सुभाषचंद्र बोस यांच्याविषयीचं गूढ अजूनही कायम असल्याचे आणि त्यांच्याविषयीची उत्सुकताही कायम असल्याचे पुरावे अधूनमधून मिळत राहतात. याचा सर्वात मोठा पुरावा त्यांच्याविषयी अजूनही होत असलेले लेखन हाच आहे. त्यांची पुन:पुन्हा चरित्रं लिहिली जाणं, त्यांच्या कार्याचं पुन:पुन्हा पुनर्मूल्यांकन केलं जाणं, यातून ते सिद्ध होतं. हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आणि सुभाषबाबूंचे नातू सुगाता बोस यांनी लिहिलेल्या ‘हीज मॅजेस्टिज् अपोनन्ट – सुभाषचंद्र बोस अँड इंडियाज् स्ट्रगल अगेन्स्ट एम्पायर’ या चरित्राचं मागच्याच आठवडय़ात कोलकात्यात प्रकाशन झालं. आजवर प्रकाशात न आलेल्या खाजगी दस्तावेजाचा वापर त्यांनी या चरित्रासाठी केला आहे. ‘ही कॉल्ड हिम द प्रिन्स अमंग पॅट्रिअॅट्स’ असं बोस यांनी आपल्या आजोबांचं वर्णन केलं आहे. शिवाय सुभाषबाबूंचा निधर्मीवाद गांधी-नेहरू यांच्यापेक्षा कसा वेगळा होता, याचीही मांडणी केली आहे. भारताच्या धार्मिक, आर्थिक, भाषिक विविधतेसंदर्भात सुभाषबाबूंनी दिलेल्या लढय़ाचीही हकिकत लिहिलीय. नातवानं लिहिलेलं चरित्र असलं तरी ते बऱ्यापैकी तटस्थ राहून आणि अभ्यास करून लिहिलं आहे.
हिज मॅजेस्टिज् अपोनन्ट – सुभाषचंद्र बोस अँड इंडियाज् स्ट्रगल अगेन्स्ट एम्पायर : सुगाता बोस, पेंग्विन, पाने : ४४८, किंमत : ४९९ रुपये.
स्वप्न दाखवणारी कादंबरी
विकास स्वरूप या जपानमध्ये राहणाऱ्या भारतीय लेखकाची ‘अॅक्सिडेंटल अप्रेंटिस’ ही नवीकोरी कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. ‘क्यू अँड ए’ या स्वरूप यांच्या आधीच्या कादंबरीवर ‘स्लमडॉग मिल्यनेअर’ हा सुप्रसिद्ध सिनेमा तयार झाला. त्यात काम करणाऱ्या मुंबईच्या झोपटपट्टीतल्या दोन मुलांचं आयुष्य रातोरात बदललं. प्रस्तुत कादंबरीही अशीच अनपेक्षितरीत्या आयुष्य बदलणाऱ्या सपना सिन्हा या तरुण नायिकेची आहे. ही या कादंबरीची दिल्लीत राहणारी आणि एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात काम करणारी तरुणी आपल्या करिअरविषयी खूपच महत्त्वाकांक्षी आणि आशावादी असते. एखादी मोठी लॉटरी लागावी आणि आपलं आयुष्य बदलावं असं तिला वाटत असतं. सध्या ती करत असलेली नोकरी तिला अजिबात आवडत नाही, पण त्यावर तिचं कुटुंब अवलंबून असतं. ती योग्य संधीच्या शोधात असते. तोच एके दिवशी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत तिला भारतातल्या एक मोठय़ा कंपनीचा सीईओ भेटतो. त्याला एका हुशार तरुणीची गरज असते. तो सपनाला नोकरीची ऑफर देतो आणि तिचं आयुष्य बदलतं. स्वप्नं अशीच असतात. मोहून टाकणारी आणि जग बदलवणारी.
अॅक्सिडेंटल अप्रेंटिस : विकास स्वरूप, सायमन अँड शूस्टर, पाने : ४४८, किंमत : ३५० रुपये.