ॐ नमोजी आद्या, या श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीतील पहिल्या चरणाच्या अनुषंगानं आपण ॐ चा विचार करीत आहोत. गेल्या वेळी स्वामी रामतीर्थ यांनी, ‘ॐ हा ध्वनीचे सर्व क्षेत्र व्यापतो म्हणून तो वाणीचा व पर्यायाने विश्वाचा निदर्शक आहे,’ हे जे विधान केलं त्यातील ‘विश्वाचा निदर्शक’ हा शब्द अत्यंत रहस्यमय आहे, आणि त्याचा आपण कालौघात विचार करणार आहोतच. तर अशा प्रकारे ॐचं माहात्म्य सांगून स्वामी रामतीर्थ म्हणतात की कुणाला वाटेल अ, उ आणि म या तिन्हींचेच स्तोम कशाला? त्याचंही उत्तर देताना रामतीर्थ सांगतात, ‘‘कण्ठय़ वर्ण अनेक आहेत पण त्यात ‘अ’ प्रधान आहे. तसेच तालव्य ध्वनीमध्ये ‘उ’ हा श्रेष्ठ आहे. ‘उ’ स्वर लहान मुलेही उच्चारू शकतात आणि मूकबधिरही उच्चारू शकतात. ‘उ’चा उच्चार प्रत्येकालाच जन्मापासून स्वाभाविकपणे येतो. म्हणून तालव्य वर्णाचा तोच योग्य प्रतिनिधी आहे. ‘म्’ हा अनुनासिक असल्याने श्वासोच्छ्वासाचा सर्व मार्ग तो व्यापून टाकतो. म्हणून सर्व वाणीचा, सर्व भाषांचा प्रतिनिधीरूप असा कोणता एक शब्द असेल तर तो ॐ हाच आहे.’’ रोजच्या जगण्यातला ॐचा वावर उलगडून दाखविताना स्वामी रामतीर्थ सांगतात की, रोगानं, तापानं विव्हळणारी माणसं ओ, ऊं-ह्, आं-ह् म्हणतात, आनंदातिरेकानं माणूस ओ-हो, ओ-ह् म्हणतो, हे सारं ॐचंच अपभ्रंशित उच्चारण आहे. इतकंच काय, श्वासोच्छ्वासाबरोबर ॐचाच ध्वनी बाहेर पडत असतो. (श्वासोच्छ्वास ही प्राणाची मुख्य क्रिया असल्यानं प्राणाला व्यापून असलेल्या या ॐला प्रणव असंही म्हणतात.) ॐने देश, भाषा आणि संस्कृतीच्या भिंती कशा पूर्वापार ओलांडल्या आहेत, हे नमूद करताना स्वामी रामतीर्थ सांगतात की, ‘‘ग्रीक वर्णमालेतील शेवटचं अक्षर ‘ओमेगा’ याचं ॐशीच ध्वनीसाम्य आहे. हिंदूंच्या मंत्राची सुरुवात तसेच अनेक उपासनांचा विराम ॐनेच होतो. त्याचप्रमाणे ख्रिस्ती प्रार्थनेचा समारोप ‘आमेन्’ने होतो. इस्लामी प्रार्थनेच्या अखेरीसही ‘आमिन्’ म्हटले जाते. ‘आमिन्’ हा अरबी शब्द हिब्रू भाषेतील ‘एमन्’पासून झाला असून ‘एमन्’चा अर्थ सत्य, शाश्वत, स्थिर असा आहे!’’ थोडक्यात आमेन्, आमिन् म्हणण्यामागचा भाव, त्या प्रभूचं, अल्लाचंच स्मरण असतो. त्यामुळेच ॐ हा मूळचा आहे, मूळ सार्वत्रिक शब्द आहे. तो कोणत्या एका भाषेचा नाही! ॐच्या अ, उ आणि म या तीन मात्रा आणि त्याच्या डोक्यावरील चंद्र ही अर्धमात्रा यांचं विवेचनही अनेकांनी केलं आहे. ॐ हा मंत्ररूपही आहेच. हा एकाक्षरी मंत्र आहे. मंत्रशास्त्रानुसार भगवंताचं नुसतं नाम घेणं हा मंत्र होत नाही. त्या नामाच्या आधी ॐ लावल्यावरच त्याला मंत्ररूप येतं. जणू ॐकाराच्या नादाद्वारे हा मंत्र त्या देवतेपर्यंत पोहोचतो. ॐ हा विश्वाचा निदर्शक आहे, विश्वव्यापी आहे (तो का, हे आपण नंतर पाहूच) अगदी त्याचप्रमाणे ‘राम्’ हा शब्दही विश्वव्यापी आहे. विश्वाच्या कणाकणांत रम्यमाण असलेल्या तत्त्वाला ‘राम’ म्हणतात. त्यामुळे भारतातील सनातन धर्मातील सर्वच मंत्रांमध्ये एक तर ‘ॐ’ आहे किंवा ‘राम’ आहे, तर ॐकाराचं हे मंत्ररूपही आहे. ‘ज्ञानेश्वरी’ची सुरुवातही या ॐनेच झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा