हृषीकेश दत्ताराम शेर्लेकर
या लेखमालिकेत भविष्यातील विश्व कसे असू शकेल, याबद्दल चर्चा करण्याआधी मानवी उत्क्रांतीमधील काही महत्त्वाच्या शोधांबद्दलचा रंजक इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे..
(१) दगडी हत्यारे, आग, शिजवलेले अन्न, निवारा :
मानवाचे पूर्वज सुरुवातीला कंदमुळे, फळे खाऊन पोट भरीत. हळूहळू दगड व लाकडाची हत्यारे बनवून त्यांनी शिकार करून प्राण्यांचे मांस, मासे खायला सुरुवात केली. त्यातून मिळणारी प्रथिने व ऊर्जेपासून त्यांची शारीरिक वाढ अधिक जोमाने व्हायला सुरुवात झाली. पुढे त्यांनी टोकदार केलेल्या दगडांचा वापर करून, शिकार केलेल्या प्राण्यांची हाडे फोडून त्यातील मगज खायला सुरुवात केली आणि त्या स्निग्धतेतून मिळण्याऱ्या प्रचंड ऊर्जेपासून त्यांच्या मेंदूच्या आकारात वाढ होऊ लागली, असे संशोधन सांगते. हे जैविक बदल अर्थातच अनेक पिढय़ांनंतर निर्माण झाले असले, तरी मानवी उत्क्रांतीमध्ये मगजरूपी अन्न व त्यातून मेंदूच्या आकारात वाढ होणे, हा एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो.
आधी दिवसभर कंदमुळे शोधण्यात आणि वन्यप्राण्यांपासून स्वत:चा बचाव करण्यात सारा वेळ जाई. पण मांसासारख्या मंद गतीने पचणाऱ्या अन्नामुळे त्यांना सतत खाण्याची गरज उरली नाही आणि वाचलेला वेळ ते नवीन कामांकडे वळवू लागले- जसे निवारा, नवीन हत्यारे बनवणे, इत्यादी. तरीही कच्चे अन्न खाल्ल्यामुळे म्हणावी तशी पोषणमूल्ये मिळत नव्हती आणि खायलाही बराच वेळ लागे. पुढे जाऊन मांस आगीवर भाजून खाण्याची सुरुवात झाली आणि मानवी उत्क्रांतीमध्ये एक नवा टप्पा ओलांडला गेला. आता पूर्वीसारखे कच्चे अन्न खायची गरज नव्हती आणि शिजलेले अन्न पचायला पूर्वीपेक्षा हलके व जास्त पोषक होते. त्यातून त्यांच्या पुढील पिढय़ांमध्ये लक्षणीय बदल झाले, प्रामुख्याने मेंदूचा आकार मोठा होत गेला.
मानवी उत्क्रांतीच्या या टप्प्यावर काही महत्त्वाचे बदल घडले :
– घर किंवा निवारा संकल्पना. आधी दिवसभर भटकंती सुरू असायची. जिथे अन्न मिळेल तिथे निवारा. आता अन्न भाजण्याची-खाण्याची जागा विरुद्ध अन्न व शिकार करण्याची जागा, अशी मानसिकता निर्माण झाली. आगीमुळे थंडीपासून होणारा बचाव आणि तिथेच निवारा, या विचारात ‘घर’ संकल्पना उदयास आली असावी.
– इथेच आणखी एक नवीन पायंडा पडला. अन्न आगीवर शिजवणे कमी जोखमीचे आणि एकत्र बसून करण्याचे काम. त्याउलट शिकार करणे, मोठमोठी जनावरे मारून त्यांना दूरवरून उचलून आणणे हे कष्टप्रद व जोखमीचे. मग शारीरिक ताकदीच्या तुलनेत स्त्रिया थोडय़ा नाजूक म्हणून त्या शिकार साफ करणार, अन्न शिजवणार, लहान मुलांना सांभाळणार आणि प्रौढ पुरुष शिकार करून आणणार, असे प्रकार सुरू झाले असावेत.
– त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे सामाजिक जीवन. आग, त्यावर अन्न भाजले जातेय, आगीच्या अवतीभोवती माणसांचा गराडा पडलाय. एकमेकांशी बोलणे, अन्न वाटून खाणे, एकमेकांच्या मदतीला धावून जाणे असले सामाजिक जीवनाचे संस्कार होण्यास इथेच सुरुवात झाली असावी. कला, संगीत, नृत्य, सण अनेक लोकांनी एकत्र येऊन करण्याच्या क्रियादेखील कदाचित इथेच उदय पावल्या असाव्यात.
– पाळीव प्राणी. माणसाने फेकून दिलेल्या उर्वरित मांसावर काही विशिष्ट प्राणी (लांडगे, कोल्हे, कुत्रे) गुजराण करू लागले. या प्राण्यांना आयते अन्न व मोठय़ा प्राण्यांपासून सुरक्षा, तर मानवी टोळ्यांना आयता पहारेकरी, असे गणित जमून पाळीव प्राण्यांची संकल्पना निर्माण झाली असे म्हणतात. तसेच गुरेढोरे व घोडे पाळणे सुरू झाले.
(२) शेती :
– अंदाजे दहा हजार वर्षांपूर्वी नवअश्मयुगात (निओलिथिक) मनुष्याने सर्वप्रथम शेती करायला सुरुवात केली. गहू, मटार, मसूर, मोहरी, बार्ली, चणे इत्यादी पिके, तसेच फळझाडे-फुलझाडे लावायला सुरुवात केली. इतर निगडित व्यवसायही (पशुपालन वगैरे) सुरू झाले.
– सर्वप्रथम गुंतवणूक, साठवणूक, दुष्काळ पडल्यास जीवनाश्यक गोष्टींचा साठा करणे अशा मानसिकतेचा उदय इथूनच झाला असावा.
– भूमी / गाव / राज्ये : भटकंती करणारा माणूस शेती करायला लागल्यापासून स्थिर झाला. त्यातून ‘माझी जागा, माझे गाव’ ही संकल्पना आली!
– खते, मशागत प्रकार वापरून उत्पादनक्षमता वाढवण्याच्या तंत्राचा उदय झाला.
– निसर्गचक्राचा अभ्यास करून त्यानुसार पेरणी करणे, मशागत वगैरे तंत्रांचा उदय झाला.
(३) धातूयुग – तांबे, जस्त, लोखंड :
सुमारे नऊ हजार वर्षांपूर्वी मध्यआखाती खंडात तांबे बनवायला सुरुवात झाली. पुढे त्यापासून थोडे कठीण असे जस्त बनवले गेले. नऊ हजार वर्षांपूर्वी लोखंडाचा शोध लागला आणि मानवी उत्क्रांतीमधील सुवर्णअध्याय लिहिला गेला. आज आपल्या जीवनावश्यक अशा कमीतकमी ५० टक्के वस्तूंमध्ये पोलाद, स्टील असतेच.
(४) नकाशे, होकायंत्र, जल वाहतूक :
– इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात चीनमध्ये चुंबकीय होकायंत्र शोधले गेले. तांबे, लोखंड इत्यादी वापरून त्या काळचे होकायंत्र बनवले जाई, जे नेहमी दक्षिणेकडे दिशा दर्शवे.
– होकायंत्रामुळे जग बरेच जवळ आले, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण त्याआधी जल वाहतूक, प्रवास, स्थलांतर आकाशातला ध्रुव तारा बघून केले जाई, आणि ढगाळ वातावरण असताना त्यात अनेक अडथळे येत.
– होकायंत्राचा प्रसार झाल्यावर सर्वात जास्त काय झाले असेल? तर, मोहिमा. जलमार्गे नवीन देश, खंड आणि नशीब अजमवायला धैर्यवान धजावू लागले.
(५) कागद, छपाई, पुस्तके व लिखाण :
– इ.स.पू. १०० च्या आसपास चीनमध्ये कागदाचा शोध लागला. हान साम्राज्यातील कै लून नावाच्या सरकारी अधिकाऱ्याने कागदनिर्मितीचा उद्योग प्रथम सुरू केला होता.
– ज्ञान शब्दरूपात साठवणे आणि त्याचा प्रसार करणे कागदाशिवाय अशक्य होते.
(६) औषधे व वैद्यकीय उपकरणे :
या शोधांमुळे मनुष्य मृत्यूवर काही अंशाने तरी मात करू लागला. त्याआधी साथींच्या रोगांनी थैमान घातले होते; साध्या तापानेदेखील जीव दगावायचे.
तीच तऱ्हा इतर शोधांची. प्रत्येक बाबतीत मनुष्य आपले बौद्धिक बळ, प्रचंड इच्छाशक्ती, जिज्ञासा, अथक प्रयत्न आणि चिकाटीच्या जोरावर निसर्गावर जमेल तेवढी मात करणे, स्वावलंबित्व मिळवणे आणि उच्चतम कार्यक्षमता साध्य करणे असे ध्येय ठेवून पुढे जाऊ लागला. मानवी उत्क्रांतीमधील मुख्य कल अगदी आदिमानवापासून आजच्या डिजिटल युगापर्यंत वरीलप्रमाणेच राहिला आहे, नाही का?
आता थोडेसे विषयांतर करून आजच्या डिजिटल युगात येऊ या. सर्वात आघाडीचे व्यवसाय घ्या किंवा सर्वाधिक भांडवल असलेल्या कंपन्या (अॅमेझॉन, अॅपल, गूगल.. इत्यादी) घ्या; त्यांच्यामध्येही काही समान वैशिष्टय़े नक्कीच आढळतील, जसे-
(अ) अति-वैयक्तिकीकरण : प्रत्येक व्यवहार तुमच्या वैयक्तिक गरजा, आवडीनिवडी, आधीचे वापरलेले पर्याय व प्राथमिक माहिती लक्षात ठेवून केलेले, जणू काही आपला मित्रच आपल्याशी व्यवहार करतोय! उदा. ३० कोटींहून अधिक ग्राहकांचे सेकंदागणिक शेकडो व्यवहार सुरळीत करायचेच, पण त्याचबरोबर त्यात वैयक्तिकपणा आणायचा, हे अॅमेझॉनच्या यशाचे कारण आहे.
(ब) परिस्थितीकीचा सर्वोत्तम वापर : वाहतूक सेवा पुरवणारी उबर कंपनी किंवा घरे भाडय़ाने देणारी एयरबीएनबी घ्या; ते पुरवत असलेली गाडी वा घर त्यांच्या मालकीचे नाहीये. भागीदारीतील इतरांच्या मालमत्तेचा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर ते करतात.
(क) जोखीम पत्करणे : अॅमेझॉनने कुणाच्या कल्पनेतही नसताना चालू शतकाच्या प्रारंभी ‘क्लाऊड’मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. आज त्यांच्या क्लाऊड सेवा पुरवणाऱ्या एडब्ल्यूएस कंपनीचा बाजारातील वाटा ४० टक्के आहे.
(ड) मूल्यवृद्धी : जुनेच थोडय़ाफार फरकाने जास्त कार्यक्षम करणे विरुद्ध नावीन्यपूर्ण, आमूलाग्र बदल आणणारे तंत्रज्ञान शोधून काढून, त्या जोरावर व्यवसाय उभारणे. सर्वोत्तम उदाहरण देता येईल आयफोनच्या टचस्क्रीन संकल्पनेचे!
(इ) त्याचबरोबर बौद्धिक बळ, इच्छाशक्ती, जिज्ञासा, अथक प्रयत्न आणि चिकाटी.
यातून नक्कीच हे ध्यानात येईल की, अगदी पूर्वकाळी, त्यानंतर औद्योगिक क्रांतीच्या दरम्यान आणि सध्याच्या डिजिटल युगातही- यशस्वी व्हायची मूलभूत तत्त्वे काही फारशी बदललेली नाहीत आणि बऱ्याच अंशी वरील पाच मुद्दय़ांमध्ये त्यांची मांडणी करता येईल.
लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.