प्रशांत केणी  prashant.keni@expressindia.Com

बीसीसीआय, एमसीए यासारख्या क्रिकेटविषयक आस्थापानांमध्ये महत्त्वाच्या पदांवर वावरलेल्या व्यवस्थापकाच्या नजरेतून दिसणारे क्रिकेट कसे असू शकते, याची चुणूक रत्नाकर शेट्टी यांच्या पुस्तकातून अनुभवता येते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

प्रा. रत्नाकर शेट्टी हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि मुंबई क्रिकेट संघटना (एमसीए) या अनुक्रमे आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसेच देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या संघटनांमधील कार्यकारिणी समिती आणि प्रशासकीय पदे भूषवलेले एक मुरब्बी व्यक्तिमत्त्व. विल्सन महाविद्यालयात रसायनशास्त्र हा जटिल विषय शिकवणाऱ्या या प्राध्यापकाने क्रिकेटच्या आवडीपोटी क्रिकेट प्रशासनात घेतलेला रस आणि त्यानंतरचा गेल्या तीन दशकांचा प्रवास ‘माय इयर्स इन ‘बीसीसीआय’ : ऑन बोर्ड टेस्ट, ट्रायल अ‍ॅण्ड ट्रम्प’ या पुस्तकात रेखाटला आहे.  वरकरणी हे शेट्टी यांचे आत्मचरित्र वाटत असले तरी त्यात मुंबई आणि भारतीय क्रिकेटच्या जन्मापासून आजमितीपर्यंतच्या स्थित्यंतरांचा धांडोळा वाचायला मिळतो. पुस्तक लोकप्रिय करण्यासाठी वादग्रस्त लेखन करण्याची क्लृप्ती इतरांबरोबरच क्रीडाक्षेत्रातही अनेक पुस्तकांच्या माध्यमातून वापरली गेली आहे. पण तो मार्ग टाळून शेट्टी यांनी भारतीय तसेच मुंबई क्रिकेटच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांचे संदर्भासहित स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे हे पुस्तक फक्त शेट्टी यांच्या क्रिकेटमधील यशस्वी योगदानापुरते मर्यादित न राहता त्यापलीकडे जाते.

शेट्टी यांचे वडील कर्नाटकच्या उडिपी जिल्ह्यातून मुंबईत नशीब अजमावण्यासाठी आले. नावाला जागत हॉटेल व्यवसायात शिरले. शेट्टी यांचा जन्म माझगावच्या चाळीतला. सात भावंडांपैकी ते दुसरे. चाळ संस्कृतीमधील त्यांचे शालेय, महाविद्यालयीन जीवन, त्यांनी अनुभवलेले मुंबईतील गणेशोत्सवाचे सांस्कृतिक वातावरण, चाळीमधून फ्लॅटमध्ये झालेले स्थित्यंतर, नोकरीचे दिवस या सगळय़ाबद्दल शेट्टी यांनी ‘फॉर्मेटिव्ह इयर्स’ म्हणजेच ‘जडणघडणीची वर्षे’ या दुसऱ्या प्रकरणात लिहिले आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाची ही सगळी वाटचाल स्तीमित करणारी आहे. त्यांची सगळी जडणघडण मुंबईतच झालेली असल्यामुळे मुंबईविषयी त्यांना असलेला ओलावाही या प्रकरणात व्यक्त झाला आहे.

 ‘द पिनॅकल’ (कळसाध्याय) हे या पुस्तकातील पहिले प्रकरण २ एप्रिल, २०११ रोजी भारतीय क्रिकेटमध्ये घडलेल्या एका ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे. महेंद्रसिंह धोनीने न्यूवान कुलसेकराच्या गोलंदाजीवर षटकार खेचून भारताच्या एकदिवसीय प्रकारातील दुसऱ्या विश्वविजेतेपदावर केलेले शिक्कामोर्तब ही ती घटना. हा इतिहास खरे तर सर्वश्रुत आहे. पण २००६ पासून केलेले या स्पर्धेचे नियोजन, यजमानपद मिळवण्यासाठीचे प्रयत्न ते स्पर्धेचे यशस्वी आयोजन या वाटचालीत ‘यजमानांचा स्पर्धा संचालक’ हे पद भूषवतानाचे रत्नाकर शेट्टी यांचे पडद्यामागील अनुभव रंगतदार आहेत.

‘बीसीसीआय’ आणि ‘एमसीए’ या संघटनांच्या स्थापनेचा इतिहास वाचताना इथे रुजलेल्या क्रिकेट संस्कृतीचा लेखकाने घेतलेला आढावाही नजरेखालून जातो. कोणत्याही संस्थात्मक जीवनात असते तसे संघटक, त्यांचे राजकारण यांचेही दर्शन होते. आर्थिक संघर्षांचा काळ संपल्यानंतर १९७१ मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्या भूमीवर मिळवलेले ऐतिहासिक मालिकाविजय, त्यानंतर १९८३ मध्ये मिळालेले पहिलेवहिले विश्वविजेतेपद या यशामुळे सुखाचे दिवस कसे येत गेले, १९८७, १९९६ आणि २०११ या एकदिवसीय तसेच २०१६ च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारताने कशा रीतीने भूषवले, जगमोहन दालमिया यांनी क्रिकेटच्या जागतिक नकाशावर भारताला महासत्ता म्हणून कसे उभे केले इथपासून ते ‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभा, सामना निश्चिती अशा जवळपास सर्व घटना शेट्टी यांनी तपशीलवार मांडल्या आहेत. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, प्रशिक्षक ग्रेग चॅपेल अशा अनेक प्रशिक्षक-खेळाडू यांच्या क्रिकेट कारकीर्दीतील महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार म्हणून शेट्टी यांचे अनुभवकथन ही या पुस्तकाची अत्यंत महत्त्वाची अशी जमेची बाजू आहे.  प्रशासक आणि क्रिकेटपटू हे भारतीय-मुंबईच्या क्रिकेटला समृद्ध करणारे दोन घटक. यापैकी प्रशासकांची भूमिका, त्याची मानसिकता या पुस्तकात तपशीलवार येते, तर क्रिकेटपटूंचे उल्लेख, त्यांच्याशी संबंधित घटना संदर्भानुसार येतात. सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर आणि सचिन तेंडुलकर या मुंबई क्रिकेटला समृद्ध करणाऱ्या दिग्गजांचा काळ त्यांच्या योगदानासह शेट्टी यांनी मांडला आहे. याचप्रमाणे वानखेडे स्टेडियमची निर्मिती, गरवारे क्लबचा वाद, ‘एमसीए’च्या कार्यकारिणीतील गट-तट आणि त्यांचे राजकारण यांचा वेध घेतला आहे.

‘अक्रॉस दी बॉर्डर, २००४’ या प्रकरणात परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दौरा कसा रंजक ठरला, यांचेही तपशीलवार वर्णन पुस्तकात वाचायला मिळते. सचिन १९४ धावांवर असताना कर्णधार राहुल द्रविडने डाव घोषित केल्यामुळे या दोन खेळाडूंमध्ये मतभेद निर्माण झाले होते. परंतु त्यामागचे नेमके वास्तव शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. या मालिकेसाठी व्यवस्थापक म्हणून शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली होती. या एकदिवसीय मालिकेत विजय मिळवल्यानंतरचे छायाचित्रच पुस्तकाचे मुखपृष्ठ म्हणून वापरले आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अध्यायाला २००८ मध्ये कसा प्रारंभ झाला, ललित मोदीने सादर केलेल्या कॉर्पोरेट स्पर्धेच्या पहिल्या योजनेपासून आतापर्यंतची विविध ‘आयपीएल’ पर्व, या स्पर्धा आणि त्यांचे अर्थकारण कसे विकसित झाले, सर्वात यशस्वी ठरलेली ही लीग असंख्य वादग्रस्त घटनांमुळे कशी डागाळली, हे या सगळय़ाचा ऊहापोह लेखकाने केला आहे. या स्पर्धेचा प्रणेता ललित मोदीचा भारतीय क्रिकेट प्रशासनातील उदय, सत्ताधीश म्हणून त्याने पाय रोवलेले पाय, अहंकारी वृत्ती आणि आर्थिक चुकांमुळे झालेला त्याचा अस्त या घटनाक्रमाचा साद्यंत आढावा हे पुस्तक घेते. १९९९ पासून सामना/निकाल निश्चिती प्रकरणे विविध चौकशी समित्या आणि कपिल देवचे प्रसारमाध्यमांसमोर रडणे आदी सर्व घटना त्यात ओघाने येतात.

दूरदर्शन वाहिनीवर सामने प्रक्षेपित करण्यासाठी एकेकाळी ‘बीसीसीआय’कडून पैसे आकारले जायचे. परंतु नंतर काळाच्या ओघात ते बदलत गेले. उलट सामन्यांच्या प्रक्षेपणातून मोठय़ा प्रमाणात पैसा उभा करता यायला लागला. देशांतर्गत सामने, ‘आयपीएल’ या सर्व सामन्यांद्वारे मोठमोठय़ा रकमांची उड्डाणे घेतली गेली. देशांतर्गत प्रक्षेपणातील दूरदर्शनची मक्तेदारी झुगारून देणारा ‘बीसीसीआय’चा न्यायालयीन लढा हे सगळे टप्पे शेट्टी यांनी व्यवस्थित मांडले आहेत. पूर्वी भारतीय क्रिकेट संघासमवेत व्यवस्थापक असायचे. पण काळानुसार साहाय्यक मार्गदर्शकांची म्हणजेच ‘सपोर्ट स्टाफ’ची फौज कार्यरत झाली. मुख्य प्रशिक्षकाच्या साथीला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक याचप्रमाणे फिजिओथेरपिस्ट, सराव मार्गदर्शक यांची गरज निर्माण झाली आणि तशी माणसेही नेमली जाऊ लागली. हे होत असतानाच खेळाडूंची श्रेणीनिहाय मानधन पद्धत अमलात आली. यात खेळाडूंचे कामगिरीनुरूप वर्गीकरण करण्यात आले. हे बदल, त्यांना वास्तविक रूप देणारे शिलेदार यांच्यासंबंधीची मांडणी लेखकाने केली आहे. 

जगमोहन दालमिया, राजसिंग डुंगरपूर, ए. सी. मुथय्या, इंद्रजित सिंह िबद्रा, जयवंत लेले, शरद पवार, शशांक मनोहर, एन. श्रीनिवासन, निरंजन शाह, अनुराग ठाकूर, संजय जगदाळे, रणबीर सिंग मिहद्रा, अरुण जेटली यांच्यासारख्या असंख्य व्यक्तींनी ‘बीसीसीआय’च्या यशोपर्वात महत्त्वाचे योगदान दिले. या सगळय़ांचे आपापल्या कारकीर्दीतील यशापयश, ‘बीसीसीआय’च्या निवडणुका, त्यातील राजकारण हा घटनाक्रम एकंदर क्रिकेटच्या इतिहासात रंजक आहे. शरद पवार यांच्या ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत महिला क्रिकेट संघटनेचे ‘बीसीसीआय’मध्ये विलीनीकरण, ‘आयपीएल’ आणि क्रिकेटपटूंना निवृत्तिवेतन हे तीन महत्त्वाचे निर्णय झाले. आर्थिक पातळीवर संघर्ष करणाऱ्या महिला क्रिकेट संघटनेच्या विलीनीकरणाचा निर्णय महिला क्रिकेट संजीवनी देणारा कसा ठरला, हे शेट्टी यांनी मांडले आहे. याशिवाय पॉली उम्रीगर, जगमोहन दालमिया यांच्याकडून त्यांना प्रशासकीय शिस्तीची शिकवण कशी मिळाली हेदेखील ते आवर्जून नमूद करतात.

क्रिकेट हा भारतीयांचा श्वास आहे, असे म्हटले जाते. अनेक अंगांनी, अनेक कंगोऱ्यांसहित क्रिकेट रसिकांना क्रिकेट माहीत असते. प्रशासकीय अंगाने ते समजून घेण्यासाठी आता रत्नाकर शेट्टी यांचे हे पुस्तक उपलब्ध झाले आहे.

माय इयर्स इन बीसीसीआय’ : ऑन बोर्ड टेस्ट, ट्रायल अ‍ॅण्ड ट्रम्प

लेखक :  रत्नाकर शेट्टी

प्रकाशक: रुपा पब्लिकेशन्स पृष्ठे : ३२८;  किंमत : ५९५ रुपये