एल. मुरुगन -केंद्रीय राज्यमंत्री – माहिती व प्रसारण, मत्स्यव्यवसाय, पशुधन व दुग्धव्यवसाय
आदिवासींच्या सन्मानासाठी बंड करणारे बिरसा मुंडा यांना ‘भगवान’ संबोधून, त्यांचा जन्मदिवस हा ‘जनजातीय गौरव दिन’ पाळून मोदी सरकारने दूरदृष्टीच दाखविली आहे..
‘आझादी का अमृत महोत्सव’ या नावाने देशभरात स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे केले जात असताना, दमनकारी ब्रिटिश राजवटीपासून मातृभूमीचे निडरपणे रक्षण करणाऱ्यांच्या आकाशगंगेत एक नाव तेज:पुंज ठरते, ते म्हणजे भगवान बिरसा मुंडा. बिरसा मुंडा यांचे आयुष्य अवघ्या २५ वर्षांचे; परंतु पराक्रमी. अन्याय आणि दमनाविरुद्ध लढय़ांसाठी केलेल्या धाडसी प्रयत्नांनी भरलेली त्यांची जीवनगाथा म्हणजे, वसाहतवादाविरुद्ध उमटलेला एक बुलंद आवाज.
उलीहातु या आज झारखंडमध्ये असलेल्या गावात १५ नोव्हेंबर १८७५ रोजी बिरसा मुंडा यांचा जन्म झाला. मुंडा ही आदिवासी जमात आणि बिरसा यांचेही बालपण गरिबीतच गेले. याच सुमारास, ब्रिटिशांनी मध्य व पूर्व भारतातील घनदाट जंगलांचेही शोषण सुरू केल्यामुळे निसर्गाशी एकरूप जीवन जगणाऱ्या आदिवासींच्या मुळावरच घाला आला होता. छोटा नागपूर भागातील आदिवासींची मूळची ‘खुंटकट्टी’ शेती पद्धत नष्ट करून ब्रिटिशांनी त्याऐवजी तेथे जमीनदारी पद्धत आरंभली होती. ब्रिटिशांमुळेच या आदिवासी भागात सावकार, कंत्राटदार तसेच सरंजामी जमीनदार म्हणून बिगरआदिवासी आले आणि ब्रिटिशांना हे बिगरआदिवासी भारतीय या भागाच्या शोषणासाठी मदत करू लागले. त्याच वेळी मिशनऱ्यांच्या कारवायाही ब्रिटिशांच्या वरदहस्ताने निर्गलपणे चालूच राहिल्या, त्यामुळे आदिवासींच्या धार्मिक-सांस्कृतिक स्वत्वावरही घाव बसू लागले होते.
हे सारे लहान वयातच बिरसा पाहात होते. वसाहतवादी शक्ती आणि ‘डिकू’ (आदिवासींचे शोषण करण्यासाठी बाहेरून आलेले बिगरआदिवासी) यांनी मिळून आपले जगणे कसे धोक्यात आणले आहे हे बिरसा यांना उमगू लागले. यामुळेच, ही अभद्र युती (आदिवासींचे ब्रिटिश व भारतीय शोषक) मोडून काढण्याचा त्यांचा निर्धार पक्का होत गेला.
बिरसा लहान असतानाच, १८८० च्या दशकात ब्रिटिशांकडून आदिवासींचे हक्क परत मिळवण्यासाठी ‘सरदारी लराई’ ही चळवळ याच भागात सुरू झाली होती. या लढाईचे मार्ग अहिंसक होते. अर्जविनंत्या करण्यावर भर होता. दमनकारी ब्रिटिश राजवटीने या मागण्यांकडे दुर्लक्षच केले. जमीनदारी पद्धत फोफावतच गेली, त्यामुळे जो आदिवासी जमीनमालक होता तो आता शेतमजूर झाला; इतकेच नव्हे तर वेठबिगार म्हणून राबू लागला. आदिवासींचे शोषण इतके वाढले की सहनशक्तीचा कडेलोट कधी ना कधी होणारच होता.
या अशा पार्श्वभूमीचे पर्यवसान म्हणजे बिरसा मुंडा यांनी आदिवासींसाठी झटून उभे राहणे. त्यांच्या लढय़ाला धर्माचे अंगसुद्धा होतेच. हा लढा आदिवासी जीवनशैली आणि संस्कृती यांना हीन लेखणाऱ्या मिशनऱ्यांविरुद्ध होता. दुसऱ्या बाजूला, आदिवासींच्या काही धर्मप्रथांमध्ये सुधारणा करण्याचा तसेच अंधश्रद्धायुक्त रिवाजांना फाटा देण्याचा प्रयत्नही बिरसा मुंडा यांनी केला. आदिवासींची अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी बिरसा यांनी नवी तत्त्वे व प्रार्थनांचा उपयोग केला. ‘सिरमरे फिरन राजा जाई’ (आदिवासींच्या राजाचा विजय असो) या घोषणेतून आपला प्रांत हा आदिवासींची स्वायत्त मालकी असलेला भूभाग आहे, हे बिरसा मुंडा यांनी ठसविले. बिरसा अल्पावधीत लोकनेते झाले, त्यांना आदिवासी भाषेत ‘धरती आबा’ किंवा हिंदीत ‘भगवान’ म्हणू लागले.
बिरसा यांना खरा शत्रू कोण हे माहीत होते. ‘डिकू’ किंवा बिगरआदिवासींइतकेच, जमीन बळकावून शोषणाला सिद्ध झालेले ब्रिटिश हे मोठे शत्रू होते. ‘अबुआ राज सेतार जाना, महारानी राज तुंडू जाना’ (आपले राज्य पुन्हा येवो, राणीचे (ब्रिटिश) राज्य संपून जावो) इतकी स्पष्टता त्यांच्याकडे होते. त्यांची मुंडा जमातच नव्हे तर अराओन तसेच अन्य आदिवासी जमाती आणि शोषणाचे बळी ठरलेल्या बिगरआदिवासी जमाती यांचा प्रतिसादही बिरसा यांच्या ‘उलगुलान’ला, म्हणजे वसाहतवादी ब्रिटिश आणि या सत्ताधाऱ्यांच्या साथीने आर्थिक शोषण करणाऱ्या ‘डिकूं’विरुद्ध पुकारलेल्या बंडाला होता. भुईभाडे द्यायचे नाही, असे आवाहन बिरसा यांनी लोकांना केले तसेच जमीनदारांच्या, मिशनऱ्यांच्या आणि वसाहतवाद्यांच्या ठाण्यांवर हल्ले चढवण्यात आले. केवळ पारंपरिक धनुष्यबाण वापरणाऱ्या मध्य व पूर्व भारतातील आदिवासींनी, तोफा-बंदुका असलेल्या ब्रिटिशांशी पुकारलेले हे युद्ध होते.
हे करताना बिरसा यांनी एवढी काळजी नक्कीच घेतली की, हल्ले खऱ्या शोषकांवरच व्हावेत आणि सामान्यजनांना त्रास होऊ नये. बिरसा यांच्यात लोकांनी शौर्य आणि दैवीपणा पाहिला. मात्र काही काळाने ब्रिटिश पोलिसांनी बिरसा यांना पकडले आणि कोठडीत डांबले, ९ जून १९०० रोजी कोठडीतच त्यांनी प्राण सोडला. परंतु भगवान बिरसा मुंडा यांचा लढा व्यर्थ गेला नाही. आदिवासींचे शोषण आणि त्यांची दु:खे यांची दखल ब्रिटिशांना घ्यावीच लागली आणि आदिवासींचे हितरक्षण करणारा ‘छोटा नागपूर टेनन्सी अॅक्ट- १९०८’ लागू झाला. आदिवासींची जमीन बिगरआदिवासींना हस्तांतरित करण्यावर या कायद्यामुळे सन १९०८ पासून निर्बंध लागू झाले. त्यामुळे हा कायदा आजही, आदिवासींच्या हक्करक्षणासाठी महत्त्वाचा ठरतो. वेठबिगारी किंवा श्रमसक्तीची प्रथा बंद करण्यासाठीदेखील ब्रिटिशांनी पावले उचलली.
आज बिरसा मुंडा यांच्या मृत्यूनंतर १२१ वर्षांनीही, ‘भगवान बिरसा मुंडा’ यांची प्रेरणा कोटय़वधी भारतीयांना मिळते आहे. धैर्य, शौर्य आणि नेतृत्व या गुणांचे दर्शन त्यांच्या प्रतिमेतून होते. सांस्कृतिक समृद्धी आणि परंपरांची थोरवी यांसाठी लढणारे; परंतु प्रसंगी सुधारणेपासून मागे न हटणारे असे त्यांचे नेतृत्व होते.
भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वांपैकी बिरसा मुंडा हे होत. भारताच्या स्वातंत्र्यलढय़ात विविध आदिवासी समूहांचाही सहभाग मोठा होता- मुंडा, ओराओन, संथाळ, तमार, भिल्ल, खासी, कोया, मिझो.. अशा आणखीही कित्येक जमाती लढल्या. अतुलनीय धैर्य आणि सर्वोच्च त्याग यांची प्रेरणा या साऱ्या आदिवासी समाजांचे लढे सर्वच भारतीयांना देत राहिले. तरीदेखील, प्रस्थापित इतिहासकारांनी मात्र स्वातंत्र्यलढय़ातील आदिवासींच्या या प्रचंड योगदानाकडे दुर्लक्षच केले. आपले द्रष्टे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी अशी की, ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करताना आपल्या स्वातंत्र्यलढय़ातील दुर्लक्षित नायकांच्या शौर्याचा व त्यागाचा अभ्यास करा, ते गुण समजून घ्या, असे आवाहन त्यांनी भारतीयांना केले. त्यांच्या क्रियाशील नेतृत्वाखाली पहिल्यांदाच, भगवान बिरसा मुंडा यांच्या १५ नोव्हेंबर या जन्मदिनी ‘जनजातीय गौरव दिवस’ पाळून आदिवासी अस्मिता आणि त्यांचे योगदान यांना औचित्यपूर्ण मानवंदना देण्यात आली.
यंदाचा हा पहिलावहिला जनजातीय गौरव दिवस भारतातील आदिवासी समाजांनी आपापला सांस्कृतिक वारसा तसेच शौर्य, आतिथ्य आणि राष्ट्रगौरव यांच्या परंपरा टिकवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची जाण ठेवून साजरा होतो आहे!