महाराष्ट्र परीक्षा परिषदेने मोठा गाजावाजा करीत (खरे तर सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीचे गाजर दाखवीत) टीईटी परीक्षा घेतली खरी, पण आज त्याला तब्बल दीड महिना उलटूनदेखील निकालाचा मात्र कुठेही पत्ता नसल्याने डी.एड्/ बी.एड् झालेल्या तरुणांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. या परीक्षेच्या सुरुवातीपासूनच गोंधळाचे वातावरण होते.
खरे तर डी.एड्/ बी.एड् कॉलेजे इतकी उदंड झाली आहेत की त्यातून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे जास्त आणि प्रत्यक्षात नोकरीचा मात्र पत्ता नाही. असे असतानाच ही टीईटी परीक्षा घेण्यात येणार म्हटल्यावर सगळ्यांना आशा वाटू लागली की काहीतरी होणार. पण परीक्षा फीपासून ते प्रत्यक्ष पेपर होईपर्यंत सगळेच अनागोंदी होते. फॉर्म जमा करायला केंद्रावर समक्ष या मग ऑनलाइन तरी कशाला भरून घ्यावेत फॉर्म? परीक्षा केंद्र फक्त जिल्ह्यांच्या ठिकाणी आणि प्रत्यक्ष पेपर तर इतका विचित्र की अनेक प्रश्न चुकीचे निघाले. पण मोठा आíथक भरुदड सोसून डी.एड्/ बी.एड्. केलेल्या तरुणांसाठी कुठून का होईना, नोकरीचा मार्ग खुला होतो आहे या आशेवर सगळ्यांनी हा आíथक, मानसिक अन्याय सहन केला. पण आज दीड महिना उलटूनही या परीक्षेचा ना निकाल आला आहे, ना अंतिम उत्तरसूची.
खरे तर या सगळ्या अनागोंदी प्रकारामुळे ही परीक्षा म्हणजे निव्वळ देखावा होता व यामागे तरुणांना नोकरी देण्यापेक्षाही वेगळेच अर्थकारण होते का, अशी चर्चा तरुणांमध्ये होते आहे. त्याला कारणदेखील तसेच आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या एमपीएससीसारख्या वर्ग- १, २ ची पदे देणाऱ्या व नोकरीची हमी देणाऱ्या आयोगाकडूनदेखील इतकी अवाजवी फी आकारली जात नाही. टीईटीसाठी मात्र अवाच्या सव्वा फी का घेतली? इतक्या मोठय़ा रकमेचा आíथक हिशेब कोण देणार? सगळ्यात कहर म्हणजे खासगी क्लासेस आणि पुस्तक प्रकाशने या सगळ्यात गब्बर झाली. परिषदेने एक निश्चित्त अभ्यासक्रम आणि मान्यताप्राप्त पुस्तके का काढू नयेत? हे सगळे पाहता या परीक्षेमुळे शासनाने नक्की कोणाचे (आíथक) हितसंबंध सांभाळले, असे अनेक गंभीर प्रश्न आता तरुणांच्यात बोलले जात आहेत.
तरुणांची अगतिकता/ अपरिहार्यता म्हणून सगळ्यांनीच ‘लूट लो’ या (अ)न्यायाने या डी.एड्/ बी.एड्. झालेल्या तरुणांना नाडले आहे. या सगळ्या तरुणांची ना कुठली राजकीय संघटना, ना दबाव गट. मग या असंघटित तरुणांसाठी कोणालाच काही देणेघेणे नाही. अनेक तरुण रोज महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वेबसाइटला भेट देऊन वैतागले आहेत, पण तेथे कसलीही माहिती उपलब्ध नाही. फोन करून विचारले तर धड उत्तर नाही.. ‘काम चालू आहे’ असे नेहमीचेच उत्तर.
-तुषार देसले, झोडगे,
ता. मालेगाव, जि. नाशिक
शिवसैनिक म्हणजे टगे आणि सांड नव्हेत!
शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्ताने जो प्रतिज्ञादिन पाळण्यात आला आणि शिवबंधन बांधण्यात आले त्यावर होणारी टीका अकारण आहे असे वाटते. व्यावहारिक आणि संधिसाधू नात्यापेक्षा कडवा शिवसनिक हा कायमच भावनिक आणि आपलेपणाच्या नात्याने शिवसेनेशी जोडला गेलेला आहे. अशा सर्व शिवसनिकांना एकत्र बोलावून, पूर्वीपासून ठरवलेले कार्याचे, विचारांचे स्मरण करून देणे आणि नव्याने प्रतिज्ञेद्वारे कटिबद्ध करून बंधनाचा धागा बांधणे यात वावगे ते काय? आता ज्यांचे राजकारणच जिथे व्यवहार, दलाली, सेटिंग, मांडवली, घोडेबाजारी करून चालते आणि कार्यकत्रे ठेकेदारी, भाईगिरी, कमिशनगिरी, खोटी समाजसेवा, पसेवाटप, सरकारी लाभार्थी, काळा पसा सांभाळणारे भाट, बेकायदेशीर काम करणारे एजंट, आश्रित आणि उपकृत केलेले तसेच दादागिरीकरिता मोकळे सोडलेले टगे आणि सांड यांच्याद्वारे चालते, तिथे असा भावनिक जोडलेपणा कधीच असणार नाही.
बंधन बांधणे ही जर अंधश्रद्धा असेल तर मग राजीव गांधी यांच्या हत्येनंतर त्यांचा अस्थीकलश देशभर फिरवून मतांचा भावनिक जोगवा मागणे हे काय होते? शिवबंधन जर अयोग्य असेल तर रक्षाबंधन आणि फ्रेन्डशिप बँडसुद्धा चुकीचाच ठरेल. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, ‘हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायला हो’ असे म्हणून कृतसंकल्प होणारे आदर्श आता नाहीत. राजकारणात कायमच इतरांना गंडा घालणाऱ्यांना बंधन आणि निष्ठा याबाबत काही सांगणे व्यर्थ आहे.
-सुरेश कोडीतकर, पुणे</strong>
खरगे, आमच्यासारखा प्रवास करून दाखवा!
‘रेल्वे सोडा नि बसने जा!’ ही बातमी (लोकसत्ता, २४ जाने.) वाचनात आली आणि अकलेचे दिवाळे निघालेल्या आपल्या मंत्र्यांची कीव करावीशी वाटली. मुंबई उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना रेल्वेगाडय़ांची व फेऱ्यांची संख्या वाढवून, गाडी व फलाट यांमधील अंतर कमी करून, स्थानकांवरील समस्या दूर करून, परप्रांतीयांचे महाराष्ट्रात येणारे लोंढे रोखून दिलासा देण्याऐवजी बसने प्रवास करा असा सल्ला देणाऱ्या रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी जरा सामान्य मुंबईकरांप्रमाणे प्रवास तरी करून दाखवावा.
उपनगरी रेल्वे सेवा ही सर्वात स्वस्त आणि वेळ वाचवणारी आहे म्हणूनच मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. मुंबई आणि उपनगरातील रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी, वारंवार आडवे येणारे सिग्नल्स, टोलनाके आणि खड्डे यांमुळे रस्त्यांवरून अंतर कापायला अधिक वेळ लागतो हे एवढय़ा मोठय़ा पदावर बसणाऱ्या खरगेंना कळत नाही काय? मुंबईकरांना आपल्या कार्यालयात पोहोचण्याकरिता रेल्वे आणि बेस्ट या दोहोंचा वापर करावा लागतो. रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या आधी दूर कराव्यात, होणारे अपघात, जाणारे जीव वाचवण्यासाठी प्रथम उपाययोजना कराव्यात मग अकलेचे तारे तोडावेत, असेच खरगे यांना सांगावेसे वाटते.
– प्राची कमलाकर गुर्जर, कळवा.
देशद्रोह्यांना कसले सुधारता?
आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्या अंजली दमानिया यांनी केलेले ‘अरुण गवळी आणि दाऊद इब्राहीम हेसुद्धा आम आदमी पक्षात येऊ शकतात व आम्ही त्यांना सुधारू’ हे वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह तसेच अत्यंत विनोदी आहे.
अगोदरच केजरीवाल यांच्यावर दिल्लीत धरणे धरल्याबद्दल पोलीस ठाण्यांत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांचे दिल्लीचे कायदा मंत्री सोमनाथ भारती यांच्यावर बेकायदा कामांचे भरपूर आरोप लागले आहेत. त्यांच्या पक्षातून नुकतेच निलंबित झालेले बिन्नी उघडपणे केजरीवाल सरकारवर आरोप करीत आहेत आणि तिसरीकडे, दाऊद आणि गवळी यांना सुधारण्याचे हास्यास्पद वक्तव्य दमानिया करीत आहेत.
दाऊद इब्राहीम देशद्रोही गुन्हेगार आहे. देशात दहशतवाद पसरवणे, बॉम्बस्फोट व धार्मिक दंगली घडवणे, तस्करी अशा अत्यंत गंभीर गुन्ह्यांचे आरोप त्याच्यावर आहेत. त्याला पक्षात घेणे हासुद्धा देशद्रोहाचा गुन्हा ठरावा, पण दमानिया यांना याची फिकीर दिसत नाही.
-महेश भानुदास गोळे, कुर्ला (पश्चिम), मुंबई
आधी तपास, मग ‘पद्म’
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना पद्म पुरस्कार जाहीर झाल्याचे वाचले (२६ जाने.). त्यांच्या सामाजिक कार्याची केंद्र सरकारने ही पावतीच दिली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना यापासून नक्कीच प्रेरणा घेता येईल. हा सन्मान आधी मिळायला हवा होता, ही अपेक्षाही योग्य आहे.
मला मात्र सरकारच्या दुट्टपी धोरणाची कमाल वाटते. एकीकडे या माणसाच्या कामाचा सन्मान करायचा आणि दुसरीकडे हे काम करताना बलिदान दिलेल्या व्यक्तीच्या खुनाचा तपास मात्र ढिसाळपणे करायचा.
जोपर्यंत दाभोलकर यांचे खुनी व त्यामागचे सूत्रधार सापडत नाहीत तोपर्यंत हा पुरस्कार स्वीकारणार नाही अशी भूमिका घ्यायला हवी, अन्यथा सरकार आपल्या तोंडाला पाने पुसायला नेहमीच उत्सुक असते!
-गार्गी बनहट्टी, मुंबई