‘जातिअंतासाठी राज्यघटनेकडे पाहण्याची दृष्टी हवी’ या मथळ्याचे प्रदीप देशपांडे यांचे पत्र वाचले. (३० ऑक्टो.) त्यांनी म्हटले आहे की, ‘गौतमबुद्धांनी आपल्या हयात काळात दु:खनिवारणाचे जे तत्त्वज्ञान मांडले त्या तत्त्वांच्या आधारावर डॉ. आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना केली आहे. त्या घटनेच्या स्वातंत्र्योत्तर काळात धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या जडणघडणीत मोठाच हातभार लागला आहे.’
राज्यघटनेच्या ग्रंथाच्या पहिल्या पृष्ठावरच, ‘आम्ही भारताचे लोक सार्वभौम लोकशाही राज्य निर्माण करून न्याय, स्वातंत्र्य, समता आणि एकता ही तत्त्वं असलेली राज्यघटना आम्हाला अर्पित करीत आहोत,’ असा उद्घोष केला आहे. ही तत्त्वे आम्ही फ्रेंच राज्यक्रांतीकडून नाही तर आमच्या देशाच्या पूर्वकालीन बौद्धधम्मातून घेतली आहेत, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते. चातुर्वण्र्य व जातीव्यवस्था या तत्त्वांवरील आधारित हिंदू धर्माची विचारसरणी नष्ट करण्याचा म्हणजेच जातीअंत करण्याचा प्रयत्न घटनेच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांनी केला नाही हे म्हणणे तितकेसे खरे नाही. घटनेच्या १७ व्या कलमात म्हटले आहे की, ‘अस्पृश्यता’ नष्ट करण्यात आली आहे व तिच्या वापरावर पूर्ण बंदी घातलेली आहे. अस्पृश्यतेमुळे झालेल्या अन्यायाला जबाबदार असलेल्यांवर कायदेशीर कारवाई होईल. कलम १४ मध्ये प्रत्येकाला समतेचा अधिकार दिला गेला आहे. कलम १६ मध्ये त्यांना नोकरीमध्ये आरक्षण मिळण्याची तरतूद आहे. घटनेच्या कलमांखाली अस्पृश्यांवर अन्याय करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून शिक्षा करण्याचीही तरतूद आहे. ही ‘अॅट्रॅसिटी अॅक्ट’ म्हणून प्रसिद्ध आहे. याशिवाय दलित व आदिवासींसाठी आणि आता इतर मागासवर्गीयांसाठीही शैक्षणिक सवलती आहेत.
या सर्वामुळे अस्पृश्य व तथाकथित खालच्या जातींचा थोडाफार उत्कर्ष झाला व त्या सक्षम होण्यास मदत झाली व जातिभेद काही प्रमाणात कमी झाला. जातीव्यवस्था हे हिंदू धर्माचे नुसते अंग नाही तर मनुस्मृतीसारख्या शास्त्राच्या आधारावर ती असल्याने नष्ट होणार नाही व राज्यघटनेला धर्माच्या शास्त्रांवर बंदी घालण्याचा किंवा ते बदलण्याचा अधिकार नाही. यावर एकच मार्ग आहे की हिंदू धर्माचा त्याग करून स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या तत्त्वांवर आधारित असलेल्या बौद्ध धर्माचा स्वीकार करणे.
१९३६ साली डॉ. आंबेडकरांनी Annihilation of castes (जातिविध्वंसन) हा ग्रंथ लिहून जातीअंतासाठी काय करावे याचे मार्गदर्शन केले आहे. जातीअंत तुम्ही आपल्या अंतापर्यंत पाहू नका, बाबासाहेबांच्या तत्त्वांचे पालन करून तुम्ही समतेच्या हातोडय़ाने जातिविध्वंस करा.
-कॅप्टन भाऊराव खडताळे,अंधेरी (पश्चिम)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा