भाजपचे राज्यसभेतील खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री : प्रकाश जावडेकर

मुख्यमंत्रिपदावर सलग १३ वर्षे आणि त्यानंतर लगेचच पंतप्रधानपदावर सात वर्षे अशी एकूण सलग २० वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रवर्ती स्थानी आहेत. लोकांनी दाखवलेला विश्वास हेच त्यांच्या या यशाचे गमक आहे.

नुकताच म्हणजे १७ सप्टेंबर २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१ वा वाढदिवस झाला. आता थोड्याच दिवसांत म्हणजे ६ ऑक्टोबर रोजी त्यांच्या लोकप्रतिनिधीच्या या नात्याने राजकीय नेतृत्वाच्या कारकीर्दीला सलग २० वर्षे पूर्ण होतील. हा एक विक्रमच आहे. ते सलग १३ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते. आणि गेली सलग सात वर्षे ते जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. मुख्यमंत्री म्हणून राज्यातील तसेच पंतप्रधान म्हणून केंद्रातील सरकारचे सलग २० वर्षे नेतृत्व करण्याचा त्यांचा हा पराक्रम म्हणजे नशिबाचा भाग नाही तर वेगळ्या पद्धतीने विचार आणि कृती करणाऱ्या त्यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्यावर लोकांनी दाखवलेल्या विश्वासाचा परिणाम आहे.

नीतिमत्ता, सचोटी वादातीत

आपल्या देशाचे प्रश्न सोडवू शकेल, अशी खात्री असते अशाच नेत्याच्या हातात लोक अशा प्रकारे सलग सत्ता देतात. एखाद्या कुटुंबाने पक्ष ताब्यात घेऊन चालवलेली सरकारे भारतीय लोकांनी बघितली आहेत. आता आपल्या देशाला असा पंतप्रधान लाभला आहे जो असे मानतो की सगळा देशच त्याचे कुटुंब आहे. आणि सगळ्या देशालाच पुढे घेऊन जाण्यासाठी तो अथक प्रयत्न करतो आहे. स्वार्थाने बरबटलेल्या आधीच्या राजवटींचा लोकांनी अनुभव घेतला आहे. मोदी मात्र देशाला प्राधान्य देतात. त्यांचा प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता, सचोटी वादातीत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप होत नाही आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी सरकारच्या राज्यकारभारात पारदर्शकता आणली आहे. त्यांच्या या गुणवैशिष्ट्यांमुळेच भारतीय मतदारांनी इतर कुणालाही नाही, तर त्यांना प्राधान्य दिले आहे.

कोणत्याही लोकशाहीवादी नेत्याच्या दृष्टीने लोकांचे म्हणणे, लोकांचे मत ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. जागतिक पातळीवरील सर्व लोकमत चाचण्या तसेच सर्वेक्षणांमध्ये मोदींना कायमच वरचे स्थान मिळाले आहे. लोक त्यांच्यावर किती प्रेम करतात याचा मी स्वत: वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनुभव घेतला आहे. राजस्थानमधल्या बारमेर जिल्ह्यामधल्या एका तरुणाने मला सांगितले की, पाकिस्तानातून पाठवले गेलेले आपल्या सैनिकांचे मृतदेह आम्ही बघितले आहे. पण पाकिस्तानने ताब्यात घेतलेला आपला सैनिक ४८ तासांमध्ये परत येईल याची खात्री देणारा पंतप्रधान आम्ही पहिल्यांदाच पाहतो आहोत. एका शेतमजूर स्त्रीने मला सांगितले की, तिच्यासारखे लोक मोदींना प्राधान्य देतात कारण मोदी अगदी सामान्य परिस्थितीतून वर आले आहेत आणि गरिबी काय असते याची त्यांना जाणीव आहे. मोदींच्या सरकारने अन्न सुरक्षा कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली आहे आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ दिला म्हणून मणिपूरमधले मतदार खूश आहेत.

गरीब, शेतकरी तसेच मध्यमवर्गाची स्थिती सुधारणे आणि देशाच्या वेगवान विकासाला चालना देणे यावर मोदींचा भर आहे. त्यांनी पंतप्रधान आवास योजनेतून आत्तापर्यंत दोन कोटी घरे दिली आहेत. १२ कोटी शौचालये बांधली गेली आहेत. चार कोटी वीजजोडण्या दिल्या आहेत. चार कोटी नळजोडण्या दिल्या आहेत. त्यांनी जाहीर केलेल्या आरोग्यासाठीच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा ‘आयुषमान भारत योजने’तून ५० कोटी लोकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य दिले गेले आहेत. २४ कोटी मुद्रा कर्ज दिली गेली आहेत. रोजगारनिर्मितीच्या इतर योजनामुळे समाजामधल्या गरीब समाजाचे जगणे आणि नशीबच बदलून गेले आहे.

देशहितासाठी कठोर निर्णय

मध्यमवर्गाला नेहमीच शांतता आणि प्रगती अपेक्षित असते. ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’च्या सरकारच्या काळात अहमदाबाद, वाराणसी, मुंबई, दिल्ली अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवले. मोदी सरकारच्या काळात सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रचंड फरक पडला आहे. दहशतवाद तसेच नक्षलवादाच्या विरोधात या सरकारने उचललेल्या कठोर पावलांमुळे शांतता निर्माण झाली आहे. उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक करण्याच्या तसेच पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोट येथील दहशतवादी तळावर हवाई हल्ला करण्याच्या त्यांच्या निर्णयानंतर देशाकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोनच बदलला आहे. देशहिताचा मुद्दा येतो तेव्हा आपण कठोर निर्णय घेऊ शकतो हे मोदी यांनी जगाला दाखवून दिले आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये ३७० तसेच ३५अ ही कलमे रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. राम मंदिराच्या मुद्द्यावर शांततामय तोडगा काढला. तिहेरी तलाक रद्द करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे मुस्लीम स्त्रियांनी स्वागत केले.

देशामधल्या मध्यमवर्गाला पायाभूत विकास आणि त्याबरोबरच व्यवसायाच्या वाढत्या संधी हव्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, अंतर्गत जलमार्ग, ग्रामीण रस्ते, उडानसारख्या योजना, मोबाइलचे जाळे, डाटा स्वस्त होणे, आयकराचे रिफंड तातडीने मिळणे, जीएसटी, आयबीसी या आणि अशा प्रकारच्या व्यवसायाच्या क्षेत्रातील अनेक सुधारणांमुळे व्यवसाय करणे आणि जगणे सुलभ झाले आहे.

भविष्यवेधी कार्यक्रम

त्यांना राष्ट्रउभारणी करायची आहे. ‘स्वच्छ भारत’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘डिजिटल इंडिया’, ‘राष्ट्रीय सिंचन धोरण’, ‘कौशल्यपूर्ण भारत’, ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन’, ‘अटल इनोव्हेशन मिशन’ आणि ‘टॉयकॅथॉन’ ही त्यातली काही उदाहरणे आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’, ‘स्टार्टअप इंडिया’, ‘स्टॅण्डअप इंडिया’ तसेच ‘मेक इन इंडिया’ हे त्यांनी दिलेले अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रम भविष्यवेधी आहेत. महात्मा गांधी, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस आणि सर्व माजी पंतप्रधान यांची आकर्षक तसेच चांगली संग्रहालये उभी करण्यासाठी ते करत असलेल्या परिश्रमातून त्यांचे देशाला प्रेरणादायी गोष्टी देण्याचे प्रयत्नच दिसून येतात.

लोकांवर विश्वास

राज्यघटनेसमोर नतमस्तक होऊन देश चालवण्यासाठी तीच सर्वोच्च मार्गदर्शक आहे हे त्यांनी ज्या पद्धतीने दाखवून दिले त्यावरून आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची कल्पना येते. आधीच्या सरकारांनी तसेच पंतप्रधानांनी केलेल्या चांगल्या कामांबद्दल त्यांनी वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांनी घेतलेल्या अगदी लहान अशा निर्णयांमधून ते कसा विचार करतात ते समजते. त्यातला एक निर्णय म्हणजे लाल दिव्याची गाडी तसेच व्हीआयपी संस्कृतीपासून दूर राहणे. आणि दुसरा निर्णय म्हणजे दस्तावेजांच्या स्व साक्षांकनाला त्यांनी सामान्य लोकांना दिलेली परवानगी. लोकांवर विश्वास ठेवण्याची ही पद्धत ब्रिटिशांच्या राजवटीत तर पाहायला मिळाली नव्हतीच, पण स्वातंत्र्यानंतरच्या सरकारांमध्येही पाहायला मिळाली नव्हती.

आपण नशीबवान आहोत, म्हणून आपल्याला त्यांना काम करताना पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीमध्ये ते मंत्र्यांना त्यांचे मत विचारतात. मंत्र्यांनी सांगितलेल्या एखाद्या मुद्द्यामध्ये खरोखरच अर्थ वाटला, त्यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे असे वाटले, तर त्यासाठी वेळ घेऊन, आवश्यक ते बदल करून ते तो मुद्दा मंत्रिमंडळापुढे आणतात.

जागतिक पातळीवर सक्रिय

जागतिक व्यासपीठावरदेखील ते अत्यंत सक्रिय असतात. पॅरिसमध्ये त्यांच्या या जागतिक नेतृत्वाचा पैलू मला जवळून बघायला मिळाला. ‘पॅरिस करारा’मध्ये ‘जीवनशैली’ (लाइफस्टाइल) तसेच ‘हवामान न्याय’ (क्लायमेट जस्टिस) या दोन संकल्पनांचा समावेश करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड यशस्वी ठरली.

पर्युषण पर्वाच्या निमित्ताने त्यांनी अलीकडेच ट्वीट केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, क्षमाशीलतेमधून विशाल अंत:करणाचे दर्शन होते. एकमेकांबद्दल चुकीच्या, द्वेषभावना न ठेवणे हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. या ट्वीटमधूनच आपल्या पंतप्रधानांच्या, नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होते.