हेन्री डेव्हिड थोरो हा निसर्गवादी तत्त्ववेत्ता होता. ‘स्वावलंबी माणूस हा सर्वात आनंदी असतो,’ असे तो म्हणतो. पक्षी स्वत:चे अन्न स्वत: मिळवतात, स्वत:चे घरटे स्वत: बांधतात. हे करताना ते आनंदाने गात नाहीत काय? असा काव्यमय प्रश्न थोरो विचारतो. अशा थोरोच्या वडिलांचा शिसपेन्सिली बनवण्याचा कारखाना होता. त्यात लक्ष घालणारा थोरो वेगळा आहे. तेथे तो निर्मितीक्षम कलावंत तर आहेच, पण त्याचबरोबर कुशल तंत्रज्ञ म्हणजे इंजिनीअरही आहे. हेन्री पेट्रोस्की यांच्या ‘द पेन्सिल : अ हिस्ट्री’ या अप्रतिम पुस्तकात ‘इंजिनीअर वा तंत्रज्ञ म्हणजे काय रे भाऊ’, या प्रश्नाचा वेध घेताना थोरो कुटुंबावर एक स्वतंत्र प्रकरणच आहे. थोरोने अमेरिकन पेन्सिल उद्योगात केलेली सुधारणा लक्षणीय आहे.
माणसाच्या प्रगतीचा इतिहास हा त्याच्या जैविक वा मानसिक विकासाचा इतिहास नाही, तो तंत्रज्ञानाच्या विकासाचा इतिहास आहे. सर्व मानवनिर्मित गोष्टींची- मग त्या किती का लहान असेनात- निर्मिती कोणत्या तरी तंत्रावर अवलंबून असते. हाती जो कच्चा माल असतो, त्याच्यातून वस्तू निर्माण करायच्या असतात. त्याप्रमाणे हे तंत्र बदलावे लागते. नवीन तंत्राचा शोध घ्यावा लागतो, तो घडवावा लागतो, तो इंजिनीअर करावा लागतो. त्यामुळे हा बदल अत्यंत सावकाश होत असतो. इंजिनीअरिंग म्हणजे केवळ कोरडी गणिती करामत नसते, तर त्याला राजकीय, सामाजिक आणि त्या भागातल्या संस्कृतीचे पदर असतात. मागणी-पुरवठय़ाचे पेच असतात. त्यामागे आर्थिक गणितेही असतात. पेन्सिलीचा इतिहास सांगण्याच्या निमित्ताने या तंत्राचा आत्मा हेन्री पेट्रोस्की यांनी ‘द पेन्सिल : अ हिस्ट्री’ या पुस्तकात उलगडून सांगितला आहे.
वर्षांनुवर्षे वस्तू व त्या बनवण्याचे तंत्र यात मूलत: फार बदल नसतो, पण हे तंत्र सतत सुधारत जाणारे असते. रोम सम्राट सिसरोच्या मित्राने जेव्हा सम्राटाच्या घराच्या खिडक्यांबद्दल तक्रार केली तेव्हा सिसरोने त्याला लिहिले, ‘‘घराच्या खिडक्यांबद्दल तक्रार करणे म्हणजे घर बांधणाऱ्या इंजिनीअरच्या ज्ञान आणि कौशल्यासंबंधी शंका घेण्यासारखे आहे. त्या खिडक्या तशा का आहेत, याची पूर्ण कारणे त्याच्याकडे आहेत. अर्थात खिडक्या परिपूर्ण आहेत असे माझे म्हणणे नाही. तू सुचवलेल्या सुधारणा थोडय़ाशा रकमेत आणि सहज होण्यासारख्या असतील तर त्या मी जरूर करून घेईन, पण तू घेत असलेल्या सर्वच प्रमुख आक्षेपांना माझ्या तंत्रज्ञांकडे उत्तरे आहेत.’’ शिक्षणाने इंजिनीअर नसलेल्या सिसरोला इंजिनीअरिंगचे पूर्ण भान असल्याचे दिसते.
आज ज्या स्वरूपात आपण पेन्सिल पाहतो, साधारणत: तशा प्रकारची पेन्सिल अस्तित्वात आणणारी माणसे ही त्या क्षेत्रातली पुस्तकी पंडित नव्हती. ती सर्व कारागीर होती. काही सुतार होती. तंत्रज्ञानाचे नियम ते वापरत होते, पण ते त्यांना माहीत नव्हते. महिन्याकाठी टोपलीभर पेन्सिली बाजारात विकल्यामुळे त्यांची व बाजाराची गरज भागली जात होती, पण जशी मागणी व स्पर्धा वाढू लागली वा ठरावीक दर्जाचे लाकूड व शिसे उपलब्ध होईनासे झाले, त्या त्या वेळेला नवीन तंत्र शोधावे लागले.
थोरोचे उदाहरण लेखकाला महत्त्वाचे वाटते, कारण अशा प्रकारचे सर्जनशील व वेगवेगळे प्रयोग करणारे तंत्रज्ञ समाजाच्या सर्व थरांत मिसळत. ते कॉलेजात गेलेले असोत अगर नसोत, ज्ञानाच्या इतर शाखांमध्ये त्यांना रस व गती असे. त्यामुळे कलाकार, राजकारणी, वैज्ञानिक, लेखक, कवी यांच्या गटांमध्ये त्यांचा राबता असे. अशा लोकांबरोबर साधलेल्या संवादांमधून त्यांची इंजिनीअरिंगमधील निर्मिती क्षमता कमी होण्याऐवजी वाढत असे. चांगली पेन्सिल मिळू शकते, पण आदर्श अशी पेन्सिल अस्तित्वात असू शकत नाही याची जाणीव तंत्रज्ञाला असते. पण हाताशी असलेल्या सामग्रीतून थोडीशी का होईना पण अधिक चांगली पेन्सिल बनवल्यावाचून तो राहू शकत नाही. तो खरे तर वैज्ञानिक असतो, पण त्याची नाळ व्यापाराशी जोडलेली असते. त्याचे काम प्रयोगशाळेत नसून प्रत्यक्ष समाजात घडत असते. ‘विज्ञान, तंत्रज्ञान व व्यापार या तिघांना इंजिनीअर एकत्र आणतो. त्यामुळे सामाजिक क्रांतीचा तो अग्रदूत ठरतो,’ असे अर्थतज्ज्ञ व्हेब्लेनचा हवाला देत लेखकाने म्हटले आहे ते खरे आहे. एडिसन वा बिल गेट्स यांचे काम पाहिले, की या म्हणण्याची सत्यता ध्यानात येते. जगण्याची एक नवीन पद्धती या प्रतिभावंतांनी जगाला दिली आहे. अर्थात सर्व इंजिनीअर या गटात मोडत नाहीत, पण काही थोडे जण मात्र याच्या आसपास कधी ना कधी जाणता-अजाणता असतात.
या पुस्तकात पेन्सिल बनवण्याची फ्रेंचांनी शोधलेली ‘कॉन्ते’ पद्धत दिलेली आहे. कोहिनूर कंपनीने लिहिलेले ‘हाऊ पेन्सिल इज मेड?’ हे प्रकरणही दिलेले आहे, पण हा पुस्तकाचा गाभा नाही.
पेन्सिल बनवण्याचे तंत्र कसे विकसित होत गेले हे सांगता सांगता लेखक इंजिनीअरिंगच्या प्रेरणा व मर्यादा काय असतात, त्या आपल्या रोजच्या वापराच्या वस्तूमध्ये कशा उमटलेल्या दिसतात हे सांगतो. फाऊंटन पेन, बॉल पेन यांच्या तडाख्यातही पेन्सिलीने सहज तग धरला आहे. कॉम्प्युटर व वर्ड प्रोसेसिंगच्या जमान्यातही ती कदाचित तग धरून राहील असे दिसते. वॉल्ट डिस्ने घरात व ऑफिसमध्ये अनेक ठिकाणी पेन्सिली मुद्दाम ठेवे. कोठेही व केव्हाही कल्पना सुचली की भिंतीवर लगेच तो लिहून ठेवी. एडिसन स्वत:साठी खास लांबीने लहान असलेल्या पेन्सिली बनवून घेई. मोठय़ा पेन्सिली कोटाच्या खिशाच्या शिलाईत अडकतात अशी तक्रार करे. हेमिंग्वे लेखनाचा मूड बनवण्यासाठी पेन्सिली तासणे सुरू करे. रोज दोन पेन्सिली तरी लिहून संपवण्याचा त्याचा प्रयत्न असे.
या पुस्तकातले असे किस्से गमतीशार वाटतात, पण त्याचबरोबर हेही लक्षात येते की, हेन्री डेव्हिड थोरोची छाया पुस्तकभर पसरलेली आहे. ‘कोणताही मूर्ख माणूस नियम बनवू शकतो व कुठलाही मूर्ख त्यावर विचार करत बसतो,’ असे थोरोने ‘वाल्डन’मध्ये म्हटले आहे. उत्कृष्ट पेन्सिल बनवण्याचे नियम शोधताना तो पेन्सिलीच्या मागे नव्हता, तर त्याला ध्यास उत्कृष्टतेचा होता. असा थोरो इंजिनीअर नव्हता असे कोण म्हणेल?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टॉप  ५  फिक्शन
द अ‍ॅक्सिडेंटल अप्रेंटिस : विकास स्वरूप, पाने : ४४८३५० रुपये.
थ्रीट वेक्टर : टॉम क्लॅन्सी, पाने : ७२०५९९ रुपये.
बॉम्बे स्टोरीज : सदाअत हसन मंटो, पाने : ३२०३९९ रुपये.
द परफेक्ट होप : नोरा रॉबर्टस, पाने : ३३६५९९ रुपये.
असुरा : आनंद निलकांथन, पाने : ८००२५० रुपये.

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opretional history of pencil