डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विभूतिपूजेला विरोध असूनही त्याच प्रकारे त्यांची जयंती साजरी होते.. प्रबोधनाऐवजी मनोरंजनाला, संघटनाऐवजी शक्तीप्रदर्शनाला महत्त्व मिळते आणि तरुणांचा उत्साह उतू जातो! सुशिक्षित आंबेडकरवादी असा उत्साह दाखवत नसले, तरी जयंती उत्सवीकरणाच्या वळणावर का जाते आहे?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या रविवारी साजरी होईल. जन्मोत्सव अथवा जयंती तसेच स्मृतिदिन साजरे होणे भारताला नवीन नाही, परंतु कोणतीही सत्ता हाती नसताना लोकांकडून सुरू झालेली डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीची परंपरा ही आजही लोकसहभागामुळे वेगळी ठरते. स्वातंत्र्याच्या उदयकाळातील अन्य भारतीय नेत्यांच्या जयंत्या बहुश: शासकीय वा पक्षीय पातळ्यांवरच साजऱ्या होत असल्याचे चित्र दिसते, तर डॉ. आंबेडकर जयंतीचा उत्साह आंबेडकरी जनतेत दिसतो. बाबासाहेबांच्या जयंतीसंदर्भात एक बाब विशेष आहे ती ही की, बाबासाहेबांची जयंती साजरी होण्याचा प्रघात त्यांच्याच हयातीत सुरू झाला होता. ते वर्ष होतं १९२७. बाबासाहेबांनीच तशी कबुली दिलेली आढळते. १४ एप्रिल १९४२ रोजी वयाची ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुंबईत सुवर्ण जयंती महोत्सव समिती स्थापन होऊन एकंदर नऊ दिवस हा जयंती महोत्सव चालला होता. महोत्सवाच्या नवव्या दिवशी स्वत: बाबासाहेब सहभागी झाले. मुळात बाबासाहेबांना असले प्रकार, जे विभूतिपूजेला बळ देऊ शकतात, ते अमान्य होते; तरीही कार्यकर्त्यांच्या अजोड आग्रहाखातर ते आले. कार्यकर्त्यांना ते म्हणाले, ‘गेल्या १५ वर्षांपासून तुम्ही माझा जन्मदिवस साजरा करत आहात. मी कधी त्यात भाग घेतला नाही. मी नेहमी याचा विरोध केला. आता तर तुम्ही माझी सुवर्ण जयंती साजरी करीत आहात. हे खूप झालं. यानंतर अधिक समारोहाची गरज नाही.’
बाबासाहेबांचे हे वक्तव्य समाजपरिवर्तन चळवळीसाठी अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण आहे. अशा प्रकारच्या अंधभक्तीतून उद्भवलेल्या महोत्सवात त्यांना समाजपरिवर्तन चळवळीसारख्या जबाबदार व समाजाला आश्वस्त करणाऱ्या सम्यक कर्ममार्गाचा अध:पात होण्याची चिन्हे दिसत होती.
 नेत्यांविषयी आंधळी श्रद्धा डॉ. आंबेडकर यांना कधीही मान्य नव्हती. न्या. म. गो. रानडे यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त (१८ जाने. १९४३) रोजी केलेल्या भाषणात डॉ. आंबेडकर म्हणतात: महापुरुषांविषयी आपल्या मनातील कौतुकाची भावना व्यक्त करण्यासाठी जयंतीचे कार्यक्रम करणे वाईट नाही, परंतु जयंतीच्या निमित्ताने महापुरुषांच्या विचारातील जे-जे उदात्त आहे, त्याचा आदर अशा कार्यक्रमांतून झाला पाहिजे.
बाबासाहेबांचे नेत्यांच्या जयंतीसंदर्भातील विचार पाहता आज आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करताना त्यांच्याच विचारांना मूठमाती तर देत नाही ना, असा एक प्रश्न मोठय़ा उद्वेगातून निर्माण होतो. बाबासाहेबांचे जयंती-उत्सव साजरे करताना गेल्या काही वर्षांत जे घडू लागले आहे, ते बाबासाहेबांच्या विचारांनाही पूरक नसून आंबेडकरी चळवळीला मारक आहे. ज्या नेत्याने दलितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून दिला, त्यांच्या विचारांचा, तत्त्वांचा पराभव होण्याइतपत ते कारणीभूत ठरू शकते, एवढे ते चळवळीसाठी अपायकारक आहे. एका उदात्त हेतूने आत्यंतिक आदरभावातून सुरू करण्यात आलेली जयंती ‘हे फार झाले’ म्हणून बंद करावयास सांगणारे बाबासाहेब, कोणतेही परिवर्तन सम्यक मानवी हस्तक्षेपाशिवाय घडून येत नाही, या तत्त्वाचा पुरस्कार करणारे होते. आपला उद्धार करण्यासाठी कोणी तरी दुसरा येईल, असा विचार न करता आपला उद्धार आपणच केला पाहिजे, असे सौम्य शब्दांत सुनावण्याची संधी बाबासाहेबांनी सुवर्णजयंतीच्या निमित्ताने केलेल्या भाषणात घेतली होती.  
मात्र गेल्या दोन-तीन दशकांत बाबासाहेबांची जयंती ही आंबेडकरी चळवळीचा भाग होण्याऐवजी पारंपरिक विभूतिपूजेच्या उत्सवीकरणाचा भाग होताना दिसते आहे. अर्थात ती साजरी करण्यामागे अनुयायांची जी आदराची भावना आहे ती समजून घेऊनही, तिला प्राप्त झालेले स्वरूप हे चळवळीच्या दृष्टीने अनुत्पादक तर आहेच, पण त्यापेक्षाही जास्त घातक आहे. आंबेडकरी कार्यकर्ता, जो स्वत:ला परिवर्तनवादी म्हणवून घेतो, तो स्वत्व कसा विसरला हे यानिमित्ताने दिसते. अनेक जण या जयंती उत्सवाकडे एक धंदा म्हणून पाहताना दिसतात. प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्याची सुरुवात ही अशा अनेक कार्यकर्त्यांसाठी एक पर्वणी ठरते. त्यातच बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक आपल्या अनुयायांमध्ये पेरलेल्या एकीच्या विचारवृक्षाला बेकीची फळे कशी लागतात, हेही बघायला मिळते. एकाच वेळी, एकाच वस्तीत बाबासाहेबांच्या जयंतीचे उत्सव साजरे करण्यासाठी अनेक वेगवेगळे मांडव पडलेले दिसतात. आंबेडकरी चळवळीतील सर्वच पक्ष-संघटनांचे ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ या चळवळीला आलेले भग्न रूप अधिक स्पष्ट करतात.. डिजिटल फ्लेक्स-बॅनरची राजकीय जाहिरातबाजी या जयंती उत्सवानिमित्ताने केली जाते. ज्यांना बाबासाहेबांचे जन्मवर्ष माहीत नाही अशा अर्धशिक्षित, धंदेवाईक, उत्साही कार्यकर्त्यांच्या कोंडाळ्यासह बाबासाहेबांची भव्य छायाचित्रे चौकाचौकांत लावलेली दिसतात. बाबासाहेबांच्या विचारांशी ज्यांना देणेघेणे नाही, अशा अनेक राजकीय पक्षांच्या ‘उत्सव समित्या’ व मंडळे भूछत्रांप्रमाणे उगवतात आणि भावनिक ब्लॅकमेलिंग होताना दिसते. या प्रसंगी देण्यात येणाऱ्या घोषणांमध्ये ऊरबडवेपणाच अधिक असतो.
पूर्वी जयंतीला कलावंतांचा आदर करण्याचा फुले-शाहूंचा विचार बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीतच कार्यकर्त्यांत रुजवला होता. त्यामुळे जयंतीमध्ये शाहीर व कव्वालांना महत्त्व आले होते. ‘आंबेडकरी जलसे’ सुरू झाले होते. परंतु काळानुरूप लोकांची अभिरुची बदलत जाऊन या कव्वाली व शाहिरीचे स्वरूप पालटत गेले. बीभत्स गाण्यांचे सामनेही आदल्या रात्री रंगू लागले. जलशांमधले प्रबोधन मागे हटले, मनोरंजनाची सरशी झाली. हा बदल वाद्यतंत्रातही घडून आला. पूर्वी जयंतीत पारंपरिक वाद्यांचा वापर आपसूकच होई. पुढे त्यात सुधारणा म्हणून ब्रास बँड आले, त्यानंतर ऑर्केस्ट्रासह बँड आले.. आता तर ‘डीजे’ आणि कर्णकर्कश तंत्रज्ञान आल्यामुळे अशा प्रकारच्या प्रसंगांतून वादकांना मिळणारा रोजगार थांबला आणि उत्सवातून तयार होणारे वादकही खुंटले. १५ ते २० वादकांचा ताफा आज दोघातिघा ‘डीजें’पुरता सीमित झाल्यावर रोजगारनिर्मिती थांबणार, यात नवल नाही. परंतु जयंतीची उत्पादकता कमी झाली, ती फक्त एवढय़ानेच नव्हे.
जयंतीला लागलेले आणखी एक वळण म्हणजे नृत्य. नृत्य करणे वा नाचणे ही माणसाच्या आनंदाभिव्यक्तीची एक स्वाभाविक कृती मानली जाते, पण जयंतीच्या मिरवणुकीतून नाचण्यासाठी जी ऊर्जा वापरली जाते, ती आंतरिक बळापेक्षा बाह्य- कृत्रिम ‘औषध’ पिऊन मिळविली जाते. बऱ्याचदा हे प्राशन वाजवीपेक्षा जास्त झाल्याने हे उत्साही तरुण जमिनीवर, गटारांत अक्षरश: लोळताना दिसतात.. ज्या दिवशी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करण्यासाठी एकत्र यायचे, त्याच दिवशी! मग अशा तरुणांना त्यांचे पालक सावरत सावरत एका बाजूला नेतात किंवा घरी घेऊन जातात.
बाबासाहेबांप्रति असलेला आदर व्यक्त करण्याच्या पद्धतींमध्ये होत गेलेला हा अध:पात म्हणजे त्या आदरालाही कमीपणाच आणणारे कृत्य नाही का?
मान्य आहे की, सुशिक्षित वर्ग अशा प्रकारे साजऱ्या होणाऱ्या उत्सवांमध्ये दिसत नाही, पण जयंती उत्सवांचे जे स्वरूप ठिकठिकाणी दिसते, ते काय आहे? अशा प्रकारे उत्सवाचा उत्साह दाखवणारा वर्ग हा बहुतांशी गोरगरीब, पददलित वर्ग आहे. पण याप्रसंगी या समाजाचा आर्थिक- सामाजिक- शैक्षणिक आणि राजकीय स्तर कोणत्या पातळीवर अद्याप घुटमळतोय हे विदारक सत्यही पाहावयास मिळते. यासारख्या कृत्यांना उत्सव मंडळांचे अध्यक्ष, कार्यकर्ते प्रोत्साहनच देताना दिसतात, हे त्याहून भयंकर आहे.
आंबेडकरी विचारांच्या चळवळीने दलित पँथरच्या रूपाने जी कूस बदलली, तिचे एक कारण चळवळीतून अध:पाती विचारांना दूर करणे हेही होते. मनोरंजन, उत्सवीकरण आणि विभूतिपूजेकडे वळलेल्या समाजाच्या मानसिकतेला पुन्हा प्रबोधनाच्या दिशेने वळवण्यासाठी पँथरने बाबासाहेबांच्या जयंतीला व्याख्यानमालांच्या आयोजनाचा स्तुत्य उपक्रम सुरू केला. सभा-भाषणांसाठी येणारे, व्याख्याने ऐकणारे लोकच आता कमी झाले आहेत.. बोलावूनही येत नाहीत. परंतु एखाद्या प्रख्यात लोकगायकाचा मनोरंजन कार्यक्रम ठेवला तर प्रतिसाद मिळतोच मिळतो! मात्र अशा कार्यक्रमांवर जो पैसा खर्च केला जातो, तो गोरगरीब, दररोज हातावर पोट भरून जगणाऱ्या कष्टकऱ्यांच्या श्रमांतून- शोषणातूनही आलेला असतो.
या चळवळीच्या नेत्यांना बाबासाहेबांच्या विचारांचा पराभव समाजाकडून आणि चळवळीकडूनच कसा होऊ शकतो- होतो आहे- हे ओळखताच आले नाही. ओळखता आले असते तर, त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीचे वर्षांनुवर्षे होत जाणारे विकृतीकरण थांबवण्याचे प्रयत्न तरी केले असते.
बाबासाहेबांनी वंचित, दलित, स्त्रिया, आदिवासी यांना दिलेला मूलमंत्र म्हणजे ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’. याची आठवण अनेकांनी, अनेकदा दिली आहे, परंतु शिक्षणाचे व्यापारीकरण होत असतानाच्या आजच्या काळात शिक्षणसंस्था उभारणे, संघटित होण्यासाठी दलित व दलितेतर नेतृत्वाला प्रश्न विचारणे आणि अशा संघटनांतून वंचितांचे आजचे प्रश्न ओळखून त्यावर एकत्र येऊन संघर्ष करणे हा चळवळीचा मार्ग आहे. तो खुंटत असल्याचे चित्र बाबासाहेबांच्या जयंतीला दिसते, तसे होऊ नये.
* लेखक धुळय़ाच्या विद्यावर्धिनी महाविद्यालयात सहायक प्राध्यापक आहेत. त्यांचा ई-मेल : arke.rajiv@gmail.com

loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
reactions of students participated in loksatta lokankika competition zws
म्हणूनच लोकसत्ता लोकांकिका इतर स्पर्धांपेक्षा खूप आगळीवेगळी ठरते; स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
Story img Loader