शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर जाण्यात आणि शनीची भक्ती करण्यात एखादीला किंचितही रस नसेल, पण ‘स्त्री म्हणून अपवित्र’ मानून तिला तिथे जायला रोखले जात असेल तर त्या परंपरेला मात्र विरोध केलाच पाहिजे..

शनिशिंगणापूरच्या शनी मंदिरात महिलांना प्रवेशबंदी ही परंपरा असेल तर तो महिलांचा अपमान कसा, असा प्रश्न उपस्थित करून वंजारी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या आणि भाजप सरकारमधील महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी त्या प्रतिगामी विचारांच्या कट्टर प्रतिनिधी कशा आहेत हेच दाखवून दिले आहे. एखाद्या सरकारमधली मंत्रिपदावरची व्यक्ती एखादे विधान करते तेव्हा ती सरकारची भूमिका असतेच असे नाही, पण तरीही ती भूमिका राज्यकर्त्यांची विचारसरणी, मानसिकता, एकूण माहोल लक्षात येण्यासाठी पुरेशी असते. पंकजा यांनी ती अजाणता अधोरेखित केली इतकेच. येथे त्यांच्या वंजारी नेतृत्वाचा उल्लेख यासाठी की समाजाच्या विकासात आपला यथायोग्य वाटा मागणाऱ्यांच्या, समानतेची वागणूक मागणाऱ्यांच्या संघर्षांचे नेतृत्व करताना याच गोष्टींसाठी स्त्रियांचा संघर्ष आणखी धारदार असतो, असायला हवा याचे भान पंकजा यांना असणे अपेक्षित होते. पण ‘माझ्या जन्माच्या आधीपासूनच स्त्रियांना शनी मंदिरात जायला बंदी आहे, हा परंपरेचा प्रश्न आहे, त्यात मानापमान कशाला मानायचा, शनी मंदिरात जायचा हट्ट कशाला,’ अशी विधाने करून त्यांनी सनातनी, परंपरावाद्यांच्या वळचणीला जात त्यांचेच हात अधिक बळकट करण्याचा प्रयत्न चालविला आहे. शनी मंदिराच्या चौथऱ्यावर जाऊन एका महिलेने तो अपवित्र, अशुद्ध केला, आता दुधाचा अभिषेक करून आम्ही तो शुद्ध करतो असे म्हणणारे, तसे प्रत्यक्ष करणारे सनातनी, परंपरावादी हे शेकडो वर्षे चालत आलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीचे पाईक आहेत आणि महाराष्ट्रात महिलांच्या खात्याच्या मंत्रीच परंपरेला प्रिय असलेली भाषा बोलून तिला खतपाणी घालीत आहेत, हा तर शनी मंदिर प्रवेशबंदीपेक्षाही स्त्रियांचा जास्त मोठा अपमान आहे. या चौथऱ्यावर स्त्रियांनी जायचे नाही, कारण त्या दुय्यम आहेत. कारण त्यांना मासिक पाळी येते आणि त्यामुळे त्या अपवित्र, अशुद्ध ठरतात. हा स्त्रियांना दुय्यम स्थान देणारा, त्यांना जखडून ठेवणारा पुरुषी विचार आहे. शतकानुशतके तो घोकून तोच बरोबर आहे हे स्त्रियांच्या मनावर ठसवले गेले आहे. त्या माध्यमातून परंपरांचे ओझे स्त्रीच्या मानेवर ठेवून संस्कृतिरक्षक त्यांना बजावत आले आहेत की हाच आमचा धर्म, याच आमच्या परंपरा, याच आमच्या निष्ठा, हीच आमची संस्कृती. तिला आव्हान द्याल तर आम्ही तुम्हाला संपवू शकतो, हे टोक गाठण्याचा सनातन मार्ग कसा असू शकतो, याचीही उदाहरणे ताजीच आहेत. परत या सगळ्या प्रथा-परंपरा देवाधर्माशी जोडलेल्या. त्यामुळे त्यापुढे मान तुकवत, त्या स्वीकारत स्त्रियाही पुरुषप्रधान संस्कृतीला हवा असतो तसाच विचार करताना दिसतात. अशा अनेक विचारांतील विसंगतीही कुणाच्या लक्षात येत नाही. शनिशिंगणापूरचा चौथरा दुधाचा अभिषेक घालून शुद्ध केला. ते दूध काय कुणा पुरुषाने दिले होते की काय? तेही गाईचे किंवा म्हशीचेच असणार. म्हणजे तीही प्राण्यांमधील स्त्री जातच. स्त्रीच्या मासिक पाळीला अशुद्ध समजणाऱ्यांना शुद्धीकरणासाठी गोमूत्र म्हणजे प्राण्यांमधल्या स्त्री जातीचे मूत्र लागते, हे तर अजबच. एकीकडे स्त्रियांच्या मातृत्वाचा सन्मान म्हणून त्यांना देवी वगैरे मानायचे आणि मातृत्वाशी संबंधित तो स्राव मात्र अशुद्ध ठरवायचा? अशा अनेक विसंगती आहेत. त्या पुरुषप्रधान व्यवस्थेचा आधार आहेत, म्हणून टिकविल्या गेल्या आहेत. पण परंपरा आहे म्हणून ती बरोबरच आहे असे या व्यवस्थेतील शोषितांनी तरी मानायची आवश्यकता नाही. त्या निखालस चुकीच्या आहेत, वाईट आहेत म्हणून त्यांना विरोध केला पाहिजे हे आणि त्याचबरोबर आणखी काही गोष्टी या परंपराग्रस्तांनी समजून घ्यायची गरज आहे. महिलांना प्रवेशबंदी हा महिलांचा अपमान कसा, असा प्रश्न पंकजा यांना पडला आहे. काही प्रश्न असे असतात की त्यांची उत्तरेच समाजाला नको असतात. कारण ती उत्तरे समाजाच्या मान्यतांना, धारणांना धक्का देणारी असतात. हा प्रश्न त्यातलाच. वस्तुत: पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत निसर्गाने स्त्रीला एक महत्त्वाची भूमिका बहाल केली आहे. मासिक पाळी हा त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. ती येते म्हणून स्त्रीला अशुद्ध समजणे, पवित्र मानल्या जाणाऱ्या ठिकाणी जायला तिला बंदी घालणे हा निसर्गाच्या त्या प्रक्रियेचा, त्यातील स्त्रीच्या भूमिकेचा अपमान आहे. तो अशा रूढी-परंपरांचा आधार घेऊन केला जातो. आपल्या जन्माच्या आधीपासून त्या रूढी-परंपरा सुरू आहेत, हे काही त्यांच्या योग्यतेचे कारण नाही. तसे मानणारांना आपल्याकडे प्रतिगामी म्हटले जाते. आपल्या जन्माच्या आधीपासून स्त्रियांना शिकणे, घराबाहेर पडणे ही परंपरा नव्हतीच. महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या निदिध्यासामुळे या देशातल्या स्त्रिया शिकायला लागल्या आणि पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभाध्यक्षपदापर्यंत पोहोचल्या. आज स्वत: पंकजाही जिथे आहेत तिथे त्यांना पोहोचता आले याचे कारण आपल्या पूर्वसुरींनी स्त्रियांना जखडून ठेवणाऱ्या रूढी-परंपरा मोडल्या. नंतरच्या काळात स्त्रीवादी चळवळीनेही आपल्या संघर्षांतून यासाठीचा अवकाश निर्माण केला. आपण त्याचीच फळे चाखत आहोत आणि ते करताना ती फळे देणाऱ्या विचारांच्या फांद्याच छाटण्याचे दुष्कृत्य तर करीत नाही ना, याचे भान निदान पंकजा यांच्यासारख्या मंत्रिपदावरच्या व्यक्तीने बाळगणे आवश्यक आहे.
पण चूक एकटय़ा पंकजा यांचीही नाही. हे भान समाजातील असंख्य शिकल्यासवरलेल्या स्त्रियांनाही नसते. त्यामुळे त्यासुद्धा परंपरा आहे म्हणून विविध गोष्टींपुढे मान तुकवत राहतात. हे इतके बेमालूम असते की त्यातून आपण स्त्रीविरोधी आणि पुरुषधार्जिणी भूमिका घेतो आहोत हेही त्यांना आकळत नसते. स्त्रियांशी संबंधित असंख्य मोबाइली विनोद पुढे धाडणाऱ्या किंवा ‘मी काही तथाकथित फेमिनिस्ट नाही’ असे म्हणत परंपरांचे समर्थन करणाऱ्या उच्चशिक्षित, चांगली नोकरी वगैरे करीत स्वत:ला स्वतंत्र मानणाऱ्या स्त्रिया अशांपैकीच. एखादी महिलाच जर स्वत:ला स्त्रीवादी मानत नसेल तर पुरुषांनी स्त्रियांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने बघावे अशी अपेक्षा कशी करता येईल? मुळात स्त्रीवादी असणे म्हणजे काय हे येथे नीट समजून घेतले पाहिजे. त्याचा साधा अर्थ एवढाच आहे, की स्त्रियांना सर्व पातळ्यांवर समान वागणूक मिळावी. आता त्यात वाईट काय आहे? तशी भूमिका नसते तेव्हाच ‘बाईच बाईची शत्रू’ पद्धतीची गृहीतके घट्ट रुजत जातात. स्त्रिया एकमेकींमध्ये भांडत राहतात आणि पुरुषप्रधान व्यवस्था त्याची मौज लुटत राहते. वास्तविक स्त्री आणि पुरुष हे जगातील सगळ्यात मूलभूत ‘राजकीय नाते’ आहे! एकत्र तर राहायचे आहे, पण आपापले हितसंबंधही पुढे रेटायचे आहेत. या राजकारणात शेकडो वर्षे पुरुषांना आपले पारडे झुकते ठेवण्यात आणि परंपरांच्या संमोहनाखाली स्त्रियांना दबायला लावून त्यांचे स्थान दुय्यम ठेवण्यात यश मिळाले. शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर जाण्यात आणि शनीची भक्ती करण्यात एखादीला किंचितही रस नसेल, पण स्त्री म्हणून अपवित्र मानून तिला तिथे जायला रोखले जात असेल तर त्या परंपरेला मात्र विरोध केलाच पाहिजे.
कारण हा एखाद्या प्रथेपुरता मर्यादित प्रश्न नाही. तो शेकडो वर्षांच्या अपमानाशी निगडित आहे. त्याची प्रतीके असलेल्या परंपरा कितीही निरुपद्रवी वाटल्या तरी त्यांचे संमोहन झुगारून देण्यातच समाजाचे हित आहे.

Story img Loader