स्पेलिंगप्रमाणे त्यांच्या आडनावाचा उच्चार ‘वाक्झिआर्ग’ करावा की काय, असा भारतीय पत्रकारांचा संभ्रम ओळखून ‘माझं आडनाव वॅग्झिया आहे’ हा खुलासा भेटीच्या सुरुवातीलाच करणारे फ्रान्सिस वॅग्झिया, हे केवळ ‘भारतमित्र’ नव्हते. १९६९ पासून भारतातच राहून, २० वर्षांनी मिळणारे भारतीय नागरिकत्व या मूळच्या फ्रेंच माणसाने घेतले होते. अमन नाथ यांच्यासह १९८६ साली नीमराणा (जि. अल्वार, राजस्थान) येथील संस्थानिकाचा ओसाड महाल त्यांनी विकत घेतला आणि त्याचे रूपांतर हॉटेलमध्ये केले. त्यापूर्वीही ‘ताज’ हॉटेल समूहाने म्हैसूरनजीकच्या ललितमहाल राजवाडय़ाचे हॉटेलात रूपांतर केले होतेच, पण दोघे अननुभवी उद्योजक, वास्तुवारसा आणि कलेचा ठेवा जपण्याच्या हेतूचे तंतोतंत पालन करण्यासाठीच हॉटेल चालविण्याचा मार्ग निवडताहेत, हे अजब ठरले. ‘हेरिटेज हॉटेल’ ही संकल्पना भारतात त्यामुळे रुळली. हॉटेलच्या वास्तूचे संधारण, खोल्यांतील व बाहेरील सजावट, तसेच मिळणारे खाद्यपदार्थ हे सारे राजस्थानच्या संस्थानी परंपरांची याद जागविणारे आणि महत्त्वाचे म्हणजे, स्थानिकांना रोजगार देतानाच त्यांना प्रशिक्षित डिझायनरांसह काम करण्याची संधीही देणारे होते. नीमराणाच्या याच परिसरात, पारंपरिक भारतीय पद्धतीने विवाह सोहळे घडवण्याची कल्पनाही नाथ आणि वॅग्झियाद्वयीने साकारली. या सर्वातून नीमराणा हा ‘ब्रॅण्ड’ वाढत गेला. स्वत: वॅग्झिया यांनी भारतीय वस्त्रांचाही व्यवसाय सुरू केला. पण हे करताना, भारतीयांशी कसे वागायचे आणि भारतावरले प्रेम कसे टिकवायचे याची पूर्ण कल्पना त्यांना होती.
हातात फ्रान्समधील एमबीएची डिग्री आणि हृदयात मात्र १९६० च्या दशकाला शोभणारा बंडखोर डावा जोश, अशा अवस्थेत ब्राझील, मेक्सिको आदी देशांत नोकरीचा अनुभव घेऊन भारतातील डाव्या चळवळींचा अभ्यास करणाऱ्या एका मित्रासह (मैत्रीण नव्हे) फ्रान्सिस येथे आले. चार महिने आपण केरळपासून हिमाचलपर्यंत ‘थर्डक्लासने आणि कुणी हात दाखवल्यावर थांबणाऱ्या बसगाडय़ांतून’ फिरत होतो, असे ते सांगत. भारत हळूहळू उमगत गेला, इतकी सांस्कृतिक श्रीमंती असलेल्या या भूमीत ७५ टक्के ग्रामीण लोकांना गरिबीतच का जगावे लागते, हा प्रश्नही टोकदार झाला आणि या लोकांच्या साथीनेच व्यवसायही सुरू झाला, हा वॅग्झिया यांच्या आयुष्याला आकार देणारा भाग! प्रयोगशील उद्योजक म्हणून त्यांचे धडे पुढे एमबीचे विद्यार्थीही शिकतील, पण भारतीय संस्कृतीच्या जितेजागतेपणाबद्दल फार फुशारक्या न मारता पोटापाण्याचा व्यवसाय वाढवण्याचीच स्वप्ने पाहतसुद्धा संस्कृतीचे जागतेपण टिकवता येते, हे फ्रान्सिस वॅग्झिया यांनी दाखवून दिले. बुधवारी (१९ फेब्रुवारी) झालेल्या त्यांच्या निधनाची रुखरुख याच गुणामुळे वाटत राहील.