स्मृती इराणी
केंद्रीय मंत्री- बालविकास आणि वस्त्रोद्योग
देशातले अत्युच्च पद आज त्यांच्याकडे आहे, शतकातून एकदाच एखाद्याला मिळू शकेल इतकी विराट लोकप्रियताही त्यांच्याकडे आहेच, तरीही भपकेबाजीचा सोस तसेच जटिल परिभाषा वापरण्याचा मोह पंतप्रधान मोदी नेहमीच टाळतात; याचे एक सातत्यपूर्ण उदाहरण म्हणजे ‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रम…
विश्वातील सर्वाधिक शक्तिशाली नेत्यांपैकी एक असल्यामुळे एकाच वेळी अनेकानेक महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या व्यापातूनसुद्धा मुलांशी हितगूज करून आपल्या अनुभवाचे ज्ञानसंचित मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते आवर्जून वेळ काढतात, याचे कुणालाही आश्चर्यच वाटेल. पण ते खरोखरीच्या अर्थाने मार्गदर्शक आहेत, गुरुतुल्य सल्लागार आहेत, म्हणूनच आज नव्हे तर वर्षानुवर्षे परीक्षेस सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाचा ‘बूस्टर डोस’ देण्याचा परिपाठ त्यांनी कायम राखला आहे.
‘परीक्षा पे चर्चा’ ऐकून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो, यात काही नवल नाहीच. विद्यार्थ्यांच्या संपर्कातील प्रत्येक जण जेव्हा परीक्षा, निकाल आणि पुढली वाटचाल किंवा ‘करिअर’च्या चर्चेतच गुरफटलेला असतो तेव्हाच विद्यार्थ्यांना, समतोलपणाची जाण आणि दूरदृष्टी असलेला पुरुष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दर्शन घडते. मोदीजी आपल्या प्रत्यक्ष आयुष्यातील अनुभवांचे सार काढून विद्यार्थ्यांपुढे ठेवतात, त्यामुळेच तर जीवनाविषयीचे जे धडे मोदीजींकडून विद्यार्थ्यांना मिळतात.
असामान्य क्षमता
‘‘इन्व्हॉल्व्ह, इंटर्नलाइज, असोशिएट और व्हिज्युअलाइज। मेमरी को शार्प करने के लिए इस फॉम्र्युला पर आप चल सकते है।’’ अशा साध्यासोप्या शब्दांत मोदीजींनी दिलेला स्मरणशक्ती-वर्धनाचा मंत्र असो की पालकांनी केवळ तरुण दिसण्याचा प्रयत्न न करता पिढीतील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करावा, हा मोदीजींनी पालकांना दिलेला सल्ला असो; संपूर्ण देशभरात राहून जी विशाल अनुभवसमृद्धता मोदीजींना प्राप्त झालेली आहे, त्याचीच ही फळे आहेत. ते जे सांगतात, ते ऐकायला साधेसोपे जरूर वाटते; पण प्रत्यक्षात, मोदीजींनी जीवनभर जे मनुष्यनिरीक्षण केले, त्या संचिताचा हा परिणाम आहे. दैनंदिन घडामोडींचे निरीक्षण करून त्यातून अंतर्दृष्टीचे धडे देण्याची मोदीजींची क्षमता असामान्य आहे.
मोदीजींच्या जीवनग्रंथातील एक पान यंदाच्या ‘परीक्षा पे चर्चा- २०२१’मध्ये तेव्हा दिसले, जेव्हा कठीण वाटणारे प्रश्न आणि कठीण विषय परीक्षेत येतात तेव्हा काय करायचे, असा प्रश्न त्यांना विचारला गेला. ‘‘किसी भी विषय के कठिन अंश को अनदेखा नहीं किया जाना चाहिए बल्कि उसका समाधान तब करना चाहिए जब आपका मन तरोताज़ा हो।’’ एवढेच न सांगता ते म्हणाले की, पंतप्रधान आणि त्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री असताना स्वत: त्यांनीदेखील, मन ऊर्जावान असतानाच कठीण विषय हाताळण्याचे तत्त्व अंगीकारलेले होते. ज्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार असतील किंवा जे काही जटिल वाटत असेल, त्याचा निपटारा ते सकाळी- मन ऊर्जावान आणि स्वस्थ अवस्थेत असताना- करतात. जे सोपे वाटते आणि ज्यात त्रुटी राहण्याची शक्यता नगण्य आहे, अशा गोष्टी आपण नंतरही करू शकतो, असे ते सांगतात. सोपे ते आधी करायचे आणि मग कठीण विषयांकडे वळायचे, या आपणा सर्वांच्या नेहमीच्या ऊर्मीपेक्षा हे अगदी निराळे आहे. पण मुळात आपण स्वभावत:च कठीण कर्तव्यांना घाबरत असतो आणि म्हणून चालढकल करण्याकडे किंवा अशी आव्हाने थंड्या बस्त्यात टाकण्याकडे आपला कल असतो.
सामान्य-जनांशी संवाद
स्वत:ची जी उदाहरणे मोदीजी देतात, त्यांमधून शिखरावर पोहोचलेल्या मनुष्याविषयीची अंतर्दृष्टी आपणा सर्वांना मिळतेच; पण या यशामागे मोठा संघर्ष, निराश करणारे अनेक प्रसंग आणि त्या सर्वांमधून मार्ग शोधण्याची ऊर्मी आहे, याचाही बोध होतो. त्यामुळेच तर, मानवी वर्तनाचे आणि त्यामागच्या हेतू-प्रेरणांचे सखोल विश्लेषण मोदीजी जेव्हा करीत असतात, तेव्हा सामान्य माणसांना चटकन ते आपलेसे वाटू लागतात.
उदाहरणार्थ, पंजाबमधील लुधियानाच्या प्रतिभा गुप्ता या उघडच जेरीस आल्यासारख्या दिसणाऱ्या मातेने पंतप्रधान मोदीजींना विचारलेला प्रश्न. मुलांनी काही करावे असे आपल्याला वाटत असते पण त्यासाठी सारखे मुलांच्या मागे लागावे लागते, अशी या मातेची खंत. किंबहुना सर्वच पालकांची स्थिती या मातेसारखीच असते. पालक मुलांमागे धोषा लावत असतात आणि मग मुले एक तर आपल्याच कोषात जातात किंवा असे काही वागतात की पालकांना अधिकच त्रास होतो. मात्र पंतप्रधानांचे या प्रश्नावरील उत्तर, हा प्रश्न सुरू कोठून होतो यावर पालकांना विचार करायला लावणारे आहे.
मुलामधील अद्वितीय विशेष गुण ओळखण्याऐवजी, मुलांना ठरावीक सामाजिक संकेत व साच्यांच्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न पालक करीत असतात. यावर मोदीजींनी ‘ट्रेनिंग’चे महत्त्व योग्यरीत्या सांगितले- ‘‘एक बार बच्चे का मन ट्रेन हो जाएगा तब उसके बाद मोटिव्हेशन का समय शुरू होगा।’’, ‘‘आपका बच्चा स्वयंप्रकाशित होना चाहिए। बच्चे के अंदर जो प्रकाश आप देखना चाहते हे, वो प्रकाश उनके भीतर से प्रकाशमान होना चाहिए। और वो आपके जाग्रत सक्रिय प्रयासों से संभव है, आप अपने अॅक्शन में जो बदलाव दिखाएंगे वो बच्चे बहुत बारीकी से ऑब्झव्र्ह करेंगे।’’ यासाठी पालकांनीही, मुलांमध्ये चांगल्या सवयी बाणवण्यासाठी सर्जनशील मार्ग शोधायला हवे. मग मुलाला दैनंदिन जीवनातूनही प्रेरणा मिळण्याची शक्यता वाढेल. यामुळे केवळ पालकांचे श्रमच वाचतील असे नव्हे तर मुले आणि पालक यांच्यादरम्यान एक सकारात्मक, अधिक खुले वातावरण तयार होऊन तणाव किंवा भय यांना जागाच उरणार नाही.
दोन्ही नाहीत, निरीक्षण आहे!
मुलांच्या मनाविषयी एवढी सखोल अंतर्दृष्टी बहुतेकदा एखाद्या बालमानसशास्त्रज्ञालाच असू शकते किंवा स्वत: मुलाची आई वा वडील झालेल्यांना तरी असू शकते. पंतप्रधान मोदी हे या दोन्ही श्रेणींमध्ये बसत नाहीत. मात्र मोदीजींचे ज्ञान हे पुस्तकांमधून आलेले नसून, विशेषत: मुख्यमंत्री होण्याआधी त्यांनी देशातील प्रत्येक राज्यात जे जीवनानुभव मिळवले, त्यातून आलेले आहे. देशभरातील कित्येक कुटुंबांचे निरीक्षण मोदीजींनी किती जवळून केलेले असेल, याचे प्रत्यंतर मनुष्यस्वभावांची जी पारख मोदीजी करतात त्यातून मिळते.
देशातले अत्युच्च पद आज त्यांच्याकडे आहे, शतकातून एकदाच एखाद्याला मिळू शकेल इतकी विराट लोकप्रियताही त्यांच्याकडे आहेच, तरीही भपकेबाजीचा सोस तसेच जटिल परिभाषा वापरण्याचा मोह पंतप्रधान मोदी नेहमीच टाळतात. अत्यंत शक्तिशाली अशा नेत्यांच्या वर्तुळात वावरल्यानंतरसुद्धा, भारतातील प्रत्येक कुटुंबाचा भाग असलेल्या व्यक्तीप्रमाणे विचार करण्याची दुर्मीळ क्षमता त्यांच्याकडे आहे.
मोदीजींची पाळेमुळे जमिनीवरील वास्तवामध्ये सखोल रुजलेली आहेत. मोदीजींचा आवाज हा सामान्य माणसाचा आवाज आहे. मोदीजींची मूल्ये ही तर कोणत्याही सरासरी भारतीय कुटुंबात सर्वोत्कृष्ट मूल्ये कोणती असावीत, याचे प्रत्यंतर देणारी आहेत. भारतीय संस्कृतीच्या विकासाला धारण करणाऱ्या मृद्गंधी शहाणिवेतून मोदीजींचे वास्तविक ज्ञान प्रसृत होत असते.