अमेरिकेच्या हातून जागतिक नेतृत्व निसटत चालले असून देशाची अर्थव्यवस्था अशक्त झाली आहे, अशी चर्चा गेली किमान पाच वर्षे सुरू आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना अर्थातच ते मंजूर नाही. ओबामा यांनी न्यूयॉर्क राज्यातील लष्करी अकादमीमध्ये बुधवारी केलेल्या भाषणात आपल्या परराष्ट्रधोरणाची दिशा सुस्पष्ट केलीच आणि आगामी काळातही हा देश महासत्तेच्या भूमिकेतूनच जागतिक व्यासपीठावर वावरताना दिसेल, हे त्यांनी ठासून सांगितले. गेल्या काही वर्षांत अमेरिकेच्या या सर्वोच्च स्थानाबद्दल अमेरिकेतूनच साशंकता व्यक्त करण्यात येत होती हे खरे, परंतु अशा शंका घेणाऱ्यांचे एक तर इतिहासाचे वाचन चुकीचे आहे किंवा ते पक्षीय राजकारणातून असे बोलत आहेत, असे ओबामांचे म्हणणे आहे. आशियातून चीन नावाची महासत्ता उदयाला येत आहे. येत्या काही वर्षांत चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेला ओलांडून जाईल, असे छातीठोक दावे केले जात आहेत. ओबामांच्या मते अमेरिकेच्या स्थानाला – मग ते आर्थिक असो की लष्करी – कोणताही धोका नाही. याचा अर्थ अमेरिकेसमोर काहीच आव्हाने नाहीत का? आहेत. ओबामा यांनी आपल्या भाषणात त्यासंबंधी सविस्तर भाष्य केले आहे. जग अत्यंत वेगाने बदलत आहे. पूर्वी राज्यसत्तेच्या हातात असलेली ताकद नवे तंत्रज्ञान आणि जागतिकीकरण यामुळे व्यक्तींच्या हातात आली आहे. यामुळे वाढलेली दहशतवाद्यांची मारकक्षमता हे अमेरिकेसमोरील खरे आव्हान असल्याचे ओबामा यांनी म्हटले आहे. दहशतवाद हा वणवा असतो. तो दूर कुठे तरी लागला आहे. म्हणून आपल्यापर्यंत पोचणारच नाही याची खात्री नसते. तेव्हा त्याची वेळीच दखल घेतली पाहिजे. त्यासाठी काय करायचे, तर तेथे जाऊन तो विझवायचा. आगामी काळात ओबामांची ही ‘अग्निशमन’ भूमिका सीरियात दिसेल. रशियाचे क्रायमियातील छुपे आक्रमण, चीनची वाढती आर्थिक ताकद याचीही दखल ओबामा यांनी या वेळी घेतली. या भाषणात भारताचा उल्लेख येतो तो येथील मध्यमवर्गाच्या संदर्भात. ब्राझीलपासून भारतापर्यंत विविध देशांत वाढत असलेल्या मध्यमवर्गामुळे अमेरिकेच्या मनात धडकी भरलेली आहे, असे कोणी म्हटल्यास ते अतिशयोक्त वाटेल. ओबामा यांना मात्र या वाढत्या मध्यमवर्गामुळे काळजी वाटते. ती नेमकी कशा स्वरूपाची आहे, हे समजून घेतले पाहिजे. जागतिकीकरणाने या मध्यमवर्गाच्या जीवनमानात, सांस्कृतिक अग्रक्रमांत मोठेच बदल घडविले. त्याची आकांक्षावाढ झाली आहे. क्रयशक्ती वाढली आहे आणि तो अधिकाधिक राजकीय होत चालला आहे. मोदींचा विजय हा त्या मध्यमवर्गाच्या राजकीय आशा-आकांक्षांचाही विजय आहे. विविध देशांतून वाढत असलेल्या या आशा-आकांक्षांचेच भय ओबामा यांना जाणवत असावे. नवनवी राष्ट्रे लोकशाहीचा आणि बाजारप्रणीत अर्थव्यवस्थेचा अंगीकार करीत आहेत आणि त्या बदलत्या जागतिक व्यवस्थेला सामोरे जाण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे, असे ओबामा म्हणतात, तेव्हा त्यांच्या नजरेसमोर हाच मध्यमवर्ग आहे. अरब देशांतील क्रांतीचे वहन या मध्यमवर्गाने केले होते, हे येथे विसरता येणार नाही. जगभरात ही जी नवी व्यवस्था आकारास येत आहे, तिचे पुढारपणही अमेरिकेला करायचे आहे. कारण दुसरे कोणी ते करणार नाही, असे सांगतानाच, ‘अमेरिकेच्या हाती हातोडा आहे म्हणून प्रत्येक समस्या हा खिळा आहे’ असे समजण्याचे कारण नाही, अशी न-आततायी भूमिकाही ओबामा यांनी मांडली. त्यांच्या संपूर्ण भाषणाचे सार आहे ते हेच. सैनिकांसमोर केले असले, तरी देशांतर्गत विरोधकांना उद्देशून केलेल्या या भाषणाचा दुसरा अर्थ हाच आहे, की अमेरिकेच्या परराष्ट्रनीतीचे दुष्परिणाम कमी दिसले तरी ती अबाधित आहे.

Story img Loader