प्रकाश जावडेकर (भाजपचे राज्यसभा सदस्य व माजी केंद्रीय मंत्री )
‘संसदेत केंद्रीय मंत्री निवेदन करीत असताना त्यांच्या हातातील कागद हिसकावून विरोधकांनी ते फाडले’.. ‘जड बॅग खुर्चीच्या दिशेने भिरकावली’.. ‘मोबाइलने काच फोडली’.. या साऱ्यामागे विद्यमान सत्ताधारी पक्षाला विरोध करायचा आणि संसदेत चर्चा होऊच नये यासाठी प्रयत्न करायचे एवढाच हेतू असल्याची शंका घेणारे टिपण..
नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात विरोधी पक्षांनी राज्यसभेत ज्या प्रकारे संसदीय लोकशाहीवर हल्ला केला तसा हल्ला मी यापूर्वी कधीही पाहिलेला नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून राज्य आणि केंद्रातील माझ्या २४ वर्षांच्या कारकीर्दीत असा प्रकार मी यापूर्वी कधीही अनुभवलेला नाही. याचा बारकाईने विचार केला तर संसदेच्या कामकाजात अशा प्रकारे व्यत्यय आणायचा आणि काम करू द्यायचे नाही यासाठी पूर्वनियोजित कुटिल डाव रचण्यात आला होता, अशी माझी पूर्ण खात्री झाली आहे. एक प्रकारे विरोधी पक्षांच्या डावपेचांचा हा भाग होता. हा गोंधळ पूर्वनियोजित होता. प्रत्यक्षात हे विरोधकांचे ‘टूलकिट-३’ होते.
विरोधकांना नक्की काय हवे होते? पेगॅसस आणि शेतकऱ्यांच्या मुद्दय़ांवर चर्चेची त्यांची मागणी होती. संसदेत कोणत्याही मुद्दय़ावर शांततेत चर्चा करण्याची तयारी असल्याची सरकारने घोषणा केली. आता या पार्श्वभूमीवर विरोधकांनी काय केले ते जरा पाहू या.
मंत्र्यांच्या हातातून कागद हिसकावले!
पेगॅससविषयी सरकारने स्वत:हून निवेदन केले. मात्र, मंत्र्यांना हे निवेदन वाचू देण्यात आले नाही. त्यांच्या हातातून कागद हिसकावून घेण्यात आले आणि ते फाडून टाकण्यात आले आणि त्यानंतर विरोधी सदस्यांनी सभापतींच्या समोरच्या मोकळ्या जागेत येऊन प्रचंड गोंधळ घातला आणि घोषणाबाजी केली. खरे तर या मुद्दय़ावर एखादा प्रश्न उपस्थित करण्याची आणि त्याबाबत स्पष्टीकरण मागण्याची संधी विरोधकांना निर्माण झाली होती. पण त्यांना तसे काहीही करायचेच नव्हते याची मला पक्की खात्री आहे.
संसदेत व्यत्यय आणायचा आणि सरकारला काम करू द्यायचे नाही हाच त्यांचा उद्देश होता.
विरोधकांना हवा असलेला दुसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचा, ज्यावर त्यांना चर्चा करायची होती. सभागृहाच्या कामकाज पत्रिकेत चर्चेची वेळ निश्चित झाल्यानंतर, अगदी प्रारंभापासूनच विरोधकांनी चर्चेत अजिबात भाग घेतला नाही; कारण नवीन तिन्ही कृषी कायद्यांत कोणते दोष आहेत ते त्यांना दाखवता येणार नाहीत हे त्यांना पक्के ठाऊक होते.
त्यानंतर जे घडले त्याची कल्पनाही करता येणार नाही. सदस्यांनी कागद भिरकावले. त्यांनी प्रचंड गोंगाट केला. दोन सदस्यांनी सचिवांच्या टेबलाकडे धाव घेतली आणि एका सदस्याने तर एक जड बॅग खुर्चीच्या दिशेने फेकली. असा प्रकार यापूर्वी संसदेत घडलेला नाही.
यातून खरे तर एकच गोष्ट सिद्ध होते आणि ती म्हणजे विरोधकांचे केवळ एकमेव उद्दिष्ट होते आणि ते होते, ‘संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणणे’.
मी पाहिलेले प्रकार
विरोधकांनी कोणते प्रकार केले त्यापैकी काहींची माहिती मी देत आहे. ज्या वेळी काही सदस्यांना त्यांच्या उपद्रवी वर्तनाबद्दल निलंबित करण्यात आले, ते सदस्य सभागृहाचे कामकाज स्थगित झाल्यानंतर पुन्हा सभागृहात दाखल झाले. ज्या वेळी सुरक्षारक्षक सभागृहाचे निर्जंतुकीकरणाची तयारी करत होते, त्या वेळी या सदस्यांनी त्यांच्या मोबाइल फोनने काचेचे पॅनेल फोडले, यामध्ये एक महिला सुरक्षारक्षक जखमी झाली. सभागृहात दररोज पोलिसांप्रमाणे शिटय़ा वाजवल्या जात होत्या, याची तुम्ही कल्पना तरी करू शकाल का? शेवटच्या दिवशी सर्वात वाईट दृश्य पाहायला मिळाले. ज्या वेळी सभागृहात विमा विधेयकावर चर्चा होत होती, त्या वेळी अनेक महिला सदस्यांनी तर महिला मार्शलना धक्काबुक्की केली. या घटनेनंतर तर विरोधकांकडून सभापतींची खिल्ली उडवली जात असल्याचे दृश्य तर अतिशय चीड आणणारे होते. विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी सचिवांच्या टेबलावरील फायली उचलल्या आणि त्या फाडल्या आणि भिरकावल्या.
सदनात जे काही घडले, त्याबद्दल भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांना आपली वेदना आणि व्यथा व्यक्त करताना अवघ्या देशाने पाहिले आहे.
त्यांनी साश्रुनयनांनी थरथरत्या स्वरात उच्चारलेल्या शब्दांतून संपूर्ण देशाची व्यथा आणि दु:ख व्यक्त झाले. ‘‘आपल्या लोकशाहीच्या या मंदिरातील अशा अपवित्र कृत्यातून ध्वनित होणाऱ्या अर्थाची आणि परिणामांची कल्पना केली तरी माझा थरकाप होतो,’’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
निषेध केलाच पाहिजे!
सदनातील सर्व सत्रांना मीही उपस्थित होतो. तेथे जे काही घडले, त्याची नोंद मी घेतली आहे आणि जे काही घडले त्याचा मी साक्षीदार आहे. विरोधी खासदारांचे असे वर्तन अस्वीकारार्ह आहे, ते कोणत्याही परंपरेला धरून नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे असे वर्तन हे सभागृहाची वैधानिकता, सभागृहाची सभ्यता आणि संसदीय नैतिकतेला धरून नाही.
या संपूर्ण गोंधळाचा मूळ उद्देश लक्षात घेऊ या. सदनात आम्ही दररोज ‘मोदी हटाओ’ या घोषणा ऐकल्या. २०१४ साली विरोधक अपयशी ठरले आणि २०१९ मध्येही त्यांना यश मिळाले नाही. ते त्यांना निवडणुकीत हरवू शकणार नाहीत. त्यामुळे ते हतबल झाले आहेत. विरोधकांच्या या वर्तनातून त्यांचा उद्वेग दिसून आला. अशा प्रकारे घोषणाबाजी करून ते मोदींना पराभूत करू शकत नाहीत आणि अशा नाटकी वागण्याने लोकांची मनेही जिंकू शकत नाहीत. आता या देशातील नागरिक संतापले आहेत आणि ते अशा उपद्रवी वर्तनाच्या विरोधात आहेत. संसदीय लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक समंजस व्यक्तीने अशा बाबींचा निषेध केलाच पाहिजे.