उपनगरांमध्ये विस्तारण्यापूर्वीची मुंबई हा एके काळच्या खाशा मुंबईकरांच्या नॉस्टेल्जियाचा अविभाज्य भाग. प्रदीर्घ काळानंतर या आठवणींतला कडवटपणा, तिथे प्रत्यक्ष जगण्याचा त्रास, घुसमट वजा होत होत अखेर तिथली सांस्कृतिक विविधता आणि साध्या जगण्यातील श्रीमंती या गोष्टी अल्पस्वरूपात प्रत्येक गिरगाव, गिरणगाव, दादरकराच्या किंवा मुंबईच्या अशाच एखाद्या वस्तीत राहिलेल्यांच्या आठवणीत राहिलेल्या दिसतात. कितीही बोललं तरीही ना त्याचं कौतुक सरतं, ना गेल्या दिवसांबद्दलची चुकचुक कमी होते. प्रदीप कीर्तिकर यांनी लिहिलेलं पुस्तक ‘द मुंबई मिडवे’ हे पुस्तक गिरगावातल्या त्या जुन्या चांगल्या दिवसांना प्रेमानं घातलेली हाळी आहे. ही हाक इंग्रजीतून घातल्यानं कानाला थोडी विचित्र लागते, पण त्यातले संदर्भ इतके ओळखीचे आहेत, की अस्सल गिरगावकरांना तिचं मनातल्या मनातही भाषांतर करण्याची गरज लागू नये.
मुखपृष्ठावरील गेटवे ऑफ इंडियाच्या छायाचित्रामुळे पुस्तकात मुंबईच्या मध्यमवर्गाबद्दल काही समग्र माहिती मिळू शकेल असा समज होत असला तरीही पुस्तकाचा वस्तुविषय गिरगाव आणि गिरगाव हाच आहे. कीर्तिकरांनी पुस्तकाचे दोन भाग केले आहेत. पहिला भाग गिरगावचा विस्तार, गिरगावातले रस्ते, वाडय़ा, चौकांची नावं, हॉटेलं, खाणावळी, पाण्याची, सांडपाण्याची व्यवस्था, टेलिफोन लायनी, रस्त्यावरच्या दिव्यांची व्यवस्था, साठच्या दशकातल्या या माणसांचा सर्वसाधारण दिनक्रम, ऑफिसला जायची ठिकाणं यांचे तपशील आहेत. गप्पा मारायला उभं राहण्याची ठिकाणं, सुट्टीच्या दिवशी सहकुटुंब फिरायला जायची चौपाटीसारखी ठिकाणं, सण, उत्सव, ते इथे येणाऱ्या पाहुण्यारावळ्यांपर्यंत सगळ्या बारीकसारीक गोष्टींची माहिती दिली आहे. हा भाग बराचसा जंत्रीवजा आहे. पुढचा भाग याच जंत्रीमध्ये हाडामांसाचे तपशील भरायला घ्यावेत त्याप्रमाणे व्यक्तिचित्रणांनी भरलेला आहे. बाबीचा नवरा या नावानं ओळखला जाणारा कुटुंबाचा सामायिक टेलर, गल्लीपुरती शिरजोरी करणारा दादा अप्पा ताडगे, आयुष्यभर राजकारणात कार्यकर्त्यांच्याच पातळीवर राहिलेला शामू पवनकर, जिन्याखाली मुक्काम करून असलेला दगडू मामा, त्या काळी घराघरांतून गडीकाम करणारे बाळू, चाळीतल्या पोरांना कडक शिस्तीत ठेवणारी शिक्षिका नानीताई, एरवी मुकादम म्हणून काम करणारे, पण गणपतीच्या दिवसांत मूर्ती घडवण्याच्या कामात रंगून जाणारे कलाकार बापू आणि त्यांची बायको माई हे कष्टाळू जोडपं अशी कीर्तिकरांना त्यांच्या राहत्या चाळीत आणि परिसरात भेटलेल्या माणसांवर ही व्यक्तिचित्रणं आहेत. यात आणखी एखाद्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ किंवा ‘बटाटय़ाच्या चाळी’चा विषय बनू शकेल इतका ऐवज नक्कीच आहे. तो मांडलाही छान, पण हे सगळं सांगण्याच्या उत्साहाला इंग्रजी शब्दसंपदेच्या मर्यादेमुळे उगीचच बांध पडला आहे असं वाटतं.
या गोष्टी गमतीच्या खऱ्या आणि या व्यक्तिचित्रणांमधला नर्मविनोद, कारुण्य, माणसांचा विक्षिप्तपणा हे सगळं अशा परिसरांत वाढलेले किंवा पुलंच्या लिखाणाची पारायणं केलेले वाचक सहज समजून घेऊ शकतील. शेवटी चौपाटीची भेळ, गल्लीबोळांत खेळलेले खेळ, हिवाळ्यातल्या गारव्यात, नाक्यावर उभं राहून दुकानातल्या रेडिओवर ऐकलेली क्रिकेट कॉमेंट्री यांचं कौतुक ज्यांना माहीत नाही ते या अनुभवांत ठासून भरलेल्या वैयक्तिक नॉस्टेल्जियाच्या रिकाम्या जागा कुठून भरणार?
द मुंबई मिडवे : प्रदीप कीर्तिकर,
पॅर्ट्ीज इंडिया, नवी दिल्ली,
पाने: १९८, किंमत: ४५१ रुपये.
एके काळी.. गिरगावात
उपनगरांमध्ये विस्तारण्यापूर्वीची मुंबई हा एके काळच्या खाशा मुंबईकरांच्या नॉस्टेल्जियाचा अविभाज्य भाग. प्रदीर्घ काळानंतर या आठवणींतला कडवटपणा, तिथे प्रत्यक्ष जगण्याचा त्रास, घुसमट वजा होत होत
First published on: 12-07-2014 at 03:53 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Once upon a time in girgaon