रुबाबदारपणाकडे लक्ष असूनही आपण काही साध्य केल्याचे समाधान न मिरवणारे नेल्सन मंडेला हे द. आफ्रिकेतील वर्णद्वेषविरोधी लढाई जिंकून थांबले नाहीत. त्या देशातील बहुसंख्य आणि अल्पसंख्य यांना एकत्र ठेवण्यासाठी क्षमाशीलतेचे प्रयोग त्यांनी केले..
साधारण पाच दशकांपूर्वी, म्हणजे १९६२ साली, वर्णभेदविरोधी लढय़ात दोषी ठरवले गेल्यानंतर नेल्सन मंडेला यांना जेव्हा तुरुंगात नेण्यात आले तेव्हा तेथील लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांना खंदक खणण्याचा आदेश दिला. या खंदकाचा आकार होता शवपेटी मावेल इतका. त्यामुळे आपल्याला येथे जिवंत गाडले जाणार आहे असा मंडेला यांचा समज झाला. पुढे येईल त्या संकटास तोंड देण्याची त्यांनी तयारी केली आणि खंदक खणण्याचे काम पूर्ण केले. तुरुंगाधिकाऱ्यांनी त्यांना त्यानंतर तेथे झोपावयास सांगितल्यावर तर आपल्याला येथेच मूठमाती दिली जाणार अशी मंडेला यांची खात्रीच पटली. परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला. तुरुंगाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे ते त्या खंदकात झोपले खरे. परंतु माती टाकण्याऐवजी तुरुंगाधिकाऱ्यांनी त्यांच्या अंगावर लघवी करून मंडेला यांचा अत्यंत घृणास्पद पद्धतीने अपमान केला. पुढे मंडेला त्याच तुरुंगात तब्बल २७ वर्षे राहिले आणि जागतिक दबावामुळे सुटका झाल्यावर १९९४ साली दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे आले. वर्णद्वेषविरोधी लढय़ात विजयी ठरल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासात प्रथमच गौरेतरास अध्यक्षपद मिळाले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि जगभरातून निवडक मान्यवरांना जेव्हा निमंत्रणे गेली तेव्हा नेल्सन मंडेला यांनी एका व्यक्तीस न विसरता आग्रहाचे आमंत्रण पाठवले. ती व्यक्ती म्हणजे तुरुंगात त्यांच्या अंगावर लघवी करणारा अधिकारी. मंडेला यांच्या खास आग्रहावरून हे अधिकारी त्यांच्या शपथविधीस उपस्थित राहिले आणि मंडेला यांनी त्यांचा यथोचित सन्मानही केला.
नेल्सन मंडेला यांचे हे वैशिष्टय़. अमर्याद क्षमाशीलता हे त्यांच्या राजकारण आणि समाजकारणाचे भव्य असे वेगळेपण. ते त्यांनी शेवटपर्यंत जपले. वास्तविक तुरुंगात २७ वर्षे इतका प्रदीर्घ काळ काढल्यानंतर त्यांच्या मनात व्यवस्थेविषयी कडवटपणा निर्माण झाला असता तर ते क्षम्य ठरले असते. पण तसे झाले नाही. तुरुंगात खितपत असतानाही तेथे त्यांना डांबणाऱ्या अधिकाऱ्यांनाच बंदिस्त झाल्यासारखे वाटावे असे मंडेला यांचे वागणे होते. कायम हसतमुख आणि मनमोकळे. यामुळे त्यांनी कोणाहीविषयी कधीही कटुता बाळगली नाही. ज्या मुद्दय़ावर त्यांनी आयुष्यातील मोठा कालखंड लढण्यात घालवला त्यास कारणीभूत असणाऱ्यांशीही ते असेच वागले. हे काही अर्थात त्यांचे संतत्व नव्हते, हे येथे नमूद करणे आवश्यक आहे. कारण मानसिकतेच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचे भारताशी साधम्र्य असल्यामुळे नेल्सन मंडेला यांना देवत्व वगैरे दिले गेले असले तरी आपल्यावर इतका चांगुलपणा लादण्याची गरज नाही असे खुद्द मंडेला यांनी म्हटले होते आणि त्यांच्या चरित्रकारांनीही अनेक उदाहरणे देत यास दुजोराच दिला. ही क्षमाशीलता हा जसा त्यांच्या स्वभावाचा भाग होता तसाच त्यांच्या राजकारणाचाही, ही यातील महत्त्वाची बाब. आफ्रिकेसारख्या वर्ण आणि वर्ग अशा दोन्ही पातळ्यांवर विभागल्या गेलेल्या समाजास एकत्र ठेवावयाचे असेल तर ही क्षमाशीलताच कामी येईल अशी त्यांची खात्री होती आणि आपल्या राजकारणातून त्यांनी हे विचार यशस्वी करून दाखवले. शिक्षा करून जे काही करता येते त्याच्या किती तरी पट उद्दिष्ट क्षमा केल्याने साध्य होते यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी वर्णद्वेषी अशा गोऱ्यांच्या सहकार्याने देशाचे नेतृत्व करण्याची तयारी दाखवली. आपल्याला आणि गौरेतरांना झालेल्या युगानुयुगांच्या छळाबद्दल गोऱ्यांनी सर्वाची माफी मागावी अशी मागणी या संघर्षांतील कोणत्याही टप्प्यावर मंडेला यांनी कधीही केली नाही, हा मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. आपल्यासारख्या देशात बहुसंख्य आणि अल्पसंख्य यांना एकत्रच राहावे लागणार, त्यामुळे दोघांपैकी कोणीही दुसऱ्यावर कुरघोडी करू पाहणे शहाणपणाचे नाही, असे त्यांचे म्हणणे होते. बहुसंख्याकांना अल्पसंख्याकांची गरज लागणारच, असे मंडेला म्हणायचे. अपार क्षमाशीलतेमुळे स्वभावात आलेले मार्दव आणि मनमोकळा स्वभाव यामुळे मंडेला हे जगभरात अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले. माणसाचे वर्गीकरण वर्णावरून होता नये हे साधे तत्त्व जगाला.. आणि त्यातही त्यांच्या दक्षिण आफ्रिका या देशाला.. पटावे म्हणून या माणसाने आयुष्यभर लढा दिला. पण त्याची कोणतीही कटुता त्यांच्या चेहऱ्यावर वा वागण्यात कधी उमटली नाही. अनेक जण मंडेला यांची तुलना महात्मा गांधी यांच्याशी करतात. ती अनाठायी आहे. कारण या दोघांत मूलत: फरक होता. मंडेला यांचा जन्म राजघराण्यातला आणि उत्तम जगण्यावर त्यांचे प्रेम होते. महात्मा गांधी यांच्याप्रमाणे मंडेला यांचा अहिंसेवर पूर्ण विश्वास अजिबात नव्हता. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळात मंडेला यांनी हिंसाचाराचा पुरस्कार केला होता आणि प्रारंभी ते कडवे मार्क्‍सिस्ट-लेनिनिस्ट होते. त्यांना जनरल असेच म्हटले जात होते. हिंसेने आपणास सत्ता काबीज करावयाची नसून सत्तेवर असणाऱ्यांना चर्चेस भाग पाडणे इतकाच आपला हेतू आहे, असे मंडेला म्हणत. तसेच, महात्मा गांधी यांच्याप्रमाणे मंडेला यांना साधेपणा कधी भावला नाही. अखेपर्यंत त्यांचे जगणे राजेशाही होते. उत्तम रंगसंगती असलेली वस्त्रप्रावरणे त्यांना आवडायची आणि आपण जनतेसमोर जाताना कसे जातो, कसे दिसतो याची सतत ते खबरदारी घेत. स्वत:च्या रुबाबदारपणावर त्यांचे प्रेम होते. आपल्याला देवत्व देऊ पाहणाऱ्यांना मंडेला यांनी जमेल तेव्हा फटकारले, ही बाबही नोंद घेण्याजोगी. सदैव हसतमुख असलेल्या मंडेला यांना पाहणे आणि कोणताही अभिनिवेश नसलेले त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान ऐकणे हा जगभरातील सर्व वर्ग आणि वर्णीय तरुणांसाठीही आनंद होता. उत्फुल्ल तरुणतरुणींच्या मेळाव्यात आग्रह झाला तर त्यांच्या नृत्यानंदात सहभागी व्हायलाही त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. हे त्यांना शक्य झाले याचे कारण आपण काही साध्य केल्याचे मिरवणे हे कधीही त्यांचे ईप्सित नव्हते. बिल क्लिंटन आणि टोनी ब्लेअर यांच्याशी त्यांचा खास दोस्ताना होता. आणि असे असले तरी त्यामुळे त्यांच्या राजकीय विचारांत कधीही बदल होत नसे. अमेरिकेचा इराकवरचा हल्ला अनावश्यक होता असे त्यांचे मत होते आणि क्युबाच्या फिडेल कॅस्ट्रो वा लिबियाच्या कर्नल मुअम्मर गडाफी यांच्याविषयी त्यांना शेवटपर्यंत ममत्व होते. एका अर्थाने मंडेला यांचे आयुष्य विरोधाभासांनी भरलेले होते. कौटुंबिक पातळीवर त्यांच्या आयुष्यात विविध वादळे उठली आणि त्यांचे वैवाहिक आयुष्य अनेकार्थानी चर्चेचा विषय झाले. वयाच्या ऐंशीव्या वर्षी ते तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले. त्यांच्या पोराबाळांतले मतभेद ही अलीकडच्या काळातील त्यांच्यासमोरची डोकेदुखी होती. असे असले तरी मंडेला यांना अपार लोकप्रियता लाभली. इतकी की लंडन असो वा शिकागो वा नवी दिल्ली, त्यांना पाहण्या-ऐकण्यासाठी लाखोंची गर्दी उसळत असे. यामागील कारण काय?
कारण जगास नायकांची गरज असते. मानवाचे स्खलनशीलत्व मान्य करून काही भव्यदिव्य साध्य करणारे राजस वा काळजात अपार करुणा वागवणारे सालस जगास तितकेच भावतात. त्याचमुळे अमेरिकेतील जॉन एफ केनेडी आणि अब्राहम लिंकन,  विन्स्टन चर्चिल आणि मोहनदास करमचंद गांधी किंवा लेडी डायना स्पेन्सर आणि मदर तेरेसा या विरोधाभासी व्यक्ती एकाच वेळी अफाट लोकप्रिय होतात.
नेल्सन रोलीहल्लाला मंडेला हे अशा वैश्विक लोकप्रियतेतील अखेरचे. त्यांचे मोठेपण हे की लोकप्रियतेने त्यांना अप्रामाणिक केले नाही. त्यांचा हा प्रामाणिकपणा ‘लाँग वॉक टु फ्रीडम’ या  आत्मचरित्रातून आपल्यापर्यंत पाझरतो. विचित्र योगायोग असा की या आत्मचरित्रावर आधारित सिनेमाचे पहिले प्रदर्शन लंडनमध्ये निवडक मान्यवरांच्या साक्षीने होत असताना त्याच वेळी तिकडे दक्षिण आफ्रिकेत मंडेला यांना मरण आले. जगण्यावर अपार प्रेम करणारे मंडेला गेले काही महिने मरणाच्या वाटेवर होते. तसे पाहिले तर प्रत्येक जीव जन्मक्षणापासून मरणाच्याच वाटेवर असतो. परंतु जन्म आणि मृत्यू यातील वाट उजळवून टाकण्याचे भाग्य काहींच्याच वाटय़ास येते. मंडेला यांनी हे भाग्य कमावले होते. या उत्कट आणि भव्य भाग्यवंतास अभिवादन.