‘नरसिंहाच्या मंदिरावरून सिंहगड हे नाव पडले – ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांचा दावा’ या, ढेरे यांच्या मुलाखतीवर आधारित बातमीकडे (लोकसत्ता, २१ जुलै) मी लक्ष वेधू इच्छिते. इतिहास हा माझा स्वतचा आवडीचा विषय आहे. महाराणी ताराराणी यांच्या ऐतिहासिक कामगिरीच्या विषयावर थिसिस लिहून मी मुंबई विद्यापीठातून पीएच. डी. प्राप्त केली आहे, त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ यांचे एक ललित चरित्र लिहिलेले आहे आणि शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करताना महाराष्ट्रातले सर्व गड आणि किल्ले फिरून पाहिलेले आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी दिलेल्या आहेत.
मी स्वत सातारा जिल्ह्यातली माहेरवाशीण आहे. या जिल्ह्यात प्रतापगड, कल्याणगड आणि वसंतगड आहेत.. ही उदाहरणे अशासाठी की, यापैकी एकही नाव कोणत्याही देवाचे नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आवडीची ही नावे असली पाहिजेत किंवा त्यांच्या एखाद्य सहकाऱ्याच्या विनंतीवरून ही नावे ठेवली गेली असावीत. या प्रत्येक किल्ल्यावरती शिवकालापूर्वीपासून कोणत्या ना कोणत्या देवाचे मंदिर हे अन्य किल्ल्यांप्रमाणेच निश्चितच असले पाहिजे, कारण त्या काळी सुरक्षितता म्हणून देवदेवतांची स्थापना अवघड जागेवर केलेली असावी.
कोंडाणा किल्ल्याचे सिंहगड हे नाव नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमानंतर त्यांनी केलेली कामगिरी अत्यंत मोलाची असल्यामुळे आणि स्वराज्याच्या कामासाठी केलेल्या त्यागातून सिंहगड हे नाव नव्याने अस्तित्वात आले, ही माझ्याप्रमाणे इतर कित्येकांची समजूत आहे. नव्याने संशोधित करून , नरसिंह देवावरून सिंहगड नाव पडले हा विचार कोणी करत असेल तर त्याला आमचा विरोध नाही. परंतु ते प्रसिद्ध करून लक्षावधी लोकांच्या भावनांना ठेच पोहोचविणे योग्य आहे असे मला वाटत नाही.
– शालिनीताई पाटील (माजी मंत्री व माजी खासदार), मुंबई.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा