राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दल पक्षाने लोकसभा निवडणुकीपूर्वीच आपला हट्टाग्रह सुरू केला आहे. विरोधी पक्षात असलेल्या रालोआमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि अन्य सगळ्या पक्षांपैकी एकाही पक्षाच्या खासदारांची संख्या भाजपच्या खासदारांच्या निम्म्याहूनही किती तरी कमी आहे. ११५ खासदार असलेल्या भाजपने पंतप्रधानपदासाठी कोणाला पुढे करावे, हेही आता जनता दलासारखे घटक पक्ष ठरवणार असतील तर या आघाडीचे निवडणुकीपर्यंत काय होईल, ते वेगळे सांगायला नको. बिहारमध्ये याच भाजपच्या मदतीने सत्तेवर असलेल्या नितीशकुमार यांच्या जनता दलाचे वीस खासदार निवडून आले आहेत. आपली लोकप्रियता वाढत असल्याने त्यात पुढील निवडणुकीत आणखी भर पडेल, असे त्यांना वाटते. बिहारच्या निवडणुकीत भाजपच्या कोणत्या नेत्याने प्रचार करायचा आणि कुणी तिकडे फिरकायचेही नाही, हेही या नितीशकुमार यांनीच ठरवले होते. त्यामुळे गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांना तेथे प्रवेशबंदी करण्यात आली. भाजपला बरोबर घेतल्याशिवाय तेथे सत्ता स्थापन करणे अशक्य आहे, हे त्यांच्या लक्षात आले, तेव्हाच त्यांना त्यांची राजकीय ताकद लक्षात यायला हवी होती. भाजपने काय करावे, हे सांगताना आपणच रालोआचे सर्वेसर्वा असल्याचा जो आव नितीशकुमार आणत आहेत, तो त्यांच्या राजकीय असमंजसपणाचे दर्शन घडवणारा आहे. आघाडीचा धर्म पाळा, असा सल्ला देताना आपण तो यापूर्वी कधी पाळला होता काय, याचे आत्मपरीक्षण नितीश यांनी करायला हवे. एखादे राज्य चांगले चालवता आले म्हणजे देश चालवता येईल, असे नव्हे, असे सांगताना नितीश यांनी स्वत:लाही पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतून बाद ठरवून टाकले आहे. मोदी यांच्या कारकिर्दीत झालेल्या गोध्रा हत्याकांडामुळे ते सर्वाना पसंत पडणार नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. भाजपच्या अध्यक्षपदावरून नितीन  गडकरी पायउतार झाल्याबरोबर मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणातील प्रवेश होणे याला भाजपअंतर्गत असलेल्या राजकारणाचीही किनार आहेच.          परंतु भाजपने कुणाला नेता करावे, याचे आदेश घटक पक्षाने देणे हेही राजधर्मात बसत नाही, हे नितीश यांना सांगायला हवे. आपल्याला हवे तसे इतरांना वाकवण्याची ही पद्धत लोकशाहीला धरून नाही  आणि आघाडीतील पक्षस्वातंत्र्यालाही धरून नाही. नरेंद्र मोदी हे अतिमागास वर्गातील असल्याचा दावा भाजपचे बिहारमधील नेते करीत आहेत. मोदी यांच्या या जातीय अस्मितेचा फायदा बिहारमध्ये अधिक मिळेल, असेही त्यांना वाटते. नितीशकुमार यांना स्वत:ला पंतप्रधानपदात रस नाही. परंतु त्यांना मोदी यांनाही त्या पदावर बसू द्यायचे नाही. भाजपमधील अनेक नेत्यांच्या मनातही कदाचित अशीच भावना असू शकते. रालोआला सत्तेवर येण्याची संधी दिसत असताना मोदी यांना आयती संधी का द्यावी, असा त्यांचा सूर आहे. त्यांच्या मनातले विचार व्यक्त करण्यासाठी आपला उपयोग करू द्यायचा का याचा विचार नितीशकुमार यांनीच करायला हवा. मोदी यांच्या रूपाने राष्ट्रीय पातळीवर प्रथमच ओबीसी नेता उदयाला येणार असल्याची भीती नितीश यांना वाटते आहे आणि त्यांच्या विरोधामागे हेही एक कारण आहे, असे सांगितले जाते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्या गेल्या दशकभरातील कारकिर्दीनंतर विरोधकांनी सत्तेवर येण्याची ही संधी प्राप्त करण्यासाठी खरे तर  कंबर कसून तयारीला लागायला हवे. परंतु गाडी पहिल्याच वळणाला अडखळली, तर तिचा वेग कसा वाढणार, याबद्दल आघाडीतील सर्वानीच विचार करायला हवा.