हृषीकेश दत्ताराम शेर्लेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या लेखमालेच्या पहिल्या टप्प्यात आपण सध्याची चौथी औद्योगिक क्रांती (आयआर ४.०), सायबर-फिजिकल विश्व आणि डिजिटल तंत्रज्ञानाबद्दल सखोलपणे जाणून घेतले. त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), वस्तुजाल (इंटरनेट ऑफ थिंग्ज), विदा विश्लेषण (डेटा अ‍ॅनालिटिक्स) इत्यादी विषयांची शक्य तितक्या खोलात शिरून चर्चा केली. दुसऱ्या टप्प्यात उदयोन्मुख तंत्रज्ञानाबद्दल थोडक्यात जाणून घेतले. तिसऱ्या टप्प्यात मानवी उत्क्रांतीमधील काही महत्त्वाच्या शोधांबद्दलचा रंजक इतिहास बघितला. आता चौथ्या व शेवटच्या टप्प्यात भविष्यातील विश्व आणि त्यासाठी आपण कसे तयार राहू, विशेषत: पुढील तीन ते चार दशकांत प्रौढ नागरिक होणाऱ्या आजच्या बालपिढीला आजच काय-काय वेगळे शिकवू शकू, त्याबद्दल पुढील काही लेखांत चर्चा करणार आहोत.

भविष्यातील विश्व कसे असू शकेल, हे ठामपणे कुणीही सांगू शकणार नाही. पण एकंदर वाटचाल कुठल्या दिशेने सुरू आहे, त्याचा आढावा घेणे नक्कीच गरजेचे आहे. आपल्या देशाला बेरोजगारी, बहुतांश लोकांचे शेतीवर अवलंबित्व, जुनाट शिक्षण पद्धती, वाढती लोकसंख्या व तुटपुंजी नैसर्गिक संसाधने अशा अनेक समस्या भेडसावत होत्या आणि आहेत. त्यात अत्याधुनिक औद्योगिकीकरण, रोबोटिक ऑटोमेशन, यांत्रिकीकरण असल्या प्रकारांची भर पडतेय. त्याबद्दल पुढील लेखात चर्चा करूच, पण आज पाहू या भविष्यातील विश्व..

(१) जनरल इंटेलिजन्स किंवा त्याही पुढचे सुपर-इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्तेतील शेवटची अवस्था) :

– सध्याची एआय बुद्धिमत्ता मनुष्याच्या बुद्धय़ांकाच्या तुलनेत फक्त ६.५ वर्षांच्या मुलाइतकीच आहे. त्यात भावना, सर्जनशीलता असल्या उच्चकोटीच्या अवस्था यायला काही दशके लागतील.

– पूर्ण मानवी मेंदूची क्षमता एआयमध्ये आल्यावर तेव्हाचे एआय रोबोट्स आजच्यापेक्षा अनेक पटींनी प्रगत असतील व आज त्यांना शक्य नसलेली कार्ये करू लागतील (सन २०३०-५०).

– जनरल इंटेलिजन्स प्राप्त झालेले एआय केंद्रक स्वत:हून त्यांच्यापेक्षा प्रगत आणि मानवी बुद्धिपेक्षा अनेक पटींनी प्रभावी असे सुपर-इंटेलिजन्स नामक एआय प्रणाली बनवेल (सन २०५०-२१००).

– मनुष्याच्या तुलनेत त्यांच्याकडे क्लाऊड नेटवर्कद्वारा एकत्रित जोडलेली महाकाय संगणकीय शक्ती, ऊर्जा शक्तीअसेलच.

– इथे एक लक्षात घ्यावे की, जनरल एआयकडून सुपर एआयपर्यंतचा प्रवास मनुष्य नव्हे रोबोट्स स्वत:च करतील, अशी कल्पना आहे.. आणि हो, त्याच वेळी कदाचित मनुष्याचे त्यांच्यावरचे नियंत्रणदेखील सुटेल.

(२) मानव + यंत्र (रोबोट्स) विश्व :

– कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अत्यंत पुढारलेले रोबोट्स आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतील.

– लहानांपासून प्रौढ, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी सर्वच आपल्या दैनंदिन आयुष्यात वेगवेगळ्या रोबोट्सचा वापर करू लागतील.

– इथे रोबोट म्हणजे ‘शरीरसदृश वस्तू’ असणेच गरजेचे नसून, एआय रोबोट्स हे अधिकतर एखाद्या विशिष्ट कार्यासाठी निर्मिलेली ‘संगणकीय प्रणाली’ असेल.

– असे रोबोट्स मग आपले गाडीचालक, स्वयंपाकी, नोकर, सहकर्मी, सुरक्षारक्षक, प्राथमिक शिक्षक, वैद्यक अशा अगणित भूमिका निभावू लागतील (सन २०४०-५०).

– प्रारंभी मनुष्याला नको वाटणारी कष्टदायक कामे त्यांच्याकडून करून घेण्यावर भर असेल; पण हळूहळू त्यांच्याकडून भावना, निर्मिती, क्रीडा, कला असली कार्येदेखील करवून घेतली जातील.

– कदाचित पुढे जाऊन ते आपले मित्र-मत्रिणीदेखील बनतील! आजही एकटय़ा पडलेल्या वृद्धांशी गप्पा मारायला एआय रोबोट्स प्रायोगिक तत्त्वावर तयार होताहेतही; त्याचीच ही अत्यंत प्रगत पायरी असेल.

(३) स्वयंचलित वाहतूक आणि उडणाऱ्या गाडय़ा :

– स्वयंचलित गाडय़ा तर रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर आजही धावताहेत. त्यांचे आणखी अचुकीकरण झाल्यावर पुढे कायदेशीर मान्यता आणि मग चालकविरहित कार बाजारात उपलब्ध होतीलच (सन २०२५-३०).

– स्वयंचलित वाहने वैज्ञानिकांच्या प्रयोगशाळेतून कधीच ऑटोमोटिव्ह कंपन्यांच्या रिसर्च आणि डिझाइन लॅबमध्ये येऊन दाखल झाल्यात (टेस्ला, टोयोटा, जनरल मोटर्स, मर्सिडीज बेंझ, इत्यादी).

– परंतु त्यांच्याही पुढे जाऊन, उडत्या स्वयंचलित वाहतुकीवर आघाडीच्या संशोधकांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यातले एक प्रात्यक्षिक प्रस्तुत लेखकास अमेरिकेतील एमआयटी मीडिया लॅबमध्ये मागच्या वर्षी बघायला मिळाले.

– ड्रोन वापरून मालाची वाहतूक लवकरच सुरू होईल असे दिसतेय.

– पुढे ड्रोन वापरून मनुष्यदेखील छोटे-छोटे प्रवास (पाच-दहा किमीपर्यंत) करू लागतील; याच्या प्रायोगिक तत्त्वावर सध्या चाचण्या सुरू आहेत.

– ‘हायपर लूप’सारखी नावीन्यपूर्ण वाहतूक संकल्पना वापरून भविष्यात जड सामान व माणसे प्रवास करतील.. १२०० किलोमीटर प्रति तास वेगाने!

– हे सर्व होत असताना, डिजिटल एआर/व्हीआर तंत्रज्ञान वापरून प्रवास सुखरूप, सुखकर आणि सुंदर बनविण्याचे प्रयत्न होतील.

– तसेच प्रवासाचा एकूण वेळ आणि क्षीण अनेक पटींनी कमी झाल्यामुळे जग आणखी जवळ येईल.

(४) पर्यायी इंधन, शून्य प्रदूषण व ऊर्जा :

– २०५० पर्यंत जग संपूर्णपणे खनिज तेलविरहित बनलेले असेल.

– कमीत कमी ऊर्जा वापरणारी आणि स्वत:च ऊर्जा निर्माण करणारी उपकरणे, वाहने, वास्तू निर्माण झाल्यामुळे एकंदर ऊर्जेची गरज कमी होईल, त्यामुळेच प्रदूषण, जागतिक तापमानवाढही कमी होईल.

– विशेषत: कष्टाची कामे एआय रोबोट्स करू लागल्यामुळे एकंदर ऊर्जेमध्ये बचत होईलच. तसेच अचूकता, वेळकाढूपणा वगैरे नाहीसा होऊन उत्पादकता अनेक पटींनी वाढेल.

(५) स्थलांतर व पर्यायी वस्त्या, नवीन देश संकल्पना :

– मनुष्य आणि रोबोट्सचे एकत्रित विश्व, स्वयंचलित वाहतूक व उडणाऱ्या गाडय़ा आणि प्रवासाचा अवधी काही मिनिटे, त्यात जोडीला पर्यायी इंधन, डिजिटल व्यवहार.. मग शहरात कशाला राहायचे?

– त्यातून काही लोक अशा ठिकाणी स्थलांतर करतील, जिथे सध्या मानवी वस्तीच नाहीये.

– मग नवीन देश, राज्ये असले प्रकार उदयास येतील.

(६) ३-डी प्रिंटिंग आणि व्हर्टिकल सिटी :

– अशा स्थलांतर केलेल्या ठिकाणी अनेक छोटी-छोटी घरे बनविण्यापेक्षा एखादे शहरच मावावे इतके अवाढव्य बांधकाम प्रकल्प सुरू होतील. हे सारे ३-डी प्रिटिंग तंत्रज्ञान वापरून होईल.

– व्हर्टिकल सिटी म्हणजे एकाच अतिउंच व अतिभव्य इमारतीत घरे, कार्यालये, मॉल, रुग्णालये, करमणूक गृहे, शाळा/महाविद्यालये, सरकारी कार्यालये, नैसर्गिक उद्याने, आदी सर्व सुविधा निर्माण केल्या जातील आणि एक इमारत जणू एका छोटय़ा शहराइतकीच लोकसंख्या सामावून घेईल.

– त्यामागची संकल्पना अशी आहे की, एकाच अतिउंच इमारतीत लाखो घरे, कार्यालये, मॉल बनविल्यास वाहतूक खर्च, प्रवास वेळ, ऊर्जा तर वाचेलच, परंतु भौगोलिक व नैसर्गिक संसाधनांचीदेखील बचत होईल.

– रिसायकल (पुनर्वापरशील) साहित्यापासून ३-डी प्रिटिंगद्वारा अख्खी इमारत तयार होईल. आजही दुबईमध्ये अशी इमारत प्रायोगिक तत्त्वावर उभी आहे. त्यात संपूर्ण अंतर्गत सजावटीसकट २५० चौरस फुटांचे घर केवळ १७ दिवसांत प्रिंट आणि दोन दिवसांत जोडणी झाली आहे.

(७) ऑग्मेंटेड/ व्हर्च्युअल रियालिटी उपकरणे :

– अशी उपकरणे स्मार्ट फोनला मागे टाकतील.

– रेडियो, टीव्ही, संगणक जाऊन लॅपटॉप व मोबाइल फोन आले. सध्या स्मार्टफोनचा जमाना सुरू आहे. त्यापुढची पायरी कदाचित ऑग्मेंटेड/ व्हर्च्युअल रियालिटीची (एआर/व्हीआर)असेल.

– एआर/व्हीआर चष्मे वापरून लोक हवेतच ३-डी रूपात सादर केलेल्या स्क्रीनला ‘टच’ (स्पर्श) करून आज्ञा देतील.

– सर्व क्लाऊड प्लॅटफॉर्मवर असल्यामुळे मोबाइल फोनची गरज कमी होऊ लागेल.

क्रमश.. तोपर्यंत आजचा प्रश्न : सन २०५० मधील जग आजच्यापेक्षा जास्त सुंदर, समाधानी व परिपूर्ण असेल की नाही?

लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

hrishikesh.sherlekar@gmail.com