जागतिक राजकारणाचे भान हे राजे अब्दुल्ला यांचे वैशिष्टय़ होते. त्यांच्या निधनानंतर राजे सलमान यांच्याकडे जगातील सर्वात समृद्ध तेलसाठय़ाची मालकी येत आहे. मात्र अमेरिका तेलाच्या बाबत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याने सौदीला आता राजकारणाची आखणी नव्याने करावी लागणार आहे.
सौदी राजघराण्यातल्या राजपुत्रांची संख्या आजमितीला सात हजार इतकी आहे. या हजारो पुत्रांमधून राजप्रमुख म्हणून निवडले गेलेले अब्दुल्ला बिन अब्दुल अझीझ यांचे काल वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. मुळात जेव्हा सत्ता मिळाली तेव्हाच ते थकले भागलेले होते. २००५ साली ते राज्यावर आले त्या वेळी त्यांच्या सहस्रचंद्रदर्शनाची वेळ आली होती. त्यांच्या आधीचे राजे फाहद हे अब्दुल्ला यांच्या तुलनेत डोक्याने बेतास बात. शेवटची काही वष्रे त्यांना अर्धागवायूने ग्रासलेले होते. सौदीचे कडवे इस्लामीकरण झाले ते फाहद यांच्या काळात. त्याचप्रमाणे आणखी एका घटनेसाठी जग फाहद यांना विसरणार नाही. ते म्हणजे अल कायदा. १९९० सालच्या ऑगस्ट महिन्यात इराकच्या सद्दाम हुसेन याने ज्या वेळी कुवेतचा घास घेतला, त्या वेळी सौदी अरेबियासही धोका निर्माण झाला. कारण कुवेतनंतर सद्दाम हा सौदीत घुसणार आणि हे सुन्नी राज्य ताब्यात घेणार ही शक्यता उघड दिसत होती. हे अमेरिकेस परवडणारे नव्हते. कारण त्या वेळी सौदी तेलावर अमेरिकेचा संसार अवलंबून होता. तेव्हा सौदीला वाचवण्यासाठी अमेरिकेने सद्दामविरोधात युद्ध पुकारले आणि त्यासाठी सौदी भूमीचा युद्धतळ म्हणून वापर करण्यास सुरुवात केली. सौदी अरेबियाचा राजा हा मुसलमानांसाठी पवित्र असलेल्या मक्का आणि मदिना या धर्मस्थळांचा रक्षक असतो. या दोन्ही ठिकाणी अन्य धर्मीयांनी जाणे हे कर्मल्लांना मंजूर नसते. परंतु कुवेतला आणि पर्यायाने सौदीला वाचवण्याच्या हेतूने अमेरिकी फौजा सौदी भूमीवर उतरल्या आणि इस्लामी धर्ममरतडांनी तोबा तोबा म्हणत त्या विरोधात काहूर उठवले. अमेरिकी फौजांत यहुद्यांचा समावेश होता. यहुद्यांनी पवित्र मक्का मदिनेच्या भूमीत पाऊल टाकावे यासारखे पाप नाही. त्यामुळे साहजिकच इस्लामी कर्मल्लांनी आकांत केला. त्याचे नेतृत्व केले ओसामा बिन लादेन या तरुणाने. अफगाणिस्तानात सोविएत फौजांविरोधात लढण्याचा यशस्वी अनुभव असलेल्या ओसामाने चक्क राजे फाहद यांच्या विरोधातच जंग पुकारले. परिस्थिती इतकी बिकट झाली की अखेर राजे फाहद यांना ओसामाची गठडी वळून सौदीबाहेर पाठवावे लागले. ओसामा सोमालिया आदी देशांत गेला तो त्यामुळे. परंतु त्यामुळे सौदी राजघराणे आणि हे अतिरेकी इस्लामी यांच्यात कायमच संघर्ष होत राहिला.
राजे अब्दुल्ला यांच्याकडे सत्ता आली ती या पाश्र्वभूमीवर. ९/११ घडून गेलेले, अल कायदा प्रबळ झालेली, तेलाचे भाव कोसळल्यामुळे सौदी खजिना रिता झालेला आणि धर्माच्या मुद्दय़ावर इस्लामी जगताविषयी सर्वत्र एक प्रकारची नाराजी दाटलेली. अशा वेळी वयाच्या ऐंशीत असलेले राजे अब्दुल्ला यांच्याकडे सौदीची सूत्रे आली असता त्यांच्या सुधारणावादी सुराने वातावरणात एक प्रकारचा आशावाद निर्माण झाला. कारण वयोवृद्ध होते तरी राजे अब्दुल्ला विचाराने आधुनिक होते. अर्थात त्यांचे आधुनिकत्व हे मर्यादित अर्थानेच घ्यावयास हवे. सौदी शहरांतील निवडणुकांत महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचे धाडसी पाऊल या अब्दुल्ला यांनीच टाकले. संतुलन हे त्यांच्या राजकारणाचे वैशिष्टय़. राजे फाहद यांच्या काळात तेलाचे भाव वाटेल तसे वरखाली होत. ते संतुलन राजे अब्दुल्ला यांनी आणले. त्या आधी तेल हे सौदीने एखाद्या अस्त्रासारखे वापरले. असे करण्यास राजे अब्दुल्ला यांचा विरोध होता. २००८ सालातील अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकांच्या आधी तेलाचे भाव मोठय़ा प्रमाणावर वाढले होते. ते कमी करण्यासाठी अमेरिकेचा दबाव येत होता आणि सौदीने अधिकाधिक तेल उपसावे यासाठी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश हे आग्रही होते. त्या वेळी राजे अब्दुल्ला यांनी अध्यक्ष बुश यांना जाहीरपणे चार बोल सुनावले. अमेरिकेच्या तेलपिपासू वृत्तीवर टीका करताना अब्दुल्ला म्हणाले, बुशसाहेब थोडेसे तेल आमच्या नातवंडांसाठी राहू द्या. जागतिक राजकारणाचे भान हे राजे अब्दुल्ला यांचे वैशिष्टय़ होते. त्या बाबत ते त्यांचे पूर्वसुरी राजे फैजल यांच्याइतकेच तल्लख होते. राजे फैजल यांनी संपूर्ण जग आपल्या तालावर नाचवले. पुढे याच राजकारणातून त्यांची हत्या झाली. राजे अब्दुल्ला त्या टोकाला गेले नाहीत. राजे फैजल यांच्याप्रमाणेच अब्दुल्ला हेदेखील काटकसरी होते. गेली काही वष्रे विविध उपचारांसाठी अमेरिकावारी करणाऱ्या अब्दुल्ला यांचा सारा लवाजमा स्वतंत्र खासगी शाही विमानांनी यायचा. पण त्या तुलनेत अब्दुल्ला यांना संपत्ती मिरवणे आवडायचे नाही. अमेरिकेशी त्यांचे उत्तम संबंध होते. हेन्री फोर्ड यांच्यापासून अनेक अमेरिकी अध्यक्षांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध होते. महाविद्यालयीन काळात अमेरिकेस राहावयाची संधी मिळालेली असल्याने त्यांचा दृष्टिकोन तुलनेने आधुनिक होता. त्याचमुळे सौदी अरेबियाची सूत्रे घेतल्यावर एबीसी या वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सौदी अरेबियात लवकरच महिला मोटारी चालवू शकतील, अशी घोषणा केली होती. दुर्दैवाने ती काही त्यांच्या हयातीत अमलात येऊ शकली नाही. महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला, पण त्यात पुढे काही फारशी प्रगती होऊ शकली नाही. आता तर ते गेलेच. त्यांची जागा राजे सलमान हे घेतील. राजे सलमान यांच्या निमित्ताने सुदईरी सातांचे पुन्हा आगमन होत आहे, ही बाब लक्षणीय.
अशासाठी की हे सुदईरी सात धर्माच्या बाबत अत्यंत कर्मठ मानले जातात. सुदईरी हे सौदीचे संस्थापक महंमद बिन इब्न सौद यांची अत्यंत आवडती राणी. राज्य स्थापन होत असताना सौद यांनी पहिल्याच वर्षांत जवळपास २२ विवाह केले. यातीलच एक होती हस्सा िबत अहमद अल सुदईरी. नज्द प्रांतातील सत्ताधीशांची ती कन्या. इब्न सौद यांच्याप्रमाणेच नज्द प्रांतीयदेखील इस्लामातील कडव्या अशा वहाबी संप्रदायाचे पाईक. त्याहीमुळे असेल आणि राणी सुदईरी रूपवती म्हणूनही असेल इब्न सौद यांचा तिच्यावर भलताच जीव होता. याची जाणीव सुदईरी यांनाही होती. त्यामुळे त्यांच्या शब्दालाही राजकारणात मान होता. त्यातूनच या सुंदरी सुदईरी हिने इब्न सौद यांच्याकडून वचन घेतले की तिच्या संतानाकडेच सौदी गादी जाईल. तिला सात मुलगे झाले. राजे फाहद हे तिचेच चिरंजीव. त्यांच्या निधनानंतर सत्ता खरे तर तिच्या अन्य मुलांकडेच जायची. पण ती राजे अब्दुल्ला यांच्याकडे गेली. ते राजे फाहद यांचे सावत्र बंधू. आता राजे अब्दुल्ला पगंबरवासी झाल्यानंतर पुन्हा सुदईरीपुत्र सलमान याच्याकडे सौदी राजघराण्याची सूत्रे आली आहेत.
तेल भावाची घसरगुंडी थांबायला तयार नाही आणि इस्लामी जगात शांतता नांदण्याची शक्यता नाही अशा वेळी राजे सलमान यांच्याकडे जगातील सर्वात समृद्ध तेलसाठय़ाची मालकी येत आहे. इतके दिवस अमेरिका तेलासाठी सौदीवर अवलंबून होती. २०१८ नंतर तशी परिस्थिती राहणार नाही. अमेरिका तेलाच्या बाबत स्वयंपूर्ण होईल. अशा वेळी सौदीला राजकारणाची आखणी नव्याने करावी लागणार आहे. जवळपास २० हजार जणांचे हे सौदी राजघराण्याचे लचांड एकत्र बांधून ठेवणे हेही आव्हान आहे. हा सातवा सुदईरी हे आव्हान कसे पेलतो यावर पश्चिम आशियातील आणि अर्थातच जागतिकही, स्थर्य अवलंबून राहील.
सातवा सुदईरी
जागतिक राजकारणाचे भान हे राजे अब्दुल्ला यांचे वैशिष्टय़ होते. त्यांच्या निधनानंतर राजे सलमान यांच्याकडे जगातील सर्वात समृद्ध तेलसाठय़ाची मालकी येत आहे.
First published on: 24-01-2015 at 01:12 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oil giant saudi to look for new politics as us becoming self sufficient in energy and oil