डॉ. जयदेव पंचवाघ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मेंदूवरल्या वा चेतासंस्थेच्या शस्त्रक्रियांचा ‘उत्कृष्ट’पणा इतिहासाची साक्ष काढून ठरेलच, पण उत्कृष्टता म्हणजे काय?
साधारण आठ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. केनियामधील एका नियतकालिकानं मेंदूच्या शस्त्रक्रियेसंदर्भात माझी मुलाखत घेतली होती. केनियातील जनतेला व तिथल्या न्यूरोसर्जनना भारतातील अनुभवाचा उपयोग कसा होईल हा मुख्य विषय. ‘प्रत्येक देशाने उत्कृष्ट न्यूरोसर्जरी आपल्या देशात प्रस्थापित करण्याचं ध्येय ठेवायला हवं,’ या विधानावर साहजिकच त्यांचा प्रश्न आला ही उत्कृष्ट न्यूरोसर्जरी म्हणजे काय? याला प्रमाण काय?
किंबहुना आपण जेव्हा म्हणतो की अमका सर्जन विशिष्ट शस्त्रक्रियेत उत्कृष्ट किंवा निष्णात आहे.. याचा नेमका अर्थ काय? न्यूरोसर्जरीच्या संदर्भाने याचा विचार व्हायला हवा, कारण ही अत्यंत अवघड आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया आहे. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मेंदू वा मज्जारज्जूच्या शस्त्रक्रियेत शरीरातील इतर शस्त्रक्रिया त्यांच्या तुलनेत वेगळय़ा का असतात हे नीट समजावून घेणं गरजेचं आहे.
सर्वात महत्त्वाचा फरक- जो खरं तर अगदी स्पष्ट आहे- तो म्हणजे कवटीच्या आत बंदिस्त असलेल्या मेंदूमध्ये अनेक महत्त्वाच्या मानवी क्षमतांची केंद्रं अगदी दाटीवाटीने बसलेली आहेत. मेंदूतील असंख्य केंद्रं कवटीच्या, तुलनेने लहान पोकळीत बसलेली असल्याने त्यांची रचना एकावर एक गुंडाळी करून ठेवल्यासारखी असते. उदाहरणार्थ स्मृती आणि भावनांशी घनिष्ठ संबंध असलेलं केंद्र (पॅपेझ सर्किट) एखाद्या ‘स्विस रोल’ प्रमाणे असतं. अर्थातच अशा चक्रव्यूहासारख्या रचनेच्या केंद्रभागी आजार झाला असेल तर त्यावर ‘बाहेरच्या चक्रव्यूहाला इजा न करता’ शस्त्रक्रिया करावी लागते.
जेव्हा मेंदूमध्ये ब्रेन टय़ूमर (अर्थात मेंदूच्या गाठी) सारखी परिस्थिती उद्भवते तेव्हा ही केंद्रं त्या गाठींना लागूनच असतात. त्या गाठीपर्यंत पोहोचण्यासाठी जो मार्ग बनवावा लागतो त्या मार्गातसुद्धा ही केंद्रं येण्याची शक्यता असते. म्हणजेच यशस्वीरीत्या गाठ काढूनसुद्धा एकूण ‘शस्त्रक्रिया यशस्वी’ ठरवायची असेल तर ही केंद्रं विविध उपाययोजनांनी अबाधित ठेवणं गरजेचं असतं. या उलट पोटात एखादी गाठ झाली तर ती गाठ काढताना आजूबाजूचे अनेक अवयव सहजगत्या एका बाजूला ढकलून ती काढता येते. आतडय़ाचा काही फूट लांबीचा तुकडा शरीरावर फारसा परिणाम न होता काढून टाकता येतो. अशा प्रकारचा विचारसुद्धा मेंदूच्या शस्त्रक्रियेत संभवत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे फक्त विचार, तर्कभावना, कलात्मक सर्जकता, स्मृती.. यांसारखी उच्च क्षमतांची केंद्रंच मेंदूमध्ये असतात असं नाही तर शरीरातील जवळपास सर्व अवयवांचा अंतिम कंट्रोलच मेंदूमध्ये असतो. उदाहरणार्थ हृदयाचं कार्य, श्वासोच्छवासाचं नियंत्रण, शरीरातील सर्व ग्रंथींचं, स्नायूंचं कार्य, छाती व पोटातल्या अनेक अवयवांवरचं नियंत्रण.. या सर्वच क्षमता मेंदूमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे या शस्त्रक्रियांचा संपूर्ण शरीरावरच परिणाम होऊ शकतो.
तिसरी गोष्ट म्हणजे मेंदू आणि मज्जारज्जू कवटी व मणक्याच्या आवरणात बंदिस्त असतात आणि अर्थातच कवटी हाडाची असल्यामुळे प्रसारण पावू शकत नाही. मेंदूतील आजारांमुळे कवटीच्या आतील दाब वाढत गेला तर अर्थातच कवटी प्रसरण पावून तो दाब सहन करू शकत नाही किंवा शोषून घेऊ शकत नाही. चौथी गोष्ट म्हणजे आपल्या रक्ताभिसरणाबरोबर शरीरातील इतर अवयवांमध्ये मुक्तपणे पसरणाऱ्या निरनिराळय़ा रसायनांपैकी काही रसायनं मेंदूच्या रक्तवाहिन्यांमधून मेंदूमध्ये मात्र प्रवेश करू शकत नाहीत. यालाच ‘ब्लड-ब्रेन बॅरियर’ असं म्हटलं जातं. निसर्गानं हा अडथळा निर्माण करण्याचं कारण म्हणजे मेंदूची संरचना ही अत्यंत नाजूक असते आणि शरीरातील इतर अवयव जरी काही रसायनांचा मारा सहन करू शकत असले तरी मेंदूमध्ये तीच रसायनं सर्वनाश घडवू शकतात. या नैसर्गिक अडथळय़ामुळे मेंदूच्या नाजूक पेशी रक्ताभिसरणातल्या अनेक संभाव्य ‘विषांपासून’ सुरक्षित राहातात.
याचा दुसरा पण त्रासदायक परिणाम म्हणजे काही प्रतिजैविकं (अॅन्टिबायोटिक्स) हा अडथळा पार करून मेंदूच्या आतपर्यंत पोहोचू शकत नाहीत. कोणत्याही शस्त्रक्रियेदरम्यान जंतुसंसर्गाची शक्यता कमी व्हावी म्हणून प्रतिजैविकं दिली जातात. या प्रतिजैविकांपैकी फक्त अगदी मोजकीच हा अडथळा भेदून आत प्रवेश करतात. मुळातच मेंदू व मज्जारज्जूचा जंतुसंसर्ग गंभीर स्वरूप धारण करू शकतो. त्यात ही समस्या आगीत तेल ओतते.
पाचवी समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे एकदा नष्ट झालेल्या चेतापेशी परत तयार (शरीरातील बहुसंख्य पेशींप्रमाणे) होत नाहीत. उदाहरणार्थ त्वचेला इजा झाल्यास जखम भरून येताना त्वचेच्या पेशी पुन्हा तयार होतात, आतडय़ाच्या आजारांमध्ये पूर्णपणे नाहीसं झालेलं पेशींच अस्तर पुन्हा तयार होतं. नवीन चेतापेशी मात्र तयार होत नाहीत. त्यामुळे अतिविशिष्ट कार्य करणाऱ्या मेंदूतल्या किंवा मज्जारज्जूतल्या केंद्रांना धक्का लागून मृत झालेल्या पेशी कायमच्याच नाहीशा होतात. (कालांतरानं, विशिष्ट व्यायाम देऊन सभोवतालच्या जगल्या वाचलेल्या पेशी ते कार्य काही प्रमाणात शिकू शकतात, ते वेगळं)
म्हणूनच, उत्कृष्ट दर्जाच्या न्यूरोसर्जरीची व्याख्या शब्दात करणं थोडं कठीण आहे. कॉलेजात असताना ओशो रजनीश यांच्या प्रवचनांच्या कॅसेट मिळायच्या. त्या आम्ही अत्यंत लक्षपूर्वक ऐकायचो. सुरुवातीच्या काळातली रजनीशांची भाषणं ही अत्यंत विद्वत्तापूर्ण आणि विषयाच्या मर्माचा अचूक वेध घेणारी असायची. ते अनेक संतांबद्दल, फकिरांबद्दल, झेन आचार्याबद्दल अत्यंत खोलात जाऊन बोलायचे. त्यातली एक गोष्ट माझ्या मनावर कायमची बिंबलेली आहे. उत्कृष्ट न्यूरोसर्जरी म्हणजे काय आणि अत्यंत कुशल न्यूरोसर्जनची व्याख्या कशी करावी याचं उत्तरच या अगदी साध्या वाटणाऱ्या दोन गोष्टींत दडलेलं आहे असं मला नेहमी वाटतं. लाओ त्से नावाच्या, प्राचीन चीनमधल्या एका अवलिया संतानं ‘सर्वात कुशल धावपटू कोण?’ याचं उत्तर असं दिलं आहे की, ‘पळताना ज्याची पदचिन्ह जमिनीवर उमटत नाहीत त्याला सर्वश्रेष्ठ-कुशल धावपटू म्हणता येईल’
मेंदूतल्या गाठींवर किंवा इतर अवघड आजारांवर शस्त्रक्रिया करताना हे वाक्य कायमचं लक्षात ठेवायला हवं. मेंदूतील गाठ किंवा आजार तर पूर्ण निघायला हवा पण इतर केंद्रांना धक्का लागल्याची अगदी छोटीशीही निशाणी मागे सुटू नये. अर्थातच हे शिवधनुष्य पेलण्याइतकं कठीण आहे आणि याचा अर्थ अगदी शब्दश: घेण्याचीसुद्धा गरज नाही. परंतु या लक्ष्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न सतत करणं गरजेचं आहे.
दुसरी गोष्ट ही एका धनुर्धराची आहे. आता या पठ्ठय़ाला आपण सर्वश्रेष्ठ धनुर्धर असल्याचा गर्व झालेला होता. त्याच्या जवळच राहणारा एक चर्मकार त्याच्या वल्गना ऐकून जोरात हसू लागला आणि म्हणाला, धनुर्विद्येतला ‘ध’सुद्धा तुला येत नाही, आणि सर्वश्रेष्ठ धनुर्धर असल्याच्या बाता करतो आहेस! हे ऐकून त्या धनुर्धराने आश्चर्याने आणि थोडय़ा संतापाने त्याला विचारलं कोण आहे माझ्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर? हा प्रश्न ऐकून त्या चर्मकारानं फक्त दूरवरच्या डोंगराकडे बोट दाखवलं आणि ‘तो तिथं राहतो’ एवढंच म्हणाला. हे ऐकून हा धनुर्धर मजल-दरमजल करत त्या पर्वतावर पोहोचला. एक वृद्ध माणूस शांतपणे लाकडं गोळा करत असलेला त्याला तिथे दिसला. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्या वृद्धाने याला येण्याचं कारण विचारलं. ‘मला माझ्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर कोण आहे हे बघायचं आहे आणि तो जर खरंच असेल तर त्याच्याकडून पुढची विद्या शिकायची आहे’.. वृद्धानं शांतपणे हसत विचारलं ‘अरे, पण तुला जर धनुर्विद्या शिकायची आहे तर तुझ्या खांद्यावर धनुष्य का लटकतंय? .. जोपर्यंत सर्वश्रेष्ठ धनुर्धर होण्यासाठी धनुष्याची गरज आहे असं तुला वाटतं तोपर्यंत तुला पुढचा प्रवास शक्य नाही.. खऱ्या धनुर्धराच्या हातात गवताची साधी काडीसुद्धा बाण होऊ शकते आणि त्याची एकाग्रता हे धनुष्य!’
आपण अगदी शब्दश: घेऊ शकलो नाही तरी खूप अर्थपूर्ण अशी गोष्ट आहे. उत्कृष्ट शस्त्रक्रिया करण्यासाठी तंत्रज्ञानाची आणि आयुधांची मदत लागतेच पण खरी न्यूरोसर्जरी ही सर्जनच्या मेंदूतच रूप घेत असते आणि त्याच्या एकाग्रतेनंच खरंतर यशस्वी होते.
म्हणूनच उत्कृष्ट न्यूरोसर्जरी करण्यासाठी सर्जनला या गोष्टीतील धावपटू आणि धनुर्धर व्हायला हवं. म्हणजेच शस्त्रक्रिया केली गेल्याची निशाणीसुद्धा मागे राहिलेल्या मेंदूवर दिसता कामा नये आणि यासाठी प्रगत तंत्रज्ञानाएवढीच सर्जनच्या मानसिक ऊर्जेची आणि एकाग्रतेची जोड मिळायला हवी. तीच उत्कृष्टतेची निशाणी आहे.
पुढच्या काही लेखांमध्ये मेंदूच्या विशिष्ट शस्त्रक्रियांच्या यशोगाथांच्या इतिहासाचा आढावा मी घेणार आहे आणि म्हणून या लेखात त्याची थोडक्यात प्रस्तावना केली. या शस्त्रक्रियांमध्ये मेंदूतील खोलवरच्या भागात होणाऱ्या गाठी, मेंदूमध्ये होणारा रक्तस्राव, मेंदूच्या रक्तवाहिन्यांना येणारे फुगे (अॅन्युरिझम ), पार्किन्सन किंवा अपस्मार (एपिलेप्सी) अशा अनेक आजारांच्या शस्त्रक्रियांचा वेध आपण घेऊ.
(लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत. brainandspinesurgery60@gmail.com