|| हृषिकेश दत्ताराम शेर्लेकर

घेतलेल्या नोंदींचा वापर योग्यरीत्या करणे हे वस्तुजालाचे (आयओटी) वैशिष्टय़. हा वापर सध्या कसा आहे?

‘वस्तुजाल’ म्हणजेच ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ किंवा लघुरूपात ‘आयओटी’. या ‘आयओटी’च्या प्रगतीत विविध टप्पे आले. तसे पाहू जाता, डिजिटल स्वरूपात डेटा नोंदवणारी उपकरणे (इलेक्ट्रो-मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस किंवा थिंग्ज) फार आधीपासूनच अस्तित्वात आहेत. एसी/ फ्रिजमधील तापमान, वीज-मीटर, एखाद्या गाडीचा वेगमापक अशी अनेक उपकरणे असतात.

मग ‘आयओटी’ वेगळे कसे? तर सर्व उपकरणे एकमेकांशी नेटवर्कद्वारा जोडणे आणि त्यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणणे, जेणेकरून त्या वस्तू ‘निर्णय’ घेऊ  शकतील, हे ‘आयओटी’चे निराळेपण! अर्थात, आजची परिस्थिती बहुतांश उपकरणे ‘एकमेकांशी नेटवर्कद्वारा जोडणे आणि त्यातील डेटा वापरून माणसाने निर्णय घेणे’ अशीच आहे म्हटलं तर वावगं ठरू नये. ‘इंटेलिजेंट थिंग्ज’ घरोघरी यायला अद्याप थोडा अवधी आहे.

उदाहरणार्थ, समजा आपल्या घरात एक फ्रिज, दोन एसी, चार पंखे, दहा एलईडी बल्ब, मुख्य दरवाजाबाहेर एक सीसीटीव्ही कॅमेरा, एक टीव्ही, म्युझिक सिस्टम आणि दोन कॉम्प्युटर अशी उपकरणे वापरात आहेत. त्याचबरोबर गॅसगळती, आग/धूर यांची संवेदक (सेन्सर) अशी उपकरणे आहेत आणि अर्थातच वायफाय राउटरदेखील आहे. प्रत्येक उपकरण सतत ठरलेल्या गोष्टींचे रीडिंग (डेटा) घेतच आहे, परंतु त्या सर्व नोंदी त्या-त्या उपकरणामध्येच निव्वळ पडून राहताहेत. मग एखादे उपकरण बंद पडल्यास आपल्याला प्रथम मनस्ताप, वायफळ खर्च आणि वेळेचा अपव्यय.. काही महिन्यांनी दुसरे एखादे उपकरण बंद आणि परत तोच अनुभव. बरोबर ना?

‘आयओटी’चे नक्की फायदे कोणते समजून घेण्यासाठी आधी खालील प्रश्न स्वत:लाच विचारून पाहा :

  •  तुम्ही तुमच्या घरातील उपकरणे आणि वाहने कधी बंद पडू शकतील हे वर्तवू शकता? ..आणि कधी, कशामुळे, कुठला पार्ट, किती खर्च होईल, इत्यादी प्रश्न.
  •  तुमच्या घरातील उपकरणे आणि वाहने सध्या सर्वोत्तम स्थितीत सुरू आहेत असे खात्रीलायकपणे सांगू शकता? (उदा. विजेची किफायत आदी प्रश्न)
  • घरातील उपकरणे आणि वाहने वापरताना कुठलाही धोका उद्भवणार नाही हे सांगू शकाल का? जसे गाडीचा ब्रेक, शॉर्टसर्किट इत्यादी जीवितहानी करू शकणारे प्रश्न.
  • या उपकरणांवर आणि वाहनांवर जगाच्या पाठीवर कुठेही असताना देखरेख ठेवू शकता? ती चालू-बंद करू शकता? आणि मुख्य म्हणजे त्यांचा अनधिकृत आणि गैरवापर रोखू शकता का?
  •  सर्वात मुख्य म्हणजे, काही गैर झाल्यास आणि तुम्ही त्या वेळी घरी नसल्यास तुम्हाला तातडीने माहिती मिळू शकते का? (उदा. घरात गॅसगळती झाली आहे, अलार्म वाजतो आहे, पण त्या वेळी घरी कोणीही नाही.)

हल्ली ‘आयओटी’ची जाहिरातबाजी जरी चौथ्या मुद्दय़ाभोवती फिरत असली (एका जाहिरातीत, सहलीवर गेलेले एक जोडपे डोंगराच्या माथ्यावरून मोबाइल वापरून घरातील लाइट, पंखे बंद केले असल्याची खात्री करून घेतात.), तरी ‘आयओटी’चे महत्त्वाचे फायदे म्हणजे वरील सर्व प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असणे होय. घरातील उपकरणांपुरते ठळक फायदे असे :

  •  बंद पडण्याची सूचना मिळणे व वेळीच खबरदारी (सक्रिय देखभाल)
  • गुणवत्ता चाचणी व त्यामधून बचत (वीज, दुरुस्ती खर्च इत्यादी)
  •  धोक्याची सूचना व जीवितहानीपासून सुरक्षा (ब्रेक-फेल, शॉर्टसर्किट, गॅसगळती, घरफोडी वगैरे)
  •  दूरस्थ संचालन व देखरेख (कुठूनही उपकरण चालू/बंद)
  •  आपत्कालीन संपर्क (‘अ‍ॅलर्ट’ संदेश)

वरील फायदे शक्य व्हायला आपल्या घरची सर्व उपकरणे ‘आयओटी एनेबल्ड’ असावी लागतील, म्हणजेच त्यात ‘आयओटी-सर्किट’ असावे लागेल. घरात अर्थातच वायफाय नेटवर्क असावे लागेल आणि त्याला ही सर्व उपकरणे जोडलेली असावी लागतील. घरगुती वापरासाठी हल्ली बरीच ‘आयओटी’ अ‍ॅप्लिकेशन्स मोफत उपलब्ध आहेत (गूगल होम, अ‍ॅमेझॉन अलेक्सा इत्यादी). ती डाऊनलोड करून, त्यावर तुमच्या ‘आयओटी एनेबल्ड’ उपकरणांची नोंदणी केली की काम झाले. मग ती सर्व उपकरणे तुम्ही मोबाइल वापरून बंद/चालू करू शकता. अगदी, घरी परत येण्याआधीच ‘आयओटी’ कूकर सुरू करणे, एसी चालू करणे असले गमतीदार आणि काही प्रमाणात फाजील प्रकारदेखील बाजारात येताहेत.

मात्र ‘आयओटी’ तंत्रज्ञानाचा खरा ग्राहक अवजड उद्योग, पायाभूत सुविधा कंपन्या आहेत. का, ते सविस्तर पाहू :

सक्रिय देखभाल : उत्पादन साखळीतील असेंब्ली लाइन, ऊर्जा निर्माण करणारी प्रचंड यंत्रे हे अवघे काही तास बंद पडल्यास काही कोटींचे नुकसान आणि उत्पादन बंद पडल्यामुळे ग्राहकांचा रोष, शिवाय दुरुस्ती खर्च.. हे टाळण्यासाठी त्या यंत्रसामग्रीतील हजारो ‘आयओटी’ संवेदक विविध नोंदणी घेऊन कुठला पार्ट ‘फेल’ होण्याची शक्यता आहे, याबद्दल अंदाज वर्तवितात.

उदा. बॉल-बेअिरगमधील घर्षणाचा आवाज ठरावीक पातळीपेक्षा वाढल्यास ते फेल होऊन पूर्ण इलेक्ट्रिक-मोटर बंद पडण्याची शक्यता असल्याची सूचना! ती मिळताच बेअिरग बदलणे इत्यादी कामे हाती घेता येतात. त्यातही मशीनरी दूरच्या स्थळी असल्यास हा उपयोग मोलाचाच.

गुणवत्ता चाचणी व त्यातून बचत : एका मोठय़ा भारतीय कंपनीच्या अनेक शाखा आहेत, कर्मचारी काही लाखांवर आणि कार्यालय-क्षेत्रफळही अवाढव्य. त्यांचे विजेचे बिलच काही कोटी रुपयांचे आणि फक्त काही टक्के वीजबचत म्हणजे नफ्यात काही कोटी रुपयांची वाढ! त्यांनी त्यांच्या प्रत्येक वीज-उपकरणात जागोजागी आयओटी एनर्जी मीटर बसवले आणि कुठली शाखा, कुठले उपकरण, कधी किती वीज वापरत आहे, सरासरीपेक्षा जास्त असल्यास नियंत्रण कक्षाद्वारा पडताळणी असे उपक्रम सुरू केले. कार्यालयातील हेवी डय़ुटी कूलिंग मशीन्सच एकूण वापरापैकी ५५ ते ६० टक्के वीज वापरतात, हे लक्षात आल्यावर बचतीचा रोख तिकडे वळविला गेला. ‘कूलिंग मशीन सकाळी सातला सुरू आणि रात्री नऊला बंद’ या प्रथेऐवजी, त्या-त्या शाखेत किती कर्मचारी आहेत यावर कधी आणि किती कूलिंग मशीन सुरू करायच्या, हे आयओटी प्लॅटफॉर्म ठरविते आणि त्यानुसार ठरावीकच वातानुकूलन यंत्रे सुरू केली जातात. असे आणखी अनेक प्रयोग करून गेल्या चार-पाच वर्षांत जवळपास ३५ ते ४० टक्के वीजबचत त्यांना शक्य झाली आहे. हा ‘आयओटी’चा खराखुरा फायदा.

असेच उपक्रम घरच्या घरीदेखील शक्य आहेत; पण सध्या तरी आयओटी एनेबल्ड साधनांच्या किमती मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर आहेत. तरी दिवसेंदिवस त्यात झपाटय़ाने घट होऊन पुढील तीन ते पाच वर्षांत भारतात घरोघरी ‘आयओटी’ उपकरणे दिसतीलच.

धोक्याची सूचना व आपत्कालीन संपर्क : बचत, देखभाल हा एक उपयोग; पण ब्रेक-फेल, शॉर्टसर्किट, गॅसगळतीमुळे होणाऱ्या जीवितहानीबद्दल विचार करा. रासायनिक औषधे, खते आदी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या परिसरात विषारी वायूंची भीती असतेच. कुठल्याही मोठय़ा अनर्थाआधी गळती हळूहळू होत असते, ज्यावर संवेदक सहजच देखरेख ठेवू शकतात आणि आखून दिलेल्या प्रमाणाच्या वर गळती गेल्यास लगेच भोंगे- ‘अ‍ॅलर्ट’ संदेशांद्वारा धोक्याच्या सूचना देतात.

घरातसुद्धा ‘एलपीजी गॅसगळतीमुळे घरातील गॅससेन्सर जोरात अलार्म देताहेत, पण ऐकायला घरी कोणीच नाही, सोसायटीच्या वॉचमनलाही वरच्या मजल्यावरला तो गजर ऐकू येत नाही’ अशा स्थितीत, ‘आयओटी’ तंत्रज्ञान उपयोगी पडू शकते.

दूरस्थ संचालन व देखरेख : वाहतूक करणारे प्रचंड ट्रक-ट्रेलर्स देशभर फिरत असतात. रस्त्यात बंद पडल्यास होणारे नुकसान, परत एकंदर साखळीप्रक्रियेत अडचण आणि मालाचा तुटवडा, त्यातून प्रचंड तोटा. दुसरा धोका म्हणजे गैरवापर. पेट्रोल/डिझेल मध्येच थांबवून चोरी, भेसळ असे प्रकार आपल्याकडे होतात. एका भारतीय इंधन कंपनीने त्यांच्या प्रत्येक ऑइल-टँकरच्या नळाला एक आयओटी एनेबल्ड इलेक्ट्रॉनिक लॉकच लावून टाकले. म्हणजे नियंत्रण कक्षाला कळविल्याशिवाय चालकही ते उघडू शकणार नाही आणि तोडण्या-फोडण्याचा प्रयत्न झाला, तर नियंत्रण कक्षाला लगेच संदेश. जीपीएस ट्रॅकरमुळे ट्रक अनधिकृत ठिकाणी थांबून तेलाचा नळ उघडला जातोय तेदेखील लगेच कळू शकते आहे. तेलचोरी, भेसळ या सोप्या उपायाने मिटवता आली, त्यातून नफा वाढलाच.

तरीही, आपण फक्त ‘जोडलेल्या (कनेक्टेड) उपकरणां’बद्दलच बोलतो आहोत. ही उपकरणे जेव्हा ‘एआय’- नवप्रज्ञा- वापरून ‘इंटेलिजंट’देखील होतील, तेव्हा तर आणखीच विस्मयकारक शक्यता खुल्या होतील.

पुढील लेखात पाहू ‘आयओटी’चे विविध विकास टप्पे आणि सध्याची आव्हाने.

लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

hrishikesh.sherlekar@gmail.com

Story img Loader