सांस्कृतिक बदलांचा व्यापक मागोवा घेणाऱ्या सदराचा हा विरामलेख.. बदल वाट्टेल तसे केले तर ताल कुठेतरी चुकणारच, याची जाता जाता आठवण करून देणारा..
तबलानवाज्म झाकीर हुसेन यांच्या जन्मानंतर त्यांच्या पाळण्याला म्हणे छोटे छोटे तबले आणि डग्गे टांगून ठेवले होते. जन्मत:च तालवाद्यातून निर्माण होणाऱ्या नादाचा परिचय करून देण्याची, त्यांचे पिताश्री आणि मशहूर तबलिये मरहूम उस्ताद अल्लारखाँ यांची, ही कल्पना नामी होती. आपल्याकडे पाळण्याला खुळखुळे लावण्याची पद्धत असते. बाळाला नुसता आवाज ऐकता येतो की नाही, याची जशी ती परीक्षा असते, तशीच त्याला नुसत्या आवाजापेक्षा त्या आवाजातून निर्माण होणाऱ्या नादाची ओळख करून देणं हाही त्यामागचा हेतू असतो. परिसरात उमटणारे विविध प्रकारचे ध्वनी आणि नाद यातील फरक लक्षात आल्यामुळे त्याला अगदीच लहानपणापासून संगीत म्हणजे काय हे आपोआप समजायला लागतं. नुसते आवाज काढून संगीत निर्माण होत नाही. त्यासाठी त्या आवाजाला नादाचा दर्जा प्राप्त व्हावा लागतो. हा नाद चराचर व्यापून राहिलेला असला तरीही तो व्यक्त करण्यासाठी निसर्गातल्याच वस्तूंपासून काही नवं वाद्य निर्माण करावं लागतं. वाद्याच्या आधीच माणसाला त्याच्या गळ्यातून निर्माण होणाऱ्या नादाचा शोध लागला होता. बोलण्याचा आवाज आणि नाद एकाच स्वरयंत्रातून व्यक्त होतात, हेही त्याला समजलं होतं. या यंत्रावर हुकूमत मिळवता आली की नाद निर्माण करता येतो, असंही त्याच्या लक्षात आलं होतं. या नादातून त्यानं संगीताची निर्मिती केली आणि स्वत:चं एक नवं अवकाश तयार केलं. स्वर हे नादाचं अधिक सुस्पष्ट आणि ठाशीव स्वरूप. त्या स्वरांच्या साह्यानं मेंदूत तयार होणाऱ्या अनेक नव्या कल्पनांचा विलास करता करता संगीत तयार झालं. हाच नाद त्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत सदैव सोबत करत राहतो.
जगातली सर्वात जुनी आणि संपन्न संगीत परंपरा म्हणून भारतीय संगीताची गणना होते. ज्ञात असलेल्या हडप्पा संस्कृतीमध्येही संगीताची स्थापना झाल्याचं संशोधनात आढळून आलं आहे. म्हणजे इसवी सनापूर्वी किमान सहा हजार वर्षांपूर्वीपासून संगीत ही समाजाची एक सांस्कृतिक खूण होती. मेंदूच्या विकासाबरोबर माणसानं जी अनेक क्षेत्रं पादाक्रांत केली, त्यातलं, सर्वात महत्त्वाचं क्षेत्र संगीताचं होतं. गरज ही शोधाची जननी असते, हा सिद्धान्त संगीताच्या बाबत लागू झाला असेलच असं नाही. कदाचित ती आपातत: घडून आलेली घटना असेल. पण त्यामुळे माणसाच्या जगण्याला अतिशय तरल अशा अभिजाततेचा स्पर्श झाला. संगीतात त्याला भावना व्यक्त करण्यासाठी स्थान मिळालं. अतिशय गूढ वाटणाऱ्या, नेमकेपणानं पकडता न येणाऱ्या भावनांचं सौंदर्यपूर्ण सादरीकरण करण्यासाठी संगीत जन्माला आलं. शब्दांच्या अर्थापलीकडे जाण्याची क्षमता धारण केलेल्या या कलाप्रकारानं माणसाच्या संवेदना कुरवाळण्याचं अद्भुत कार्य केलं. सौंदर्याचा हा हव्यास मग जगण्याच्या सगळ्याच प्रांतात आला. त्यातून चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला, साहित्य, नृत्य अशा अनेकविध शाखा जन्मल्या. सौंदर्याची निर्मिती आणि तिचा अनुभव या माणूसपणाच्या खुणा झाल्या. पृथ्वीवरील अन्य प्राण्यांपेक्षा माणसानं या सौंदर्यनिर्मितीमुळे आपलं वेगळंपण विकसित केलं. केवळ संवादासाठी, ध्वनीच्या मदतीनं शब्दांवरचा जोर कमी जास्त करून माणसाला भावना सांगता येऊ लागल्या. ओरडणं, रागावणं, चिडणं, प्रेमानं बोलणं, चुचकारणं, मनधरणी करणं, लटकेपणानं रागावणं अशा केवळ ध्वनीच्या कितीतरी शक्यता माणसानं शोधून काढल्या. पण त्यापलीकडे जाऊन केवळ नादाच्या साह्य़ानं कलात्मक संवाद करण्याची त्याच्यातील क्षमता केवळ अगाध होती.
म्हणजे नादाशिवाय संगीत नाही, हे माणसानं मान्य करून सौंदर्याच्या निर्मितीला स्थान दिलं. गळ्यातला स्वर आणि वाद्यांमधून निर्माण होणारा नाद या दोन्हीमध्ये सातत्य हा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म होता. एका स्वरानं संगीत तयार होत नाही. त्यासाठी त्याला स्वर लांबवता यावा लागतो. शिवाय एका स्वराच्या जोडीला आणखी स्वरांची मालिका उपलब्ध झाल्याशिवाय त्याला भाव उत्पन्न करता येत नाही. तंबोरा असो की तबला, बासरी असो की सारंगी माणसानं स्वरसातत्य असणारे नाद निर्माण करण्यासाठीच त्यांची योजना केली. त्यातून अर्थपूर्ण नाद येण्याची व्यवस्था केली आणि त्या सगळ्याचा मेळ घालून नादसंमेलन घडवून आणलं. तबला, त्या आधीचा मृदुंग यामधून संगीतमय नाद व्यक्त होत असतो. घरातल्या जेवणाच्या टेबलावर ठेका धरून गाणं म्हणणं आणि तबल्याच्या संगतीत म्हणणं यात जमीन अस्मानाचं अंतर असतं. टेबलावरचा ठेका म्हणजे संगीत नव्हे, एवढं कळण्याएवढी सुज्ञता माणसानं कमावली. तरीही जेव्हा आवाजाच्या साह्य़ानं संगीत निर्मिती करण्याचा हट्ट सुरू होतो, तेव्हा आवाज आणि नाद यातील फरक पुन्हा एकदा स्पष्ट करण्याची गरज वाटू लागते. गेल्या काही वर्षांत तालवाद्यांवर हुकूमत असणारे अनेक कलावंतही या काटेरी वाटेवरून जाताना पाहिलं की क्लेश होतात. तबल्यातून निर्माण होणारे वेगवेगळ्या प्रकारचे आणि दर्जाचे नाद त्या वाद्याला संगीताच्या दरबारात मानाचं स्थान मिळवून देतात. तबला शिकवल्या जाणाऱ्या एकाद्या वर्गात सुरात जमवलेले अनेक तबले जेव्हा एकाच वेळी घुमू लागतात, तेव्हा ऐकणाऱ्याला जो आनंद होतो, तो शब्दातीत असतो. हाताच्या बोटांचा विविधांगी वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या नादांमधून जे तालसंगीत तयार होतं, ते माणसाच्या बुद्धीची आणि सर्जनशीलतेची ओळख पटवून देणारं असतं. अशा तालसंगीतात कुणी चमचे, कचकडय़ाच्या पिण्याच्या बाटल्या, सूटकेस, सुऱ्या, रव्या यांसारख्या दैनंदिन जीवनात हरघडी वापरात असणाऱ्या वस्तूंचा समावेश केला, तर त्यातून संगीत कसे बरे निर्माण होईल? गेल्या काही वर्षांत अशा नाद नसलेल्या वस्तूंच्या मदतीनं तालसंगीत सादर करणाऱ्यांची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. हे धोकादायक आहे. कानाला चांगलं लागतं, ते प्रत्येक संगीतच असतं, अशा गैरसमजुतीतून अशा नव्या गोष्टींचा जन्म होत असावा. ‘पर्कशनिस्ट’ असं बिरूद मिरवणाऱ्या तालसाधकांमध्ये केवळ आवाजाच्या (नादाच्या नव्हे!) मदतीनं संगीत निर्माण करण्याची हौस येते, तेव्हा ती धोक्याची घंटा (घंटेतूनही नाद निर्माण होतो..) असते, हे त्यांच्या लक्षातही येत नाही.
रेल्वेगाडीचा आवाज तोंडाने काढणे म्हणजे संगीत नव्हे. कुत्र्यांचं भुंकणं, जसंच्या तसं तोंडातून काढणं, म्हणजे सौंदर्यनिर्मिती नव्हे. माणसाला जे आवाज माहीत आहेत, ते गळ्यातून काढता येणे ही नक्कल आहे, सर्जन नव्हे, याचं भान सुटल्यामुळे रसिकाला गंडवण्याचे असले प्रकार दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत चालले आहेत. तालाची अफाट दुनिया निर्माण करणाऱ्यांनी लयीचं गणित शोधून काढलं. मात्रा म्हणजे बीटस् ही संकल्पना शोधली. त्या मात्रांचा हिशोब लावत चार मात्रांपासून ते अट्ठावीस मात्रांची आवर्तनं तयार केली. त्या आवर्तनांनाच ताल असं संबोधून त्यातून मात्रांचा सौंदर्यपूर्ण गणिती आविष्कार करण्याचं तंत्र तयार केलं. तबल्याची म्हणून स्वतंत्र भाषा तयार केली. धा, धिं, तिं, तिरकिट, किटगद, गदीगन यासारख्या नादाच्या उच्चारांशी साधम्र्य राखणारी ही भाषा. प्रारंभ, मध्य आणि अंत असं स्वरूप असणारे हे ताल स्वत:च्या नादातून संगीत निर्माण करत राहिले. प्रारंभ आणि अंत एकाच बिंदूत (प्रारंभ िबदू म्हणजे सम आणि अंत बिंदू म्हणजेही सम) सामावलेली ही तालपद्धत जगातल्या सर्वच संगीतरसिकांना भुरळ पाडणारी ठरते. तालांच्या या वेगवेगळ्या आकाराच्या आवर्तनामुळे सौंदर्यनिर्मिती करण्यासाठी अधिक आव्हान मिळालं आणि करामतीबरोबरच अभिजाततेलाही स्थान मिळालं. तालाचं हे विश्व इतकं व्यापक आणि अपूर्व आहे की त्यामध्ये आयुष्यभर डुंबत राहिलं, तरी हातात मूठभरच सौंदर्यकण यावेत.
एवढय़ा मोठय़ा तालविश्वात अनाहूतपणे आलेल्या बोंगो, कोंगो यांसारख्या पाश्चात्त्य तालवाद्यांचा समावेश करून एक वेगळं विश्व तयार करण्याची कल्पना म्हणजेच फ्यूजन होतं. डमरू, ढोलक, मृदुंग, पखावज, चिपळ्या, करताल, झांज, ढोल, ताशा यांसारख्या अनेक तालवाद्यांना आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या तालसंगीताला स्वत:चं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्या व्यक्तिमत्त्वांचा सामूहिक आविष्कार करताना त्यांच्या अस्तित्वाला धक्का न लावता आणि त्यांच्यातील सौंदर्यखुणा पुसू न देता संगीत निर्माण करणं हेच एक मोठं आव्हान असतं. विशिष्ट मात्रांच्या आवर्तनाचा ‘ताल’ नाही, अशा वाद्यांना त्यात सामावून घेताना सौंदर्यदृष्टी ढळू न देण्याचं भान असणं अधिक आवश्यक असतं. दुर्दैवानं केवळ चूष म्हणून चमच्यापासून ते सूटकेसपर्यंत ज्या ज्या वस्तूंमधून आवाज निर्माण होतो, अशा वस्तूही संगीताच्या दरबारात शेखी मिरवू लागल्या आहेत. गंमत म्हणून हे सारं ठीक आहे. परंतु त्याला अभिजाततेचा दर्जा देणं केवळ मूर्खपणाचं आहे. एकेका वाद्यावर हुकूमत मिळवण्यासाठी सारं आयुष्य घालवणाऱ्या कलावंताला एवढय़ा साऱ्या वाद्यांवर प्रभुत्व गाजवताना आपण नेमकं काय करतो आहोत, याची जाणीव नसल्यानं तालांच्या दुनियेत हलकल्लोळ माजणं स्वाभाविक आहे. त्यातून अलगद बाहेर पडण्यासाठी नादातून निर्माण होणाऱ्या संगीताचीच कास धरावी लागणार आहे.
ताल चुकू नये..
सांस्कृतिक बदलांचा व्यापक मागोवा घेणाऱ्या सदराचा हा विरामलेख.. बदल वाट्टेल तसे केले तर ताल कुठेतरी चुकणारच, याची जाता जाता आठवण करून देणारा.. तबलानवाज्म झाकीर हुसेन यांच्या जन्मानंतर त्यांच्या पाळण्याला म्हणे छोटे छोटे तबले आणि डग्गे टांगून ठेवले होते.
First published on: 29-12-2012 at 12:08 IST
मराठीतील सर्व रुजुवात बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No mistake in rhythm