हृषीकेश दत्ताराम शेर्लेकर

येत्या काळात उदयोन्मुख तंत्रज्ञान शेती आणि खाद्यान्नात कोणते बदल घडवून आणणार आहे आणि ते कसे? मागील काही लेखांकांत आपण उदयोन्मुख तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेत आहोत. त्यातील दोन विषयांबद्दल आज पाहू..

(१) प्रीसिजन अ‍ॅग्रिकल्चर (पीए) :

हे शेती करण्याचे आधुनिक तंत्र आहे. यात माहिती तंत्रज्ञान (आयटी) तंत्रज्ञान वापरून पिकांना, झाडांना आणि मातीला अत्यंत मोजूनमापून कार्यक्षम, प्रभावी व किफायतशीर पद्धतीने जोपासले जाते- जेणेकरून त्यांचे आरोग्य आणि उत्पादकता सर्वोत्तम राखता येईल. त्यात भर म्हणून कृत्रिम प्रकाशही वापरला जातो कधी कधी. इथे मनुष्यबळ कमी करून मोठी उपकरणे वापरणे आणि खर्च कमी करणे हा मुद्दा नसून, शेतीला फक्त गरजेनुसार खते, पाणी व प्रकाश पुरवणे, आयओटी संवेदक (सेन्सर) आणि ड्रोन वापरून पिकांची २४ तास देखरेख ठेवणे आणि एकंदरीत अत्यंत सूक्ष्म पातळीवर जाऊन शेतीचे व्यवस्थापन करणे. त्यासाठी पुढील तंत्रे अवलंबली जातात –

(अ) फायटोमॉफरेलॉजी : जमिनीचे वैशिष्टय़, पोत आणि त्यानुसार पिकांची निवड अभ्यासपूर्वक ठरवणे. त्यासाठी विदाशास्त्र आणि मशीन लर्निग तंत्रज्ञान वापरले जाते.

(आ) डिसिजन सपोर्ट सिस्टीम : एकंदरीत शेती व्यवस्थापन करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान वापरून एक निर्णय-समर्थन प्रणाली राबवणे- जेणेकरून संपूर्ण शेती लागवडीचा अहवाल, नियंत्रण एका ठिकाणी संगणकाद्वारे करता येईल.

(इ) प्रिस्क्रिप्टिव्ह लागवड : विदा विश्लेषण (डेटा-अ‍ॅनालिटिक्स) वापरून कुठल्या लागवडीमुळे किती खर्च, उत्पन्न, बाजारभाव व नफा असे आधीच अंदाज घेऊन मग प्रत्यक्ष लागवड ठरवणे.

(ई) वस्तुजालाआधारित शेती : इंटरनेट ऑफ थिंग्ज अर्थात आयओटी संवेदक झाडांना, मातीत, पिकांमध्ये लावून त्याद्वारे त्यांच्या आरोग्याची अचूक माहिती सतत मिळवणे आणि त्यानुसार खते, पाणी, औषधे पुरवणे.

(उ) ड्रोन्सआधारित शेती : खते फवारणी, कीटक व पक्षी यांपासून संरक्षण, वन्य प्राण्यांच्या नासधुसीची सूचना, इत्यादी.

(ऊ) मोबाइल अ‍ॅप : डिसिजन सपोर्ट सिस्टीमचा मोबाइलद्वारा वापर व नियंत्रण.

(ए) अ‍ॅग्बोट्स : रोबोटिक शेतकामगार- अजून प्रयोगशाळेतच आहेत, परंतु भविष्यात शक्य होतील!

(ऐ) सूक्ष्म खते : नायट्रेट, पोटॅशियम, फॉस्फरस (एनकेपी) व्यतिरिक्त इतर सूक्ष्म पोषक घटक अचूक प्रमाणात पुरवणे. आपण जसे विविध व्हिटॅमिनच्या गोळ्या विविध व्याधींसाठी घेतो तसे!

(ओ) अचूकतानिष्ठ शेती (प्रीसिजन अ‍ॅग्रिकल्चर) हे तंत्र फक्त शेतीपुरते मर्यादित नसून मत्स्य-व्यवसाय, पशुपालन, फळझाडे लागवड अशा सर्व निगडित व्यवसायांसाठीदेखील पूरक आहे.

हे सर्व वाचून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल, की हे सारे भारतात कसे शक्य आहे? काही शेतीविषयक समस्या आपल्या देशाला आत्ताच भेडसावताहेत. त्यामध्ये शेतकरी शेती करायला निरुत्सुक, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, गरजेला मजूर उपलब्ध नसणे, बाजारभावाचा अंदाज नसल्यामुळे पीक चांगले येऊनही शेवटी नुकसान, पाणी व खते वारेमाप वापरल्यामुळे प्रदूषण, पर्यावरण हानी अशा बऱ्याच गोष्टींचा उल्लेख करता येईल. अर्थातच या सर्व समस्यांवर ‘प्रीसिजन अ‍ॅग्रिकल्चर’ हे काही एकमेव उत्तर नाहीये. तरीही एकदा का हे तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्यात आले, की बरेच प्रश्न सुटू शकतील.

आता थोडेसे विषयांतर करून, सध्या देशात चर्चेत असलेल्या दिल्लीतील हवा प्रदूषणाबद्दल. त्यावर राजकारण, चिखलफेक, बातम्या सुरूच आहे म्हणा रोज. एका बाजूला तेथील नागरिकांचे प्रचंड हाल व संभाव्य श्वसनाचे आजार, तर दुसऱ्या बाजूला शेतातील पेंढा जाळणाऱ्या गहू उत्पादकांचे आर्थिक गणित व तोटय़ात शेती करण्याच्या नामुष्कीमुळे पेंढा जाळण्याचा सोप्पा मार्ग अवलंबणे. पंजाबमधील एका शेतकऱ्याची मुलाखत सुरू होती टीव्हीवर. त्यात त्याचे सरळ उत्तर होते : जर आम्हाला परवडणाऱ्या खर्चात पेंढा काढायचे तंत्र अवगत झाले, तर आम्ही कशाला आगी लावू? इथे कायदा करून शेवटी पळवाट शोधली जाणार. त्यात ‘एअर-प्युरिफायर’ नामक घरातील हवेचे शुद्धीकरण करण्याचे उपकरण प्रचंड महाग आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर. मग आपत्ती घोषित करून नक्की काय करायचे? पुढील वर्षी परत हेच घडणार नाही याची काय हमी? आणि या जाचाला कंटाळून तिथल्या शेतकऱ्यांनी गहू उत्पादनच थांबवले तर? त्यातून मग अन्न तुटवडा आणि इतर समस्या.

आपल्या देशात प्रचंड लोकसंख्या आणि संसाधने मात्र कमी. पण कोणीही पेंढा काढायचे आणि घरातील हवेचे शुद्धीकरण करण्याच्या नव-तंत्रज्ञानाबद्दल काहीच बोलत नाहीये. सरकारी यंत्रणा, खासगी कंपन्या, आयआयटीसारख्या अग्रेसर शैक्षणिक संस्था आणि नावाजलेले ज्येष्ठ संशोधक एकत्र आले, तर अगदी काही महिन्यांत वरील दोन्ही उपकरणे अत्यंत वाजवी दरात, पूर्णपणे नवीन संकल्पना वापरून तयार होऊ  शकतील. अभियांत्रिकी विद्यार्थी गटांच्या ‘इनोव्हेशन हॅकेथॉन’ नामक स्पर्धेमार्फतही कदाचित काही सहज मार्ग सापडू शकतील.

भारत जर अमेरिकेच्या काही अंश खर्चात स्वबळावर अंतराळात गरुडझेप घेऊ  शकतो, तिथे असल्या प्रश्नांची काय ती मजल! पण आपल्याकडे इस्रोच्या तोडीसतोड शेतीसाठी संस्था आहेत? बरे, शेतीविषयक संशोधन होतच नाही, असेही नाही. पण इस्रो काही दशकांपूर्वी जन्मालाच घातली गेली नसती, तर आजचे चांद्रयान, मंगलयान शक्य झाले असते? मुद्दा हाच की, समस्या कोणतीही असो; नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानच आपल्या देशाला भविष्यात तारू शकेल. अर्थातच त्यातही योग्य कायदे, नागरिकांचे सहकार्य लागेलच.

(२) कृत्रिम खाद्य व प्रयोगशाळेत वाढवलेले मांस खाद्य (लॅब मीट) :

लॅब मीट म्हणजे कत्तल केलेल्या प्राण्याऐवजी, प्राण्यांच्या पेशींच्या व्ह्रिटो लागवडीने तयार केलेले मांस. हा पेशीजन्य शेतीचा एक प्रकार असून पुनरुत्पादक औषधात पारंपरिकपणे वापरल्या जाणाऱ्या अभियांत्रिकी तंत्रांचा वापर करून लॅब मीट तयार केले जाते. लॅब मीट अनेक नावांनी संबोधले जाते; जसे- लॅब मीट, व्ह्रिटो मीट, सिंथेटिक मीट. प्रयोगशाळेतील उपकरणात नियंत्रित वातावरणात प्राण्यांच्या स्नायू पेशी पौष्टिक सीरममध्ये वाढवून स्नायूसारख्या मोठय़ा तंतूंमध्ये त्यांची वाढ केली जाते.

तथापि, लॅब मीट निर्माण करण्यासाठी गरज पडते मुख्य प्राण्याच्या स्टेम पेशी, गर्भ सीरम व इतर प्राणी उत्पादनांची. याचाच अर्थ असा की, लॅब मीट मांसामध्ये पुष्कळ प्राण्यांचे जीवन वाचवण्याची क्षमता असूनही ते शाकाहारी मुळीच नाहीये. परंतु हिंसा, कत्तल असले विषय इथे नक्कीच काही प्रमाणात बाद होतात.

संशोधन असे दर्शवते की, प्राण्यांचे मांस मिळवण्यासाठी जगातील अर्धेअधिक धान्य प्राण्यांना खायला दिले जाते. यातील बऱ्याच प्रमाणात भाजीपाला, धान्य वाचू शकेल आणि तितकीच जमिनीची उत्पादकता वाढू शकेल. अर्थातच, लॅब मीटच्या स्नायूसारख्या तंतूंची वाढ होण्यास ज्या नैसर्गिक ऊर्जेची गरज पडेल, त्याचाही विचार करावा लागेलच.

पण चवीबद्दल काय, हा आपल्या खवय्यांचा प्रश्न. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रयोगशाळेत निर्माण केलेले लॅब मीट हे जिवंत प्राण्यांपासून मिळणाऱ्या मांसासारखी चव, पोत व गुणवत्ता प्राप्त करण्यापासून अद्याप बरेच दूर आहे आणि हो, अजून तरी हे प्रयोग प्राण्यांच्या मांसाबद्दल सुरू आहेत; मासेखाऊंना समुद्रावरच अवलंबून राहावे लागेल!

भविष्यातले प्रमुख फायदे :

(अ) वाढती लोकसंख्या आणि नैसर्गिक अन्नाचा वाढता तुटवडा यावर लॅब मीट एक उपयुक्त पर्याय ठरू शकतो.

(ब) तुलनेने स्वस्त, मुबलक प्रमाणात कुठेही उपलब्ध होऊ  शकेल असे आणि प्रथिन पुरवठय़ासाठी उपयुक्त पर्याय.

(क) डिझाइनर मीट : नैसर्गिक मांस त्याच्या विविध समस्यांबरोबर येते- जसे कॉलेस्टेरॉल, त्वचेवरील चरबीयुक्त स्निग्धता, काटे/हाडे, विषाणूंचा प्रादुर्भाव, इत्यादी. लॅब मीटमध्ये अशा समस्या नसतील.

(ड) गुणवत्ता : नैसर्गिक मांस ग्राहकापर्यंत पोहोचताना पुरवठा साखळीत अनेकदा भेसळ, अस्वछता, प्रदूषण करीत पोहोचत असते. त्याउलट लॅब मीट फॅक्टरी ते ग्राहक पॅकिंग स्वरूपात येईल.

वरील विषयाबद्दल वाचून अनेकांच्या मनात बरेच प्रश्न उद्भवले असतील कदाचित. मात्र युद्धकाळात, नैसर्गिक आपत्ती आणि नैसर्गिक अन्न मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यास जगण्यासाठी आवश्यक पर्याय म्हणून नक्कीच याकडे पाहता येईल!

लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

hrishikesh.sherlekar@gmail.com

Story img Loader