शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने शाळेने ठरवून दिलेल्या वाहतूक व्यवस्थेचाच उपयोग करण्याची मार्गदर्शक सूचना पालकांसाठी वरवर पाहता त्रासदायक ठरणारी वाटेलही, परंतु मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते किती आवश्यक आहे, हे यापूर्वी घडलेल्या अपघातांच्या वेळी लक्षात आले आहे. मोठय़ा शहरांमध्ये आणि शहरे बनू लागलेल्या गावांमध्ये मूल शाळेत वेळेवर पोहोचून परत येईपर्यंत पालकांना चैन पडत नाही. वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यात सरकारला कधीच यश येत नसल्याने दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढच होत आहे आणि ही वाढ घरातून कोणत्याही निमित्ताने बाहेर पडणाऱ्या व्यक्तीबाबत चिंता वाटायला लावणारी आहे. शालेय विद्यार्थ्यांना प्रवेश देताना, घराजवळची शाळा, हा नियम एकाही पालकाला मानवत नाही. प्रतिष्ठित आणि ‘चांगले’ शिक्षण देणारी शाळा घरापासून लांब असली, तरी तिथेच आपल्या मुलांनी शिकायला हवे, असा त्यांचा आग्रह असतो. घरापासून लांब असलेल्या शाळेत छोटय़ा मुलाने वेळेत कसे पोहोचायचे, हा यक्षप्रश्न प्रत्येक पालकाला पडलेला असतो. त्यातूनच शालेय रिक्षाचा पर्याय उभा राहिला. मुलांना नुसते वेळेवर सोडण्यापुरतेच हे रिक्षावाले काका काम करीत नाहीत, तर त्यांचा गृहपाठ लिहून घेणे, त्यांचे वाढदिवस साजरे करणे, परीक्षा संपल्यावर छोटीशी आईस्क्रीम पार्टी करणे यांसारख्या अनेक उपक्रमांमुळे हे रिक्षावाले काका म्हणजे त्या मुलांचे श्रद्धास्थान बनतात. महाराष्ट्र शासनाने शालेय वाहतुकीसाठी ज्या नव्या मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत, त्यामध्ये या रिक्षांच्या पर्यायाचा उल्लेख दिसत नाही. बसमधून प्रवास करणे सुरक्षित असले, तरी ही बस घराच्या अगदी जवळ येणे अनेकदा शक्य नसते. त्यामुळे मूल बसमध्ये चढेपर्यंत त्याच्याबरोबर घरातल्या कुणाला तरी सोबत करणे भाग पडते. आता अशा मोठय़ा वाहनांनीच प्रवास करण्याची सक्ती करण्यात आल्याने या समस्यांनाही तोंड द्यावे लागणार आहे. आई आणि वडील असे दोघेही नोकरी करीत असलेल्या घरांमध्ये हे प्रश्न अटीतटीचे असतात. मुलांसाठी बस हे खात्रीशीर आणि सुरक्षित वाहन आहे, हे जरी खरे असले, तरीही ते सक्तीचे करणे कितपत व्यवहार्य ठरणार आहे, याचाही अंदाज काहीच दिवसांत येऊ शकेल. शासनाने पुढाकार घेऊन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न विचारात घेतला, हे योग्य असले, तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत काटेकोरपणा दाखवण्यात आता शाळा, पालक आणि वाहतूकदार यांनी मागे पडता कामा नये. नववीत गेलेल्या मुलाला शाळेत जाण्यासाठी स्वत:ची सायकल हवी असते. आपण मोठे झालो आहोत, अशी पक्की खात्री असलेल्या या लहान मुलांना अडचणी आणि समस्यांचे भान नसल्याने, त्यांचे मन वळवणे ही पालकांसमोरची डोकेदुखी असते. सुरक्षेला प्राधान्य द्यायचे, तर काही बाबतीत होणारा त्रास सहन करणे उचित आहे, हे पालकांच्या लक्षात आले तर हा प्रश्न अधिक गहन होणार नाही. एकल कुटुंबांसमोरील या समस्याही सार्वजनिक झाल्याने, त्यांची सोडवणूक याच पद्धतीने होणे आवश्यक असते. शाळेचे कडक नियम स्वीकारणाऱ्या पालकांना मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी बसचा पर्याय आवश्यकच आहे. मात्र, त्याला समांतर अशा अन्य काही व्यवस्थाही निर्माण करता येतील काय, याचा विचार होणे आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांची बस वाहतूक होणार असल्याने रस्त्यांवर होणारी कोंडी टाळण्यासाठी एकाच परिसरातील शाळांनी शाळेच्या वेळा बदलण्याचाही पर्याय अद्याप चर्चेच्याच पातळीवर राहिला आहे. सुरक्षा हाच निकष लावून मुलांच्या शिक्षणाकडे पाहणाऱ्या शाळा आणि पालक यांनी सामंजस्याने या पर्यायाचा स्वीकार करणे, हेच भल्याचे आहे.
शालेय वाहतुकीच्या व्यवहार्यतेसाठी..
शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने शाळेने ठरवून दिलेल्या वाहतूक व्यवस्थेचाच उपयोग करण्याची मार्गदर्शक सूचना पालकांसाठी वरवर पाहता त्रासदायक ठरणारी वाटेलही, परंतु मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते किती आवश्यक आहे,
First published on: 20-11-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New guidelines for school bus services