अनिल बलुनी (राज्यसभा खासदार, भाजपचे प्रमुख राष्ट्रीय प्रवक्ते)
पंजाबमध्ये पंतप्रधानांचा ताफा अडवला काँग्रेसने; पंतप्रधानांच्या जिवाला धोका निर्माण झाला काँग्रेसमुळे; ‘पंजाबियत’चा अपमान केला काँग्रेसने; द्वेषाचे, वैमनस्याचे राजकारण काय असते ते देशालाच नव्हे तर जगालाही या घटनेतून दाखवून दिले ते काँग्रेसनेच..
पंजाबमध्ये आंदोलकांकडून नुकताच (बुधवार, ५ जानेवारी २०२१ ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडवला गेल्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली तिचे वर्णन भारतीय राजकारणातील आजवरची सगळय़ात शरमेची बाब असे करायला हवे. बहुमताने निवडून आलेल्या एका पंतप्रधानांच्याविरुद्ध आपल्याला काहीही करता येत नाही या हतबलतेतून काँग्रेसने केलेले हे कृत्य या पक्षातील लोकांच्या मनात पंतप्रधानांबद्दल किती द्वेषभावना आहे हेच दाखवून देते.
पंतप्रधान नियोजित ठिकाणी हेलिकॉप्टरऐवजी रस्तामार्गे जाणार आहेत ही अत्यंत गोपनीय माहिती पंजाब पोलिसांनी भारतीय किसान युनियनच्या नेत्यांपर्यंत पोहोचवली असे वृत्तांकन काही माध्यमांनी केले आहे. त्यानुसार भारतीय किसान युनियनने स्थानिक पोलीस तसेच प्रशासनाच्या मदतीने पंतप्रधान ज्या मार्गाने जाणार होते त्या मार्गावर त्यांच्या ताफ्याला अडवण्याची योजना आखली. यासंदर्भात मिळालेल्या दृकपुराव्यांमधून पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत असलेले उल्लंघन स्पष्ट दिसून येते. पंजाबमधील काँग्रेस सरकारच्या कामकाजाबाबत इतरही अनेक गंभीर त्रुटी आहेत, त्यांचा या अभूतपूर्व घटनांशी संबंध आहे.
काँग्रेसच जबाबदार
हा सगळा प्रकार काँग्रेसमधील सर्वोच्च पातळीवरील नेतृत्वाने रचला होता हे उघड आहे. सगळय़ात पहिली गोष्ट म्हणजे पंजाबच्या पोलीस प्रमुखांनी पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेला हा सगळा मार्ग निर्जंतुक करण्यात आला आहे असे खोटेच सांगितले. दुसरी गोष्ट म्हणजे, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक हे दोघेही पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी पुरवण्यात आलेल्या ताफ्यात असायला हवे होते. पण ते कुठेही दिसले नाहीत. तिसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधानांचा ताफा संबंधित उड्डाणपुलावर २० मिनिटे अडकला असताना, आपली नियोजित भेट रद्द करण्याची पंतप्रधानांवर वेळ आली असताना, परिस्थितीची कल्पना देण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांना वारंवार दूरध्वनी केला गेला; पण त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. त्यानंतर लगेचच काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने अत्यंत घृणास्पद ट्वीट केले. हा सगळा घटनाक्रम स्वत:च त्या परिस्थितीवर पुरेसा प्रकाश टाकणारा आहे.
लोकांच्या विश्वासाला तडा
इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे आपले दोन नेते तसेच माजी पंतप्रधान दहशतवादी हल्ल्यात गमावणाऱ्या काँग्रेसनेच हे सगळे करावे हे पाहून सगळय़ा देशाला फक्त धक्काच बसलेला नाही तर सगळे देशवासीय भयभीत झाले आहेत. हा दिवस भारताच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवला जाईल. आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पंतप्रधानांचा जीव अशा पद्धतीने धोक्यात घालण्याच्या आपल्या या कृतीतून काँग्रेस किती खालच्या पातळीवर गेली आहे, हेच दिसून येते. पंजाबमधील काँग्रेस सरकारने भारताच्या संघराज्यवादाचा अपमान केला आहे. त्यामुळे सर्व भारतीयांच्या विश्वासाला तडा गेला आहे.
‘पंजाबियत’वर घाला
असे काही घडणे चुकीचे आहे, असे म्हणत पंजाब काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी, सुनील जाखड यांनी त्यांच्या भावना योग्य शब्दांत मांडल्या. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘हे ‘पंजाबियत’च्या विरुद्ध आहे. पंतप्रधान ज्या मार्गाने जाणार होते, तो सुरक्षित आहे याची खात्री करून घ्यायला हवी होती. पण लोकशाहीमध्ये हे सगळे असेच घडते’. ‘पंजाबियत’ हे पंजाबमधील लोकांचे वैशिष्टय़ आहे. पंजाबी लोक मोठय़ा मनाचे, दिलदार असतात. त्यांना सगळय़ांबद्दल प्रेम असते, आदर असतो. देशाच्या उभारणीत बलिदान करून पंजाबी लोकांनी आपले योगदान दिले आहे. ‘पंजाबियत’ हे त्या सगळय़ाचे प्रतीक आहे. पण काँग्रेस सरकारने देशाबरोबरच सगळय़ा जगाला द्वेषाचे, वैमनस्याचे राजकारण म्हणजे काय असते तेच दाखवून दिले आहे. या वागण्यातून या सरकारने देशाच्या घटनेचा अवमान केला आहे. या घटनेचे ‘दुर्दैवी’ असे वर्णन करून, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा म्हणाले: ‘इतिहासापासून आपण धडा घेतला पाहिजे. देशाच्या सर्वोच्च यंत्रणेचे संरक्षण करताना आपण थोडेही आत्मसंतुष्ट असता कामा नये.’ दोन माजी पंतप्रधानांच्या हत्येचे त्यांनी दिलेले संदर्भ पंजाबमधील काँग्रेस सरकार आपले घटनात्मक कर्तव्य पार पाडण्यात कसे अपयशी ठरले आहे, हे अधोरेखित करतात.
मोदींचे मिशन
पंतप्रधानपदी बसलेली व्यक्ती ही कोणत्याही पक्षाची नाही तर संपूर्ण देशाची असते हे मुख्यमंत्री चन्नी आणि काँग्रेसमधील त्यांचे वरिष्ठ कसे विसरले, हेच या घटनेतून दिसून येते. भारताला महासत्ता बनवण्याचे, ‘विश्वगुरू’चे स्थान भारताला पुन्हा प्राप्त करण्याचे ध्येय बाळगून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाटचाल करत आहेत. हे मिशन हेच त्यांचे ध्येय आहे. देशाचा विकास हेच त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. देशातील वेगवेगळय़ा राज्यांमध्ये कोणत्याही पक्षाची सत्ता असो, नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन प्रत्येक राज्याला विकासाच्या, प्रगतीच्या पथावर नेतो आहे. मोदी सरकारच्या धोरणांचा आणि कार्यक्रमांचा सर्वाधिक फायदा झालेल्या राज्यांमध्ये पंजाबचाही समावेश आहे.
काँग्रेसची शत्रूशी हातमिळवणी
त्यांचा पंजाब दौरा राज्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल होते. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकात जाऊन ते आदरांजली अर्पण करणार होते. पण पंतप्रधान मोदींबद्दलचा द्वेष आणि वैर यामुळे काँग्रेस नेतृत्व तसेच चन्नी सरकार इतके आंधळे झाले आहेत की ते उघडपणे भारताच्या शत्रूंशी हातमिळवणी करू लागले आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते चीन आणि पाकिस्तानची प्रचारयंत्रे बनले आहेत. गलवान खोऱ्यातील मे २०२० मधील चकमकीबद्दल काँग्रेसच्या ‘युवराजां’नी मध्ये केलेले ट्वीट हे त्याचे अगदी अलीकडचे उदाहरण आहे. काँग्रेसने आता जर स्वत:मध्ये सुधारणा केली नाही तर देशातील लोक त्यांना कायमचे विस्मृतीत टाकतील.