सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात १५ पोलीस मारले गेल्याच्या घटनेसंदर्भातील ‘नाकत्रे आणि नेभळट’ हा अग्रलेख (१३ मार्च) वाचला. त्याच्या शेवटी ‘या (नक्षली) दहशतवादाचे आंतरराष्ट्रीय परिमाण’ सांगताना म्हटलंय : ‘..देशातील ज्या जिल्ह्यांत या नक्षली दहशतवाद्यांचे थैमान सुरू आहे ते सर्व जिल्हे नैसर्गिक साधनसंपत्तीने भरलेले आहेत. या जिल्ह्यातील भूगर्भातून ही खनिजसंपत्ती जर बाहेर आली तर त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेस मोठा फायदा होणार आहे. इतकी समृद्ध खनिजसंपत्ती आपल्या आसपास कोणाकडे असलीच तर तो देश म्हणजे चीन. तेव्हा अशा वेळी ही खनिजसंपत्ती बाहेर येऊन आपल्या अर्थव्यवस्थेस त्याचा फायदा होऊ नये या विघ्नसंतोषी विचारातून अन्य कोणी देश या नक्षली दहशतवाद्यांना मदत करीत नसेल असे मानणे दुधखुळेपणाचे ठरेल.’
किमान या विषयात चीन हा एकदम सोपा शत्रू म्हणून समोर ठेवून काहीही इतर काटेकोर तपशील न देता सुलभीकरण करणं हे आपल्या मुख्य वाचकवर्गाला आधार देणारं किंवा पचायला सोपं असेलही पण तितकंसं बरं नाही.
केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री जयराम रमेश यांनी दिल्लीत याच विषयावर एक व्याख्यान काही काळापूर्वी दिलं होतं. त्या व्याख्यानाचा शेवट त्यांनी असा केला होता, ‘आदिवासी भारत हा आपल्यासाठी फक्त खनिजांचा साठा म्हणून अस्तित्वात आहे. पण आदिवासींकडे पहिल्यांदा माणसं म्हणून पाहायला हवं. केवळ वेगानं विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थेला कच्चा माल म्हणून उपयोगी पडणारा कोळसा, युरेनियम, लोहखनिज, बॉक्साइट, मँगेनिज हे सगळं मिळावं यासाठी विस्थापित होऊ घातलेले लोक म्हणून फक्त आदिवासींकडे पाहू नये.’
रमेश जे म्हणतायत त्याकडे आपण लक्ष देतो का? आपण- म्हणजे, अग्रलेखातून उर्वरित जगावर दुधखुळे, नेभळट वगरे वाट्टेल त्या शब्दांनी ताशेरे ओढणारी आपली माध्यमं या समस्येकडे कसं पाहतात?
सुप्रिया शर्मा या इंग्रजी पत्रकार मुलीनं छत्तीसगढमधल्या संघर्षांविषयीच्या माध्यमांच्या कामगिरीबद्दल ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘रॉयटर्स इन्स्टिटय़ूट फेलोशिप’अंतर्गत एक संशोधन केलं. त्या (‘गन्स अँड प्रोटेस्ट’) संशोधनाचा पूर्ण तपशील इथं सांगणं शक्य नाही, पण त्याचा ढोबळ निष्कर्ष असा की, ‘छत्तीसगढसंबंधी प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांपकी ७५टक्के बातम्या हिंसक घटना, सुरक्षा समस्या यांच्या असतात तर फक्त दहा टक्क्यांच्या आसपास बातम्या विकासकामं, खाणकाम, विस्थापन यांमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत असतात.’
आपण केवळ हिंसक घटनांवरूनच एखाद्या समस्येकडे लक्ष देणार असू नि तिचं गांभीर्य ठरवणार असू तर मग अशा अवस्थेत समस्या समजून घेण्यात नार्कत कोण ठरतंय? आणि अशा परिस्थितीत पुन्हा यातूनच हिंसेला खतपाणी मिळत असेल, तर त्याचा दोष कोणाकोणाला किती किती टक्के द्यायचा?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा