षा काहीतरी विसंगती ओळखून धोक्याचा इशाराही दिला. पण पुढे कारखान्यातील देखरेख ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यावर तातडीने काहीच कृती न केल्यामुळे शेवटी दुर्घटना झालीच.
- दुसरे म्हणजे याच उदाहरणात विषारी वायू एकूण हवेच्या किती टक्के चालेल, हे कोण ठरविणार, ज्याला आपण धोक्याची पातळी म्हणतो. नाहीतर उगीचच चुकीने भोंगा वाजत राहायचा.
- जागतिक संशोधनानुसार सव्र्हेलन्सचे यश हे वरीलप्रमाणे योग्य कृती वेळेत घेणे यावर ३०-४० टक्के, येणारे इशारे योग्य प्रकारे वर्गीकरण करून, त्यातील खरेच धोकादायक इशारे वेगळे करून पुढे नियंत्रण कक्षाकडे पाठविणे यावर अजून आणखी ३०-४० टक्के आणि उर्वरित फक्त २०-३० टक्के वरील तंत्रज्ञान म्हणजेच डिव्हायसेस, कनेक्टिव्हिटी, अॅनॅलिटिक्स सॉफ्टवेअर्सवर अवलंबून असते.
उपयुक्ततेच्या बाबतीत सव्र्हेलन्सचा चार वेगवेगळ्या स्वरूपात विचार करता येईल. ते पुढील सदरात एकेक उदाहरण घेऊन बघू.
१) गृहोपयोगी (लहान मुले, वृद्ध, घरातील कामगार) २) व्यावसायिक (उद्योगधंदे, कारखाने, कंपन्या) ३) सार्वजनिक (वाहतूक, पर्यटन, धार्मिक स्थळे, उत्सव इत्यादी) ४) शासकीय (राष्ट्रीय सुरक्षा, सैन्य, सीमा नियंत्रण, अन्य)
आतापर्यंत आपण तंत्रज्ञान वापरून सुरक्षासंदर्भातील उपयुक्त अशी उदाहरणे व भविष्यातील रंजक शक्यता बघितल्या. परंतु अद्यवयात अस्त्रे-शस्त्रे दिमतीला आणि त्यात सत्ता असली की गैरवापरदेखील आलाच. सध्या जगात बऱ्याच ठिकाणी अशा तंत्रज्ञानाचा मुक्त, बेसुमार व अनुचित वापर होत आहे. तेही राष्ट्रीय सुरक्षेच्या गोंडस नावाखाली. काही म्हणतील, हे सर्व तंत्रज्ञानामुळे होतेय. पण वरीलप्रमाणे अशा गैरवापराला जवळजवळ ८० टक्के जबाबदार असतील कुठे, कुठली, केव्हा आणि काय (दडपून टाकणारी) कृती घ्यायची ठरविणारे सत्तापिपासू राज्यकर्ते व प्रशासक. यावर अजून विस्ताराने पुढील सदरात.
hrishikesh.sherlekar@gmail.com
(लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.)