|| हृषिकेश दत्ताराम शेर्लेकर

कृत्रिम बुद्धिमत्ता, वस्तुजाल, विदा-विश्लेषण यांच्याबद्दल जाणून घेतल्यानंतर ‘क्लाऊड’ तंत्रज्ञानाच्या अवाढव्य पसाऱ्याची सविस्तर ओळख करून घ्यायला हवीच.. 

‘नवप्रज्ञेचे तंत्रायन’ या लेखमालेत आतापर्यंत आपण कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), वस्तुजाल (आयओटी), विदा-विश्लेषण (डेटा-अ‍ॅनालिटिक्स) अशा विषयांवर सविस्तर चर्चा केली. सध्या सुरू असलेल्या ‘चौथ्या औद्योगिक क्रांती’मध्ये (इंडस्ट्री ४.०) निर्माण झालेल्या आभासी-भौतिक विश्वातील डिजिटल तंत्रज्ञानाचा पसारा इतका अवाढव्य आहे, की सर्व विषयांच्या खोलात शिरायचे झाल्यास अनेक वर्षे लागतील. दररोज नवीन शोधांची भर पडते आहेच! तरीही, डिजिटल तंत्रज्ञानातील सर्वोच्च दहा विषयांबद्दल या लेखमालेत आपण जाणून घेणार आहोत.

या सर्वोच्च दहा विषयांबद्दल बोलायचे झाल्यास, कृत्रिम बुद्धिमत्ता, वस्तुजाल, विदा-विश्लेषण, क्लाऊड, समाजमाध्यमे.. आणि ड्रोन, आभासी वास्तव, फायबर नेटवर्क/ ५-जी, औद्योगिक यंत्रमानव, सायबर-सुरक्षा आणि त्यापुढे काही विशिष्ट उदयोन्मुख विषय जसे ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस, क्वांटम-कम्प्युटिंग आदी.

तेव्हा, आजचा विषय म्हणजे- क्लाऊड (‘पुंज-संगणन’?)! पुढे क्लाऊड-कम्प्युटिंग, क्लाऊड-अ‍ॅप्लिकेशन्स, क्लाऊड इन्फ्रा डेटा सेंटर यांच्याविषयी जाणून घेऊ.

‘तुम्ही जर विद्युत ऊर्जा (वीज) स्वत: बनवत नाही, तर मग कम्प्युटिंग (कॉम्प्युटर इन्फ्रास्ट्रक्चर) कशाला स्वत: बनविता (आणि सांभाळता)?’ जेफ बेझोस यांनी विचारलेला हा प्रश्न. बेझोस हे ‘अ‍ॅमेझॉन’ कंपनीचे संस्थापक व क्लाऊड सेवा पुरविणाऱ्या जगातील प्रमुख कंपन्यांपैकी ‘अ‍ॅमेझॉन वेब सव्‍‌र्हिसेस्’ नामक कंपनीचे मुख्याधिकारी.

‘क्लाऊड’ म्हणजे नक्की काय?

क्लाऊड कम्प्युटिंग म्हणजे संगणक संसाधनांचा मागणीनुसार पुरवठा. ज्यामध्ये संगणकीय प्रोसेसिंग (सीपीयू), डेटा-स्टोरेज (मेमरी) अशा सुविधा वापरकर्त्यांच्या सक्रिय व्यवस्थापनाशिवाय ‘पे-पर-यूज’ (प्रति वापर दर) योजनेमार्फत पुरविल्या जातात. अगदी सोप्या शब्दांत, तुमचा घरगुती संगणक तुमच्या कार्यालयात/घरी न ठेवता त्याऐवजी फक्त स्क्रीन/माऊस/की-बोर्ड तुमच्याकडे आणि सीपीयू/मेमरी आदी बाबी एका कंपनीने सांभाळणे. इंटरनेटमार्फत तुम्ही हवे तेव्हा त्याचा वापर करा आणि वापरानुसार पैसे मोजा. जसे आपण वीज वापरतो, नाही का? ती आपल्या घर/कार्यालयापर्यंत पोहोचविली जाते आणि आपण त्याचे वापरानुसार पैसे भरतो. त्यापलीकडे ती कुठे बनते, आपल्यापर्यंत कशी पोहोचते, त्यांचे खर्चाचे गणित काय, भांडवली खर्च/ दुरुस्ती आदींशी आपल्याला काहीएक देणे-घेणे नसते आणि अर्थातच वीज कंपनीला हे सर्व परवडते; कारण अनेक ग्राहक आणि मोठय़ा प्रमाणात उत्पादन.

डेटा-सेंटर म्हणजे क्लाऊड कंपनीची आयटी इन्फ्रास्ट्रक्चरनी सुसज्ज अशी अवाढव्य शाखा. त्या जोडीला २४ तास व्यवस्थापन करणारे कर्मचारी, वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षा, वीज अधिक बॅटरी पॉवर व डिझेल जनरेटर आणि बरेच काही अद्ययावत, प्रचंड आवाका असलेले तंत्रज्ञान. क्लाऊड कंपन्यांचे असल्या डेटा-सेंटरचे जगभर जाळे असते.

‘क्लाऊड’ हे इंटरनेटसाठी एक रूपक असून, त्याचा कुठे तरी संदर्भ पुढील संकल्पनेशी असावा. ज्याप्रमाणे वास्तव जगातील ढग आकाशातील काही भाग आपल्यापासून लपवतात, त्याचप्रमाणे क्लाऊड वापरकर्त्यांपासून क्लिष्ट संगणकीय मूलभूत संरचना लपवून साध्या इंटरनेट-ब्राऊजरद्वारा सर्व संगणकीय सेवा पुरवते.

जॉन मॅकार्थी हे अमेरिकेतील एमआयटी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक. १९६० मध्येच त्यांनी एक दिवस संगणक हे वीज-पाण्याप्रमाणे सर्वसाधारण सेवा बनतील, असे भविष्य वर्तवून उद्योगजगतास पुढच्या वाटचालीची रूपरेषा दाखवून दिली. १९९० साली बँकेच्या एटीएम नेटवर्कने तो दिवस प्रत्यक्षात आणला. २००२ मध्ये ‘अ‍ॅमेझॉन वेब सव्‍‌र्हिसेस्’ने सर्वप्रथम क्लाऊड-कम्प्युटिंग सेवा द्यायला सुरुवात केली होती. त्यातील व्यवसायसंधी हेरून मग अनेक जागतिक कंपन्यांनी त्यात उडी घेतली आणि आजच्या घडीला ‘मायक्रोसॉफ्ट अझुर’, ‘गूगल क्लाऊड प्लॅटफॉर्म’, ‘सेल्सफोर्स’ इत्यादी बडय़ा कंपन्या जगाला क्लाऊड सेवा पुरवताहेत. आपल्या देशातील रिलायन्स कंपनीनेदेखील हल्लीच त्यांच्या वार्षिक भागधारक सभेत क्लाऊड व्यवसायात प्रवेश करण्याचे मनसुबे जाहीर केलेत.

क्लाऊडचे प्रमुख प्रकार :

(१) क्लाऊड कम्प्युटिंग : म्हणजे संगणकाचा सीपीयू (गाभा किंवा मेंदू) क्लाऊडद्वारा पुरवणे. जेव्हा आपण एखादा संगणक वा लॅपटॉप विकत घेतो, तेव्हा एकूण किंमत रकमेत सीपीयूचीच किंमत ६०-७० टक्के असते. या प्रकाराचा वापर अधिकतर मोठय़ा कंपन्या, कार्यालये करताहेत. घरगुती संगणक/ मोबाइल/ लॅपटॉप/ टॅब्लेट वापरास, क्लाऊड कम्प्युटिंग म्हणता येणार नाही.

(२) क्लाऊड स्टोरेज : तुमच्या संगणकाची हार्ड-डिस्क क्लाऊडद्वारा पुरवणे. प्रचंड प्रमाणात माहिती साठवण्यास उपयोगी पर्याय. तुम्ही गूगलवर आपली छायाचित्रे साठवता, तेव्हा अप्रत्यक्षप्रमाणे तुम्ही क्लाऊड-स्टोरेज वापरत असता!

(३) क्लाऊड नेटवर्किंग सेवा : मोठय़ा कंपन्या आणि कार्यालयांमध्ये अनेक संगणक, इतर उपकरणे- जसे प्रिंटर, सुरक्षा कॅमेरे आदी एकमेकांशी नेटवर्कद्वारा जोडलेले असतात, ज्यात आपल्याला वरवर फक्त केबल्स दिसत असल्या तरी त्यापाठी अनेक क्लिष्ट गोष्टी दडलेल्या असतात. अशी सेवा क्लाऊडद्वारा पुरवणे म्हणजे क्लाऊड-नेटवर्किंग!

इथपर्यंत संगणकीय हार्डवेअरबद्दल क्लाऊडच्या रूपात पर्याय पाहिले, आता सॉफ्टवेअरबद्दल पाहू..

(४) क्लाऊड अ‍ॅप्लिकेशन्स : गूगल ईमेल सर्वात सोप्पे उदाहरण. पूर्णच्या पूर्ण हार्डवेअर अधिक नेटवर्किंग अधिक सॉफ्टवेअर अधिक स्टोरेज सगळे क्लाऊडवर! आपण फक्त मोबाइल/ लॅपटॉपमधील ब्राऊजर वापरून ईमेल पाठवा, वाचा, जतन करा.. आणि पैसे? तर, व्यावसायिक कंपन्या अशा सेवा प्रति ईमेलमागे ठरावीक पैसे घेऊन पुरवितात; आपण तर मोफतच वापरतो म्हणा!

(५) क्लाऊड डेटाबेस/ सव्‍‌र्हर : ही पुढील पायरी, म्हणजे डेटाबेस सव्‍‌र्हरच क्लाऊडवर!

(६) क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर : त्याहीपुढे एखाद्या नव्याने येऊ  घातलेल्या कंपनीसाठी हे उपयुक्त. पूर्णच्या पूर्ण आयटी-इन्फ्राच क्लाऊडवर, म्हणजे कार्यालयामध्ये फक्त लॅपटॉप/ मोबाइल/ वायफाय कनेक्शन – त्यापल्याड काहीएक गुंतवणूक नाही!

क्लाऊड-सेवा पुरवण्याचे वेगवेगळे पर्याय :

(१) इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅज अ सव्‍‌र्हिस : फक्त सीपीयू/ स्टोरेज/ नेटवर्किंग सेवा. उदा. गूगल फोटो.

(२) सॉफ्टवेअर अ‍ॅज अ सव्‍‌र्हिस : वरील सेवा अधिक सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन. उदा. गूगल ईमेल.

(३) प्लॅटफॉर्म अ‍ॅज अ सव्‍‌र्हिस : वरील पहिली सेवा अधिक स्वत:चे सॉफ्टवेअर- जसे वेबसाइट अ‍ॅप्लिकेशन बनविण्यासाठी क्लाऊड वापरणे. उदा. गूगल अ‍ॅप इंजिन.. तसेच पब्लिक क्लाऊड, प्रायव्हेट क्लाऊड आणि हायब्रिड क्लाऊड नामक विविध सोल्यूशन्स वापरात आहेत.

क्लाऊडचे प्रमुख फायदे :

(१) भांडवली खर्च : सुरुवातीचा प्रचंड खर्च व सतत दुरुस्ती नसणे.

(२) चालू ठेवण्याचा खर्च : सुविधा चालू ठेवण्याचा खर्च. इथे मनुष्यबळ खर्च प्रत्यक्ष सॉफ्टवेअर, हार्डवेअरपेक्षा किती तरी जास्त असतो.

(३) जबाबदारी : सर्व व्यवस्थापन आणि करारानुसार सेवा पुरवण्याचे कंत्राट क्लाऊड कंपनीकडे असल्यामुळे वैयक्तिक जबाबदारी जवळजवळ शून्य.

(४) अपग्रेड : नवीन हार्डवेअर तंत्रज्ञान आणि दर वर्षीचा भांडवली खर्च नसणे.

(५) लवचीकता आणि मागणीनुसार पुरवठा : हा सर्वात मोठा फायदा.

(६) स्केलेबल : वरीलप्रमाणेच तुमचा व्यवसाय वाढला तरच तुम्ही अधिक क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर मागवू शकता, तेही काही तासांत उपलब्ध होणारे!

(७) अपटाइम : आयटी इन्फ्रास्ट्रक्चरमधील सर्वात मोठी कटकट म्हणजे संगणक ऐन वेळी बंद पडणे. क्लाऊड कंपन्याकडे प्रचंड प्रमाणात बॅक-अप असल्यामुळे ते ९९.९९ टक्के चालू राहण्याची शाश्वती देतात.

(८) आपत्कालीन सुविधा : क्लाऊड कंपन्यांचे जगभर जाळे असते. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती वगैरे आल्यास क्षणार्धात ते इतर ठिकाणाहून तुम्हाला सेवा पुरवू शकतात.

(९) सुरक्षा : भौतिक सुरक्षा/ सायबर सुरक्षा/ हॅकिंग इत्यादी धोके अशा अवाढव्य क्लाऊड कंपन्या सामान्य व्यवसाय/ कंपनीच्या मानाने किती तरी पटीने सहज हाताळू शकतात.

(१०) पर्यावरण, प्रदूषण, ऊर्जा- संपूर्ण आयटी इन्फ्रा स्वत: उभारणे/ सांभाळणे आणि त्यातील हार्डवेअर प्लास्टिक, वीज, कूलिंगसाठी लागणारे पाणी इत्यादी एकाच क्लाऊड कंपनीने वापरल्यास जवळजवळ ८८ टक्के कार्बन प्रदूषण, प्लास्टिकचा वापर कमी होतो असे संशोधन म्हणते. आघाडीच्या क्लाऊड कंपन्यांनी १०० टक्के वीज पर्यायी ऊर्जास्रोतांतून मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

क्लाऊडचे धोके, आव्हाने :

(१) हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन नसले तर सगळेच बंद नाही का? तेव्हा टेलीकॉम सेवेवर क्लाऊड सेवेचे प्रचंड अवलंबित्व. (२) छोटय़ा-मोठय़ा व्यवसायांचे अवाढव्य क्लाऊड कंपन्यांवर संपूर्ण परावलंबित्व. (३) क्लाऊड कंपन्यांच्या पातळीवर काही गडबड झाल्यास अनेक व्यवसाय काही वेळेसाठी ठप्प!

लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

hrishikesh.sherlekar@gmail.com

Story img Loader