‘लोकसत्ते’च्या बुधवार, दि. २ जानेवारीच्या अंकात पहिल्या पानावर ‘ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर’ अशा शीर्षकाखाली एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. या बातमीमागे काही दबावाचे राजकारणही असू शकते. जेव्हा भारतरत्न डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली हिंदूमधील एक मोठा वर्ग बौद्ध धर्मात दाखल झाला त्यापूर्वी डॉ. आंबेडकर यांनी कोणत्या धर्माचा स्वीकार करावयाचा, याबद्दल प्रदीर्घ काळ विचारमंथन केले होते. आपल्या आठ अनुयायांना शीख धर्मात पाठवून त्याही धर्माचा मागोवा घेतला होता. आंबेडकरांनी आणि त्यांच्या अनुयायांनी मुसलमान धर्म स्वीकारावा यासाठी तत्कालीन मुसलमान पुढाऱ्यांनी खूप प्रयत्न केले होते. फत्तेपूरच्या नवाबाने यासाठी त्याकाळात शेकडो कोटी रुपये देऊ केले होते. पण बाबासाहेबांनी हिंदू धर्माशी बरेचसे साम्य असलेला बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला, हे त्यांचे हिंदू धर्मावर आणि भारत देशावर मोठे उपकार आहेत. डॉ. आंबेडकरांच्या वाङ्मयात हिंदू धर्माबद्दल वेगवेगळ्या स्वरूपाची विधाने आढळतात. पण इतर काही फुटीरवाद्यांप्रमाणे आगखाऊ मते ते व्यक्त करीत नाहीत. साकल्याने विचार केला तर त्या काळच्या परिस्थितीनुसार धार्मिक ऐक्य सांभाळले जाईल, असा दूरदर्शित्वाचा विचार बाबासाहेबांनी केला असावा, असे वाटते. कारण भारतीय राज्यघटनेमध्ये धार्मिक स्वातंत्र्याबद्दल जो मजकूर आहे त्यात कलम २५ मध्ये २ क्रमांकाच्या स्पष्टीकरणात हिंदू धर्मीयांबरोबरच शीख, जैन व बौद्ध यांचाही उल्लेख एकत्र करण्यात आलेला आहे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट होय. बाबासाहेबांनी धर्मातराचा निर्णय घेतल्यानंतर महात्मा गांधीच्या पुढाकाराने काही हिंदू धर्मीय विचारवंतांनी आणि शंकराचार्यानी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. डॉ. बाबासाहेब हे कायदेतज्ज्ञ आणि आपली बाजू योग्यप्रकारे मांडण्यात पटाईत असल्यामुळे या वादविवादात त्यांनी निर्माण केलेले काही मुद्दे विरोधी पक्षातील मंडळींना निरुत्तर करणारे ठरले. त्यानंतर काही वर्षांनी करपात्रीजी महाराज यांच्या प्रयत्नाने चारही पीठांच्या शंकराचार्यानी एकत्र येऊन हिंदू धर्मात अस्पृश्यता नाही, असे जाहीर केले होते; पण दुर्दैवाने तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पूर्वीच्या काळाचा विचार केला तर सर्वसाधारण समाजातून आता अस्पृश्यता केवळ काही मंडळींच्या मतलबी स्वार्थातच आपल्याला आढळून येते. दैनिक व्यवहारात अस्पृश्यतेचा विचारही कोणी करीत नाही.
आता हा इतिहास सांगण्याचे कारण एवढेच की, ओबीसी समाजाने संघटित धर्मातर करण्याचे ठरविले तर हिंदू धर्मीय विद्वानांनी आणि विचारवंतांनी त्याबाबत गाफील राहू नये. कारण धर्मातर झाल्यावर तो समाज मूळ प्रवाहापासून बाजूला होतो, काही वेळा तर वैर भावनाही बाळगू लागतो. हे टाळले पाहिजे. मानवी मनाला अधिक उन्नत करण्याच्या विषयात हिंदू धर्माचे योगदान जागतिक महत्त्वाचे आहे. आपापसातील किरकोळ वादात धर्महानी होऊ देण्यात अर्थ नाही.
ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा