दादासाहेबांच्या मोबाइलमधील त्या हत्यारांकडे सर्वचजण निरखून पाहात होते आणि दादासाहेब त्यांची नावं आणि त्यांचा उपयोग सांगत होते..
कर्मेद्र – हत्यारं म्हणालात तेव्हा माझ्या डोळ्यासमोर वेगळीच हत्यारं आली.. इतकी नाजूक हत्यारं..
दादासाहेब – अहो हत्यारं म्हणा, साधनं म्हणा, उपकरणं म्हणा.. सोनारकाम कसं अगदी नाजूक असतं.. दागिन्याची घडण, त्यावरची नक्षी सगळ्यात एक नाजूकपणा असतो.. त्यामुळे ही हत्यारंही तशीच आहेत.. पण सोनं घडवावं लागतं.. आधी भट्टीतून काढावं लागतं.. इथे आपला हा अभंग खऱ्या अर्थानं सुरू होतो.. हृदयेंद्र पुन्हा वाचा जरा तो अभंग..
हृदयेंद्र – देवा तुझा मी सोनार। तुझे नामाचा व्यवहार।। देह बागेसरी जाणे। अंतरात्मा नाम सोने।। त्रिगुणाची करुनी मूस। आंत ओतिला ब्रह्मरस।।
दादासाहेब – बस.. बस.. आता या ओळींचा अर्थ घ्या.. पहिल्या चरणाचा अर्थ काय होता?
हृदयेंद्र – देवा मी तुझा सोनार आहे आणि तुझ्या नामानं जगणं भरून टाकण्याचा व्यवहार ठरला आहे!
दादासाहेब – थोडा आणखी विचार करा बरं.. सोनाराकडं माणूस येतो ते दागिना घडवायला येतो की सोनं घडवायला?
योगेंद्र – अर्थात दागिना!
दादासाहेब – हा दागिना मात्र असतो सोन्याचा बरं का! मग तो घरातलं जुनं सोनं आणतो किंवा नवं सोनं आणतो आणि ते सोनाराकडे देतो.. तसं इथे सोनं दिलं गेलंय आणि दागिना घडवायचा आहे तो जीवनाचा!
ज्ञानेंद्र – व्वा! जीवनाचा दागिना!!
दादासाहेब – तो घडवण्यासाठी सोनं कुठलं आहे?
हृदयेंद्र – अंतरात्मा नाम सोने! म्हणजे नामानं भरलेलं अंत:करण हेच सोनं आहे!!
दादासाहेब – पहा! अंतरात्मा आणि अंत:करण यांना आपण एकच मानतो. आपल्याला आत्मरूपाचा अनुभव नसतो, अंत:करणाचा असतो. अंत:करण तुमच्या चर्चेनुसार ‘मी’पणानं मलीन असतं. जसं हिणकस सोनं.. ते शुद्ध झालं की मुळातलं आत्मस्वरूप प्रकटतंच! पण त्याकडे नंतर वळू..
हृदयेंद्र – हो.. खरंच किती सूक्ष्म भेद आहे!
दादासाहेब – आता दुसरी फसगत ‘नाम’ शब्दानं होते. इथे ‘अंतरात्मा नाम सोने’मध्ये ‘नाम’चा अर्थ ‘भगवंताचं नाम’ असा न घेता ‘म्हणजे’ असा घेतला की लख्ख उमगतं पाहा! हे देवा आत्मरूपी सोनं तू दिलं आहेस आणि त्यातून मी जीवनाचा दागिना घडवणार आहे!
योगेंद्र – ओहो.. पण हे बागेसरी म्हणजे काय हो?
दादासाहेब – बागेसरी म्हणजे सोनं तापवायचं भांडं.. भट्टी म्हणा हवं तर! थांबा तुम्हाला कागदावर काढून दाखवतो.. (ज्ञानेंद्रनं तत्परतेनं कागद आणि पेन दिलं. दादासाहेबांनी काढलेलं चित्र सर्वजण निरखत होते..) यात मधोमध तिरक्या आकारात खाली जाणारं जे छोटं पात्र दिसतंय ना, ती मूस आहे बरं का! बागेसरीत कोळसे असतात आणि मुशीत सोनं असतं. ते वितळत गेलं की लगड बनवण्याची प्रक्रिया नंतर होते..
ज्ञानेंद्र – बागेसरी हा शब्द नेमका कसा आला?
दादासाहेब – देवी वागेश्वरीवरून हे नाव पडलं, असंही मानलं जातं. आता ‘देह बागेसरी जाणे’ मध्ये काय खोल अर्थ आहे पाहा! देहाच्या भट्टीत त्रिगुणाची मूस आहे, मुशीत आत्मरूपी सोनं आहे! त्यानं जीवनाचा दागिना घडवायचा आहे!
हृदयेंद्र – वा.. आयुष्यात प्रथमच या अभंगाचा खरा अर्थ समजणार आहे!
चैतन्य प्रेम
९०. भट्टी
दादासाहेबांच्या मोबाइलमधील त्या हत्यारांकडे सर्वचजण निरखून पाहात होते आणि दादासाहेब त्यांची नावं आणि त्यांचा उपयोग सांगत होते..
आणखी वाचा
First published on: 08-05-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oven