|| हृषिकेश दत्ताराम शेर्लेकर
देशातील अनेक अद्ययावत रुग्णालयांमध्ये रोबोटिक सर्जरी होत असून त्याचा लाभ रुग्णांना मिळत आहे.
सामाजिक परिवर्तन नेहमीच संथगतीने होत असते व बहुतेक करून त्या स्थित्यंतराची जाणीव फार उशिराने उमजते. मागील लेखात पाहिल्याप्रमाणे ‘एआय (कृत्रिम प्रज्ञा) व रोबोटिक हेल्थकेअर’ या विषयावर युरोपीय देशांतील लोकांची जनमत चाचणी घेण्यात आली. त्यातील काही प्रश्नांची उत्तरे वरील संथगतीचा सिद्धान्त सार्थ ठरवतात. उदाहरणार्थ काही प्रश्न खाली बघू.
१) तुम्ही एआयआधारित रोबोटिक डॉक्टरमार्फत कुठल्या आरोग्यविषयक सल्ले वा उपचारांसाठी तयार व्हाल? महत्त्वाचे तीन पर्याय निवडा. उत्तरे होती- १)हृदयाची स्पंदने, रक्तदाब बघून योग्य उपचारांची शिफारस करणे (३७%). २) वैयक्तिक आरोग्य चाचण्यांवरून फिटनेस व आरोग्यासाठी सल्ला प्रदान करणे (३४%), ३) घरीच रक्तचाचण्या करून ताबडतोब अहवाल तयार करणे (३०%).
२) एआयआधारित रोबोटिक हेल्थकेअर वापरण्याचे महत्त्वाचे तीन संभाव्य फायदे कोणते? उत्तरे होती- १) प्रगत आरोग्य सेवा जलदगतीने व सोप्या पद्धतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे (३४%). २) जलद व जास्त अचूक निदान व उपचार शिफारस करता येणे (३१%). ३) वैयक्तिक वैद्यकीय साहाय्य कुठेही व कधीही घरबसल्या उपलब्ध होणे (२७%).
३) एआय आधारित रोबोटिक हेल्थकेअर वापरण्याचे महत्त्वाचे तीन तोटे किंवा संभाव्य धोके कुठले? उत्तरे होती- १) अचानक काही विपरीत घडले तर मी रोबोटिक डॉक्टरांवर उपचारासंबंधी निर्णय घ्यायला विश्वास नाही ठेवणार (४७%). २) आरोग्य सेवेत मानवी स्पर्श, संवेदना अत्यंत महत्त्वाच्या असतात (३८%). ३) आम्हाला या तंत्रज्ञानाबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे त्यापासून संभवणारे फायदे किंवा तोटे व धोके याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत (३०%).
अशीच जनमत चाचणी उद्या भारतात घ्यायची झाली तर? वयोगट, शहरी विरुद्ध ग्रामीण, शिक्षण व व्यवसाय यावरून बरीच तफावत नक्कीच दिसून येईल आणि एकंदर इच्छा, ज्ञान व जागरूकता व त्यातून येणारे स्वीकारीकरण कदाचित ‘एकअंकी’देखील असू शकेल; पण शेवटच्या प्रश्नाचे विश्लेषण करायचे झाल्यास, पहिला मुद्दा होता ‘अचानक काही विपरीत होणे व मानवी तज्ज्ञ जवळ असणे’. एक नक्कीच नमूद करावेसे वाटते की एआय, रोबोटिक्स व आरोग्य सेवा सोडा, पण कुठल्याही क्षेत्रातदेखील भविष्यातील पुढील पायरी ही ‘मनुष्य अधिक मशीन’ अशी पूरकच असणार. ‘मनुष्याला पर्याय म्हणून मशीन’ असे कदापि नाही. दुसरा ‘ह्य़ूमन टच’, इथेही ‘मनुष्य अधिक मशीन’ अशी जोडी उदयाला येऊन एकमेकाला पूरक कामे करणे व किचकट, वेळखाऊ कामे यांत्रिक मशीन करू लागल्यामुळे भविष्यात मनुष्य त्याचा जास्तीत जास्त वेळ ‘मानवी नैसर्गिक’ कार्ये (भावना, सर्जनशीलता, नैतिकता अशांचा प्रांत) करण्यासाठी देऊ शकेल. उदाहरणार्थ- डॉक्टर व नर्सचा पेशंट, नातेवाईक यांबरोबर संवाद वगैरे. तिसरा मुद्दा माहिती व जागरूकता, जी नक्कीच वाढीस लागली आहे. या संदर्भात भारताचे प्रश्न थोडे वेगळे आहेत. प्रादेशिक भाषेत, सोप्या पद्धतीने वरील माहितीचे प्रसारण होणे फार गरजेचे आहे.
एआय आणि रोबोटिक्स तंत्रज्ञान आरोग्य सेवेच्या विविध क्षेत्रांत कसा प्रभाव पाडू शकतील, त्याबद्दल पुढे माहिती करून घेऊ .
तंदुरुस्ती
मागील सदरात बघितल्याप्रमाणे ‘प्रोअॅक्टिव्ह- सक्रिय’ विचारसरणीचे लोक वैयक्तिक बायो-डिव्हायसेस, डिजिटल प्रकारात उपलब्ध असलेले ज्ञान, ऑनलाइन वैद्यक तज्ज्ञांचे मार्गदर्शन व विश्लेषकाचा आधार घेऊन स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवून आणत आहेत. इथे ‘मी जास्तीत जास्त तंदुरुस्त राहू इच्छितो’ आणि त्यासाठी गरज असणारी लाइफस्टाइल, आरोग्य चाचण्या, गरज पडल्यास वेळीच उपचार व तज्ज्ञांचे मार्गदर्शन, जगात सुरू असलेले चांगले उपाय, शोध अशांना प्राधान्य. दुसरा फायदा म्हणजे डॉक्टर समुदायाला वैयक्तिक बायो-डिव्हायसेसमुळे पेशंटचा नवनवीन प्रकारचा वैद्यक डेटा २४ तास उपलब्ध झाल्यामुळे, कोणावर काय औषधे व उपचार लागू पडत आहेत अशी उपयुक्त माहिती मिळू लागली. त्याचा परिणाम उपचार पद्धती अजून सुधारायला मदत होते. त्याशिवाय काही ‘सीमारेषेवर’ असलेल्या रुग्णांना सतत निरीक्षणाखाली ठेवता येऊ लागले. नाही तर पूर्वी रुग्ण हॉस्पिटल किंवा डॉक्टरकडे यायच्या आधी व डिस्चार्ज झाल्यावर त्याचे काय चाललेय त्याबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती.
पूर्वरोगनिदान
कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड निकामी होणे आदींचे निदान व पूर्वसूचना जेवढी लवकर होईल तेवढी वाचण्याची शक्यता जास्त. दुर्दैवाने आपल्या देशात जास्तीत जास्त रुग्ण डॉक्टर, हॉस्पिटल गाठतात ते शेवटची पायरी आलेली असते. एकंदर जागरूकता व वैद्यकीय ज्ञान, वैयक्तिक बायो-डिव्हायसेस वापर व आरोग्य चाचण्या करून वेळेआधीच खबरदारी व उपचार करता येऊ शकतील; पण त्याआधी गरज आहे प्रचंड प्रमाणात जनजागृतीची, जे काम शासकीय संस्था आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य सेवा कंपन्यांना करावे लागेल.
अचूक निदान
दुखणे, मग डॉक्टर, मग महागडय़ा चाचण्या आणि निदान योग्य न झाल्यास आणखी नवीन चाचण्या असे दुष्टचक्र आपण बरेचदा बघतो. अमेरिकन कॅन्सर सोसायटीप्रमाणे स्तन कर्करोग निदान करण्यासाठी ‘मॅमोग्राफी’ चाचणी करतात. डॉक्टरमार्फत मानवी पद्धतीने निदान करताना यामध्ये जवळपास ५० टक्के चुका होण्याची शक्यता असते, म्हणजे कर्करोग नसतानाही बायोप्सीसाठी केस पुढे पाठवणे. एआयआधारित इमेज प्रोसेसिंग वापरून हेच मॅमोग्राफीवरून निदान ९९ टक्के अचूक व ३० पटीने जलद होऊ लागले आहे; पण अर्थातच ही क्षमता गाठताना लागली कोटय़वधी अचूक निदान केलेली उदाहरणे. याला एआयच्या जगात ‘ट्रेनिंग डेटा-सेट’ म्हणतात.
उपचारासंबंधी निर्णय व प्रत्यक्ष उपचार
निष्णात डॉक्टर, विविध चाचण्या यावरून योग्य उपचार पद्धती नक्कीच ठरविता येते. त्यात त्या रुग्णाचा कौटुंबिक आरोग्य इतिहास, एकंदर राहणीमान, सवयी, आनुवंशिक रोग इत्यादी विचारात घेतले जाते; पण सव्वाशे कोटी भारतीय जनतेला निष्णात डॉक्टर व खर्चीक चाचण्या उपलब्ध होतील, परवडतील? तितके डॉक्टर आपल्याकडे आहेत?
एआयआधारित डेटा अनॅलिटिक्स वापरून अनेकमितीय माहितीवरून ठरावीक कल शोधणे (पुढे काय होऊ शकेल, कुठली उपचार पद्धती योग्य ठरेल इत्यादी) यात निष्णात डॉक्टरांची गरज फक्त अंतिम निर्णय घेताना लागेल. वर बघितल्याप्रमाणे वैयक्तिक बायो-डिव्हायसेस व त्यामुळे शक्य होणाऱ्या खऱ्याखुऱ्या देखरेखीमुळे रुग्ण घरीच हॉस्पिटलसारखी सेवा मिळवू शकतात व गरज पडल्यास तात्काळ वैद्यकीय मदत मागू शकतात.
एका संशोधनानुसार एका औषधाला फार्मा कंपनीच्या प्रयोगशाळेतून प्रत्यक्ष वापरात यायला सरासरी १२ वर्षे लागतात आणि हजारातले फक्त एकच औषध सर्व अडथळे पार करून आपल्यापर्यंत पोचते. त्यातले काहीच शेवटी उपयोगी व यशस्वी ठरतात. एआयआधारित मशीन लर्निग अल्गोरिथम्स वापरून हा काल बऱ्याच अंशी कमी करता येऊ शकेल व चाचणीदरम्यानच उपयुक्ततेची टक्केवारी वर्तविता येईल.
प्रशिक्षण
पारंपरिक वैद्यकीय प्रशिक्षण हे जास्त करून गद्द (टेक्स्ट) प्रकारात उपलब्ध आहे. एआयच्या नॅच्युरल लँग्वेज प्रोसेसिंग, इमेज प्रोसेसिंगमुळे त्यात बऱ्याच प्रमाणात ‘मानवी नैसर्गिकपणा’ आणता येईल. डिजिटल स्वरूपात हाताळण्यासारखे असल्यामुळे कुठेही वापरणे शक्य होईल. मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांने केलेल्या चुका शोधून त्यावर परत प्रशिक्षण व नवीन चाचणी प्रश्न इत्यादी सुधारित शिक्षण पद्धती शक्य होईल.
रोबोटिक सर्जरी
भारतातील अनेक अद्ययावत रुग्णालयांमध्ये हल्ली रोबोटिक सर्जरी हा पर्याय उपलब्ध झाला आहे. इथे निष्णात सर्जन रोबोटिक हात वापरून प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करतात, ज्यामुळे कमालीची अचूकता, अत्यंत छोटय़ा व सूक्ष्म प्रमाणावर हालचाल करता येते, जी मानवी हातांना कधीच शक्य नव्हती. खास करून मेंदू, किडनी व मणक्याची शस्त्रक्रिया इत्यादी.
https://www.youtube.com/watch?v=H-sOLL9cz_g
आयबीएम वॉटसन हेल्थ
रुग्णाच्या वैद्यक अहवालावरून आयबीएम वॉटसन ट्रेनिंग डेटा-सेट म्हणजे लाखो कर्करुग्णांच्या केसेस व मशीन लर्निग अल्गोरिथम्स वापरून उपचार शिफारस करू शकतो. इथे अनेक उपचार पद्धती आधीच दाखल झालेल्या असतात. वॉटसन त्यांना रँक देऊन त्यातील सर्वात योग्य अशी उपचार थेरपी डॉक्टरांना सुचवितो.
गुगल बुब्बुळ प्रतिमा व हृदयरोगासंबंधी कल
गुगलने डोळ्याच्या बुब्बुळ प्रतिमा (रेटिना) व त्या लोकांना हृदयरोग आहे की नाही अशी लाखो लोकांची माहिती गोळा केली. त्यापुढे कॉम्प्युटर व्हिजनचे इमेज प्रोसेसिंग वापरून बुब्बुळाच्या रक्तवाहिन्यांचा आकार व हृदयरोग असणे वा नसणे असे काही विशिष्ट कल शोधून काढले. आता फक्त डोळ्याच्या तपासणीवरून हृदयरोग आहे का, याची प्राथमिक माहिती मिळवता येईल व असेल तर पुढील चाचण्या करता येतील. विचार करा, ग्रामीण भागातील लोकांसाठी किती उपयुक्त असेल हे तंत्रज्ञान!
hrishikesh.sherlekar@gmail.com
लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.