धुळे शहराला वेगळी ओळख देणाऱ्या इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाने ८५ वर्षांच्या काळात इतिहास व संस्कृती या क्षेत्रात निभावलेल्या कामगिरीची ‘लोकसत्ता’ने दखल घेतल्यानंतर इतिहासाबद्दल जिज्ञासा असणाऱ्या विद्यार्थ्यांपासून  या क्षेत्रातील अभ्यासक, विविध संस्था व महाविद्यालयांनी संस्थेशी संपर्क साधून अडचणीत सापडलेल्या आमच्या संस्थेला आधार देण्याचा मनोदय व्यक्त केला. ही बाब ऐतिहासिक ठेवा जतन करणाऱ्या आमच्या संस्थेला निश्चितच संजीवनी देणारी. ऐतिहासिक कागदपत्रांचे जतन, साधने व दुर्मीळ अशा संशोधनपर ग्रंथांचे प्रकाशन, वस्तुसंग्रहालय, संदर्भ ग्रंथालय, कलादालन अशा इतिहास, संस्कृती व प्राचीन साहित्याशी संबंधित विषयांवर कार्यरत असणाऱ्या संस्थेला ‘सर्वकार्येषु सर्वेदा’ उपक्रम प्रेरणा देणारा ठरला.
इतिहास आणि संशोधन क्षेत्रात आपले आयुष्य वाहून घेणाऱ्या इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी आपल्या राष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष असणाऱ्या हस्तलिखितांचे संकलन, संवर्धन, संशोधन आणि प्रकाशनाचे कार्य केले. त्यांच्या मृत्यूनंतर संशोधन कार्याचा हा यज्ञ पुढील काळातही अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी राजवाडे इतिहास संशोधन मंडळाची स्थापना झाली आहे. इतिहासाच्या अभ्यासकांसह सर्वसामान्यांची जिज्ञासा भागविणे, हे मंडळाने मुख्य ध्येय. या कार्यास काही वर्षे राजवाडे मंडळ जनता सहकारी बँकेकडून आर्थिक मदत मिळत होती. पुढे ही बँक बंद झाल्यामुळे मदतीचा आर्थिक स्रोत बंद झाला आणि मंडळासमोर ग्रंथसंपदा प्रकाशन, जतन आणि प्राचीन वस्तुसंग्रहालयाचे संरक्षण करण्याचे आव्हान उभे ठाकले. या एकूणच परिस्थितीत ‘लोकसत्ता’च्या समृद्ध व्यासपीठावरून संस्थेचे कार्य व आर्थिक निकड जनता दरबारी सादर झाल्याचे समाधान शब्दांत व्यक्त करणे अवघड आहे. ‘लोकसत्ता’मधून संस्थेची माहिती दिल्यामुळे उदारदाते, इतिहासप्रेमी, संशोधक, अभ्यासक, शैक्षणिक व सामाजिक संस्था, मंडळाशी संपर्क साधत आहेत. अनेकांनी धुळ्यात प्रत्यक्ष भेट देण्याची इच्छा प्रदर्शित केली. या उपक्रमाने संस्थेच्या आर्थिक अडचणींवर आधाराची फुंकर मारली जाईल, तसेच संस्थेची एक ओळख नव्याने संपूर्ण राज्यासमोर निर्माण झाली आहे.
राजवाडे संशोधन मंडळाचा आर्थिक स्रोत दहा वर्षांपासून कायमचा बंद झाल्यामुळे संस्था अतिशय विदारक स्थितीतून मार्गक्रमण करत होती. संस्थेत संकलित दुर्मीळ आणि ऐतिहासिक महत्त्वाची हस्तलिखिते संरक्षित रहावी यासाठी त्यांचे परिरक्षण, संस्थेचे काम सर्वदूर पोहोचावे म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाची द्यावी लागणारी जोड, दुर्मीळ ग्रंथांनी समृद्ध होत असलेल्या ग्रंथांसाठी कपाटे, दुर्मीळ  आणि ‘आऊट ऑफ प्रिंट’ होणाऱ्या संस्थेच्या ग्रंथांचे पुनर्मुद्रण,आधुनिक काळाशी सुसंगती साधत संस्थेची प्रकाशने ई-बुक्सच्या माध्यमातून अभ्यासक व संशोधकांना उपलब्ध करून देणे असे अनेक प्रकल्प केवळ प्रस्तावित अर्थात ‘जैसे थे’ अवस्थेत राहिले. एवढेच नव्हे तर, सातव्या शतकांपासूनचे शिल्पवैभव, शिलालेख, धातूच्या तोफा यांची शास्त्रोक्त बैठकीवार मांडणी, यासाठी आवश्यक फर्निचर, २५० राजे, संस्थानिक यांच्या छायाचित्र माहितीसह अभ्यासकांना उपलब्ध करून देण्यासाठी लागणारी स्वतंत्र दालने, , अल्पवेतनावर काम करणारे कर्मचारी, संशोधक- क्युरेटर यांचे मानधन अशा अनेक प्रश्नांचा सामना करावा लागत होता. आर्थिक विवंचना आणि मंदावलेली प्रगती याचे सावट संस्थेवर पसरले असताना संजीवनी देण्याचे काम ‘लोकसत्ता’ आणि हितचिंतक व देणगीदारांनी केले. सध्याच्या व्यावसायिक आणि स्पर्धेच्या काळात सामाजिक बांधीलकीतून राबविलेल्या या उपक्रमाने संस्थाचालकांचे मनोबल वाढले. यामुळे नव्या उमेदीने काम करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा