माधव भांडारी
महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते
पश्चिम महाराष्ट्रातील सहकार चळवळीतून उभी राहिलेली घराणी भाजपकडे येताहेत, ही केवळ राजकीय पळापळ नसून महाराष्ट्रातील राजकीय पोत बदलण्याची व दूरगामी परिणाम करणारी प्रक्रिया आहे..
केवळ सत्तेबरोबर राहणे असे नाही तर आपापल्या भागातील जनतेबरोबर राहणे हीसुद्धा जिवंत राजकीय कार्यकर्त्यांची प्राथमिक प्रेरणा आणि गरज असते!
लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी सुरू झाल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मातबर नेते अथवा त्यांच्या पुढच्या पिढय़ांमधले तरुण भाजपमध्ये सामील होत आहेत. काही राजकीय समीक्षक व प्रसारमाध्यमांमधील एक वर्ग या घटनांना ‘तोडफोडीचे राजकारण’ असे संबोधून त्याबद्दल भाजपवर कडवट टीका करीत आहेत. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेली टीका समजू शकतो, परंतु राजकीय समीक्षकांनी या पद्धतीने टीका करणे अनाकलनीय आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात घडत असलेल्या या घडामोडींकडे केवळ फोडाफोडीचे राजकारण म्हणून बघता येणार नाही. महाराष्ट्रातील राजकारणाचा व समाजकारणाचा पोत २०१४ पासून बदलायला लागला होता, ती प्रक्रिया या निवडणुकीत पूर्ण होत असल्याचे हे लक्षण आहे.
महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. देशाच्या बहुतेक सर्व भागांनी कधी ना कधी काँग्रेसपासून फारकत घेतली, पण महाराष्ट्र मात्र १९९५ चा अपवाद वगळता काँग्रेसच सत्तेवर राहिली. १९७८ मध्ये थोडय़ा काळासाठी आलेले पुलोद सरकार हेसुद्धा काही थोडय़ा बिगरकाँग्रेसी नेत्यांना जागा देऊन स्थापन झालेले काँग्रेसी सरकारच होते. १९९५ मध्ये सेना-भाजप युतीचे सरकार आले तरी त्या सरकारलाही बंडखोर काँग्रेसी आमदारांचा टेकू होताच आणि हे काँग्रेसचे आमदार १९९९ मध्ये स्वगृही परत गेले. २०१४ मध्ये पहिल्यांदा खऱ्या अर्थाने बिगरकाँग्रेसी सरकार महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून आजपर्यंत सत्तेत आलेल्या सरकारांपैकी हे पहिले मंत्रिमंडळ होते की ज्यात एकही काँग्रेसी व्यक्ती मंत्री म्हणून नव्हती. महाराष्ट्राच्या राजकीय प्रवाहाने दिशा बदलल्याचे हे पहिले प्रत्यंतर होते. १९७२ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र काँग्रेसला ७५ टक्क्यांच्या वर मते मिळाली होती आणि त्या निवडणुकीत जनसंघाला केवळ ४.७५ टक्के मते मिळाली होती. त्यानंतर ४२ वर्षांनी जेव्हा भाजप सत्तेत आली तेव्हा भाजपला २८ टक्के मते मिळाली होती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या मतांची एकत्रित टक्केवारी ३४ टक्के होती. पण त्यानंतर गेल्या चार वर्षांमध्ये राज्यात झालेल्या सर्व शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर ३५ टक्क्यांच्या वर मते मिळवली तर त्याच वेळेला काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्रित टक्केवारी ३० टक्क्यांच्या आसपास घसरली. या पार्श्वभूमीवर सध्याच्या घडामोडींचा अन्वयार्थ तपासला पाहिजे.
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर नगरचे विखे पाटील, सोलापूरचे मोहिते पाटील, वाईचे मदन भोसले, फलटणचे नाईक निंबाळकर, नाशिक जिल्ह्य़ातल्या ए.टी.पवार या घराण्यांमधून नव्या पिढीतल्या तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण ही प्रक्रिया २०१४ मध्येच सुरू झाली होती. कराडच्या कै. यशवंतराव मोहितेंचे नातू डॉ.अतुल भोसले, पंढरपूरचे परिचारक, नंदुरबारचे गावित, सांगलीचे संजयकाका पाटील यांच्यासारखे अनेक जण २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या आगेमागेच भाजपमध्ये सामील झाले होते. तेव्हापासून सुरू झालेली ही प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आलेली दिसते. कै. वसंतदादा पाटलांचे नातू प्रतीक पाटील ते अब्दुल सत्तार यांच्यापर्यंतचे नेते काँग्रेसला रामराम ठोकत आहेत. ही केवळ सत्ता मिळविण्याची धडपड आहे असे मानणे योग्य होणार नाही. त्यापेक्षाही अधिक राजकीय आणि सामाजिक वास्तव या घटनांच्या मागे आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात काँग्रेस स्वातंत्र्य चळवळीपासून रुजलेली होती. स्वातंत्र्यानंतर याच काँग्रेस नेतृत्वाने महाराष्ट्र सहकार चळवळीचा पाया घातला. शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील जनतेला ऊस व दूध या दोन क्षेत्रांमध्ये व्यवसाय उभे करण्याची संधी सहकार चळवळीने दिली. त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये चांगलीच सुबत्ता आली आणि या सहकाराच्या माध्यमातूनच ही नवी घराणी जन्माला आली. विखे पाटील, मोहिते पाटील, मोहिते-भोसले, नाईक निंबाळकर यांच्यासारखी घराणी ही सहकार चळवळीतून उभी राहिली. कै.वसंतदादा पाटील, कै. विठ्ठलराव विखे पाटील, कै. शंकरराव मोहिते पाटील, कै.यशवंतराव मोहिते, कै.प्रतापराव भोसले ही सर्व नावे ५० वर्षांपूर्वीच्या सामान्य कार्यकर्त्यांमधीलच नावे होती. सहकार चळवळ उभी करता करता या सर्वानी काँग्रेसही बळकट केली. त्यांच्या परिश्रमांचा परिणाम १९७२ च्या निवडणुकीत पाहायला मिळाला होता. हे व यांच्यासारखे सर्व काँग्रेसी नेते जनतेशी नाळ जोडलेले नेते होते. समाजातल्या सर्व थरांतल्या माणसांशी त्यांचा जिवंत संबंध होता. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये चालणाऱ्या घुसळणीचे पूर्ण भान त्यांना नेहमी असायचे. महाराष्ट्राचा राजकीय पोत हा सामाजिक जडणघडणीच्या आधारे घडलेला होता. ग्रामीण महाराष्ट्र बारा बलुतेदारांची मांडणी आणि व्यवस्था व त्यातून निर्माण झालेली सामाजिक घडण बहुतांशी परिणामकारकरीत्या अस्तित्वात होती आणि या जडणघडणीचे पूर्ण भान त्या नेतृत्वाला होते. बारा बलुतेदारांना सांभाळून, त्यांचा योग्य मान राखून त्यांना बरोबर घेऊन चालण्याचे कौशल्य त्या नेतृत्वाकडे होते. त्याचा परिणाम व प्रभाव राजकारणात दिसत होता.
१९९० नंतर ही परिस्थिती बदलू लागली. अनेक कारणांनी तत्कालीन काँग्रेस नेतृत्व आत्ममग्न आणि स्वसंतुष्ट झाले. समाजाच्या वेगवेगळ्या थरांतील समूहांबरोबर असलेला त्यांचा संबंध कृत्रिम आणि वरपांगी होऊ लागला. त्यातून त्यांचे सामाजिक वास्तवाचे भान सुटत चालले. याच काळात भाजपने जाणीवपूर्वक प्रयत्न करून बहुजन समाजामध्ये शिरकाव केला. काँग्रेसने ज्या सामाजिक समूहांच्या राजकीय आकांक्षांना प्रतिसाद दिला नव्हता त्या समूहांना आपल्याशी जोडून घेण्यात भाजपने यश मिळवले होते. देशातले बदललेले राजकीय वास्तव आणि राज्यातील बदलणारी सामाजिक घडी यांची योग्य सांगड घालण्यात भाजपने यश मिळवले. म्हणूनच २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले.
आज राज्यातल्या बहुजन समाजातील तरुणवर्गाला भाजप हा आपला पक्ष वाटतो. सुधारित जीवनशैलीच्या आकांक्षा बाळगणाऱ्या सर्व समूहांना नरेंद्र मोदी हे आपले प्रतिनिधी व नेते वाटतात. म्हणूनच केवळ लोकसभा व विधानसभाच नव्हे तर अगदी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदांपर्यंत आणि नगरपंचायतीपासून महापालिकांपर्यंत महाराष्ट्रातील मतदारांनी भाजपला पसंती दिली. काँग्रेसच्या विद्यमान नेतृत्वाचा – ते राष्ट्रीय असो किंवा राज्यातले असो – जनतेशी जिवंत संबंध उरलेला नाही. त्यामुळे हे वास्तव त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पण जनतेबरोबर असलेले जे नेते, कार्यकत्रे आहेत त्यांना या वास्तवाचे पूर्ण भान आहे. केवळ सत्तेबरोबर राहणे असे नाही तर आपापल्या भागातील जनतेबरोबर राहणे हीसुद्धा जिवंत राजकीय कार्यकर्त्यांची प्राथमिक प्रेरणा आणि गरज असते. आपल्या भागातील जनतेच्या प्रवाहामध्ये राहणे हा त्यातील अभिप्राय असतो. या प्राथमिक प्रेरणेला प्रतिसाद देऊन जागोजागचे हे स्थानिक नेते भाजपकडे येत आहेत, आपल्या परिसरातील प्रभावी राजकीय प्रवाहाबरोबर राहण्याचा निर्णय ते घेत आहेत.
ही केवळ राजकीय पळापळ नसून महाराष्ट्रातील राजकीय पोत बदलण्याची व दूरगामी परिणाम करणारी प्रक्रिया आहे हे लक्षात घेतले पाहिजे.