डॉ. बलराम भार्गव ( भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर)चे महासंचालक)

‘कोव्हॅक्सिन या भारतात बनलेल्या लशीच्या प्रत्येक टप्प्यावरील चाचण्यांबाबतचे निष्कर्ष वेळोवेळी वैज्ञानिक संशोधन पत्रिकांमध्ये मांडले गेले- अशा एकंदर १५ पत्रिकांमधून ‘कोव्हॉक्सिन’विषयीचे लेख प्रकाशित झाल्यावर जगभरच्या शास्त्रज्ञांची प्रशंसाही मिळाली.. यापुढला टप्पा हा अन्य रोगांवरील लशींचे संशोधन भारतात करण्याचा ठरू शकतो आणि जगभरात आपण लसपुरवठा करू शकतो’ असे सांगणारा लेख..

लसीकरण मोहीम राबवण्यामध्ये सहभागी झालेले, महासाथीच्या काळात कोणतीही उसंत न घेता जीव धोक्यात घालून काम करणारे आपले आरोग्य सेवा व्यावसायिक आणि आघाडीचे कर्मचारी यांची अतिशय समर्पित वृत्ती आणि अथक प्रयत्न हेच आपल्या लसीकरण मोहिमेच्या यशामागच्या प्रमुख कारणांपैकी पहिले कारण आहे आणि त्यामुळेच आपण ही असामान्य कामगिरी करू शकलो आहोत. या यशाचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या अनेक दशकांपासून आपल्याकडे अर्भके, बालके आणि नव्या माता यांच्यासाठी राबवल्या जात असलेल्या जगातील सर्वात मोठय़ा सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेल्या प्रदीर्घ अनुभवाने आपल्या आरोग्य मंत्रालयाला अशा प्रकारची मोहीम राबवण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज बनवले होते. तिसरी बाब म्हणजे सरकारच्या विविध शाखांनी ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्याच्या एकमेव उद्देशावर लक्ष केंद्रित करून बाळगलेल्या समग्र दृष्टिकोनाचे या प्रवासात मोलाचे योगदान राहिले. निती आयोग, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), एनईजीव्हीएसी (नॅशनल एक्स्पर्ट्स ग्रुप ऑन व्हॅक्सिन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-१९; स्थापना : १२ ऑगस्ट २०२०) सारखे तज्ज्ञांचे गट, अधिकारप्राप्त समित्या आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयासारखी मंत्रालये अशा सर्व संबंधित यंत्रणांमध्ये यासंदर्भात अतिशय प्रभावी ताळमेळ पाहायला मिळाला आणि त्यांच्या कामामुळे सहकार्य आणि समन्वय यांचा नवा आदर्श निर्माण झाला.

यशांची मालिकाच

सरकार म्हणून पूर्ण ताकदीने काम करण्याच्या या क्षमतेमुळे आणि त्याच वेळी जिथे गरज भासेल तिथे सार्वजनिक- खासगी भागीदारीचा (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) अतिशय यशस्वी वापर केल्यामुळे या पराकोटीच्या अनिश्चिततेच्या कालखंडातही एकामागोमाग एक यशाची मालिकाच निर्माण झाली. मग कोविन पोर्टलचा विकास असो किंवा विविध वयोगटांना लसीकरणासाठी प्राधान्य देताना आपण अवलंबलेली तर्कसंगती असो, लहान लहान पावले टाकताना अनेक पावले योग्य दिशेने पडत गेली आणि या महाकाय लसीकरण कार्यक्रमामध्ये त्यांच्या मदतीने देशाला कोविड प्रतिबंधक लशींच्या १०० कोटी मात्रांचा ऐतिहासिक टप्पा गाठणे शक्य झाले.

 त्यापलीकडे जाऊन पाहायचे झाले तर या काळात देशाने सार्वजनिक आरोग्यासाठी अतिशय सुस्पष्ट वचनबद्धतेचे दर्शन घडवले आणि त्याचे परिणाम दिसून आले. कोव्हॅक्सिन या लशीचा विकास आणि या भागीदारीमध्ये पूर्णपणे विश्वास दाखवण्याची तसेच सार्वजनिक आणि खासगी भागीदारांमध्ये परस्परांच्या क्षमतांचा सन्मान करण्याची वृत्ती हे अतिशय महत्त्वाचे पैलू आहेत, असे मला वाटते. आयसीएमआर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने भारत बायोटेकवर टाकलेला विश्वास आणि भारत बायोटेकला आयसीएमआरविषयी असलेला विश्वास अशा दोन्ही बाजू याबाबतीत महत्त्वाच्या ठरल्या.

लसनिर्मितीच्या अगदी सुरुवातीलाच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने अगदी स्पष्टपणे ठरवले होते की आपण पूर्णपणे शास्त्रीय दृष्टिकोनाचा आधार घेतलाच पाहिजे आणि आपण जे काही करू त्याची वैज्ञानिक संशोधन-पत्रिकांमध्ये नोंद झाली पाहिजे. आता आपल्याला माहीत आहेच की १५ हून अधिक जास्त पत्रिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या कोव्हॅक्सिनवरील शास्त्रीय दाखल्यांची आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक समुदायाने प्रशंसा केली आहे. या पत्रिका म्हणजे अतिशय उच्च मान्यताप्राप्त असलेली आणि सर्व प्रकारच्या शास्त्रीय शोधांची तज्ज्ञांकडून पडताळणी करणारी जागतिक वैज्ञानिक प्रकाशने आहेत. मग ती पडताळणी वैद्यकीय चाचण्यांपूर्वीच्या अभ्यासाची असो, लहान प्राण्यांवरील अध्ययन असो, हॅम्स्टर अध्ययन, मोठय़ा प्राण्यांवरील अध्ययन, जगातील सर्वात मोठय़ा टप्प्यांपैकी एक असलेल्या तिसऱ्या टप्प्यांमधील चाचण्यांसह सर्व टप्प्यांमधील वैद्यकीय चाचण्या आदींच्या पडताळणीचा त्यात समावेश आहे. या अभ्यासामध्ये विषाणूच्या नव्याने तयार होणाऱ्या अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा या उत्परिवर्तकांवरील कोव्हॅक्सिन लशीच्या परिणामकारकतेच्या अभ्यासाचाही समावेश आहे.

थोडक्यात, कोव्हॅक्सिन लस सहनिर्मितीचा अनुभव हा देशातील विज्ञान क्षेत्र समृद्ध करणारा तसेच सार्वजनिक आरोग्याचा विकास करणारा ठरला आहे.

नवनव्या लशी

सर्वात पहिली बाब म्हणजे या अनुभवातून आमच्यात हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे की भारत जगाचे औषधी भांडार असण्याबरोबर आता एक लस उत्पादक महासत्तादेखील ठरली आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सामग्रीच्या मदतीने नवनव्या लशी तयार करण्याचा जो आत्मविश्वास याद्वारे तयार झाला आहे त्याने उद्योग आणि या क्षेत्रातील अध्ययनकर्त्यांना व्यापून टाकले आहे आणि इतर आजारांसाठी लशी तयार करण्यासाठी या अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करण्याची आणि उत्पादन मोठय़ा प्रमाणावर वाढवण्याची हीच योग्य वेळ आहे.

केवळ भारतीय लोकसंख्येसाठीच नव्हे तर जागतिक लोकसंख्येसाठी या लशी मोठय़ा प्रमाणावर तयार करण्याचा विचार झाला पाहिजे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणजे ‘हे विश्वचि माझे घर’ या सिद्धांताला अनुसरून हे प्रयत्न झाले पाहिजेत.

निधी पुरवला गेला, तर..

दुसरी बाब म्हणजे जेनेरिक- पर्यायाने, सर्वाना परवडतील अशी- औषधे तयार करणारा देश म्हणून भारताची ओळख गेल्या अनेक दशकांपासून निर्माण झालेली आहेच. यात भर टाकणारा, कोविड-१९ मधून मिळालेला अनुभव म्हणजे आपल्या मूल्यसाखळीला चालना देणारा आणि अगदी सुस्पष्टपणे सांगायचे झाले तर औषधांचा शोध आणि लशींच्या शोधाच्या अवकाशात मोठी झेप घेण्यासाठी ऊर्जा पुरवणारा घटक ठरला आहे. जर हे प्रत्यक्षात आणायचे असेल तर उद्योग आणि या क्षेत्रातील संबंधित संशोधक, शिक्षण, अध्ययन यांचा समावेश असलेली परिसंस्था यांना मोठय़ा प्रमाणावर परस्परांशी सहकार्य करावे लागेल. ही प्रक्रिया आपल्याकडे अभियांत्रिकी क्षेत्रात आधीपासून सुरू झाली आहे जिथे आयआयटीमधील प्राध्यापक सल्लागारांचे काम करतात आणि नवनिर्मितीमध्ये सहभाग घेतात. पण जैववैद्यकीय क्षेत्रात आणि वैद्यकशास्त्रात अशा प्रकारची  यंत्रणा आपल्याकडे अद्याप सुस्थापित व्हायची आहे. या अवकाशातील संबंधित असलेले आपले संशोधक, मार्गदर्शक आणि होतकरू विद्यार्थी यांना प्रोत्साहनपर निधी पुरवला गेला पाहिजे आणि त्यांच्या बौद्धिक संपदेतून तयार होणाऱ्या उत्पादनांचा लाभ मिळाला पाहिजे, जेणेकरून त्यांना नवोन्मेषासाठी प्रेरणा मिळेल. आपल्याला हे मार्ग अद्याप तयार करायचे आहेत. मला असे वाटते की सध्या आपली प्रणाली अतिशय चांगल्या प्रकारे तेल-पाणी वंगण लावल्यामुळे अतिशय उच्च गतीने फिरणाऱ्या यंत्राप्रमाणे काम करत आहे आणि झपाटय़ाने लसीकरण करत आहे आणि आपण त्या लक्ष्याच्या दिशेने झपाटय़ाने वाटचाल करत आहोत. संपूर्ण जगाचे आपल्याकडे लक्ष लागलेले आहे आणि आपली लसीकरण मोहीम केवळ वेगवानच नाही, तर अतिशय जबाबदार आणि प्रतिसादकारकदेखील आहे याचे ते साक्षीदार असेल, असे मला वाटते.

Story img Loader