पाकिस्तानला स्थिर लोकशाही पचत नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे. आताही पुन्हा त्याच इतिहासाच्या पुनरावृत्तीकडे हा देश निघाला आहे. शरीफ सरकार विरुद्ध इम्रान खान यांचा पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ हा पक्ष असा सामना तेथे सध्या सुरू आहे. पाकिस्तानच्या स्थापना दिनाचा मुहूर्त साधून त्यांनी इस्लामाबादेत एका भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. शरीफ यांच्या बाजूने बाकीचे सगळे पक्ष सध्या तरी दिसत आहेत. तर इम्रान खान यांना धार्मिक नेते ताहिरूल काद्री यांनी पाठिंबा दिला आहे. हे काद्री म्हणजे बडे प्रस्थ असून ते सूफी पंथाचे आहेत. जिहादला दहशतवाद्यांच्या पकडीतून सोडविणे ही त्यांची धार्मिक-राजकीय भूमिका पाकिस्तानातील मध्यममार्गी विचारसरणीच्या नागरिकांना भावणारी आहे. त्यामुळे त्यांच्या पाकिस्तान अवामी तहरिक या संघटनेला या नागरिकांचा चांगलाच पाठिंबा दिसतो. २०१२च्या डिसेंबरमध्ये काद्री यांनी इस्लामाबादेत शासकीय भ्रष्टाचाराविरोधात भव्य मोर्चाची हाक दिली होती. त्याला केवळ ५० हजार लोक आले. मात्र आता तालिबानी दहशतवादाने पोळून निघालेल्या पाकिस्तानात काद्री यांची लोकप्रियता चांगलीच वाढल्याचे दिसून येते. त्यांनी इम्रान यांच्या इन्कलाब मोर्चाला पाठिंबा दिल्यामुळे शरीफ यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे चित्र दिसत आहे. तसे नसते तर शरीफ अन्य पक्षांचा पाठिंबा घेत बसले नसते. हा मोर्चा असफल व्हावा यासाठी शरीफ यांनी जणू सरकारची प्रतिष्ठाच पणाला लावल्याचेही दिसते. विरोधकांनी, विशेषत: काद्री यांनी ट्विटरवरून दिलेली माहिती आणि पाकिस्तानातील वृत्तपत्रांतील बातम्या यावरून शरीफ यांनी इस्लामाबादला अक्षरश: किल्ल्याचे स्वरूप दिले असून महत्त्वाच्या सर्व मार्गाची कडेकोट नाकेबंदी केली आहे. काही रस्त्यांवर तर मोठमोठे कंटेनर आडवे ठेवून वाहतूक अडविण्यात आली आहे. मोर्चा निघूच नये असे हे प्रयत्न आहेत; पण खरे तर या मोर्चातून इम्रान आणि काद्री यांना जे साध्य करायचे आहे ते आधीच होऊन बसले आहे. या मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय अल्पसंख्याक दिनाच्या निमित्ताने शरीफ यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. वास्तविक दोन दिवसांवर देशाचा स्थापना दिन आला असताना आणि त्यानिमित्ताने पंतप्रधान म्हणून ते राष्ट्राला संदेश देणार असताना त्यांना हे भाषण करण्याची आवश्यकता नव्हती, पण एकीकडे भारताकडून येणारे कडक संकेत आणि दुसरीकडे हा मोर्चा यामुळे बहुधा शरीफ यांना आपण किती ताठ कण्याचे आहोत हे दाखविण्याची गरज भासली असावी. त्यातून त्यांची हतबलता मात्र समोर आली. २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत बरेच गैरप्रकार झाले आणि त्यामुळे शरीफ सत्तेवर आले, असा इम्रान यांचा आरोप आहे. त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून चौकशी करण्याचे जाहीर करून शरीफ यांनी या विरोधाची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला; पण हे बैल गेल्यानंतर झोपा केल्यासारखे झाले. शिवाय हा मोर्चा आणि त्यापुढे काही प्रमाणात तुकलेले शरीफ यामुळे इम्रान हे अचानक शरीफ यांच्या समकक्ष नेते बनले. हा त्यांचा मोठाच लाभ म्हणायचा. या सर्व प्रकरणात लष्कराची भूमिका अजून स्पष्ट नाही. ती एवढय़ात होणारही नाही. मात्र काद्री यांच्यासारख्या अमेरिका-ब्रिटन आदी देशांच्या लाडक्या धार्मिक नेत्याच्या सहभागामुळे या आंदोलनाबाबत वेगळेच सवाल निर्माण झाले आहेत. इम्रान आणि काद्री यांच्या आंदोलनामागे कोणाचा हात आहे, असा प्रश्न खुद्द शरीफ यांनीही केला आहे. तो अ-राजकीय असेल, तर इम्रान आणि काद्री या जोडगोळीचे हेतू आणि लोकशाहीचे भवितव्य हे सारेच प्रश्नांकित होते; मात्र पाकिस्तानात एकूणच शरीफ कोण आणि बदमाश कोण हे ठरविणे अवघडच असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा