हृषीकेश दत्ताराम शेर्लेकर

मागील दोन लेखांपासून आपण उदयोन्मुख तंत्रज्ञाना(इमर्जिग टेक्नोलॉजिस्)बद्दल जाणून घेण्यास सुरुवात केली आहे, ज्यात प्रमुख दहा विषय निवडले आहेत. त्यापैकी काही पुढे बघू या..

chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
artificial intelligence to develop ability to create substances with specific qualities
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतून हव्या त्या गुणधर्मांचा पदार्थ
Where a giant animal like a dinosaur was destroyed, what happened to microscopic organisms! Man should take the initiative to protect biodiversity know more about
जैवविविधतेच्या संरक्षणासाठी माणसानेच पुढाकार घ्यावा

(१) सव्‍‌र्हरलेस कॉम्प्युटिंग :

‘क्लाऊड’ तंत्रज्ञानासंदर्भातील लेखात पाहिल्याप्रमाणे, संपूर्ण संगणक हार्डवेअर घरी वा कार्यालयात ठेवण्याच्या सुरुवातीच्या प्रथेला छेद देत क्लाऊड सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी सर्वच्या सर्व संगणकीय सेवा क्लाऊडमार्फत भाडय़ाने पुरवण्यास सुरुवात केली आहे. त्यात ‘डेटा-स्टोरेज’, ‘कॉम्प्युटिंग-पॉवर’ व ‘होस्टेड अ‍ॅप्लिकेशन्स’ प्रामुख्याने येतात. ‘सव्‍‌र्हरलेस कॉम्प्युटिंग’ त्यातीलच एक प्रकार! सव्‍‌र्हरलेस कॉम्प्युटिंग क्लाऊड-कॉम्प्युटिंग सेवा पुरवण्याचे एक विशिष्ट प्रारूप आहे. त्यानुसार क्लाऊड सेवा पुरवणारी कंपनी मोठमोठाले सव्‍‌र्हर चालवते आणि वापरकर्त्यांना गरजेनुसार व मागणीनुसार फक्त हवी तेवढीच कॉम्प्युटिंग पॉवर पुरवते. मग वापरकर्त्यांना हाती वेब-ब्राऊजर आणि इंटरनेट जोडणी असले की पुरे!

इथे क्लाऊड-कॉम्प्युटिंग आणि सव्‍‌र्हरलेस कॉम्प्युटिंग यांच्यात एक सूक्ष्म फरक आहे. क्लाऊड वापरून तुमची संगणकीय गरज दोन प्रकारे भागवता येते :

(अ) तुमच्या घरचा किंवा कार्यालयातला संगणक (सव्‍‌र्हर) क्लाऊड कंपनीने स्वत:कडे ठेवून इंटरनेटमार्फत तुम्हाला गरजेनुसार वापरायला देणे. जसे प्रवास करायचा असल्यास संपूर्ण वाहन भाडय़ाने घेण्यासारखे.

(ब) क्लाऊड कंपनीने सव्‍‌र्हरचे महाजाल निर्माण केलेले असतेच; वापरकर्त्यांने काही प्रोग्राम चालवायला घेतल्यास फक्त त्याच वेळेसाठी क्लाऊड कंपनी तिच्या एकत्रित सव्‍‌र्हर क्षमतेतील काही संसाधने वापरकर्त्यांला पुरवते. जसे प्रवास करायचा असल्यास मोठय़ा वाहनातील फक्त एक, दोन सीट्स भाडय़ाने घेण्यासारखे.

सव्‍‌र्हरलेस कॉम्प्युटिंगचे प्रमुख फायदे म्हणजे, आपण ऊर्जेचा वापर करतो त्याप्रमाणे वापर तेवढेच शुल्क, कमीत कमी वापराच्या हमीची गरज नाही, अचानक वापर वाढला तरी सेवा मिळणारच, तसेच पुरवठा बंद पडल्यास तातडीने पर्यायी सेवा मिळणे, इत्यादी. आणि अशी सव्‍‌र्हरलेस कॉम्प्युटिंग सेवा पुरवणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस्, मायक्रोसॉफ्ट अझुर, गूगल क्लाऊड प्लॅटफॉर्म यांचा समावेश होतो.

(२) बायोमेट्रिक्स :

‘बायोमेट्रिक्स’ म्हणजे लोकांच्या शारीरिक व वर्तणुकीशी संबंधित वैशिष्टय़ांचे मोजमाप आणि सांख्यीय विश्लेषण. हे तंत्रज्ञान मुख्यत: ठरावीक मनुष्याची अचूक ओळख, प्रवेश नियंत्रणासाठी किंवा देखरेखीखाली असलेल्या व्यक्तींना ओळखण्यासाठी वापरले जाते. प्रत्येक जण त्याच्या शारीरिक किंवा वर्तणुकीच्या वैशिष्टय़ांद्वारे अचूकपणे ओळखला जाऊ  शकतो, हा या तंत्रज्ञानाचा मूलभूत आधार आहे. ‘बायोमेट्रिक्स’ हा ग्रीक शब्द ‘जैव’ म्हणजे जीवन आणि ‘मेट्रिक’ म्हणजे मोजणे यांपासून बनला आहे. बायोमेट्रिक्समध्ये तीन प्रमुख गोष्टी येतात- (अ) बायोमेट्रिक्स रीडर किंवा स्कॅनर. (ब) बायोमेट्रिक्स सॉफ्टवेअर प्रणाली, जी मिळवलेल्या विदेचे डिजिटल रूपात परिवर्तन करून आधीपासूनच साठवलेल्या विदेशी पडताळणी करते. (क) ‘बायोमेट्रिक्स डेटाबेस’- ज्याच्यात डिजिटल स्वरूपात विदा साठवली जाते. बायोमेट्रिक्समध्ये पुढील शारीरिक गोष्टी वापरून कार्य साधले जाते : चेहरा (फेशियल रेकग्निशन), बोटांचे ठसे, बोटांची भूमिती (बोटांचे आकार आणि स्थिती), डोळ्यांतील बुब्बुळ व त्याची रचना, रक्तवाहिन्या, शिरांची रचना, डोळ्यांतील पडदा, आवाज (व्हॉइस रेकग्निशन), डीएनए मॅपिंग, वर्तणुकीशी संबंधित वैशिष्टय़े- म्हणजे चाल, ओठांची, मानेची हालचाल, इत्यादी.

या तंत्रज्ञानाचा वापर प्रामुख्याने कायदा अंमलबजावणी, गुन्हेगारीविषयक विदासंकलन, सीमा नियंत्रण, इलेक्ट्रॉनिक पारपत्र, राष्ट्रीय ओळखपत्रे (उदा. आधार), कार्यालयातील प्रवेश व हजेरी, आदींसाठी केला जातो.

(३) बायोप्लास्टिक्स :

‘बायोप्लास्टिक’ म्हणजे नवनिर्मितीयोग्य जैविक स्रोतांपासून तयार केलेली प्लास्टिकची सामग्री. जसे की- भाजीपाला, चरबी आणि तेल, कॉर्न स्टार्च, पेंढा, लाकडी भुसा, पुनर्नविनीकरण केलेले अन्न, इत्यादी. तसेच बायोप्लास्टिक कृषी उप-उत्पादनांमधूनदेखील बनवता येते. वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर वस्तूंपासूनही बायोप्लास्टिक बनवले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बायोप्लास्टिक उत्पादने उदयास आली. त्यांना कधी कधी ‘बायोबेस्ड्’, ‘बायोडीग्रेडेबल’ किंवा ‘कम्पोस्टेबल’ अशी लेबले लावली जातात; कारण ते जैविक गोष्टींसारखे नैसर्गिक घटकांमध्ये विघटित होते. बायोडीग्रेडेबल प्लास्टिक पूर्णपणे विघटित होण्यास तीन ते सहा महिने लागतात आणि सिंथेटिक प्लास्टिकला कित्येक वर्षे. परंतु बायोप्लास्टिक विघटन होताना मिथेन वायू बऱ्याच प्रमाणात निर्माण करतात आणि पूर्ण विघटन व्हायला अनेक महिने लागतात.

बायोप्लास्टिक्स सध्या साधारण प्लास्टिकपेक्षा खूपच महाग आहेत आणि हळूहळू नवनवीन तंत्रज्ञान उदयास येऊन बायोप्लास्टिक्स साधारण प्लास्टिकपेक्षा स्वस्त होईल अशी खात्री आपण नक्कीच बाळगू शकतो. यातील प्रमुख खर्च मात्र टाकाऊ नैसर्गिक पदार्थ मिळवणे, त्यासाठीची पुरवठा साखळी अशा गैर-तंत्रज्ञान गोष्टींमध्ये अधिक होतो.

(४) कोलॅबोरेटिव्ह टेलिप्रेझेन्स :

सध्याच्या सायबर-फिजिकल युगात मानवी भेटीगाठींना फार वेगळे स्वरूप आले आहे. व्हिडीओ कॉल, कार्यालयांमध्ये सर्रास वापरले जाणारे स्काइप, वेबेक्स, व्हिडीओ कॉन्फरन्स, इत्यादी. पण तरीही एकत्र वा जवळ बसल्याचा, स्पर्श करण्याचा अनुभव त्यातून अजून काही मिळत नव्हता. कल्पना करा, जगातील विविध ठिकाणी काही लोक बसले आहेत आणि तंत्रज्ञान वापरून चक्क एकमेकांशी अशा प्रकारे सुसंवाद साधत आहेत, की जणू काही ते एकाच खोलीत एकत्र आहेत; त्यांना एकमेकांना अगदी स्पर्श केल्याचा अनुभवदेखील मिळतो आहे! अशा तंत्रज्ञानाला ‘कोलॅबोरेटिव्ह टेलिप्रेझेन्स’ म्हटले जाते- ज्यामुळे संवाद साधण्यासाठी माणसांतले भौगोलिक अंतर भविष्यात एक गौण भाग होऊन जाईल.

ऑग्मेन्टेड-रियालिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रियालिटी (व्हीआर) तंत्रज्ञान हळूहळू परवडणारे होतेच आहे. दूरसंचार कंपन्या ५-जी नेटवर्क वेगाने आणत आहेत, जेणेकरून सध्या व्हिडीओ कॉलमध्ये जसा टाइम लॅग जाणवतो, तसा जाणवणार नाही. तसेच हॅप्टिक सेन्सर्समुळे दूरस्थ असूनदेखील स्पर्श अनुभवणे शक्य होत आहे. हे सर्व असूनही सध्याच्या इंटरनेट टाइम लॅगमुळे आपल्याला सतत जाणीव असते, की समोरील व्यक्ती जवळ भासत असली तरी ती दूरस्थ कुठे तरी आहे. ही त्रुटी गणितीश्रेणीची कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून सोडवण्याचा प्रयोग सध्या सुरू आहे.

या तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर करमणुकीबरोबरच दूरस्थ रुग्ण-निदान आणि वैद्यकीय सेवा, दूरस्थ शिक्षण, व्यावहारिक चर्चा व बैठकांचा वेळ व खर्च वाचणे, दूरस्थ स्थळी नोकरी/व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या आप्तांशी संपर्कात राहण्यासाठी वगैरे होऊ  शकेल.

(५) थ्रीडी प्रिंटिंग :

‘थ्रीडी प्रिंटिंग’ किंवा ‘अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चिरग’ म्हणजे डिजिटल फाइलमधून तीन मितीय घन वस्तू बनवण्याची प्रक्रिया आहे. खास थ्रीडी प्रिंटिंग प्रणालीचा वापर करून थ्रीडी प्रिंटेड वस्तूची निर्मिती केली जाते. संपूर्ण वस्तू तयार होईपर्यंत लागोपाठ थरावर थर रचून (प्रिंट करून) अंतिम वस्तू तयार केली जाते. यातील प्रत्येक थर अंतिम वस्तूच्या पातळ कापलेल्या क्रॉस-सेक्शनच्या रूपात असतो.

अत्यंत क्लिष्ट वस्तुरचना, नैसर्गिक आकार, मानवी अवयव, सूक्ष्म वस्तू इत्यादी निर्माण करण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरते आहे. कारण हे तंत्रज्ञान पारंपरिक वस्तू-उत्पादननिर्मितीच्या उलट आहे, जिथे धातू किंवा प्लास्टिकचा तुकडा कापून अंतिम वस्तू बनविली जाते. तसेच पारंपरिक उत्पादन पद्धतींपेक्षा बरीच कमी सामग्री वापरून थ्रीडी प्रिंटिंग आपले कार्य पूर्ण करते.

सध्याच्या थ्रीडी प्रिंटिंगची मागणी अधिकतर औद्योगिक स्वरूपाची आहे, तसेच २०२० पर्यंत जागतिक थ्रीडी प्रिंटिंग उद्योग १५ अब्ज डॉलर्सपर्यंत महसूल कमवू शकेल. या तंत्रज्ञानाचा प्रमुख वापर दंत उत्पादने, चष्मा, कृत्रिम औषधे, मूव्ही प्रॉप्स, डिझाइन (दिवे, फर्निचर इ.), जीवाश्मांची पुनर्रचना, पुरातन कला-प्रतिकृती, फॉरेन्सिक पॅथॉलॉजीमध्ये हाडे आणि शरीराच्या अवयवांची पुनर्रचना करणे, गुन्हेशोधामध्ये नष्ट झालेल्या पुराव्यांची पुनर्रचना करणे, जड उद्योगातील मोठी उपकरणे उत्पादन करण्याआधी प्रारूप बनवणे, आदींमध्ये होतो.

लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

hrishikesh.sherlekar@gmail.com