राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि प्राप्तिकर खात्याच्या कारवाईत चार ट्रक भरून पैसे आणि दागिने ताब्यात घेण्यात आले, ज्याची किंमत एक हजार कोटी रुपयांवर असण्याची शक्यता आहे, अशी बातमी ३ जुलै रोजी अनेक वृत्तपत्रांत झळकली होती. हे सर्व मुंबईहून गुजरातमध्ये अंगाडियांमार्फत नेण्यात येत असून बडय़ा व्यापाऱ्यांचाच ऐवज असल्याचे तपासात पुढे आले असल्याचे त्या बातम्यांत नमूद होते.
दहशतवादी कारवायांसाठी हा निधी वापरला जाणार होता काय, याची चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाल्याचे काही बातम्यांत नमूद होते.
प्रत्यक्षात, ताब्यात घेतलेल्या १०२ बॅगांमधून फक्त १० कोटी रुपयेच हाती लागले, असे दुसऱ्या दिवशी सांगण्यात आले. मग ती मोजण्यासाठी २४ तास का लागावेत? शिवाय, त्यानंतरच्या गेल्या पंधरवडय़ाभरात ही बातमी गडप झाली. ना तपासयंत्रणांनी त्याचा खुलासा केला, ना प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी. गृहमंत्र्यांनी यावर काही भाष्य केले नाही की प्रसारमाध्यमांनाही पुढे काय झाले, असा प्रश्न पडल्याचे दिसले नाही. या बातमीमागील गूढ कोण उकलेल?
माधव आठल्ये, डोंबिवली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा