बातमीच्या पलीकडे आणि संपादकीय टिप्पणीच्या अलीकडे असलेले अनेक विषय हाताळणारं  हे पाक्षिक सदर..   
व्यक्तीप्रमाणेच वर्षदेखील आपापलं नशीब घेऊन येतं की काय? हो बहुधा. काही काही वर्ष खरंच भाग्यवान. सुवर्णाक्षरातच कोरली जातात ती. असं पटकन आठवणारं वर्ष म्हणजे १९७९. काय काय घडलं त्या एका वर्षांत. अमेरिका आणि चीनमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले, इराणमध्ये क्रांती झाली, अयातोल्ला खोमेनी १५ वर्षांचा देशसंन्यास संपवून मायदेशी परतले, इंग्लंडमध्ये पहिल्यांदा एक महिला (मार्गारेट थॅचर) पंतप्रधान बनल्या, युरोपीय पार्लमेंटची पहिली थेट निवडणूक या वर्षी झाली, कम्युनिस्ट देशात पोप पहिल्यांदाच गेले तेही या वर्षी, सद्दाम हुसेन इराकमध्ये सत्तेवर आले, अवकाशातनं स्कायलॅब पृथ्वीवर यायला निघाली, सोविएत रशियाच्या फौजा अफगाणिस्तानात घुसल्या.. या अशा पटकन आठवणाऱ्या काही १९७९ सालच्या घटना.    
यंदाचं हे २०१४ साल त्याहूनही भाग्यवान आहे. तीन कारणांसाठी. आणि खरा भाग्ययोग हा की ही तीनही कारणं एकमेकांशी संबंधितच आहेत.
म्हणजे पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलं त्याला यंदा १०० वर्ष होतायत, दुसरं महायुद्ध नागालॅण्डमध्ये, कोहिमात पोहोचलं त्याची सत्तरी या वर्षी आहे आणि तिसरं म्हणजे बर्लिनची भिंत कोसळून शीतयुद्धाच्या अंताची सुरुवात झाली त्या घटनेचा रौप्य महोत्सवही याच वर्षी आहे. या सगळय़ाचा इतिहास आपल्याला तोडकामोडका का असेना, पण माहीत आहे. अशा वेळी या इतक्या महत्त्वाच्या वर्षांत या घटनांच्या इतिहासाचा माहीत नसलेला पैलू माहीत करून घ्यायला हवा. आपलं ते कतव्र्यच ठरतं.ऑस्ट्रियाचा राजपुत्र फर्डिनंड याची सारायेवोत हत्या झाली आणि या महायुद्धाला सुरुवात झाली असं आपण वाचलेलं असतं. फारच नृशंस युद्ध ते. जवळपास ९० लाख माणसं त्यात मेली. जगाच्या इतिहासातल्या अत्यंत संहारक अशा काही घटनांमध्ये या युद्धाची गणना होते, हेही कदाचित माहीत असतं आपल्याला. प्रशिया, बाल्कन राष्ट्रं वगैरे सगळं तसं कानावरनं गेलेलं असतं. पण याच्याशिवाय अन्य काही कारण या महायुद्धाला असू शकेल, असं आपल्याला वाटलेलं नसतं. आपल्या नजरेतनं हे युद्ध म्हणजे उघड उघड साम्राज्यवाद वा एखाद्या देशाचा विस्तारवाद आदीमुळे घडलेलं असतं. पण हे युद्ध चलनवाढीला उत्तर म्हणून ठरवून घडवलं गेलं होतं, असं कोणी म्हणाल्याचं आठवतं का आपल्याला?
बहुधा नाही.    
पण हेदेखील महायुद्धाच्या इतिहासाचं महत्त्वाचं अंग आहे.
पहिलं महायुद्ध हे आर्थिक कारणांसाठी घडवून आणलेली कृती होती असा जाहीर पुराव्यासह आरोप त्या वेळी झाला होता. म्हणजे युद्धाचं कारण राजकीय वा अन्य नव्हतं, तर फक्त रोकडं आर्थिक होतं असा एक विचारप्रवाह आहे. एरवी असं काही आचरट वाटेल असं बोलणारे कमी नसतात. त्यांच्याकडे दुर्लक्षच करतो आपण. आणि तेच योग्यही. पण महायुद्धाबाबत असा जाहीर आरोप करणारी व्यक्ती विक्षिप्त वगैरे नव्हती. आपल्या प्रचंड उद्यमशीलतेसाठी उलट तिचं नाव आजही आदरानं घेतलं जातं. ती व्यक्ती म्हणजे हेन्री फोर्ड. तेच ते उद्योगपती. मोटारी बनवणाऱ्या फोर्ड कंपनीचे जनक.     
फोर्ड यांचा ठाम समज होता अमेरिकेतल्या बलाढय़ बँका हाती असणाऱ्या यहुदींनी हे युद्ध घडवून आणलं. तसा जाहीर आरोप फोर्ड यांनी केला. पण बलाढय़ बँकांप्रमाणे अमेरिकेतली वर्तमानपत्रंदेखील यहुदींच्याच हाती होती. आजही आहेत. मग द न्यूयॉर्क टाइम्स असो वा वॉशिंग्टन पोस्ट. त्यांच्यावरचा यहुदी मालकी हक्क उघड दिसतो. त्यामुळे फोर्ड यांचं हे विधान कोणत्याच वर्तमानपत्रांनी गांभीर्यानं घेतलं नाही. साहजिकच कोणीच ठळकपणे ते छापलं नाही. अर्थातच फोर्ड यांना याचा संताप आला. एव्हाना ते उद्योगपती झालेले होते. त्यामुळे त्यांच्या संतापाला काही अर्थ होता. तेव्हा मग काय केलं फोर्ड यांनी? तर एक नियतकालिकच विकत घेतलं. द डिअरबॉर्न इंडिपेंडंट या नावाचं. त्यांच्याच मालकीचं दैनिक ते. त्यांनी त्या पत्राच्या ज्येष्ठ संपादकांना सांगितलं, तुमच्यापैकी कोणी एक माझ्याबरोबर आलटून पालटून सतत असायला हवा. मी त्याच्याशी संवाद साधेन, त्याने त्याचं शब्दांकन करायचं आणि माझ्या नावानं छापायचं. फोर्ड यांना वास्तविक हे सगळं लिहायचं होतं. पण तेवढा वेळ त्यांच्याकडे नव्हता. म्हणून त्यांनी ही मधली युक्ती काढली. त्यानंतर जवळपास ९१ आठवडे, हेन्री फोर्ड हे या संपादकांना आपली मतं सांगत. महायुद्धाचे विविध पैलू त्यांच्यासमोर उलगडून दाखवत. मग ते सगळे लेख फोर्ड यांच्या नावाने छापले जात. या लेखांची शीर्षकं जरी पाहिली तरी फोर्ड यांची त्या विषयातली गती कळून येईल. द ज्युईश क्वेश्चन: फॅक्ट्स ऑर फॅन्टसी, द ज्यूज इन कॅरेक्टर अ‍ॅण्ड बिझनेस, अ‍ॅन इंट्रोडक्शन टु ज्युईश प्रोटोकॉल, हाउ ज्यूज इन युनायटेड स्टेट्स कन्सिल देअर स्ट्रेंग्थ, ज्यूज व्हर्सेस नॉन ज्यूज इन न्यूयॉर्क फायनान्स, व्हेन द एडिटर्स वेअर इंडिपेंडंट ऑफ ज्यूज.. अशी अनेक. या लेखांची संख्या इतकी मोठी होती की नंतर ते चार खंडांत प्रकाशित करण्यात आले. द इंटरनॅशनल ज्यू या नावाच्या पुस्तकात. त्या सर्वाचा मथितार्थ इतकाच की पहिलं महायुद्ध हे यहुदींनी ठरवून घडवून आणलं. असं फोर्ड यांचं म्हणणं.     
या यहुदींची जर्मनीतही चांगलीच सद्दी होती. लोकसंख्येच्या प्रमाणात ते अगदी किरकोळ होते. पण जे काही होते ते अर्थव्यवस्थेच्या नाडय़ा सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका असणारे होते. पुढे पहिलं महायुद्ध संपलं आणि त्याचं खापर जर्मनीच्या डोक्यावर फोडून इतर सर्वानी काखा वर केल्या. या फटक्यामुळे जर्मनीची आर्थिकदृष्टय़ा खूपच वाताहत झाली. प्रचंड चलनवाढ झाली. इतकी की जर्मन मार्कची किंमत एका डॉलरच्या तुलनेत ५० लाख इतकी झाली. म्हणजे एक डॉलर विकत घेण्यासाठी ५० लाख मार्क्‍स मोजावे लागत.     
या युद्धात ग्रेट ब्रिटननं रासायनिक अस्त्रांचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला. ते उत्तर होतं. जर्मनीनं विषारी वायू वापरून ब्रिटिश जवानांची हत्या केली होती. म्हणून ब्रिटननं विषारी रसायनं वापरली. त्यातली काही अशी होती की त्यांच्याशी संपर्क आल्यावर डोळय़ात शंभर सुया खुपसाव्यात इतक्या वेदना होत असत आणि तात्पुरतं अंधत्व येत असे. हे महायुद्ध शेवटच्या टप्प्यात असताना, १३ ऑक्टोबर १९१८ या दिवशी, ब्रिटिशांनी जर्मन सैनिकांवर रसायनास्त्राचा मारा केला. त्यात अनेक जायबंदी झाले. एका तरुणाची तर दृष्टीच गेली. त्याला इतक्या वेदना व्हायला लागल्या की त्याला जर्मनीत परत पाठवावं लागलं.    
या तरुणाचं नाव अ‍ॅडॉल्फ हिटलर. पहिल्या महायुद्धात तात्पुरतं अंधत्व पत्करावं लागलेल्या हिटलरनं दुसऱ्या महायुद्धात ‘अंदाधुंद’ हिंसाचार केला, हे आपल्याला ठाऊक असतंच. पण पहिल्या महायुद्धानं त्याला आंधळं केलं होतं.. हे नसतं माहीत आपल्याला.
तसंच ११ नोव्हेंबर १९८९ या दिवशी सुरू झालेल्या जर्मन एकत्रीकरणाचंही. या दिवशी बर्लिनची भिंत कोसळली आणि पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या विलीनीकरणाला सुरुवात झाली. आपण म्हणतो, विलीनीकरण झालं. पण काही जर्मन अभ्यासक म्हणतात आर्थिकदृष्टय़ा संपन्न पश्चिम जर्मनीनं पूर्व जर्मनीला गिळंकृत केलं. आकडेवारी दुर्दैवानं हे दर्शवते. पश्चिम जर्मनीच्या तुलनेत पूर्व अद्याप बरीच मागे पडलीये.
या वर्षी या सगळय़ा इतिहासाची उजळणी करायला हवी. ती केली तर एक गोष्ट नक्की कळेल. ती म्हणजे ऐतिहासिक सत्य म्हणून एकमेव, अंतिम असं काही नसतं. वर्तमानाप्रमाणे इतिहास हादेखील वाहता असतो. काळाच्या ओघात त्याचे नवनवे, अ-लक्षित घटक आपल्यासमोर येत असतात. त्यांना भिडण्याची आपली तयारी मात्र हवी. २०१४ सालात ही संधी आहे.        

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा