राखीव खेळाडूंना अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात संधी न दिल्याबद्दल सुनील गावस्करांनी केलेली टीका योग्यच आहे. पण गावस्कर जुन्या पिढीचे पडले, त्यामुळे त्यांना फक्त खेळाशीच देणेघेणे होते. आजचा जमाना वेगळा आहे. ‘राखीव खेळाडूंनी चांगली कामगिरी केली तर संघातील कायम खेळाडूंचे काय होईल’ या वाक्यातच आपला संघ कसा बांधला जातो याचे दर्शन होते. याचाच अर्थ चांगली कामगिरी करा अथवा न करा, संघातील स्थान पक्के असते. पूर्वी केवळ गुणवत्तेवर भारतीय संघाचे दरवाजे मुंबईतून उघडायचे. या काळात वाढलेल्या गावस्करांना नक्कीच ठाऊक असेल की हल्ली भारतीय संघाचे दरवाजे हे चेन्नईतून उघडतात आणि त्यात गुणवत्ता वगरे ‘दुय्यम’ गोष्टींना स्थान नसते.
हंगामी संघनायक कोहलीची मानसिकताही यात दिसून येते. अफगाणिस्तानसारख्या कमकुवत संघाविरुद्धसुद्धा अकरापकी एखाददुसरा खेळाडू बदलून संघाचा आत्मविश्वास डळमळीत होत असेल, यात त्या न खेळवलेल्या खेळाडूवर दाखवलेला अविश्वास त्या खेळाडूंना जास्त त्रासदायक वाटत असेल. हीच चूक कोहलीने गेल्या वर्षी झिम्बाब्वेत केली होती. कर्णधार असताना मालिका जिंकल्यावरसुद्धा काश्मीरच्या परवेझ रसूलला खेळवले नव्हते. वास्तविक जम्मू काश्मीरसारख्या प्रदेशातला एक खेळाडू भारतातर्फे पहिल्यांदा खेळला असता तर त्या घटनेला खेळापलीकडे बरेच संदर्भ होते. पण कोहलीचे कारण तेव्हा होते. ‘भारतातर्फे खेळायला वाट ही पाहावीच लागते.’ स्वत: जेमतेम १० रणजी सामने खेळून, युवा विश्वचषक आणि मग आयपीएलच्या द्वारे भारतीय संघात दाखल झालेल्या कोहलीने कुठच्याही खेळाडूला वाट पाहावी लागते हे सांगणे तितकेसे पटत नाही. ईश्वर पांडेने गेल्या दोन हंगामात स्थानिक सामन्यात नक्कीच सातत्य दाखवले होते आणि कसोटी सामन्यात द्रविड गेल्यावर पुजाराशिवाय आपले चालत नाही. अशा खेळाडूंवर कोहलीने दाखवलेला अविश्वास हा त्यांच्या न खेळण्याच्या क्षमतेबद्दल नसून गावस्कर म्हणतात त्याप्रमाणे चुकून चांगले खेळले तर काय करायचे याबद्दलच जास्त वाटतो.
कोहलीचे कर्णधारपदाचे गुरुबंधू धोनीने सपासप लक्ष्मण, द्रविड, गांगुली, सेहवाग यांचे पत्ते कापले. यात लक्ष्मणचा धक्का तर चटका लावणारा होता. आपल्या सुदैवाने सचिन तेंडुलकरला त्याला धक्का मारता आला नाही आणि त्याला सन्मानाने निवृत्त होता आले. त्याच पावलावर पाऊल ठेवून चेला कोहली आपल्याला हवे त्यांचाच चमू बांधत असतो.
कोहलीमध्ये गुणवत्ता आहे, वय त्याच्या बाजूला आहे. थोडक्यात, कर्णधार बनायची लायकी आहे. फक्त कर्णधाराचे नुसते नावच विराट असून चालत नाही मनही विराट असावे लागते हे कळणे महत्त्वाचे आहे.
 
नसर्गिक आपत्तीला आचारसंहितेतून वगळावे..
राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश व नाशिक भागात  गारपीट व  वादळी पावसामुळे चार हजार कोटींचे नुकसान झाले आहे. फळबागा, पालेभाज्या, जनावरे,  पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही प्रमाणात जीवितहानीही  झाली आहे.
 त्सुनामी, पूर, भूकंप, गारपीट, वादळी पाऊस, दुष्काळ यांसारख्या  नसíगक आपत्ती देशात कधीही येऊ शकतात. निवडणुकीच्या काळात आचारसंहिता असल्यामुळे सरकार कुठल्याही लोककल्याणकारी घोषणा करू शकत नाहीत.  जिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना जनतेला नसíगक आपत्तीतून  सावरण्यासाठी अधिकार दिले असले तरीही त्यांना निधीची मर्यादा आहे. निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कुठलीच मदत पीडितांना करू शकत नाहीत.   नैसर्गिक आपत्ती येण्याचा नेम नसल्यामुळे आदर्श आचारसंहितेतून तिला वगळण्यात यावे. म्हणजे आपत्तीग्रस्तांना पुरेशी मदत वेळीच मिळू शकेल.
सुजित ठमके, पुणे

नियम न पाळणारा मोठा समजला जातो..
मध्य रेल्वेच्या महाव्यस्थापकाची तुघलकी सूचना ‘लोकलचे दरवाजे स्वयंचलित ठेवा’ या बातमीस जोडूनच ‘रेल्वे मार्गावरील प्रवासी मजेसाठी नाही तर नाइलाज म्हणून दरवाजात लटकून प्रवास करतात’ असे विधान रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रवक्ते नंदकुमार देशमुख यांनी केले आहे. ‘माझे काय चुकते’ या नाटकाप्रमाणे दोघेही आपले म्हणणे योग्य आहे असेच म्हणणार. पण प्रवास सुखकर होण्यासाठी कर्मचाऱ्यांना व प्रवाशांना शिस्त लावण्याचे काम करणार नाहीत.
 दारात लटकून प्रवास करणाऱ्यांचा एक वर्ग आहे हे  देशमुख यांना माहीत असणारच. ते जागा असली तरी बसणार नाहीत हे आपण कमी गर्दीच्या वेळेस पाहतोच. प्रवाशांनी दुसऱ्यांचा विचार केला व शिस्त पाळली तर प्रवास सुखकर होणार आहे. पुढल्या स्टेशनवर उतरणार असाल तरच दारात उभे राहा. अन्यथा पॅसेजमध्ये उभे राहू नका, जास्तीत जास्त आत जाण्याचा प्रयत्न करा. पण प्रत्येक स्टेशनवर उतरणार व परत चढणार असे महाभाग आहेत. अशांची संख्या कमी आहे असे देशमुख म्हणतील, पण हंडाभर भातात चमचाभर विष टाकले तर सर्व भात विषमय होतो, तद्वत असे एक दोन प्रवासीसुद्धा सर्वाना त्रासदायक होतात.
अनेक जण दारात िभत करून उभे असतात. आत अगदी झोपायला जागा नसली तरी उभे राहण्यासाठी जागा नक्की असते. दारातील सर्व प्रवासी उतरले तर चढणाऱ्या प्रवाशांना चढता येईल. आपण शिस्त पाळत नाही. उलट नियम न पाळणारा मोठा समजला जातो.
म. न. ढोकळे, डोंबिवली

लोकलमधील बेंचचा आकार कमी करा
‘लोकलचे दरवाजे स्वयंचलित ठेवण्याबद्दल’ तुघलकी सूचनेचे वृत्त (६ मार्च) वाचले.  तसे पहिले तर लोकल प्रवाशांचे हाल हे डब्यांच्या संख्या वाढवून किंवा फेऱ्या वाढवूनसुद्धा संपत नाहीत व जीवघेणा प्रवास चाकरीमुळे सुटत नाही. त्यामुळेच की काय, अशा नमुनेदार सूचना लोकलने प्रवास न करणारे लोक करत असतात.
काही वर्षांपूर्वी लोकलमध्ये बॅगा किंवा पिशव्यात बॉम्ब ठेवून स्फोट घडवून आणले होते.  त्यावेळी एका नेत्याने  गमतीदार सूचना केली होती की लोकलमधील बॅगा ठेवण्याचे रॅक काढून टाकावे. चाकरमान्यांच्या जेवण्याचा डबा, पाण्याची बाटली व इतर कागदपत्रे यांनी भरलेल्या बॅगा व  नेहमीची प्रचंड गर्दी हे त्या नेत्याने पाहिले नसेल असे नाही. पण आता कारने प्रवास करावा लागत असल्याने ही गोष्ट विसरली असावी.
लोकलमधील चौथ्या सीटबद्दल मलासुद्धा एक सूचना करावीशी वाटते. पाच दहा वर्षांपूर्वी चौथ्या सीटवर बसणारा हा बाकीच्या तिघांच्या उपकाराची जाणीव ठेवून अगदी दीनवाणा होऊन बसायचा. आता चौथी सीट ही हक्काची झाली आहे. तेथे बसणारा आधी बसलेल्या तिघांना ‘थोडे सरका’ व मनातून काय घरात बसले आहे का असे म्हणत हुकूम देतो. नंतर तिसऱ्या सीटवाल्याला पाठ टेकून काटकोनात बसून उभ्या राहणाऱ्या प्रवाशांना अडचण करत असतो. यावर माझी अशी सूचना आहे की बसण्याचे बेंच हे पाच इंचाने कमी करावे. त्यामुळे बेंचवर फक्त तीनच प्रवासी बसतील.
पी. बी. बळवंत, ठाणे</strong>

बँकांनी कार्यप्रणाली बदलावी ..
‘बँकबुडीचा बागुलबुवा’ हा अग्रलेख (७ मार्च) देशाचा आर्थिक डोलारा सांभाळणाऱ्या बँकिंग व्यवसायाचा सर्व अंगांनी परामर्श घेणारा वाटला. बँकिंग हा इतर व्यवसायांप्रमाणे एक व्यवसाय आहे, त्यामुळे ‘कधी नफा तर कधी तोटा’ होणारच. सरकारी बँकांवरील ताण अधिकच असतो. त्यात भारतीय स्टेट बँकेच्या आज १६ हजारांच्या वर शाखा आहेत. त्यामुळे या बँकेची बुडीत कर्जाची रक्कम अर्थातच इतर बँकांच्या तुलनेत अधिक असणार. ग्रामीण भागात शेतीसाठी आवश्यक कर्जाचे वितरण हे बंधनकारक असल्यामुळे कागदपत्रांची तितकीशी शहानिशा केली जात नाही. परिणामी यातील बहुतेक कर्जे बुडीत खात्यात जमा होतात. आपण अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे जनतेच्या घामाचा पैसा  बँका वाचविण्यासाठी खर्च होणे म्हणजे देशाच्या प्रगतीला मारक आहे हे लक्षात ठेवूनच बँकांनी आपली कार्यप्रणाली बदलणे हिताचे होईल.  स्टेट बँकेत अनेक शाखांच्या प्रमुखपदी काम केल्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळेच हा पत्रप्रपंच.
सूर्यकांत भोसले, मुलुंड (पूर्व)

Story img Loader