प्रा. वसंत काळपांडे यांचा ‘‘असर’चे निदान आणि असरकारी’ उपाय’ हा लेख (२२ जाने.) निश्चितच शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत विचार करायला लावणारा आहे. नवीन शिक्षण धोरणानुसार ज्ञानरचनावादाचा वापर करून विद्यार्थी शिकावा असे अपेक्षित आहे व ते रास्तही आहे. परंतु त्यादृष्टीने शिक्षकांची, शाळांची तयारी असणे गरजेचे आहे. त्या पद्धतीची अभ्यासक्रमाची रचना, अध्ययन-अध्यापन पद्धत असून भागणार नाही, तर त्याची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होतेय ते महत्त्वाचे आहे. उपक्रम प्रकल्प घ्यायचे असतात म्हणून घ्यायचे अशी शिक्षकांची औपचारिकता असेल तर हाती काय लागणार? याचाही विचार होणे गरजेचे आहे. ज्ञानरचनावादाने विद्यार्थी शिकेल, परंतु त्या पद्धतीची वातावरणनिर्मिती व अंमलबजावणी हवी आहे. यासाठी शिक्षकांची ज्ञानरचनावादाबाबतची तयारी करणे गरजेचे वाटते. खरेतर शिक्षक आजही हर्बार्टच्या पंचपदीच्या बाहेर जायला तयार नाही. पाठय़पुस्तकाच्या पलीकडे जायचे म्हणजे काय करायचे? याचे नियोजन असायला हवे.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी सर्वागीण विकास अपेक्षिला आहे. त्या मार्गामध्ये अनेक अडचणी, त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन रेकॉर्ड म्हणून होणार असेल तर अपेक्षित उद्देश साध्य होणार नाही. अप्रगत विद्यार्थी दिसायलाच तयार नाही ही बाब अयोग्य आहे. याच पद्धतीने शिक्षणप्रक्रिया चालली तर भवितव्य शोचनीय आहे.
उपक्रम, प्रकल्प, मूल्यमापन, अध्यापनाची वेगवेगळी प्रतिमाने यांचा प्रत्यक्ष वापर याबाबत अधिक बारकाव्याने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे निदान होऊन व त्यावर उपचार झाले तरच यश हाती लागेल नाहीतर ‘ऑपरेशन इज सक्सेसफुल, बट पेशंट इज डेड’ अशी स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा