मेनका गांधी यांनी सोमवारी सायंकाळी संपूर्ण देशासमोर मंत्री म्हणून शपथ घेताना स्वतचे नाव ‘मेनका’ असे स्पष्टपणे उच्चारले. आता तरी मराठी पत्रकारांनी त्यांचे नाव ‘मनेका’ असे अशुद्ध स्वरूपात न लिहिता ‘मेनका’ असे लिहावे. इंग्रजी आणि हिन्दी पत्रकार त्यांचा उल्लेख मेनका असाच करतात. दिवंगत ज्येष्ठ पत्रकार अशोक जैन यांनी मनेका असे सुमारे २५ वर्षांपूर्वी लिहिले आणि त्यांचे अंधानुकरण करण्यात आले. माझे सहकारी अजय वैद्य आणि मी अशा दोघांनी मेनका गांधी त्यानंतर मुंबईत आल्या असताना याबाबत खुलासा करून घेऊन छापला होता. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही.
अशुद्ध लिहिणे आता सर्वमान्य होत आहे, ही चिंतेची बाब आहे. उदा. आयोग हा शब्द पुिल्लगी असूनही ‘ते’ आयोग असे मराठी दैनिके लिहितात. अशा हजारो चुका दाखविता येतील. मात्र मराठी भाषेच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करतानाच ती अशुद्ध स्वरूपात लिहिणे चालूच आहे. म्हणून हा पत्रप्रपंच.
दिलीप चावरे, अंधेरी (मुंबई)

‘दबंग’ हवे.. ‘सत्यमेव जयते’ नको?  
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला विविध क्षेत्रातील मान्यवरांप्रमाणेच िहदी चित्रपटसृष्टीतील नामवंत आमंत्रित होते. त्यांच्या ‘प्रेक्षणीय’ उपस्थितीच्या बातमीत (लोकसत्ता, २७ मे ) अनेकांची नावे आहेत. पण या तारकादलात तेवढय़ाच तोलामोलाच्या आमिर खान या कलाकाराचे नाव का नसावे असा प्रश्न पडला.
 या कलाकाराने इतरांप्रमाणे लोकांचे मनोरंजन तर केले आहेच, पण ‘सत्यमेव जयते’ या मालिकेच्या निर्मितीत रस घेऊन देशाच्या अनेक भागांत चाललेल्या विधायक कामाचा परिचय कोटय़वधी लोकांना करून दिला आहे. त्या मालिकेतून सामाजिक दृष्टय़ा महत्त्वाच्या अनेक विषयांवर प्रबोधन केले गेले आहे. तेव्हा विकासाच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवणाऱ्यांना या कलाकाराचा विसर पडावा हे पटत नाही. विशेष म्हणजे ‘दबंग’फेम सलमान खान, ज्याच्यावर मद्यपान करून बेदरकारपणे गाडी चालवून मनुष्यवधास कारणीभूत झाल्याचा खटला वर्षांनुवष्रे चालू आहे त्याचे नाव असावे आणि आमिर खानचे नसावे हे तर आणखीच खटकते.
मुकुंद नवरे, गोरेगाव पूर्व (मुंबई)

अपेक्षांचा लंबक कर्तव्यांपर्यंत लांबावा   
‘लंबक लांबला..’ या अग्रलेखात (२७ मे), स्वतच्या खांद्यावर प्रचाराची धुरा वाहून नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीची लढाई जिंकली आणि आता नव्या मंत्रिमंडळाची रचना करतानाही आपल्याच ताब्यात राज्यकारभाराची सारी सूत्रं ठेवण्याची टोकाची शिकस्तही ते करू पाहत आहेत हा सूर दिसला. मंत्रिमंडळ निवडताना समतोल सांभाळण्याचा मुत्सद्दीपणा दाखवावा लागला आहे, हेही लक्षात घ्यायला हवे.
तसेच, या सगळ्यांनी एकोप्यानं सरकारची ध्येय-धोरणं ठरवताना पूर्वीच्या सरकारनं राबवलेली धोरणं मोडीत काढून नवी धोरणं तयार केली आणि ती राबवण्यासाठी अनुशासित अधिकारी वेठीला धरले की जनतेचं आयुष्य समृद्ध होणार आणि देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेत अनुकूल बदल घडून येणार हा सोयीस्कर समज लोकांनी करून घेऊ नये. यादृष्टीनं अग्रलेखातला ‘लांबलेला लंबक’ सरकारकडून असणाऱ्या अपेक्षांचाही असावा असं म्हटलं तर वावगं होणार नाही. सरकारी ध्येय-धोरणांची अंमलबजावणी करताना पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी नियोजानापासूनच नागरिकांना विश्वासात घेणं आवश्यक आहे. उपलब्ध साधन संपती, मनुष्यबळ यांचं व्यवस्थापन करताना कुठलीही तडजोड उपयोगाची नाही. केवळ लोकांच्या सुख-समृद्धीच्या स्वप्नाळू भावनांना नाही, तर राष्ट्रीय अस्मितेला, नागरिक म्हणून असलेल्या कर्तव्य-भावनेला हाक घालणं महत्त्वाचं आहे.
– श्रीपाद पु. कुलकर्णी, बिबवेवाडी (पुणे)

आजच्या पिढीचे ‘आभासी जग’ जीवघेणेच..
‘फेसबुकमुळे दोघांचे बळी’ ही बातमी (लोकसत्ता, २३ मे) वाचून दुख अवश्य झाले, परंतु आश्चर्य वाटले नाही. आजच्या पिढीला इंटरनेट, फेसबुक, ट्विटर या सगळ्या अत्याधुनिक संपर्क साधनांनी एवढे पछाडलेले आहे की त्यांच्या धोकादायक परिणामांची त्यांना मुळीच पर्वा नाही, असे दिसते.
सध्या आपण सगळेच आभासी जगात वावरत आहोत.  इंटरनेट, मोबाइल या साधनांमुळे जग इतके जवळ आले आहे की प्रत्यक्ष जगातील वास्तविक अंतरांचा या युवा पिढीला अजिबात विसर पडला आहे व त्यामुळेच असे प्रसंग घडतात व पुढेही घडतील. मोबाइल कानाला लावून रेल्वे मार्गातून चालणाऱ्यांना गाडीने उडवल्याच्या बातम्या अधूनमधून वाचनात येतात. दिवसेंदिवस हे प्रकार वाढतात असे दिसते आहे व हा सगळा आभासी जगात वावरण्याचाच परिणाम आहे.
एरवीही मनुष्याला आभासी जगाचे आकर्षण असतेच. सामान्य माणसाच्या कार्यक्षमतेला नसíगक मर्यादा असतात. त्यामुळे त्यांना सतत अशा एका आदर्श नायकाची आवश्यकता असते जो त्यांच्या सर्व इच्छाआकांक्षा पूर्ण करू शकेल. त्यामुळेच त्याने असे नायक पूर्वी  चित्रपटात शोधले. दुर्जनांचा कर्दनकाळ, सज्जनांचा तारणहार अशा नायकांना त्यांनी डोक्यावर घेतले. त्यामुळेच अगदी नादिया जॉन कावस ते अमिताभ बच्चन, सलमान खान, आणि अजय देवगण इत्यादी नायकांना एवढी अमाप लोकप्रियता लाभली. या नायक- नायिकांमध्ये त्याने स्वतला शोधण्याचा प्रयत्न केला. टीव्हीच्या आक्रमणानंतर या नायकांची जागा बऱ्याच प्रमाणात इतर पात्रांनी घेतली. आता तर अधिक एककल्लीपणे आभासांकडे नेणारी साधने हातोहाती आहेत. इंटरनेट, यूटय़ूब, फेसबुक इ.मुळे घरबसल्या लोकांना, विशेषत मुलांना नवनवीन प्रयोग करण्याची मोकळीक मिळाली आहे.
शरद फडणवीस, कोथरूड (पुणे)

जॉर्ज ऑर्वेलसाहेब ! तुमच्या आठवणीने आज गहिवरून येतंय..
राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात  २६ मे रोजी संध्याकाळी नव्या सरकारचा शपथविधी समारंभ पार पडला. उपस्थितांमध्ये िहदी सिनेमातला नट सलमान खान दुसऱ्या रांगेत बसला होता.  मला त्याचा जबरदस्त हेवा वाटला. बारा वर्षांपूर्वी, फूटपाथवर झोपलेल्या पाच गरीब माणसांना मद्यधुंद अवस्थेत स्वतच्या गाडीखाली चिरडून यापैकी चौघांना जखमी , एकाला जागीच गतप्राण केल्यामुळे, त्याच्यावर खटला सुरू आहे. काळविटांची शिकार केल्याबद्दल आणखी एक खटला बरीच वष्रे चालू आहे.  असा हा नरश्रेष्ठ, शपथविधीसाठी आलेल्या देश-विदेशातल्या नामांकितांच्या सहवासात होता, ही खरंच एक अविश्वसनीय घटना होती. आमच्यासारख्या सामान्य लोकांना रेल्वेचे रूळ ओलांडताना पकडल्यावर दंड भरायला पसे नसले, तरी तुरुंगवास होण्याची शक्यता असते. इथे सदोष मनुष्यवधाबद्दल खटला ज्याच्यावर सुरू आहे, ती व्यक्ती जगातील मान्यवरांच्या मांडीला मांडी लावून मानकरी म्हणून या समारंभात मिरवते आहे.
जॉर्ज ऑर्वेलसाहेब ! तुमच्या आठवणीने आज गहिवरून येतंय. लोकशाहीबद्दल आपण  म्हणाला होतात ‘लोकशाहीत सर्व समान असतात. पण कांही विशिष्ट व्यक्ती इतरांपेक्षा जास्त समान असतात.’ त्यावेळी तुमच्या डोळ्यासमोर सलमान खान होता का हो?                       
अनिल रेगे, अंधेरी पूर्व (मुंबई)

अच्छे दिन..
‘मं संघके मंत्री के बतौर अपने कर्तव्यों का निर्वहन करूँगा’..
.. अशी शपथ मोदीनी सोमवारी घेतली आणि रा. स्व. संघाच्या पदाधिकाऱ्यांवरचे यूपीएच्या काळातले सर्व खटले निकाली निघणार; त्यासाठी राजनाथ सिंग यांची नियुक्ती केली गेली असल्याची बातमी मंगळवारी वाचली.
‘संघ’ या शब्दाचा मोदीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोणता अर्थ अभिप्रेत आहे हे त्यातून लगेचच कळलं. आणि ‘स्वतंत्र’  न्यायपालिकेची काय अवस्था होईल याचा अंदाज आला. बाबरी मशीद, गुजरात दंगल यातले आरोपी धर्मवीर म्हणून वावरण्याचे अच्छे दिन लवकरच येणार  याची खात्री पटली.
-अशोक राजवाडे, मुंबई

Story img Loader