तेलंगणच्या निर्मितीचे आश्वासन पूर्ण झाल्यास काँग्रेस पक्षाची देशावरील पकड मजबूत होईल, हा समज असेल तर ती अत्यंत मोठी चूक आहे. कोणत्याही अखिल भारतीय पक्षाने या भ्रमातून नवीन राज्यांना प्रोत्साहन देऊ नये. राज्याची निर्मिती प्रादेशिक पक्षांना मजबुती देणारी आणि अस्थैर्य निर्माण करणारी ठरली आहे, पुढेही ठरणार आहे. ज्या वेळी केंद्रातच एकपक्षीय शासन येऊ शकत नाही, त्या वेळी लहान राज्यात ते कसे येणार! एका किंवा दोन मंत्र्यांनी राजीनाम्याची धमकी देताच अनेक तत्त्वभ्रष्ट युती कराव्या लागतात. अनेक सरकारे कोसळतात. लोकांवरील कराचे ओझे वाढते. अनेकदा अनेक निवडणुका आणि पुन:पुन्हा तोच संगीत खुर्चीचा खेळ.
लहान राज्यांच्या फसव्या आकडय़ांचा मुलामा चढवून आणि राजकीय स्वार्थाची झूल चढवून संभाव्य विकासाचे आमिष दाखवून कार्यक्षम प्रशासनाच्या नावाने देशाची ५० राज्ये करू पाहणाऱ्यांनी हीच ऊर्जा देशापुढील आणि प्रदेशापुढील संकटाचे निराकरण करण्यात घालवली तर देशाचे आणि जनतेचे कल्याण होईल. मराठी-हिंदी, तामिळ-तेलुगू-कन्नड असे वाद पुरे नाहीत का! त्यात विदर्भातील मराठी-कोकणी, मराठी-मराठवाडा, मराठी इत्यादी वादांची भर टाकू नका. अजूनही वेळ गेलेली नाही. तेलंगणातही सर्वाची मंजुरी वेगळ्या तेलंगणला नाही. अनेक खासदार राजीनामे देत आहेत. आजवर जो संयम राखला तो पुढेही राखावा आणि एकात्मतेला बळ द्यावे ही सर्व अखिल भारतीय पक्षधुरिणांना विनंती. नाही तर विकासाच्या नावाने सुरू झालेले विघटन जुने अनेक भेद पुनरुज्जीवित करेल. महाराष्ट्र शासनाने आजवर तरी ऐक्य राखण्याची इच्छा बोलून दाखविली आहे, पण केवळ इच्छा पुरेशी नाही. विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करा. मदत आकडय़ात सांगू नका, तर प्रत्यक्षात उतरवा. ज्या ज्या ठिकाणी विदर्भाशी सापत्न व्यवहार होतो तेथे कडक कारवाई करा. हे जमणार नसेल तर पायउतार व्हा. विदर्भवादय़ांनी विकासाची आंदोलने चालू ठेवावी, प्रसंगी शासनात शिरून विकासाची गंगा इकडे वळवावी. लोक तुमच्याबरोबर येतील. विदर्भच काय, पण अख्खा देश तुमच्या स्वाधीन करतील. आपण ते करू शकत नसलो तर वेगळ्या विदर्भातही काही करू शकणार नाही.
मधुकर कुकडे, नागपूर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा