बदललेल्या वातावरणात या सणांकडे पुन्हा एकदा अभ्यासपूर्ण नजरेने पाहण्याची गरज आहे.. विद्यमान काळी राजकीय व्यवस्था आणि प्रसार माध्यमे यांचा संकरित विकास जोमाने झाल्याने शिमगा सणाचे महत्त्वदेखील कमी होईल की काय अशी शंका येऊन आमच्या घशास कोरड पडते!
आपल्या संस्कृतीत सणांचे महत्त्व काय? जे काही असेल ते असो. पण सामान्य माणसाच्या विचारातून सण म्हणजे दैनंदिनाला सुट्टी. रोजच्या कंटाळवाण्या जगण्यातून जरा विरंगुळा मिळावा, रोजचेच तेच ते खाऊन कंटाळलेल्या जिव्हेस जरा काही गोडाधोडाचे वा वशाट चाखावयास मिळावे, रोजचे बुळबुळीत शब्द वापरून शेवाळलेल्या जिभेस स्वच्छ करण्याची संधी मिळावी यासाठी कोणा चतुर पूर्वजाने सणांचे नियोजन केले याबद्दल आमच्या मनात तिळमात्रही संदेह नाही. परंतु बदललेल्या वातावरणात या सणांकडे पुन्हा एकदा अभ्यासपूर्ण नजरेने पाहण्याची गरज आहे. या सणांचे प्रयोजन विद्यमान काळात, जग एकविसाव्या शतकात जाताना काय असावे याची पाहणी करण्याची गरज आम्हास तीव्रतेने वाटते. वास्तविक मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रा. रा. रा. वेळुकर (यांतील तिसरा रा हा त्यांच्या राजन या नावाचा) वा तत्सम कोणा सरकारी कृपाप्रसादाने विद्वान म्हणवून घेणाऱ्याने या विषयावर पीएच.डी. करण्यास हरकत नसावी. आपल्या मागे डॉ. लावून घेण्यासाठी व्याकूळ झालेले वा पगारवाढीसाठी डॉत्सुक असलेले अनेक जण या विषयावर तौलनिक वगैरे अभ्यास करून आपली प्राध्यापकी सार्थ ठरवू शकतात. अशांना मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या विद्वानांचाही पुरेसा साठा महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर पडून आहे याचीही आम्हास जाणीव आहे. असो. परंतु प्रस्तुत लेखनाचा विषय हा होतकरू डाँना विषय पुरवणी करणे हा नसून सणांकडे नव्याने पाहण्याची कशी गरज आहे हे स्पष्ट करणे हा आहे.
जग एकविसाव्या शतकात जात असताना आणि भारताने हिरवी क्रांती, धवल क्रांती आदी क्रांत्या यशस्वीपणे केलेल्या असताना धान्यांची मुबलकता हे आताच्या काळाचे लक्षण ठरलेले आहे. परिणामी, या महाराष्ट्रातीलच काही जिल्हे कुपोषणग्रस्त बालकांच्या अर्धपोटांनी फुगलेले असताना पश्चिम आदी प्रांतात दुधाचा महापूर येतो आणि वारणा, चितळे आदी उद्यमशीलांना शिखरिणी (पक्षी: श्रीखंड), पीयूषादी पदार्थ बनवून व्यापारउदिमाची संधी मिळते. पूर्वीच्या काळी असे पदार्थ विजयादशमी वा चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर केले जात. परंतु आता बाजारात चार दिडक्या टाकल्या की म्हणाल ते मिष्टान्न मुदपाकखान्यात येत असल्याने गोडाधोडासाठी या सणांचे महत्त्व ते काय राहणार? पूर्वीच्या काळी नवे कपडे खरेदी करण्याचादेखील काळ होता. परंतु कापूस आणि वस्त्रप्रावरण क्षेत्रातदेखील भारताने क्रांती केलेली असल्याने कापडाचे उत्पादन आपल्याकडे जोमाने झाले आहे. एका बाजूला किमान वस्त्रे नसलेल्यांची संख्या वाढत असताना त्याच वेळी बियाणी, लालवाणी आणि मंडळींच्या कृपेने घरांत ठेवण्यास जागा नाही इतकी वस्त्रप्रावरणांची खरेदी होऊ लागली आहे. सबब, हल्ली नवीन वस्त्रे खरेदी करण्यासाठी दीपावलीची प्रतीक्षा करावी लागत नाही. तेव्हा दीपावलीचे आकर्षण ते काय राहणार? पूर्वीच्या काळी दीपावलीचे कवतिक होते ते शोभेच्या दारूकामासाठी. परंतु सांप्रतच्या काळात शोभेचे आणि न शोभेचे दारूकाम बारा महिनेही सुरू असते. या दारूकामास अलीकडच्या काळात मोठेच महत्त्व आले आहे. ते कमी होऊ नये म्हणून सांप्रत काळी धान्याचा साठादेखील दारूनिर्मितीसाठी वापरला जातो. पूर्वीच्या काळी धान्ये सडली की ती दारू बनवण्यासाठी दिली जात. आज विज्ञानाच्या प्रसारामुळे दारू बनवण्यासाठी धान्ये सडण्याची गरज राहिलेली नाही. तेव्हा आजकाल कशाहीसाठी कोणी दिवाळीची वाट पाहत नाही. तेव्हा आम्हास दिवाळीचे अप्रूप ते काय राहणार?
हाच नियम अन्य सणांनादेखील लागू पडणार नाही काय? अशा अन्य सणांतील नामांकित उत्सव म्हणजे शिमगा होय. जे वाक्प्रचार, शब्दप्रयोग, गुहय़गोष्टींचे तपशील उघड करणारे संदर्भ जे एरवी देता येत नाहीत ते उघड करण्यास मुभा देणारा सण म्हणजे शिमगा. एरवी ज्याचे वर्णन असभ्य असे सभ्य जनांकडून केले जाते त्याचा जाहीर उच्चार शिमगा या मंगलदिनी करण्याची मुभा असते. खेरीज, गर्दभ या चतुष्पादासाठीच एरवी राखीव असणारे उकिरडे या मंगलदिनी महाजनांच्या पदस्पर्शाने पुनीत होतात. त्यामुळे आपल्या उच्च संस्कृती परंपरेत शिमगा या सणास अत्यंत महत्त्व आहे, असे आमचे मत आहे. परंतु विद्यमान काळी राजकीय व्यवस्था आणि प्रसार माध्यमे यांचा संकरित विकास जोमाने झाल्याने या सणाचे महत्त्वदेखील कमी होईल की काय, अशी शंका येऊन आमच्या घशास कोरड पडते. अर्थात या शुभमुहूर्ती घसे ओले करण्याचे अनेक मार्ग संस्कृतिरक्षकांनी सांगून ठेवलेले असल्याने आम्हाला आमच्या कोरडय़ा घशाची जराही चिंता नाही. चिंता आहे ती शिमगा या सणाचे भवितव्य काय या प्रश्नाची! जे शब्दप्रयोग दिवेलागणीनंतरही करण्यास सभ्य धजावणार नाहीत, असे शब्द आजकाल राजकीय पक्षांच्या अधिवेशनात सर्रास उच्चारले जातात. पूर्वीच्या काळी गावाने ओवाळून टाकलेले काही नामांकित शिमग्याच्या सणानिमित्ताने आपल्यातील शारीर कलेचे प्रदर्शन करीत गावोगावी कुस्तीचे फड लावीत. आता त्याचीही गरज नसते. जेथे विचारमंथन करणे अपेक्षित असते अशा राजकीय नेत्यांच्या लोकप्रतिनिधिगृहात कुस्तीचे फड अलीकडे रंगतात तेव्हा त्या शिमग्यांतील फडांची स्मृती जागी होणार नाही असे होईल काय? पूर्वीच्या काळी गणवेशधारी सुरक्षा रक्षकास मान दिला जात असे. त्याची टोपी उडवली जाई ती फक्त शिमगा या शुभदिनीच. परंतु आता राज्य चालवणारेच त्यांना वाटेल तेव्हा गणवेशधारी सुरक्षा रक्षकाची वस्त्रे फेडू आणि फाडू शकतात. तेव्हा ते दृश्य पाहून शिमग्याची आठवण येणार नाही असे कसे? पूर्वीच्या काळी प्रसार माध्यमांतील ज्येष्ठ सत्ताधाऱ्यांवर नैतिक वचक म्हणून आपल्या कार्यक्षेत्राचा वापर करीत. यात बदल झालाच तर शिमगा या एखाद्या दिवशी अपवाद म्हणून होत असे. विद्यमान काळी प्रसार माध्यमांतील धुरीण आपले लेखन वा वक्तृत्व कला सत्तेच्या परिघात येण्यासाठीच वापरताना दिसतात. पूर्वीच्या काळी वृत्तपत्रादी माध्यमांतील संपादक वर्तमानपत्रांतील चुकांचा दोष स्वत:च्या शिरी घेत. परंतु आजच्या विकेंद्रीकरणाच्या काळात वर्तमानपत्रातील चुकीसाठी मी जबाबदार नसून रात्रपाळीचा उपसंपादक जबाबदार आहे, असे संपादकच जाहीरपणे सांगताना दिसतात आणि वर पुन्हा वृत्तपत्रांतील तत्त्वनिष्ठतेवर व्याख्यान देतात. हे सर्व शिमग्याचीच आठवण करून देणारे नाही काय? लोकप्रतिनिधींनी हक्कभंग ठराव आणला म्हणून कोल्हेकुई करणारे काही जण सत्ताधारी भुजांच्या आधारे आपल्यात नसलेले बळ कसे वाढवीत होते याचे स्मरण शिमग्याच्या पवित्र दिनी करणे समयोचितच ठरणार नाही काय? काही पक्षीयांकडून झालेल्या कथित हल्ल्यांच्या न झालेल्या खोटय़ा जखमा मिरवण्यात ज्यांनी आयुष्य व्यर्थ घालवले तेच त्याच कथित हल्लेखोर पक्षप्रमुखांचे चरणतीर्थ घेण्यासाठी रांगेत उभे असतील तर ते दृश्य कधीही शिमग्याच्याच स्मृती जागवणार यात विशेष ते काय?
तेव्हा नमूद करावयाचा मुद्दा हा की, जे काही शिमग्यालाच करावयाचे असते ते सर्व आजकाल दररोज होताना दिसत असेल तर शिमग्याचे महत्त्व कमी होईल ही आमची भीती रास्त म्हणावयास हवी. असे अलीकडच्या काळात सर्रास होत असल्यानेच शिमग्यात आमचा जीव रमत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा